Alvani - 5 books and stories free download online pdf in Marathi

अलवणी - ५

जस जसा सुर्य खाली गेला आणि अंधाराचे साम्राज्य वाढु लागले तसं तसा वातावरणातला तणाव वाढू लागला.

शाल्मलीला आकाश आणि जयंतने विशेष काही सांगीतले नव्हते परंतु दोघांच्या वागणुकीत, हालचालीत पडलेला फरक, अचानक खालच्या खोलीत येऊन रहाणे ह्यावरुन काहीतरी विचीत्र घडत आहे ह्याची तिला जाणीव झाली होती. मोहीत सुध्दा शाल्मलीला बिलगुनच बसला होता.

खोलीतला दिवा लावण्यात आला आणि खर्‍या अर्थाने रात्रीची सुरुवात झाली.

आकाशने खोलीचे दार लावुन घेतले. कॅमेरा ट्रायपॉड माऊंट करुन खोलीच्या बाहेरच लावला होता. जयंत जुने विषय काढुन वातावरणातला तणाव निवळवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या प्रयत्नांना विशेष यश येत नव्हते.

घड्याळात ९.३० वाजुन गेले आणि अजुन विशष अशी काही हालचाल कुठे जाणवली नव्हती.

“कदाचीत आपण जो विचार केला होता तो पुर्ण चुकीचा असेल…”, आकाशने विचार केला खरा, परंतु वातावरणात होत चाललेला बदल, विनाकारण वाढत असलेला दबाव त्याला शांत बसु देत नव्हता.

दहा वाजुन गेले तसे सर्वांनीच थोडं फार खाऊन घेतले आणि आपल्या पांघरुणात शिरुन झोपण्याचा प्रयत्न करु लागले. अर्थात झोप येणं अशक्यच होतं, पण दिवसभरातल्या घडामोडींमुळे शरीराला आणि मनाला थकवा आला होता त्यामुळे नकळतच सर्वांचे डोळे मिटले गेले.

साधारणपणे रात्री १ वाजता कसल्याश्या आवाजाने आकाशला जाग आली. बर्‍याच वेळ तो कसला आवाज असावा ह्याचाच आकाश करत होता. जणु काही कोणीतरी झाडू मारत असल्याचा तो आवाज वाटत होता.. किंवा… किंवा कोणीतरी सरपटत चालण्याचा..

आकाशने हळुच हलवुन जयंताला जागे केले. जयंता लगेच उठुन बसला. दोघंही बाहेरील आवाज कान देऊन ऐकु लागले. तो आवाज हळु हळु जवळ जवळ येत होता. काही क्षणातच तो दाराच्या अगदी जवळ आला आणि मग तेथुन पुढे जिन्यापाशी गेला. हळु हळु तो आवाज दुर दुर गेला. बहुदा ते जे कोणी होतं ते जिन्याचा आधार घेउन वरच्या खोलीकडे चालले होते.

काही क्षण शांततेत गेले आणि मग एक संतापलेली चित्कार दोघांना ऐकु आली आणि परत तोच सरपटण्याचा आवाज जिन्यांवरुन खाली येताना ऐकु आला. हळु हळु तो आवाज पुन्हा एकदा दारासमोर आला आणि तेथेच थांबला. ’ते’ दाराच्या बाहेर थांबले होते. दोघांच्याही मध्ये फक्त एक लाकडी दार होते. जर का ते पलीकडचे आघोरी, सैतानी, पाशवी असेल तर ह्या सर्वांच्या जिवनाची दोरी त्या एका लाकडाच्या दाराने बांधली गेली होती. ते दार उघडले गेले असते तर पुढे काय झाले असते हे वेगळे सांगायची आवश्यकता नव्हती.

बराच वेळ शांततेत गेला. प्रत्येक क्षण मनावर दडपण टाकत होता.

“आकाश….”, अचानक आलेल्या शाल्मलीच्या आवाजाने आकाश आणि जयंत दचकले.

आकाश उठुन शाल्मलीच्या जवळ गेला.

“काय गं? काय झालं??”, आकाशने विचारले..

“आकाश.. कसं तरी होते आहे… खुप घुसमटल्यासारखे होतेय.. आकाश…”, गळ्यावरुन जोरात हात फिरवत शाल्मली म्हणाली

आकाशने वळुन जयंताकडे पाहीले, जयंत सुध्दा उठुन शाल्मलीकडे आला.

“वहीनी.. काय होतंय…?”, जयंता म्हणाला..

“चावतंय काही तरी सर्व शरीराला… खुप सार्‍या घोंघावणार्‍या माश्या शरीरावर बसल्या आहेत असं वाटतं आहे.. असंख्य मुंग्या शरीराचा चावा घेत आहेत असं वाटतं आहे… आकाश.. काहीतरी कर

प्लिज…”,.. शाल्मली अस्वस्थ होत म्हणाली.

“हो.. हो… मी करतो काही तरी,..”, आगतीक होत आकाश म्हणाला..

शाल्मली अस्वस्थ होत अंथरुणात तळमळत होती. सतत एकदा गळ्यावरुन, मानेवरुन हात फिरवत होती, तर कधी हात झटकत होती..

“जयंत? काय होतंय शाल्मलीला?”, आकाशने जयंताला विचारले.

“वहीनी, स्वप्न पडले आहे का काही? उठुन बसता का जरा?, पाणी प्या म्हणजे बरं वाटेल..”, जयंत म्हणत होता.


शाल्मलीने डोळे उघडले आणि ती बेडवरुन खाली उतरुन पाणी प्यायला जाउ लागली. पण त्याचवेळेस एखाद्या पाशवी शक्तीने तिला भिंतीकडे लोटले. शाल्मली क्षणार्धात भिंतीकडे फेकली गेली. एखाद्याने जोरदार थोबाडीत द्यावी आणि त्या आघाताने जसे तोंड एकाबाजुला फेकेले जावे, तशी शाल्मलीची मान एका बाजुला कलली. तिची बुबुळ डोळ्याच्या वरपर्यंत गेली आणि त्यामुळे तिचे डोळे पांढरे फटक दिसु लागले. चेहर्‍यावर झालेल्या त्या जोरदार आघाताने तिचे रिबीनीने बांधलेले केस विस्कटले गेले आणि तिच्या चेहर्‍यावर पसरले. शाल्मलीचे पाय एखाद्या लाकडासारखे कडक झाले. आणि मग ती हात पाय मागच्या बाजुला भिंतीकडे वळवुन भिंतीचा आधार घेत वर वर सरकत छताला जाऊन चिकटली.

आकाश आणि जयंत विस्फारलेल्या नजरेने तो प्रकार बघत होते.. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.


थोड्यावेळाने शाल्मलीच्या तोंडातुन शब्द बाहेर पडले. खरं तर तो शाल्मलीचा आवाज नव्हताच. गोड गळ्याच्या शाल्मलीचा असा घोघरा, फाटका, चिरका आवाज असणं शक्यच नव्हतं…

“सोडनार नाय.. एकाला पन सोडनार नाय… जिता नाय जानार तुमी इथुन भार… किति दिस लपशील इथं खुलीत.. येशील नवं बाहेर..”, असं म्हणुन तो आवाज खदा खदा हसला.

त्या हसण्याने आकाश आणि जयंताच्या अंगावर काटा उभा राहीला..

हळु हळु शाल्मली पुन्हा जमीनीवर आली आणि तिथेच कोसळली…

आकाश आणि जयंताने थोडावेळ वाट पाहीली आणि मग त्यांनी शाल्मलीला उचलले आणि बेडवर आणुन झोपवले…….

उर्वरीत रात्र शांततेत गेली. त्या प्रकरणानंतर नविन काही घडलं नाही. आकाश आणि जयंत रात्रभर जागेच होते, झोपं लागणं शक्यच नव्हतं. जे आजपर्यंत केवळ ऐकलं होतं, चित्रपटांतुन पाहीलं होतं ते आज डोळ्यांदेखत घडलं होतं. शरीराला पुन्हा पुन्हा चिमटा काढूनही ते एक वाईट्ट स्वप्न नसून सत्य होतं ह्याची कटू जाणीव दोघांना सतत होतं होती.

सकाळी सुर्याची किरणं बंद खिडकीच्या फटींमधून आतमध्ये आली खरी, पण त्यातही एक प्रकारचा मलूलपणा होता जणु काही सुर्याचे तेज त्या किरणांमधुन कोणीतरी हिरावुन घेतले होते.

शाल्मली अजुनही झोपलेलीच होती, तिच्या चेहर्‍यावर थकवा दिसुन येत होता, तिचं शरीरसुध्दा तापाने फणफणलं होतं. फरक इतकाच होता की ह्यावेळेस त्याचे कारण जयंत आणि आकाश दोघांनाही माहीती होतं. बिचार्‍या शाल्मलीला मात्र त्याची तिळमात्र कल्पना नव्हती. जयंता आणि आकाशने तिला ह्याबद्दल काहीच न सांगण्याचे ठरवुन टाकले.

थोड्यावेळाने जयंताने खोलीचे दार उघडले. बाहेर थर्मल कॅमेरा अजुनही ’रेकॉर्डींग मोड’ मध्ये चालु होता. जयंताने कॅमेराचा स्विच ऑफ केला आणि कॅमेरा घेउन आतमध्ये आला.

जयंताच्या हातातला कॅमेरा बघुन आकाश जागेवरुन उठुन बसला. दोघांनी एकवार शाल्मलीकडे पाहीले. ती झोपलेली आहे ह्याची खात्री झाल्यावर दोघंही सावकाश खोलीच्या बाहेर आले आणि त्यांनी खोलीचे दार लोटुन घेतले. मग दोघंही बाहेर व्हरांड्यात येऊन बसले.

आकाशने कॅसेट रिवाईंड केली आणि मग प्ले चे बटन दाबुन रेकॉर्डींग चालु केले.

पहिला बराच वेळ कॅमेरात नुसताच काळोख होता. कॅमेराच्या एल.सि.डी. स्क्रिनवर वेळेची नोंद दिसत होती. दोघंही जण त्या स्क्रिनसमोर डोकं खुपसुन काही दिसते आहे का ह्याचा पहाण्याचा प्रयत्न करत होते. कॅसेट पुढे पुढे जात होती आणि शेवटी ती वेळ जवळ येऊन पोहोचली.

आकाश आणि जयंत अधीक बारकाईने त्या स्क्रिनकडे पाहु लागले. थोड्यावेळाने तोच तो घसटत घसटत पुढे सरकण्याचा आवाज येउ लागला, परंतु स्क्रिनवर कोणीच दिसत नव्हते. हळु हळु तो आवाज दुर गेला. कालांतराने दुसरवरुन एक जोराने ओरडण्याचा आवाज आला आणि मग पुन्हा तो घसटत चालण्याचा आवाज जवळ जवळ येउन स्तब्ध झाला.

काही क्षण गेले आणि नंतर एक अंधुकशी आकृती वेगाने सरकत कॅमेराच्या इथुन खोलीकडे वळलेली दिसली. साधारण मानवाच्याच आकाराची निळ्या, पिवळ्या, तांबड्या, हिरव्या रेघांची किनार असलेली ती आकृती क्षणार्धात आली आणि दिसेनाशी झाली.

जयंताने पटकन कॅमेरा स्टॉप केला, थोडा रिवाईंड केला आणि मग स्लो-मोशनमध्ये प्ले केला. परंतु त्या रेघांव्यतीरीक्त तेथे पहाण्यासारखे काहीच नव्हते.

त्या दृश्याने आणि नंतर घडलेल्या घटनाक्रमांच्या आठवणींनी दोघांच्याही अंगावर काटा आला.

जयंताने कॅमेरा बंद केला आणि मग दोघांनीही एक दीर्घ श्वास घेतला.


“काय करायचं आता?”, बर्‍याच वेळानंतर आकाशने जयंताला विचारले

“आय विश आय नो…”, हताशपणे जयंत म्हणाला

“मला वाटतं अजुन इथे वेळ घालवण्यात अर्थ नाही, आपणं जे पाहू नये ते काल पाहीलं. अजुन विषाची परीक्षा कश्याला पहायची? शाल्मलीच्या जिवाला धोका आहे हे तर स्पष्ट आहेच, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण सुरक्षीत आहोत…”, आकाश हवेत हात हलवत म्हणाला.

“हो, ते तर आहेच, पण इथुन गेल्यावर प्रश्न मिटतील कश्यावरुन? ज्यावरुन शाल्मलीच्या शरीरात ’ते’ जे कोण आहे त्याला प्रवेश मिळत आहे, कश्यावरुन ’ते’ आपल्याला शाल्मलीला घेउन जाऊ देईल? कश्यावरुन आपली ही घाई-गडबडीत केलेली कृती शाल्मलीच्या जिवावर उठणार नाही?”, जयंत

“पण मग करायचं काय? च्यायला कॉलेजमध्ये बरं होतं, कधी, कुठं, काही अडलं की आपण गुगल उघडुन बसायचो…”, आकाश

“हे.. दॅट्स अ गुड आयडीया… तुझ्याकडे लॅपटॉप आहे, नेट कनेक्शन आहे.. लेट्स ट्राय गुगल.. व्हॉट से?” जयंताच्या चेहर्‍यावर एक आनंदाची लकेर उमटली.

“अरे काही काय? इथे कुठे गुगल? अश्या गोष्टी थोडं नं गुगल वर मिळणार आहेत?”, जयंताचा मुद्दा खोडुन काढत आकाश म्हणाला.

“अरे बघायला काय हरकत आहे? झाला तर फायदाच आहे ना!!, जा उठ, घेउन ये तु लॅपटॉप आणि नेटकार्ड”, आकाशच्या हाताला धरुन जवळ जवळ उठवतच जयंता म्हणाला.


थोड्यावेळाने आकाश लॅपटॉप घेउन आला. लॅपटॉपच्या कडेला असलेल्या यु.एस.बी.नामक खाचेत त्याने नेट-स्टीक लावली. बर्‍याच वेळ नेटवर्क सर्च केल्यावर शेवटी नेट कनेक्ट झाले.

संगणकातील ब्राउझरची विंडो उघडुन आकाशने ’गुगल.कॉम’ चे संकेतस्थळ उघडले. थोड्यावेळाने संगणकाच्या पडद्यावर रंगीत अक्षरात गुगल असे लिहीलेले गुगल चे संकेतस्थळ उघडले.

“हम्म.. बोल काय शोधु इथं?”, आकाशने विचारले

“अम्म.. शोध ’हाऊ टु स्केअर घोस्ट?’ किंवा ’हाऊ टू गेट रिड ऑफ घोस्ट्स’, भूतांना कसे घाबरावे.??”, जयंत म्हणाला..

“खरंच का?”, जयंता आपली थट्टा करतो आहे असं वाटुन आकाशने विचारले.

“अरे हो.. खरंच सांगतो आहे.. बघ काही माहीती मिळते आहे का…”, जयंत म्हणाला

आकाशने सर्च बारमध्ये तसे टाईप करुन सर्चचे बटन दाबले आणि थोड्याच वेळात तशी माहीती उपलब्ध असलेल्या अनेक संकेतस्थळांचे पत्ते संगणकाच्या पटलावर अवतरले…

“आयला.. हे गुगल गम्मतच आहे बाबा.. खरंच आहे, काहीच्या काही माहीती मिळते इथे…”, असं म्हणुन आकाश त्या एक एक लिंक उघडुन वाचु लागला. जयंतासुध्दा आकाशच्या जवळ येऊन ती माहीती वाचु लागला

पहीली पहीली माहीती फारशी उपयुक्त नव्हती. बहुतेक ठिकाणी तेंन तेच प्युअर / होली वॉटर, ख्राईस्ट क्रॉस वगैरे माहीती उपलब्ध होती. ती माहीती खरी का खोटी हा मुद्दा दुर होता, परंतु त्यापैकी कुठलीही गोष्ट इथं लगेच उपलब्ध नव्हती.

दोघंही जणं एकामागोमाग एक संकेतस्थळं पालथे घालत होते आणि एका ठिकाणी ते अचानक थांबले…

“हे बघ.. इथं काय लिहीलं आहे…”, आकाश संगणाककडे बोट दाखवत म्हणाला..”त्यांनी गार्लीक सुचवले आहे…”

“म्हणजे.. रामुकाका म्हणाले ते बरोबर होते तर..”, जयंत म्हणाला..

“अरे, पण मग जर हे खरं असेल तर…. तर काल रात्री ’तो’ प्रकार का झाला? आपण ज्या खोलीत होतो, तिथे तर लसणाच्या कित्तीतरी माळा होत्या”, आकाश म्हणाला.

“हो, बरोबर आहे… पण म्हणजे बघ ना.. त्या माळा कधी काळी लावल्या होत्या आपल्याला कुठे माहीत आहे? कदाचीत त्या माळा ३०-४० वर्षांपूर्वी लावलेल्या असतील.. कदाचीत त्यातली तिव्रता कमी झाली असेल….”, जयंत

“हम्म, ते ही आहेच म्हणा… बर बघु पुढे अजुन काय लिहीलं आहे…”, असं म्हणुन आकाश पुढे वाचु लागला.

“हे बघ.. मीठ.. लिहीलं आहे…”, आकाश पुढच्या बुलेट पॉंईंटपाशी थांबत म्हणाला..

“मीठ?? का? म्हणजे त्याचे कारण काय सांगीतले आहे?”, जयंताने विचारले..

“मीठ हे जमीन, पाणी आणि हवा ह्यांचबरोबर सुर्यापासून निघालेल्या उष्ण्तेपासुन अर्थात एक प्रकारची आग निर्माण झालेले असते. हे सर्व घटक पंचमहाभूतांपैकीच आहेत. त्यांच्यापासुन मीठ निर्माण होते तेंव्हा ह्या घटकांची शक्ती त्यामध्ये अंतर्भुत होते असं इथं लिहीलं आहे. आणि त्यामुळेच जर तुम्ही मीठाने बॉर्डर आखलीत तर भूतं ती बॉर्डर पार करुन तुमच्यापर्यंत पोहोचु शकणार नाहीत…”, आकाश त्या संकेतस्थळावरील माहीती वाचत म्हणाला.

“हम्म.. हे सुध्दा खरं का खोटं माहीत नाही, पण जे काही लिहीलं आहे, ते पटण्यासारखं आहे…”, जयंता म्हणाला

“हो.. आणि आपल्याकडे मिठ पण आहे…”, आकाशने त्याचं वाक्य पुर्ण केलं.

आकाशने पुढे वाचण्यासाठी मान खाली वाकवली पण दोघांचेही लक्ष विचलीत झालं ते बंगल्याच्या गेटपाशी झालेल्या अचानक हालचालीने.

दोघांनीही चमकुन कुंपणाकडे पाहीले. गेटपाशी एक आकृती स्थिर उभी होती. दोघांनीही एकमेकांकडे पाहीलं.

आकाशने लॅपटॉप खाली ठेवला आणि तो उठुन उभा राहीला. जयंतासुध्दा जागेवरुन उठुन उभा राहीला आणि दोघंही कुंपणाकडे पहात राहीले.

त्या आकृतीने बंगल्याचे गेट उघडले आणि ती हळु हळु दोघांच्या दिशेने येऊ लागली. ती आकृती जवळ आल्यावर तिचा चेहरा स्पष्ट दिसु लागला तसा काहीश्या अविश्वासाने आकाश म्हणाला.. “रामुकाका???????”

[क्रमशः]