चांदी !

  • 2.6k
  • 833

मी मायाच्या लगामाला हलकेच हिसका दिला. तिने आनंदाने मान डोलावली आणि दुडक्या चालीने मार्गस्थ झाली. तिच्या गळ्यातली घंटी खूळ खूळ वाजत होती. किर्रर्र अंधारी रात्र होती. टिप्पूर चांदणं पडलं होत. आभाळात आज चांदण्यांचं राज्य होत. पण चंद्राचा पत्ता नव्हता. कारण आज अमावस्या होती. आमचं गाव या आडबाजूच्या रेल्वे स्टेशन पासून चांगलं सात आठ कोस लांब आहे. पक्कीच काय कच्चा रास्ता पण नाही. कुठं पाय वाट, तर कुठं गाडी वाट इतकंच. सगळा मामला डोंगर -दऱ्याचा अन माळ रानाचा. वाटेत दिवसा अंधार वाटावा असे निबिड जंगल! या स्टेशन वर रात्री अकराला आणि पहाट तीन ला, एक एक गाडी शिट्टी मारून जाते. बाकी शुकशुकाटच असतो.