Lachari books and stories free download online pdf in Marathi

लाचारी

मी माझे तोंड गुडघ्यामध्ये खुपसून झोपडीत बसलो होतो. मंद प्रकाश देणाऱ्या दिव्याला सुद्धा माझ्या चेहऱ्यावरचे भाव कळून येत नव्हते. समोर बसलेली रफिया तेच भाव वाचण्याचा प्रयत्न करीत होती. शेवटी ती थकून माझ्या जवळ आली व माझ्या केसात हात फिरवून मला विचारले, "काय झालं बदरु? कोणाशी भांडलास का? कोणी काही बोललेय का? कोणी काही बोलले असेल आणि उदास असशील तर विसर, गरीबाला कसली आली इज्जत !"

मला कळत नव्हते की तिला काय उत्तर द्यावे, कारण तिला माझ्या विषयी जास्त काही माहित नव्हते. आज माझ्या नशिबाने मला अश्या जागेवर आणून ठेवले होते जिथे दोन्हीकडे खोल दरी होती. रफियाने स्वतःचे प्रयत्न सोडले व म्हणाली, "आता झोप सकाळी बोलू."

एका कोपऱ्यात गोणपाटाने बनवलेले अंथरूण टाकले व माझा हाथ पकडून झोपवले. ती माझ्या सोबत चाळे करू लागली, पण माझ्या कडून काही प्रतिसाद न मिळाल्याने ती पाठ फिरवून झोपून गेली. तिची उघडी पाठ पण माझ्या समोर रागाने बघतेय असे मला वाटले. मला तो ताप सहन न झाल्याने मी माझी नजर फिरवली व पिवळा प्रकाश देत असलेल्या दिव्या कडे बघू लागलो आणी वर्तमानातून भूतकाळात निघून गेलो.

 

सहा वर्षांपूर्वी 

 

बांग्लादेश मधील एक लहान गाव अमुआ आणि त्या लहान गावात एक गरीब शेतमजुराचे मी सहावे मुल. आमचे गाव गरिबीने ग्रासलेले आणी आमचे घर तर माशाअल्लाह ! कधी एक वेळेस पोटात अन्न जायचे तर कधी उपाशी पोटी झोपावे लागे. मी लहानपणा पासून अश्या भुकेशी परिचित होतो, जे माझे आत निघून गेलेले पोट व गाल दाखवून देत होते. एक दिवस शेजाऱ्याच्या घरून शिळी रोटी घेऊन आलो आणी अब्बूने जी पिटाई केली की मी पुन्हा तसे काही न करण्याची कसम खाल्ली.

माझे तीन मध्ये भाऊ घर सोडून पळून गेले होते, पण मी तसे करू शकलो नाही. एक तर मी लहान होतो व सकीना आणि फरझानाची जिम्मेदारी अब्बूवर सोडून निघून जावे हे मला योग्य वाटले नाही. माझी जिंदगी अमुआमध्येच बसर व्हावी हे नशिबाला मंजूर नव्हते. अब्बूने सकीनाला गावातील एका व्यापाऱ्याच्या घरातून निघताना बघितले. घरी येऊन अब्बूने तिची पेटी बघितली आणी त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिच्या पेटीत खूप सारे टाका होते. तिने गरिबीशी कंटाळून चुकीचा रास्ता धरला होता. त्या रात्री अब्बूने तिला खूप मारले आणी ती फरझाना सोबत निघून गेली. जाता जाता अब्बूच्या तोंडावर थुंकली आणि म्हणाली, "जर पाळण्याची ताकत नव्हती तर पैदा का केले. रफिकसेठ काळजी घेईल आम्हा दोघांची. इज्जत, इज्जत म्हणून उपाशी पोटी मारून जायायचे काय. आता पोट पण भरेल आणी शरीराची भूक पण भागेल. बदरू, तू पण घर सोड, तुला इकडे भूके शिवाय दुसरे काही मिळणार नाही."

हा आघात अब्बू जिरवु शकेल नाही आणी अल्लाहला प्यारे झाले. त्यांच्या मागे अम्मी पण पागल झाली. दवाखान्यामध्ये घेऊन जाण्या एवढे टाका माझ्या कडे नव्हते, म्हणून तिला पीरबाबाच्या दरगाह मध्ये सोडून डोळ्यात कमाई करण्याचे स्वप्न घेऊन गाव सोडले आणी मनात निश्चय केला की सकीनाला एक दिवस परत आणायचे. मी पण भावांसारखे इंडिया मध्ये जायायचे ठरवले.

मी सतरा वर्षाचा होतो आणी गाव सोडून ढाका मध्ये आलो. गावातल्या एक मित्राकडून एजंटचा पत्ता मिळाला होता, जो एकदम स्वस्तात इंडियाची बॉर्डर पार करवून देत होता. त्याचे नाव जब्बारभाई होते. त्याला भेटून परिस्थिती सांगितली तर तो हसू लागला आणी बोलला, "माझ्या कडे सगळे अशेच लोक येतात. बॉर्डर अशीच पार नाही होत, खूप खर्च होतो. बॉर्डर पार करायला पंधरा हजार टाका लागतील, असतील तर सांग लगेच उस पार."

मी त्याची विनवणी केली व सांगितले की आल्यावर तीस हजार टाका देईन, पण तो ठाम होता तो पुढे म्हणाला, "देख बदरू, जो एक बार जातो तो परत नाही येत, पण तुझी मला दया येतेय. तुला एक शर्तवर इंडिया पाठवतो. तू आधी सहा महिने माझ्यासाठी काम करायचे. त्या बदल्यात मी तुला इंडियाची बॉर्डर पण पार करून देईन आणी तिकडे काम पण मिळवून देईन. इकडे असशील तो पर्यंत तुझ्या रोटीची जिम्मेदारी माझी." माझ्याकडे पर्याय नव्हता आणी सहा महिने दालरोटी तर मिळणार होती. आतापर्यंत ती पण कुठे मिळत होती?

तिसऱ्या दिवशीच मला काम सांगण्यात आले. मला एक बेग दिली व सांगितले, "ही बेग बोरिसाल मध्ये जाऊन हामिदबोन्धुच्या हातात द्यायची आणी लक्षात ठेव ह्याच्यात हशिश आहे म्हणून सांभाळून." मनात स्वतःबद्दल नफरत उसळून आली की हे मी काय करणार आहे, पण मला बॉर्डर पार करायची होती. मी एक गोणपाट शोधले व त्या मध्ये बेग टाकून बसच्या छतवर जाऊन बसलो. माझे कपडे फाटके होते आणी एका मजूरासारखा वाटत होतो म्हणून कोणी मला काही विचारले नाही आणी मी सुखरूप बारिसाल पोहोचलो.

हामिदभाई खुश झाले व माझी पाठ थोपाटली. त्या नंतर पुढचे सहा महिने मी बारिसाल, तुंगी आणी कोमीलीयाच्या फेऱ्या केल्या. मी कधीच पकडलो गेलो नाही. सात महिन्या नंतर पण जब्बारभाई काही बोलले नाही तर त्यांना भेटून त्यांच्या वचनाची आठवण करून दिली. त्या वेळेस ते म्हणाले, "इंतजाम होत आहे, पुढच्या महिन्यात तुला बॉर्डर क्रॉस करवून देईन. तुला एक खत देईन तो तू बशीरबोन्धुला देशील म्हणजे तो तुझ्या खाण्या आणि राहण्याचा इंतजाम करेल."

      त्या नंतर मी ढाकाहून कोलकाता आणी तिकडून वेगवेगळ्या शहरांमधून फिरत दोन महिन्यानी मुंब्रा मध्ये पोहोचलो. बशीरभाईंना भेटून पत्र दिले. त्याने माझी राहण्याची व्यवस्था नूरजहाँ आपा नावाच्या औरतच्या झोपडपट्टी मध्ये केली. चाळीशी ओलांडलेली ती औरत सुंदर होती आणी तेवढीच खतरनाक होती. मला बघून म्हणाली, "ओर एक बंगाली ! उदर क्या बच्चे पैदा करने का मशीन लगेला है? सून इधर शांती से रेहने का, झगडा नेई करने का ओर बंगाली टोन में बात नेई करने का." ती खतरनाक होती, पण वस्तीवाल्यासाठी चांगली होती. ती सर्वांची काळजी घ्यायची, पण जर कोणी वाईट नजर केली तर डोळे काढून घ्यायची. वस्तीमध्ये तिला सगळे बडीआपा म्हणून ओळखायचे.

बशीरभाईंना कामा बद्दल विचारले तर बोलले, "मियां, तू ज्या कामात उस्ताद आहेस ते काम तर तुला इकडे पण मिळेल." माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून सहा महिने पुन्हा हेराफेरीचा धंदा केला आणी दोन तीन वेळेस पोलिसांच्या हातात येता येता वाचलो. माझ्या मनात भीती वाढली होती म्हणून त्या बद्दल नूरजहाँआपाशी बोललो. तिने बशीर भाईंना बोलावले व सांगितले, "ये लडका अब तुमेरा कोई काम नेई करेगा, इसको परेशान मत करना." माहित नव्हते की तिला कोणाची शह होती, पण बशीरभाई मुंडी हलवून लगेच निघून गेले. नंतर मला कळले की तिचा भाऊ मोठा गेंगस्टर आहे.

मी त्या नंतर भंगारचे काम सुरु केले. पैसे कमी मिळायचे, पण दालरोटी निघत होती. बस्ती मध्ये नूरजहाँआपा सारखी अजून एक खतरनाक औरत होती रफिया. तिच्यावर माझे दिल आले होते, ती दिसायला पण खूप सुंदर होती. मी शादी करण्या एवढा तर झालोच होतो. ती पण भंगार जमा करायची. तिला पण मी आवडलो होतो.       

नूरजहाँ आपाने आमचा निकाह ठरवला. निकाह नंतर ते जळजळते सौंदर्य रफिया माझ्यासोबत राहू लागली. हे सगळे माझ्यासाठी स्वप्नासारखे होते. एकेकाळी मी उपाशी पोटी किंवा अर्ध्यापोटी झोपत होतो आणी आता माझा निकाह झाला होता आणी सुखाने जगत होतो. सकीना, फरझाना आणी दरगाह मध्ये सोडलेल्या आईचा पण विसर पडला होता. सुखात जगात होतो तरी सुद्धा काही तरी कमी वाटत होते. मनात असे पण विचार दरवळत होते की पुन्हा एकदा हेराफेरीचा धंदा करावा व खूप पैसे कमवून चांगल्या वस्तीत राहायला निघून जावे आणी रफियाला दागिन्याने लादून टाकावे. या विचारात मला विसर पडला होता की मी एक बांग्लादेशी आहे.

आता तर दोन वेळेची दालरोटी निघत आहे, पण हेराफेरीच्या वेळेस रोज रात्री गोट्या, दगडू आणी रफिक सोबत दारू प्यायला बसत होतो. काम सोडले आणी त्यांची साथ पण सुटली. एकदा हा विचार रफिया समोर पण सांगून बघितला पण तिने शपथ दिली आणी सांगितले, "हरामच्या कमाईने हरामी कशाला बनायचे? मी इतक्यातच खुश आहे." तिला मी कधीच सांगितले नाही की मी बांग्लादेशी आहे. मनात भीती वाटत होती की ती मला सोडून जाईल.

 

*****

पण काल जी घटना बघितली ती बघून मी हादरलो. मी धर्मसंकटात सापडलो, काय करावे हे सुचत नव्हते. रात्री उशिरा वस्तीत परततांना वस्तीच्या बाहेर मारुतीवेन मला दिसली. वस्ती समोर कधीच गाडी उभी नाही राहायची. मी सावधान होऊन वस्तीत शिरलो. आपाच्या झोपडीतुन आवाज येत होते. माझे पाय आपाच्या झोपडीकडे वळले आणि मागे जाऊन झोपडीत असलेल्या एका भोकातून आतमध्ये काय होत आहे ते बघू लागलो. आतमध्ये जे होत होते ते बघून अंगावर काटा आला.

आतमध्ये चार पेहेलवान उभे होते आणी एक व्यक्ती नूरजहाँ आपावर होता. आतमध्ये जाऊन आपाला वाचवण्याची इच्छा झाली. त्यांना मी ओळखत होतो, ते खूप जालीम गुंड होते. त्यांच्या हातात असलेले हत्यार बघून माझी पुढे जाण्याची हिम्मत झाली नाही. नामर्दा सारखा मी सगळे होताना बघत राहिलो. शेवटी जातांना त्यांनी आपाच्या गळ्यावर सुरा फिरवला आणी तिच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तिच्या तोंडात कपड्याचा बोळा असल्याने ती ओरडू पण शकली नाही. माझी पण ओरडण्याची हिम्मत झाली नाही. मी लपलो, ते सगळे पक्याभाईंचे गुंड होते. निघताना एक जण बोलला, "साली XXXXX ने पक्याभाईशी पंगा घेतला. कशी जिरवली. होती वयस्कर, पण मजा आली."

ते गेल्यानंतर पण माझी आपाच्या झोपडीत शिरण्याची हिम्मत झाली नाही. या अल्लाह त्या शयतानांनी जरा पण दया दाखवली नव्हती. अर्धातास मी तिकडे बसून राहिलो आणि आतमध्ये न जाताच परत माझ्या झोपडीत परतलो.

मी डोळे उघडले व सगळीकडे बघू लागलो. माझ्या मनात अनेक विचार वाऱ्यासारखे सुरु होते. मी पोलिसांकडे जाऊ, पण अजून तर रेशनकार्ड पण बनले नाही. पोलिसांनी विचारले तर काय सांगू? सकाळी सगळ्यांना कळेल आणी वस्तीत पोलीस येईल.सगळ्यांची चौकशी करेल. मी बांगलादेशी आहे हे उघडकीस येईल. मला पकडून नेतील. आत्ता गेलो तरी पकडतील आणी सकाळी पण. माझी झोपडी तर एकदम जवळ आहे. जर ग्वाही दिली आणी पोलिसांनी सोडले तरी पक्याभाई सोडणार नाही. हा विचार आल्यानंतर मी ताडकन उभा राहिलो.

शेजारी झोपत असलेल्या रफियाला जोरात हलवून उठवले.आणी तिला सांगितले, "रफिया, उठ लवकर आपल्याला इकडून निघावे लागेल."

डोळे चोळत उठलेली रफियाने विचारले, "काय झालर बदरू? आपल्याला कुठे जावे लागेल?"

माझ्या आवाजात कंपन होते. मी म्हणालो, "आपाचे मर्डर झाले आहे. सकाळी पोलीस येईल आणी सगळ्यांची चौकशी करेल आणी त्यांना कळेल की मी बांग्लादेशी आहे. माझे रेशनकार्ड पण अजून बनले नाही. मला जेलमध्ये जावे लागेल."

रफिया माझ्या चेहऱ्याकडे विचित्र नजरेने बघत होती. तिला काही कळत नव्हते. तिने शेजारी ठेवलेली पाण्याची बॉटल उचलली आणी मला देऊन म्हणाली, "आधी पाणी पी आणी मला सांग काय झाले ते."

माझा गळा सुकला होता, मी एक श्वासात ते पाणी संपवले आणी नंतर घडलेल्या घटना बद्दल सविस्तर सांगितले आणी मी इकडे कसा आलो ते पण सांगितले. तीने शांतपणे सगळे ऐकले.

सगळे ऐकून झाल्यावर तिचा हात वर झाला आणी पाच बोटांचे ठसे माझ्या गालावर उमटले. तिच्या गळ्यातून कर्कश आवाज बाहेर आला, "माझेच चुकले, कश्या नामर्द माणसाची निवड केली. अरे ! ज्या नूरजहाँ आपाने तुला सहारा दिला, तुला हेराफ़ेरीच्या धंद्यातून बाहेर निघायला मदत केली, तिच्यासाठी लढू पण शकला नाही. चल लढलास नाही तर काही नाही, पण तिला न्याय मिळवण्यासाठी ग्वाही देण्याऐवजी पळ काढण्याचा विचार करत आहेस. तुझ्यापेक्षा कुत्र्याला दोन रोटी आपाने दिल्या असत्या तर तो भुंकला तर असता. तुझ्या जिंदगीवर थू आहे. असे जागून काय मिळवशील."

माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हणालो, "रफिया, तू येवढे बोलत आहेस कारण तू भूक बघितलीच नाही. तुला काय माहित उपाशी पोटी झोपणे कशे असते. भाऊ घर सोडतात,पैश्याअभावी बहीण कोणाच्या घरात जाऊन त्याची रखेल बनते, अम्मीला दवाखान्यात न नेता पीरबाबांच्या दरगाह मध्ये सोडावे लागते. वाईट जगणे काय असते ते तुला कसे कळणार? तू तर अनाथआश्रमात होती ना, तिकडे दोन वेळचे जेवण मिळत असेल. तुला माझी लाचारी नाही कळणार."

"तुला काय वाटते, अनाथआश्रममध्ये सगळे आनंदाने जगतात आणी भरल्यापोटी झोपतात? तिकडे अन्याय नाही होत? तिकडे आवाज उठवण्याच्या खुणा अजून माझ्या पाठीवर आहेत. मी पण गरिबी बघितली आहे, पण मी तुझ्या सारखी कायर नाही. आत्ता इकडून जाऊन वाचशील, पण रोज आरश्यात स्वतःला तोंड कशे दाखवशील? इतका सक्षम तर झाला आहेस की दोन वेळेची दालरोटी मिळवू शकशील. जर ग्वाही नंतर पोलीस तुला बांग्लादेशात पाठवत असेल तर मी तुझ्या सोबत यायला तयार आहे. स्वतःच्या कमजोरीला लाचारीचे नाव नको देऊ. जर हेराफ़ेरीचा धंदा सोडण्यात लाचारी आडवी नाही आली तर आता पण नाही येणार. आपण तिकडे जाऊन नवीन सुरुवात करू. तुझ्या बहिणींना परत आणू, तुझ्या अम्मीचा इलाज करू." येवढे बोलता बोलता रफियाचा चेहरा लालबुंद झाला होता.

तिच्या बोलण्यात तथ्य तर होते. त्यावेळी लहान होतो आणी इंडिया मध्ये येऊन पैसे कमावण्याचा नाद होता. जेव्हा सकीना जात होती तेव्हाच आवाज उठवला असता तर आबू आज जिवंत असते आणी मी असा परक्या राष्ट्रात लपून छपून जगत नसतो. मी माझ्या मनात विचार पक्का केला आणी रफिया कडे बघून म्हणालो, "रफिया, जर तुझी साथ असेल तर मी संपूर्ण जगाशी लढेन. मी ग्वाही द्यायला तयार आहे. इकडून जावे लागेल तरी त्याची तयारी आहे. मी आपा साठी लढेन. चल तयार हो, आपण पोलिसांकडे जाऊ."

 

आणी आम्ही दोघे पोलीस स्टेशन कडे निघालो. भविष्याबद्दल माहित नव्हते, पण मी लढणार होतो, आता मी लाचार नव्हतो.

 

समाप्त