दुःखी.. - 3

  • 7.2k
  • 2.7k

लिलीची आई हिंडत हिंडत एका शहरात आली. तेथे एक मोठा कारखाना होता. त्या कारखान्यात तिला नोकरी मिळाली. एका लहानशा खोलीत ती राहात असे. काटकसरीने वागत असे. आपल्या मुलीसाठी पैन् पै शिल्लक टाकीत असे. या कारखान्याचा मालक फार उदार होता. त्याचा इतिहास मोठा विचित्र होता. तो या शहरात कधी, कोठून आला ते कोणास फारसे माहीत नव्हते. तो खूप श्रीमंत होता परंतु त्याला मूलबाळ कोणी नव्हते. त्याला कोणीच नव्हते. तो एकटाच होता. एका मोठया बंगल्यात तो राहात असे. त्याने अनेक धर्मशाळा बांधल्या. अनेक सार्वजनिक विहिरी खणविल्या. त्याने मोफत दवाखाने घातले. अनाथालये उघडले. जिकडेतिकडे त्याची कीर्ती पसरली. सरकारी अधिकारी त्याला मान देत, जनता त्याच्यावर प्रेम करी.