Brotherhood of children in the age of technology in Marathi Motivational Stories by पूर्णा गंधर्व books and stories PDF | तंत्रज्ञान युगातील मुलांचे भावविश्व

तंत्रज्ञान युगातील मुलांचे भावविश्व

संध्याकाळची वेळ ऑफिसमधून दमलेला मध्यम वर्गीय पती घरी येतो. एवढ्यात उपनगर ते शहर असा प्रवास करून थकलेली आणि ऑफिसच्या कामाने वाकलेली त्यांची पत्नी सुध्दा घरी येते . काही वेळाने भाऊ पण घरी येतो. भावाची गृहिणी असणारी पत्नी सुद्धा घरकामाने त्रस्त आहे . घरट्यात पाखरे परतली म्हणून , आजी आजोबा देखील भरल्या घरात लहानग्या नातवंडांना ठेवून बाहेर पाय मोकळे करण्यासाठी निघतात. अभ्यास की खेळ या संभ्रमात असणारी दोन छोटी पिल्ले आई बाबांकडे धाव घेतात .सारे उद्विग्न आहेत म्हणून पिल्ले चिवचिव करून शांत होतात. 13/14 वर्षांची नात आधीच बाहेर गेलेली आहे . तिची विचारपूस करून बाबा आणखी चिडतात .नोकरी करणारी पत्नी आल्यावर लगेच स्वयंपाक, घरकाम वगैरेत गृहिणीला मदत करण्यासाठी जाते. दोघे भाऊ आपल्या रूममध्ये निघून जातात . एक भाऊ ऑफिसचे काम काढून बसतो, तर दुसरा मोबाइल वर share मार्केट वगैरे ची चौकशी करत बसतो. घरातील दैनंदिन काम संपवून ,दोघीजणी जेव्हा आपापल्या रूममध्ये जातात तेव्हा पसारा काढून बसलेल्या त्यांना पाहून दोघींचा पारा चढतो . गृहिणी तिच्या पतीला सांगते की, ऑफिस चे काम घरी करू नका, घराकडे लक्ष द्या .तर तू दिवसभर घरीच असतेस तू लक्ष दे, असे तो तिला सूनवतो. गृहिणी दिवसभर घर एकटीने सांभाळताना कशी तारांबळ उडते ,सकाळी अचानक आलेले पाहुणे, स्वयंपाक ,सासू सासऱ्यांची देखभाल , शेजारच्या काकूंच्या सुनेला 7व्या महिन्यामध्येच इस्पितळात न्यावं लागले ,आपण कसा शेजारधर्म पाळला याचा पाढा वाचते .

इकडे नोकरी करणारी पत्नी आपल्या पतीला जेव्हा मोबाईल वर गप्पा मारताना पाहते , तेव्हा मी पण नोकरी करते, घर चालवते वगैरे बोलून दाखवते. यावर कंपनीत टार्गेट अचिव्ह करू न शकल्याने नोटीस मिळाल्याने तणावात असणारा तो आणखी भडकतो .ऑफिस, घरकाम ,प्रवास ,गाडीखर्च ,घराचे लोन ,नातेवाईक, गाडीचे हफ्ते ,महागाई यावरून दोघांच्याही रुममधून भांडणाचे समान स्वर येऊ लागतात . भल्या पहाटे उठून मेहेनतीने बनवलेला डबा नवऱ्याने तसाच परत आणला, म्हणून 'ती' चिडते तर outdoor कामामुळे उपाशी राहावे लागले म्हणून 'तो' चिडतो. परफॉर्मन्स चांगला असूनही प्रमोशन नाकारले , म्हणून 'तो' दुःखी असतो तर दूरच्या प्रवासाला 'ती' कंटाळलेली असते .

आरोप प्रत्यारोप करणारे ते ,बाहेरून फिरून आलेल्या वयोवृद्ध आजी आजोबांच्या चाहुलीने भांडण थांबवतात. पण आतून धुमसत असतात आजी आजोबा आल्यावर आपल्या मुलांना आणि सुनांना नातवंडांचे कौतुक सांगू लागतात.

बरं का , आज शाळेत याने तोंडी परीक्षेत खूप छान उत्तरे दिली पण एक उत्तर समाधानकारक नव्हते , म्हणून नंबर हुकला आल्यावर खट्टू झाला होता. पण बाबा माझा गणिताचा अभ्यास घेतील मग येईल माझा पहिला क्रमांक, असे म्हणाला .छोट्याच्या पायाला आणि हाताला खरचटले खेळाच्या तासाला . डबा ही खाता आला नाही धड आणि लागले म्हणून टीम मध्ये सिलेक्शन पण नाही झाले. रडला थोडा पण पुढच्या वर्षी प्रयत्न करेन बोलत होता . संध्याकाळी बागेत नेलं दोघांना , तर परिक्षेमुळे कुणी मित्रच आले नाहीत खेळायला . शेवटी घरी येऊन दोघेही चित्र काढत बसले. तो फॅमिली ट्री शिकवला आहे आज शाळेत .काढल्यावर आधी आई बाबा आणि काका काकूंना दाखवणार म्हणाले. आम्हाला पण दाखवला नाही अजून ,आजोबा म्हणाले.

यावर आजी म्हणाली आणि माझी नात गेली आहे दवाखान्यात . 2 दिवस ओटी पोटात दुखत होते बोलली . आई आणि काकुला त्रास नको ,दोघी कामात असतात म्हणून एकटीच गेली . नुसतीच मोठी नाही समजदार झाली आहे .

आतून धुमसत असणारे ते पती पत्नी आता शांत होऊन ,आई बाबांच्या भूमिकेत शिरतात. धावत मुलांच्या रूमकडे जातात नानाविध महागड्या वस्तू ,खेळणी ,यांनी सजविलेल्या त्यांच्या रूम मध्ये ते दोन छोटे जीव दमून हिरमोड होऊन निजले आहेत . छोट्याच्या हाताला,पायाला जखमा आहेत. टेबलावर मुलीने आणलेली कसलीशी स्त्रीयांची आरोग्य मासिके आहेत. हातात अश्रूंच्या थेंबानी धूसर झालेला , त्यांचा फॅमिली ट्री पाहताना आई बाबांची नजर आणखी धुमील होते.

मुलांच्या हळव्या भाव विश्वातल्या कोमल ,निरागस भावना प्रौढांनी समजून घेणे आवश्यक आहे . करीयर करणे, नाव, पैसा कमावणे यात काही गैर नाही . आपल्या कामप्रति समर्पित राहणे हे ही समर्थनीय आहे. आई वडील आणि वडीलधारी माणसे जाणते पणी मुलांकडे दुर्लक्ष करीत नाहीत. मुलांच्या संगोपनासाठीच त्यांचा आजन्म आटापिटा असतो .फक्त आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती, लहान मुले यांच्या भावनिक गरजा समजून घेणे , त्यांना वेळ देणें ,सुसंवाद साधणे ही तितकेच आवश्यक आहे जितके त्यांच्या भौतीक गरजा पूर्ण करणे . सुखसाधने पुरवून त्यांच्या बाह्य स्वरूपाचा विकास घडवून आणण्यापेक्षा त्यांच्या मनोभावना जाणून अंतर्गत विकास घडवावा . मुलांच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणीला बालपणापासूनच सुरुवात होते . संस्कार ,शिस्त ,समायोजन adjustment आदी शिक्षण त्यांना कुटुंब नावाच्या प्राथमिक संस्थेत मिळत असते . मुलांकडून घडणाऱ्या वाईट वर्तनासाठी मुलांना प्रतिबंध ,अथवा शिक्षा केली जाते. समाजमान्य वर्तन व्हावे यासाठी नियम, अवरोध घातले जातात हेच निर्बंध लहान मुले हळूहळू आत्मसात करतात व ही वर्तनावरील नियंत्रणे मुलांकडून स्वयं प्रेरित रीतीने(स्व खुशीने) स्वतः च्या वर्तनावर घातली जातात . कुटुंबातील प्रौढांचे वर्तन ,आदर्श ,संस्कार मुलांकडून स्वीकारले जातात. या नियंत्रणाचे 'अंतरीकरण' Internalization होते, यालाच प्रौढ वयातील विवेक बुद्धी म्हणतात . यास्तव बेशिस्त ,अति शिस्त , दुर्लक्ष ,अतीलक्ष ,अपमान करून त्यांचा स्व सन्मान self esteem दुखावणे ,यामुळे अनियंत्रित अथवा अपसामान्य abnormal वर्तनाकडे मुलांचा कल वाढतो . ती हट्टी वा भित्री बनू शकतात. यासाठी त्यांचा भावनिक कल, मनोव्यापार समजून आपली भूमिका त्यांच्या समोर मांडावी . बालमनावर विविध गोष्टींचा ठसा लवकर उमटून त्यांचे दृढीकरण ही जलद होते. म्हणून त्यांच्यासमोर आदर्श असे प्रकटीकरण असावे . मुले अनुकरण प्रिय, ,silent learner असतात. मुलांच्या योग्य वर्तनासाठी कौतुक ,शिक्षा दोन्ही आवश्यक आहे. परंतु त्याज्य वर्तनासाठी त्यांना चुकीची जाणीव होईपर्यंत आपल्या प्रेमाला आवर घालून ते व्यक्त होऊ देऊ नये . प्रेमाचा अभाव हीच त्यावेळची शिक्षा होय .

अनेकदा कामाच्या व्यस्ततेमूळे आई वडील मुलांना वेळ व अवधान देऊ शकत नाहीत . या अपराध बोधाने ग्रासून पालक भौतिक सुविधा मुलांना पुरविण्याचा प्रयत्न करतात . मोठेपणी अशी मुले सुखासीन ,आळशी होण्याचा संभव असतो . विक एंडला outing ,रिसोर्ट, वॉटर पार्क ,महागडे डिव्हाइस , बर्थडे पार्टीस या चंगळवादाला आता सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पण या ऐवजी निसर्गरम्य ठिकाणे , गड किल्ले आदी ऐतिहासिक वास्तू , प्राणी/पक्षी अभयारण्य ,वस्तू संग्रहालये ,नातेवाईकांच्या भेटी यांमुळे संस्कार ,वारसा वृद्धिंगत होतो .

शिक्षण ,व्यवसाय यांसाठी तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. ते एक वरदान ही आहे . आभासी प्रयोगांमुळे शिक्षण सुकर होते . परंतु , मनोरंजन ,संप्रेषण comunication साठी ईंटरनेटचा अनावश्यक वापर अयोग्य आहे . यावर अंकुश ठेवावा virtual गेम्स मधील आभासी दुनिया , वडील धाऱ्यांच्या सहवासाचा अभाव यामुळे मुले दिवा स्वप्न, कल्पना रंजन अथवा हिंसेकडे वळण्याचा धोका असतो . मैदानी खेळांना शक्यतो प्राधान्य द्यावे . बुद्धिमत्ता ,रंजन करणारे बैठे खेळ ही आहेतच .अशा खेळांमुळे गटकार्य ,सहकार्य इत्यादी प्रवृत्तीचे पोषण होते . मूल समाजात मिसळून समाजशील ,समजोन्मुख होते. कुटुंबा व्यतिरिक्त असे क्रीडा समूह व्यक्तिमत्त्व विकासात पूरक असतात. मुलांचे सहपाठी ,मित्र, क्रीडा सवंगडी याकडेही पालकांचे लक्ष असावे.

जीवनात निर्णय क्षमता ,भावनिक तटस्थता महत्त्वाची. मुलांना सतत मायेच्या छत्राखाली ठेवल्याने त्यांच्या मधील संघर्षवृत्ती ,चिकाटी लयास जाते . अति लाड झालेल्या मुलांचे प्रौढ जीवन हळवे ,मनो वृत्ती कमकुवत असतात. मुलांना छोट्या मोठया निवडीचे स्वातंत्र्य द्यावे . सर्वसाधारणतः मुलांसाठी बाबा हे role model , समर्थ असतात .अशा प्रशासक वाडीलांबद्दल आदर आणि धाक ही वाटणे योग्य आहे आणि सर्वात प्रिय आई ,आजी या मातृ तुल्य व्यक्ती त्यांच्याशीही मूल प्रेमाने वागते . मुलांचा मित्र होण्याआधी आपल्या आई बाबा या भूमिका चोख बजावल्या गेल्या पाहिजेत.

किशोरवय ( वय 12-16/17 वर्षे) हा तर शारीरिक आणि मानसिक अवस्थांतराचा काळ . कोवळ्या वयातील निरागस भावना उतशृंखल होण्याचा काळ . शारीरिक विकास आणि अंतः स्त्रवी ग्रंथींमध्ये घडणाऱ्या बदलामुळे प्रचंड भावनिक उलथापालथ या वयात मुले अनुभवतात . 'आपण मूल की प्रौढ ' या स्व अवस्थेच्या संभ्रमात अडकतात. समवयस्क समूहामध्ये (peer group) मुलांचे मन रामू लागते . वडीलधारी माणसे आपल मन समजू शकत नाहीत अशी त्यांची धारणा होते आशा वेळीच पालकांनी पुढाकार घेऊन सुसंवाद ,भावनिक जवळीक साधावी . अन्यथा ही दरी वाढत जाते .

मुलांचे भाव विश्व ,हळव्या मनाचा कोपरा ,अव्यक्त गुंतागुंत ही संवाद ,सहवास ,सल्ला यामुळे उलगडत जाईल आणि नातं ही फुलत जाईल .

बालकांप्रति असणारा माझा हा भावात्मक प्रकटीकरणाचा बाळबोध प्रयास , लेखन प्रमाद , प्रौढ आणि पक्व वाचक आपल्या सामंजस्याची प्रचिती देऊन पोटात घालतील यात शंका नाही.

# पूर्णा गंधर्व


Rate & Review

Be the first to write a Review!