अमोल गोष्टी - 13

  • 7.1k
  • 2.8k

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. भगवान बुध्द त्या काळी अवतरले होते, व सर्व लोकांस सदुपदेश करून सन्मार्ग दाखवीत होते. एकवीस वर्षे वयाचा एक तरुण ब्रह्मचारी होता. त्याच्या तोंडावर अग्नीसारखे तेज होते. तो विद्वान व बुध्दिमंत होता. लोकांनी आपल्या हुषारीची तारीफ करावी म्हणून त्यास अधिकाधिक शिकण्याची इच्छा असे. त्याने देशोदेशी नवीन ज्ञान मिळविण्यासाठी प्रवास केले. तक्षशिला, राजगृह, कौसंबी, उज्जयिनी वगैरे तत्कालीन सर्व विद्यापीठांतून तो निरनिराळया शास्त्रांत पारंगत होऊन आला. जे जे नवीन पाही, ते ते स्वतःस यावे असे त्याला वाटे, ते शिकण्याचा तो प्रयत्न करी व त्यास ते प्राप्त होई.