अमोल गोष्टी - 4

  • 8.4k
  • 1
  • 3.3k

एका समुद्रकाठी एक लहान नाही, मोठे नाही असे गाव होते. समुद्रकिनारा फारच सुंदर होता. समुद्रकिना-यावर शिंपा-कवडयाची संपत्ती किती तरी विखुरलेली असे. किना-यालगतच एक लहानशी टेकडी होती. या टेकडीवर नाना प्रकारच्या समुद्रतीरावर उगवणा-या वेली वगैरे होत्या. या टेकडीवरून एकीकडून झाडीतून वर डोके काढणारी गावातील घरांची शिखरे, तर दुसरीकडे अफाट दर्या पसरलेला, असे मनोहर दृश्य दिसे. दूरवर पसरलेला तो परमेश्वराचा पाणडोह व त्यावर हंसाप्रमाणे पोहणारी ती शेकडो गलबते यांची मोठी रमणीय पण भव्य शोभा दिसे. सायंकाळ झाली म्हणजे गावातील मुले-मुली आपले चित्रविचित्र पोशाख करून येथील वाळवंटात किंवा टेडीवर खेळण्यास येत. टेकडीवरून घसरगुंडी करून खाली घसरत येण्याची मुलांना फार गंमत वाटे. सायंकाळी मावळत्या सूर्याचे सुंदर सोनेरी किरण लाटांशी शेवटची खेळीमेळी करताना पाहून आनंद होई. सूर्याचा तांबडा गोळा समुद्रात दूर क्षितिजाजवळ गडप होताना व त्या वेळची हिरवी निळी कांती दिसताना मनात शेकडो विचार उत्पन्न होत. रात्रीच्या वेळी तर समुद्राचा देखावा फरच सुंदर दिसे.