Rutu Badalat jaati - 15 books and stories free download online pdf in Marathi

ऋतू बदलत जाती... - भाग..15




ऋतू बदलत जाती....१५.

" जाऊदे ..कुठे बोलू नकोस.. नाहीतर उगाच पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतील.."दुसरा.
पण त्या डॉक्टरांना कुठे माहिती होतं त्यांचं हे सर्व बोलणं शांभवीने ऐकलं होतं ...तिला त्या नाशिकच्या हॉस्पिटलचं नाव कळलं होतं.. आता बस तिला असे झाले होते की केव्हा क्रिश तिला घ्यायला येतो आणि केव्हा ती त्याला हे सर्व सांगते.

************

आता पुढे....

संध्याकाळी चार वाजेच्या जवळपास अदिती आणि क्रिश गच्चीवर गप्पा मारत होते ,आता दोघे बर्‍यापैकी एकमेकांशी मोकळे बोलत असत.

"क्रिश आता मला इथे हे असं रहायला बर वाटतं नाही.. निघून जावं परत ..पण महेशी साठी थांबलेय..."अदीती.

"हा मलाही थोडं वेगळं वाटतं ..म्हणजे बघ ना अनिकेत ..आणि आजी ..नाही म्हटलं तरी आपण त्यांच्यासाठी अनोळखीच आहोत.. तसं आजी दाखवत नाहीत.. बरच प्रेमाने वागतात आपल्याशी पण संकोचल्यासारखं होतं यार..".क्रिश.

"खरच आजी परक्यासारखे वागत नाहीत.. पण पण बघ मी ईथे फक्त महेशीच्या सोबत आहे.. एवढं सोडलं तर मला इथं काहीच काम नाही.. तुझं तसं नाही.. तू मदत करून राहिला आहेस शांभवीला.... तू बिझी असतोस ..महेशी बिझी असते .. मी मात्र रिकामीच असते वाटत परत हॉस्पिटलला जावं..."अदीती.

"हे बये असं नको करुस ..तुझ्यामुळेच मला करमत इथं.".क्रिश.

"मी का तुझ्या एंटरटेनमेंटचे साधन आहे ?? माझ्यामुळे करमतं म्हणे..??"अदीतीने नाक मुरडले.

"नाही ...तुझ्याशी बोलायला आवडतं मला .."क्रिश पटकन बोलून बसला. आदितीला मात्र कसतरीच वाटलं.

" ते तुला शांभवीला घ्यायला जायचं असेल ना ..बोर झाली असेल तिथं ती.."अदीती विषय बदलवत बोलली.

"अरे हा बरं झालं तू आठवण करुन दिलीस मी जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये.. "क्रिशही थोडा ओशाळला होता ,म्हणून त्याने तेथून काढता पाय घेतला.

तो हॉस्पिटल मध्ये आला. शांभवी त्याला दिसावी म्हणून ती समोरच वेटिंग एरिया मध्ये बसलेली होती .तिचं काम झालेलं होतं.
आल्याबरोबर त्याला ती दिसली, पण तो जवळ न जाता दुरूनच तिला हातानेने खाणाखुणा करून काय झालं.. झालं का काम ..?? चलायचं का मग ?असं विचारायला लागला, दुरून एक पंन्नाशीतली नर्स त्याला बघत होती.ती नर्स चालत त्याच्या जवळ आली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

" देवाने पण इतक्या चांगल्या ...गोड मुलाला कसं केल बघा... बेटा तिथं बाकड्यावर बस कोणी आल नाही का तुझ्यासोबत...?" नर्स.

क्रिश मात्र तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता. शांभवीला मात्र ते बघून हसू फुटलं, ती जोरजोरात हसत होती. क्रिशला काही कळत नव्हतं, तो शांभवी जवळ गेला ,तिचा हात पकडला आणि तिला बाहेर घेऊन आला. अजुनही ती नर्स त्याला बघत होती, तिने परत नकारार्थी मान हलवली आणि आत मध्ये आपल्या कामाला निघून गेली.

"काय झालं..?? एवढी का हसतेस तू.." क्रिशला तिचं हसणं अजूनही थांबत नाही बघून जरा राग येत होता त्याला.

" आता ती मावशी काय बोलली तुला कळलं का.??." शांभवी हसू थांबवण्याचा प्रयत्न करत बोलली.

हा त्या काहीतरी देव..गोड मुलगा.. बाकड्यावर बस.. असं काही तरी म्हणत होत्या.. मला पण नाही समजलं असं का बोलल्या तर.??." क्रिश निरागसपणे बोलला. शांभवी परत परत हसायला लागली.
"अरे त्या मावशी तुला वेडा समजत होत्या ..वेडा... कसले हातवारे करत होता .." शांभवी

"हो पण मी तर तुझ्याकडे बघून बोलत होते ना..? गाॅड ...आता समजलं मला... असे तर बरेच लोक मला वेडा समजत असतील.... शांभवी तुझ्यामुळे...ना.. !! आणि आता हसतेच मला ... तु ना गेलीस माझ्या हातून... "तो मारायला तिच्या पाठीमागे धावला. अजूनही तिथं काही लोकं होती तिही त्याच्याकडे बघून चुचु करत हळहळत होती.. बिचारा क्रिश..

"ओके चल बस गाडीत ...." अखेर तिथल्या लोकांच्या नजरा कळताच ते गाडीत जावून बसले.

"काय समजलं मग तुला आज.. ?..". त्याने गाडी स्टार्ट करत तिला विचारलं.

शांभवीने डॉक्टरांचे जे संभाषण ऐकले ते त्याला सांगितले.

"मग चल आता पोलीस स्टेशन कडे जावू ..मी विशाल ला सांगतो ..त्या नाशिकच्या लाइफ हॉस्पिटल मधून त्या हेमा ची माहिती काढायला..."क्रिश .

" क्रिश त्याच्यापेक्षा तू त्याच्याशी फोन वरच बोल ना ..मला ना..सावी ला भेटायचे आहे...सकाळपासून मी बघितलंच नाही तिला.."शांभवी.

" चालेल ठीक आहे मग .. घरी जावू ...घरी गेल्यावर करेल मग मी त्याला कॉल.." क्रिश

******

ऑफिसला आल्यापासून अनिकेतचं कामात लक्षच लागत नव्हतं. आज दुपारचं जेवण काही त्याच्या तेवढे आवडीचं नव्हतं पण तरीही त्याने ठीक-ठाक जेवण केलं.

"सकाळी आजीने सांगितलं.. तसा विचार केला तर असं वाटतं की ..महेशीच राधा असेल.. पण जर महेशी राधा होती.. तर जेव्हा मी तिला शांभवी विषयी सांगितलं होतं... तिला विचारलं होतं शांभवीला प्रपोज करण्याविषयी... तेव्हा ती मला का नाही बोलली ....?मी आश्रमात जायचो भेटायला.. तेव्हाही तीने मला ओळख दाखवली नाही ....?नसेल ती राधा नसेलच...! राधा असती तर तिला ओळख दाखवायला काय हरकत होती...?.पण मग राधा कोण असेल..? ती माझ्या जवळपास आहे ..मग कुठेय ती..?? समोर का नाही येत आहे..??. तिच्या घरचे कदाचित कडक शिस्तीचे असतील.. म्हणून ती नसेल भेटत मला ...का तिचं लग्न झालेल ..??त्याचं ह्रदयात एक कळ उठली. "तिचा नवरा शंकाखोर असेल.??.तो तिच्यावर संशय घेईल म्हणून ती मला भेटत नसेल... पण आधी पण कुठे भेटत होती ती मला... तेव्हाही किती वेळा बोललो मी तिला.." तिचं लग्न झालेलं असेल या प्रश्नामुळे त्याचं मन अशांत झालं.

" मला का बेचैन वाटतंय ...तिचं लग्न झालं असेल... तर माझंही तर झालेलं होतं..
तिलाही झाला असेल का तेव्हा त्रास.. ??पण एका मैत्रीणीला कशाला त्रास होईल ...??"तेव्हा त्याला लगेच आठवलं महेशी शांभवीची जिवलग मैत्रिण होती पण ती तिच्या लग्नात नव्हती.... महेशीच असेल का राधा ...?? म्हणून तीला थांबणं शक्य झालं नसेल ..? आता मला होतंय तसं बेचैन तेव्हा तिलाही झालं असेल का ...??आणि आता शांभवी नाही आहे म्हणून ती परत आली असेल..?? मग
मग मला सांगत का नाही ती ...??
मीच राधा आहे म्हणून.. का महेशीच्या ओळखीतली आहे राधा कुणीतरी दुसरी..??... मी महेशीलाच विचारू का डायरेक्ट...?? नको नको मला अजून काही दिवस ऑब्जर्व करावे लागेल.. मी तिचा मोबाईल चेक केला तर.??.ऐसऽऽ.. महेशीचा मोबाईल जर मला भेटला तर.. कदाचित मला माझ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील... एक तर ती राधाशी संपर्कात असेल ते कळेल.. किंवा महेशीच राधा आहे हे तरी मला नक्की समजेल.."
दिवसभरात आता तो कुठल्यातरी निष्कर्षाप्रत आला याचं त्याला समाधान वाटलं.
"खरंच राधा माझ्यासाठी आली असेल तर ..त्याला आत मध्ये कुठेतरी सुखावल्या सारखं झालं.. आतून छान छान स्पंदने येत होती.. त्याचा मूड एकदम फ्रेश झाला....


"राधा मला सांग ..कुणी त्याचं पहिलं प्रेम विसरू शकतो का??"अनिकेत.

"मला जास्त काही माहित नाही..पण ऐकलेलं पहिलं प्रेम नाही विसरता येत..पण का रे असं का विचारतोस ...??शांभवीच तुझं पहिलं प्रेम आहे ना?? आणि आता तर तुमचं लग्नही ठरलंय.."राधा.

महेशीला अपेक्षित उत्तर ' हो ' होतं पण तरीही मनात वाटत होतं त्याने नाही म्हणावं, कारण शांभवी आधी राधा शिवाय दुसरी कुठलीच मुलगी त्याच्या जास्त संपर्कात नव्हती. त्याने दुसऱ्या कुठल्याच मुलीला एवढं जवळ येऊ दिलं नव्हतं. मैत्रिण म्हणून सुद्धा...

पण तो काहीच बोलला नाही.
आज परत ते संभाषण अनिकेतला आठवत होतं.

"मी स्वार्थी झालो आहे का..?? शांभवीला जाऊन महिना ही होत नाही आणि राधा चा विचार करतोय... नाही नाही मला असा विचार करून चालणार नाही... अनिकेतने जबरजस्तीने ते विचार डोक्यातून घालवून लावले .पण राधाला शोधायचा विचार त्याने नक्की पक्का केला .

असेच दिवस जात होते ,पोलिसांचा तपास काही जास्त पुढे सरकत नव्हता. हेमा 'लाईफ 'मधून सुद्धा पळून गेली होती .आता तिचा कुठलाच ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. तो ट्रक ड्रायव्हरही काही जास्त बोलत नव्हता.. ह्या दरम्यान महेशी आणि अनिकेतचेही बोलणे बंद होते. नेहमी ती त्याच्या आवडीचे जेवण बनवत होती पण त्याच्याशी बोलत नव्हती. मात्र राधा आणि अनिकेतचा फेसबुकच्या कृपेने संवाद सुरू होता . अनिकेतने बराच वेळा तिला विचारलं की तू कुठे आहेस? पण राधाने नेहमीच उत्तर देणे टाळले .आता अनिकेत बऱ्यापैकी नॉर्मल झाला होता.. सर्व काम तो नीट बघत होता.
शांभवीही अनिकेत आणि सावी ला नीट बघुन आनंदी होती.

आदिती ही काही दिवसांसाठी गावी हॉस्पिटलला गेली होती.

आज हरतालिका होती म्हणून जेवणाचा जास्त गोंधळ नव्हता, आजी आणि महेशीचा उपवास होता. बाकी दोघांचाच स्वयंपाक महेशीने बनवला. आजची दुपारही उद्या पासून सुरु होणाऱ्या गणपती उत्सवाच्या आरास सजवण्यात गेली.
सावी झोपल्यावर शांभवीही अदीतीच्या रूमकडे निघून गेली. महेशी सावी जवळ झोपत असल्याने शांभवी अदीती सोबत रूममध्ये रहात होती फक्त अदीतीला हे माहीत नव्हते..नाहीतर..??

हरतालिकेला रात्री बारा वाजेपर्यंत तरी जागरण करावे लागते असे कुठेतरी महेशीने ऐकलेले , त्यामुळे ती जागी होती. रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते, करून, करून काय करणार म्हणून ती एक पुस्तक घेवून बाहेर गॅलरीत गेली,पण तिचं वाचण्यात मन रमत नव्हतं...म्हणून वर आकाशात चांदण्यांना बघत होती.

अनिकेत ही त्याचे काम करत गॅलरीत बसला होता. त्याचं लक्ष समोरच्या शुक्र ताऱ्याकडे गेले.

"तुम्हाला माहित आहे अनिकेत जेव्हा माझं मन अशांत होतं.. तेव्हा मी रात्री आकाशात बघते शुक्रताऱ्याकडे त्याचा तो शीतलपणा डोळ्यांतून सरळ मनात भरतो आणि मन शांत होतं..."राधा.

"काहीही..राधा.."अनिकेत.

" बघ तू ही करून बघ एकदा.. तुलाही शांत वाटेल.."राधा.

" वेडी वेडी आहेस तु राधा असं काही होतं का..?"अनिकेत.

आज त्याला तेच संभाषण आठवत होते.त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित झळकले.

"हो राधा मला आता शांत वाटतय..."तो मनाशीच बोलला. आणि तेथून उठला ,गॅलरीतल्या सर्व पसारा त्याने भरून ठेवला .झोपायच्या आधी एकदा सावीला बघून येवू म्हणून तो खाली आला. बघितलं तर सावी बेडवर एकटीच झोपलेले होती.
ही महेशी कुठे गेली..?? सावीला असं सोडून म्हणून तो रूम मध्ये आला, बघितल तर बाल्कनीत ला लाईट सुरु होता. तो तिकडे गेला महेशी अजूनही त्या शुक्रताऱ्याकडे बघत होती.त्याच्या मनात काहीतरी आले.

"तुझंही मन अशांत आहे का ..राधा??"मागून अनिकेत बोलला.

" हो.." ती बोलली खरी पण लगेच लक्षात आलं की मागे अनिकेत उभा आहे..

"अं तुम्ही तुम्ही इथं ह्यावेळेला काय करत आहात..??" महेशी थोडी गोंधळली .

पण अनिकेतच्या लक्षात आले राधा नाव घेतल्यावर सुद्धा महेशीने उत्तर दिलं.

"ते राधा ...एवढं बोलून तो मध्येच थांबला .. महेशीच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत .. माहेशीचे डोळे विस्फारले ,हात थोडे-थोडे थरथरायला लागले...

"ते माझ्या रूम मध्ये राधा कृष्ण ची मूर्ती होती, ती समोर नाही दिसत आहे ,तू त्या दिवशी आवरली होती ना रुम तर कुठे ठेवलीस..??"अनिकेत.

तिने हुश्श करून एक निश्वास सोडला ,हेही अनिकेतने बघितले..

"ती मी तुमच्या स्टडी टेबलवर ठेवलेली होती. तिथेच आहे ती...." शांभवी.

" हो अच्छा असेल ..कदाचित मला नसेल दिसली... बर तू झोपली का नाही अजून..?"अनिकेत.

" ते आज ते आज हरतालिका आहे ना... रात्री बारा पर्यंत तरी जागरण करावे..असे म्हणतात ..म्हणून जागी होते..."महेशी.

"अच्छा.. ठीक आहे " तो बाहेर गेला पण दरवाजाच्या बाहेरच थांबला .दहा एक मिनिटे तो तिथेच घुटमळला. मग त्याने त्याचा मोबाईल उघडला.

" हाय राधा.. झोपलीस का? मला झोप नाही येत आहे.. गप्पा मारायच्या का ..??"अनिकेतने
मेसेज टाईप केला आणि तो सावीच्या दरवाज्याजवळ उभा राहून सेंड केला. बरोबर त्याच वेळी सावीच्या रूममध्ये एक मेसेज टोन वाजली. त्याचं काळीज क्षणभर थांबलं.....


ऋतू बदलत जाती....
नवीन चाहूल...
नव्या बदलाची....
घेवून येती....
ऋतू बदलत जाती....

क्रमक्षः.....

भेटूया पुढच्या भागात...
©® शुभा.