फुलाचा प्रयोग - 9

  • 5.1k
  • 1.8k

परमेश्वर आपल्या दिव्य सिंहासनावर बसला होता. देवदूत स्तुति-स्तोत्रे गात होते. इंद्र, चंद्र, सूर्य, वायू सारे हात जोडून उभे होते. ‘देवा, तुझा महिमा किती वर्णावा? हे अनंत विश्व तू निर्माण केलेस. इंद्राल पाऊस पाडायला लावलेस सूर्याला तापावयास सांगितलेस. तुझ्या आज्ञेने वायू वाहातो, अग्नी जळतो, समुद्र उचंबळतो तुझ्या आज्ञेने पर्वत उभे आहेत, नद्या धावत आहेत, फुले फुलत आहेत, वृक्ष डोलत आहेत, किती विविध ही सृष्टी किती सुंदर, किती मोठी आणि सर्वात कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे मनुष्यप्राणी. देवा, परमेश्वरा, तुझे सारे बुध्दिवैभव मनुष्य निर्मिण्यात ओतले आहेस. एवढासा साडेतीन हात देहात राहणारा हा मनुष्य, परंतू सर्व विश्वाचे तो आकलन करू शकेल, सर्व सृष्टीवर सत्ता गाजवू शकेल. तो पृथ्वीवर राहून तार्‍यांचा इतिहास लिहील, पाताळातील घडामोडी वर्णील. मानवाला अशक्य असे काही नाही.’