Ek Prem Kahani Ashi pan books and stories free download online pdf in Marathi

एक प्रेम कहाणी अशी पण

ओह ! विराज किती वर्षांनी तुला बघितले. तुला एवढ्या वर्षांनी बघून पण माझ्या हृदयाचे ठोके वाढले. अजून पण किती सुंदर दिसतोयस रे! असे वाटते तुलाच बघत राहावे.

 

"मावशी, तिकडे बसून घ्या बरे, कार्यक्रम सुरु होत आहे." तुला बघण्याच्या नादात विसरले होते की मी मध्ये उभे होते. सीटवर बसले आणी माझ्या शेजारी बसलेली मीना हळूच कानाजवळ येऊन म्हणाली, "श्रद्धे, तो म्हातारा आवडलाय का? सेटिंग करून देऊ का?"

 

तूच सांग तीला काय सांगावे, तरी कोपरा मारून तीला सांगितले, "वेडी झाली आहेस का, गप्प बस काळतोंडे." विराज, कार्यक्रम सुरु झाला आणी आमच्या आनंदगृह वृद्धाश्रमचे एक ट्रस्टी मुकुल शेटने तुझे स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व मुख्य ट्रस्टी धनजी शेटने शाल व नारळ देऊन सन्मान केले. स्टेजवर तुझ्या जवळ तुझ्यासारखाच दिसणारा एक युवक पण बसलेला होता, तुझा मुलगाच असेल. मागे एकदा तू बाजारात भेटला होतास तेव्हा तुझा मुलगा तुझे बोट पकडून चालत होता, त्या वेळेस तू नाव पण सांगितले होतेस, पण विसरले.

 

मला माहित होते कार्यक्रमात पुढे काय होणार आहे. आता धनजी शेट तुझी मनसोक्त स्तुती करणार होते. दर तीन चार महिन्यात अशे कार्यक्रम आमच्या वृद्धाश्रमात होतात आणी मोठे डोनेशन देणाऱ्या व्यक्तींचे स्वागत, सन्मान व स्तुती नंतर सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणी मग नाष्टा.    

 

विराज, जवानीत तू तुझ्या शेजारी बसलेल्या तुझ्या मुला एवढाच सुंदर दिसत होतास. आता थोडे टक्कल पडले आहे, पण तुझा चार्म अजून कमी झालेला नाही अजून ही आकर्षक दिसतोस.

 

धनजीशेटने स्वागत भाषण सुरु केले "माझ्या बंधू भगिनीनो, आज आपल्या मध्ये हजर आहेत महान रंगकर्मी श्री विराज मोरे. त्यांचे नाव मराठी नाट्यअभिनेत्यांमध्ये खूप सन्मानाने घेतले जाते. त्यांची नाटके जगभरात गाजली आहेत." महान रंगकर्मी व गाजली शब्द ऐकून तुमची फुलात चाललेली छाती व ताठ होत असलेली मान मी इकडूनच बघू शकत होते. "त्यांनी आपल्या वृद्धाश्रमाला पाच लाखांचे डोनेशन दिले आहे." संपूर्ण हॉलमध्ये टाळ्या वाजल्या. "मी जास्त काही न बोलता माईक श्री विराज मोरेंजी कडे सोपवतो आणी विनंती करतो की त्यांनी आपल्या बंधूभगिनीचे उद्बोधन करावे."

 

त्या नंतर तू स्वतःचे भाषण सुरु केले. तुझा तो कानात अमृत ओतणारा मधुर आणी बुलंद आवाज आज ही मोहित करून टाकतो. वयोमानाने थोडा फरक जाणवला, पण जादू काही कमी झालेली नाही. तुझ्या या आवाजा मागे तर मी वेडी होती. तू जेव्हा कॉलेजच्या स्टेज वरून लांबलचक डायलॉग बोलायचास, मी व माझ्या मैत्रिणी मंत्रमुग्ध होऊन तुझ्या कडेच बघत राहायचो.

 

विराज, तुला आठवतोय का कॉलेजचा पहिला दिवस? त्या दिवशी तुला, मला आणी आपल्या सारख्या दहा विद्यार्थ्यांना कॉलेजच्या गेट वरून सरळ मागे ग्राउंड वर घेऊन जाण्यात आले, तिकडे आपली रॅगिंग होणार होती. एक सिनियर विद्यार्थ्याने सगळ्यांकडे काही तरी कृती करून घेतली, कुणी गाणे बोलले, तर कुणी उडया मारून दाखवल्या. जेव्हा तुझा नंबर आला तेव्हा तू नटसम्राट मधला डायलॉग बोललास "जगावं की मरावं हा एक च सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकीरड्यावर खरकट्या

पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदान ?

का फेकुन द्याव देहाच लखतर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?

आणी करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?

माझा तुझा ह्याचा अन त्याचाही.

मृत्युच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा…

की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा कीनारा कधीही.."

 

तिकडे हजर असलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण मी तर ते पण विसरले, मोहून गेले होते तुझ्या आवाजावर.

 

तू कॉलेजमध्ये नवा होतास, पण त्या सिनियरने तुला त्याचा ग्रुप मध्ये सामावून घेतले. आपण एकाच वर्गात होतो, पण तू माझ्याकडे कधी मान वर करून पण बघितले नाहीस, माझ्याकडेच काय तू कोणत्याही मुली समोर कधी बघितले नाहीस. तुला पटवण्यासाठी सगळ्या मुलींनी किती उपक्रम केले, पण तू कधी लक्ष नाही दिले आणी त्या साठी तू मला जास्त आवडू लागलास.

 

कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमात तू पहिल्यांदा माझ्याशी संवाद साधला. माझ्या कवितेचे वाचन करून मी स्टेज वरून उतरत होते तेव्हा तू माझ्या जवळ आलास आणी बोललास, "वा ! श्रद्धाजी, किती सुंदर कविता लिहिता, मला माहित नव्हते की माझ्या वर्गात एक कवयत्री पण आहे."

आधी दुर्लक्ष केले व नंतर मी उत्तरले होते "ओह! तू माझ्याशी बोलत आहेस, मला वाटले तू कोणी वयस्कर बाईला हे सगळे सांगत आहे. मी तुझ्या वयाचीच आहे." ते ऐकून तू हसू लागलास.

 

तुझ्या हसण्यामध्ये पण तुझ्या आवाजा एवढेच आकर्षण होते. तुझ्या गालांमध्ये पडणाऱ्या खळींमध्ये मी वाहून गेले. तू बोलत राहिलास आणी मी तुझ्याकडे बघत राहिले. तू माझी कवितांची नोटबुक घेऊन गेलास आणी दुसऱ्या दिवशीच मला परत दिली आणी सांगितले, "रात्रभर तुझ्या कविता वाचत होतो, किती भावपूर्ण आणी सुंदर लिहिते तू , तुझ्या कवितांचे पुस्तक प्रकाशित झाले पाहिजे."

 

तुझ्या शब्दांमुळे कविता लिहिण्याचा उत्साह वाढला होता. आपण हळू हळू जवळ आलो, आपण एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागलो. आपली मित्रता प्रेमामध्ये कधी परिवर्तित झाली हे मला पण कळले नाही. मला आज पण आठवतेय की मी एका कविता द्वारे तुला माझ्या मनातल्या भावना सांगितल्या आणी तू खूप साहजिकतेने माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास.

 

आपण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो, पण तू कधी कधी सांगायचास, "श्रद्धा, अभिनयानंतर कोणी मला आवडत असेल तर ती तू आहेस." अभिनयासाठीचे तुझे प्रेम बघून खूपदा मला ईर्ष्या व्हायची. नाटकांच्या रिहर्सल वेळी तर तू मला विसरू जायायचा, पण मला तुझे पहिले प्रेम समजत होते.

 

कॉलेजची तीन वर्षे, तीन दिवसांसारखे संपून गेले. आपण दोघेही चांगल्या गुणांनी पास झालो होतो. रिझल्टच्या दिवशी मी तुला आपल्या भविष्याबद्दल विचारले होते तेव्हा तू उत्तरलास, "श्रद्धा, सध्या माझी आर्थिक स्थिती चांगली नाही आणी परिस्थिती पण अनुकूल नाही. तू मला पाच वर्ष दे. माझे एडमिशन बी. एड. मध्ये झाले आहे व मी एका नाट्यसंस्थे मध्ये अर्ज केला आहे. मला तुझ्या लायक बनु दे त्या नंतर आपण लग्न करू. तू माझी वाट बघशील ना?"  पण विराज या सगळ्या गोष्टी तू माझ्या डोळ्यात न बघता जमिनीकडे बघून बोलला होतास आणी त्याने माझ्या मनात शंकेचे वादळ निर्माण केले.

 

विराज, तू तुझे शिक्षण हॉस्टेल मध्ये राहून घेतले होतेस आणी कोणीहि विद्यार्थ्याने तुला घरी जाताना बघितलेच नाही. उन्हाळयाच्या सुट्ट्यांमध्ये पण तू हॉस्टेल मध्ये राहून नाटक लिहायचास. मी तुला तुझ्या परिवाराबद्दल खूपदा विचारले, पण तू नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली होतीस. तू खूप प्रयत्न केलेस, पण माझ्या मनात शंका निर्माण झाली होती व त्याचे निरसन करणे गरजेचे होते म्हणून तुझा पिछा करण्याचे ठरवले.

 

आपलं कॉलेज पुण्यामध्ये आणी तू मुंबईचा. तू घरी जायायला ट्रेन पकडलीस आणी मी तुझ्या मागोमाग दुसऱ्या डब्यात चढले. तू दादरला उतरल्यास आणी तिकडून लाईन बदलून वेगळी लोकल पकडून ग्रांट रॉड स्टेशनवर गेला. तू तुझ्या धुंदीत चालत होतास आणी तुला माहित नव्हते की मी तुझ्या मागेच आहे. तू चालत चालतच निघालास आणी मी तुझ्यामागे. तू ज्या एरियामध्ये पोहोचला तो जरा विचित्र वाटत होता. मी ते बघून चक्रावून गेले.  मी एका पोलिसवाल्याला त्या बद्दल विचारले तर तो म्हणाला, "मुली, हिकडून पुढं जाऊ नको, हे कामाठीपुरा आहे, मुंबईचा रेड लाईट एरिया."

 

माझ्या डोळ्यापुढे अंधार आला. तुझ्यासारख्या चांगल्या व्यक्तीला तिकडे जाण्याची गरज काय होती? माझी उत्कंठा वाढली होती, मी पोलिसांच्या सल्याकडे दुर्लक्ष केले व पुढे निघाले. मी लांबून बघितले की तू त्या चाळीच्या एक खोलीमध्ये गेलास आणी इतक्यात माझ्या खांद्यावर एक हाथ पडला आणी कानात शब्द, "कीतना लोगी एक घंटे का?" मी घाबरले आणी पळत सुटले, स्टेशनपर्यंत मी मागे वळून बघितले नाही.

 

एक बाकावर बसून रडू लागले. किती प्रेम केले होते तुझ्यावर ! पण तुझे हे रूप बघून तुझ्या विषयी मनात ज्या भावना होत्या त्या माझ्या अश्रूं सोबत वाहू लागल्या. पवित्र प्रेमाच्या पुजार्याला शरीराची काय गरज पडली?

 

इतक्यात माझ्या खांदयावर पुन्हा एक हात पडला आणी मी पुन्हा घाबरले, पण तो तुझा हात होता विराज. तुझ्या डोळ्यात पण अश्रू होते तू म्हणालास, "श्रद्धा, मी हे तुला खूप काळापासून सांगू इच्छित होतो, पण तू माझ्यापासून दूर होशील म्हणून सांगू शकलो नाही. तू मला ज्या घरात जातांना बघितले ते माझ्या आईचे घर आहे. मी एक वेश्यापुत्र आहे आणी तिने स्वतःचे अंग विकून मला वाढवले आहे. ती अखेरचा श्वास घेत आहे म्हणून तिला बघायला गेलो होतो. माझ्या सारख्या वेश्यापुत्रांचे तसे काही भविष्य नसते, एकतर ती गुंड बनतात नाहीतर दल्ले, पण माझी आई वेगळी होती, तिने माझ्यासाठी भविष्य बघितले आणी मला शिकवले. पुन्हा इकडे परत न फिरण्याचे वचन घेतले होते, पण मला सांग श्रद्धा, इतक्या महान आईचे तिच्या शेवटच्या काळात एकदा तोंड न बघण्याचे पाप मी कसे करू शकणार होतो? इतका नालायक आहे का मी?"

 

हे सगळे सांगताना तुझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, माझ्या आतली कवयत्री तुझ्या वेदना अनुभवत होती. तू पुढे बोललास, "मी तुझ्या कवितांमध्ये नेहमी माझ्या आईला शोधत होतो, तिचा आक्रोश, तिच्या वेदना, तिचे समर्पण हे सगळेच तुझ्या कवितेंमध्ये मला दिसायचे म्हणून मी तुझ्या प्रेमात पडलो. मी खूपदा प्रयत्न केले, पण शब्द माझ्या तोंडात यायचे आणी मी तुला हरवून बसेन या भीतीने ते गळून पडायचे. आज मी माझी हकीकत सांगितली, आता माझा स्वीकार कर किंवा मला धुत्कार मला भीती नाही."

 

विराज, त्या वेळेस मी धर्मसंकटात सापडले होते. एका बाजूला तू आणी तुझे सत्य आणी दुसरीकडे माझा परिवार, ज्यांच्यापासून मी कधीच सत्य लपवणार नव्हते. तुझ्या पासून दूर पण राहू शकणार नव्हते. तू माझ्या जीवनातच का आला? थोड्यावेळाने मी माझा निर्णय सांगितला, "तू जसे आधीच बोलला आहेस तशी पाच वर्ष मी तुझी वाट बघेन आणी त्या वेळेस तू स्वतःची ओळख बनवू शकलास तर माझा परिवार पण तुझा स्वीकार करेल, पण तो पर्यंत मी तुला भेटणार नाही.”

 

***

पण मला काय माहित होते की प्रेमी म्हणून ती आपली शेवटचीच भेट होती कारण नंतर आपली जेव्हा भेट झाली तेव्हा तुझे लग्न झाले होते. तू मला धोका दिलास, मी तू एक वेश्यापुत्र असताना सुध्दा तुझा स्वीकार केला आणी तू परिस्थिती अनुकूल बनवायला आणी जीवनात पुढे जायायला यु. सी. प्रोडक्शन हाऊसच्या मालकाच्या मुलीशी लग्न केलेस आणी पुढे गेलास.  मी तुझ्या लग्नानंतर तुला विचारले होते तेव्हा तू म्हणालास, "श्रद्धा, तुला माहित आहे की नाटक हे माझे पहिले प्रेम आहे आणी समोरून चालून आलेली संधी कशी गमावू? फक्त तुझ्या प्रेमासाठी स्ट्रगल करत राहणार होतो?"

 

तुझ्या लग्न पेक्षा जास्त तुझ्या शब्दांनी दुखावले होते. तुला दुसरा चान्सच मिळाला नसता का?

 

****

 

हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला आणी तू भाषणानंतर सीट वर ताठ मानेने बसलास. त्या नंतर धनजीशेटने जाहिरात केली, "बंधू आणी भगिनींनो, आपल्या या आनंदगृह मध्ये निवास करणाऱ्या एक कवयत्रीचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. त्या कवयत्री म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या कुमारी श्रद्धा. त्यांना मी विनंती करीत आहे की त्यांनी आपल्या दोन कविता सादर कराव्या."

 

दुरून सुद्धा तुझ्या चेहर्यावरचे भाव दिसत होते. मी स्टेजवर येऊन माझ्या कवितांचे पठन केले आणी सगळ्यांनी टाळ्यांनी माझे मनोबल वाढवले. कार्यक्रम पूर्णतेकडे वळला होता. त्या वेळेस तुमच्या मुलाने इशाऱ्याने धनजी शेट कडे माईक मागितला.

 

तो उभा झाला आणी बोलू लागला, "इकडे हजर असलेल्या सर्व वडिलांना माझा नमस्कार. इकडचे वातावरण बघून मला खूप आनंद झाला आहे आणी तो शब्दांत सांगणे जरा कठीणच आहे. आनंदगृह खरोखर आनंद साजरा करणारे घर आहे. आता इकडे दर दोन किंवा तीन महिन्याने येत राहीन. इकडे येऊन मला अजून एक गोष्ट लक्षात आली की माझे बाबा इकडे किती फेमस आहेत आणी तुम्ही सर्व किती प्रेम करता त्यांना. तर मी अजून एक महत्वाची जाहिरात करीत आहे की माझे बाबा म्हणजेच तुमचे लाडके विराज मोरे आता इकडे तुमच्या सोबत राहतील." आखा हॉल टाळ्यांच्या गजराने दणाणून गेला. फक्त दोन जण टाळ्या वाजवीत नव्हते. एक मी आणी एक तू.

 

'महान रंगकर्मी, महान नाट्यकर्मी' शब्द ऐकून फुललेली छाती बसत असताना दिसू लागलेली आणी ताठ झालेली मान आता नरम पडू लागली होती. तुझे डोळेच सांगत होते की तुला न सांगता, वृद्धाश्रमात ढकलून देण्यात आले आहे. त्या नंतर हॉलमधल्या खुर्च्या हटवण्यात आल्या व तिकडे संगीतखुर्ची आणी अंताक्षरी खेळण्यात आली. तुझ्या मुलगा त्याच्यात आनंदाने सहभागी झाला आणी तुझ्या मुलाचा ड्राइवर तुझे सामान घेऊन एक रूम कडे वळला होता.

 

कुणाचेही लक्ष तुझयाकडे नाही हे बघून तू माझ्याकडे आलास आणी मला विचारलेस, "श्रद्धा, तू लग्न केले नाहीस, पण तुझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे!"

"हे मंगळसूत्र आणू कुंकू तुझ्या नावाचे आहे." माझे उत्तर ऐकून तुझ्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले आणी नंतर वेगळे भाव आणून म्हणालास, "ओह ! श्रद्धा, किती मूर्ख होतो मी! क्षुल्लक कारणावरून मी तुझ्याशी लग्न न करून तुझ्यावर अन्याय केला, पण अजून वेळ गेलेली नाही आपण लवकरच लग्न करू."

 

आरसा फुटावा असा आवाज माझ्या हृदयातून आला आणी तुझी स्वच्छ असलेली छबी धुळसर झाली. जे काल तुझ्यासाठी सर्वात प्रिय होते ते क्षुल्लक झाले? असा कसा स्वार्थी रे तू?

 

त्याच क्षणी मी माझ्या गळ्यातले मंगळसूत्र काढून टाकले आणी म्हणाले, "आता लग्नाची गरज नाही."

 

समाप्त