Rutu Badalat jaati - 25 - Last Part in Marathi Love Stories by शुभा. books and stories PDF | ऋतू बदलत जाती... - भाग..25 - अंतिम.

ऋतू बदलत जाती... - भाग..25 - अंतिम.ऋतू बदलत जाती...२५.


"शांभवी..!! काय बोलतेस तु हे..?? हे बाबा कोण आहेत ..??..अनिकेतच्या कानावर महेशी आणि अनिकेत चा विवाह हे शांभवी चे शब्द गेलेले होते.

"अनि मी तुम्हाला सर्व सांगते.. आधी आपण बाबांना आत बोलवू... त्यांचा आशीर्वाद घेऊ...."शांभवीआता पुढे....


"नाही बेटा... मी आत येत नाही.. पण माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या तिघांच्या पाठीशी आहे.."बाबा.
दोघांनी बाबांना नमस्कार केला ,डोळे उघडले तर बाबा समोर नव्हते.बाबा गेट बाहेर पडले असतील म्हणून अनिकेत तिकडे गेला, पण त्याला गेटबाहेर ते कुठेच आढळले नाहीत.तो परत आला.

"शांभवी हे बाबा कोण होते ?? ते इथे का आले होते..??ते कुठे गायब झाले....आणि तुझी आग शांत झाली का...??..... तु त्यांना माझं आणि महेशीच लग्न असं का बोलत होती..??" अनिकेत एका मागून एक प्रश्न विचारत होता.

"अनि...मला होणारा दाह शांत झाला आहे ...मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते.. चला तिथं गार्डन मधल्या झोपाळ्यावर बसू...."दोघे झोपाळ्याकडे गेले.

"अनि.. तुमचा विश्वास बसतो की नाही बसतो..??.. पण मी जे सांगणार आहे ते सत्य आहे ..."शांभवी.

अनिकेत प्रश्नचिन्ह घेऊन तिच्याकडे बघत होता. आधीच शांभवी आत्मा बनून तिथे वावरत होती, आता ती त्याला दिसतही होती, सर्वच गोष्टी विस्मयकारक ,विश्वास न ठेवण्यासारख्या होत्या. पण अनिकेत हे धक्के पचवत होता ,बराच वेळा त्याने विचार केला होता की शांभवी अशीच कुठून तरी परत येईल आणि आपलं परत सर्व नीट सुरळीत होईल. वेडी आशा... आणि आज ती खरच जवळ होती... त्याची ती वेडी आशा सत्यात उतरली होती ,तर मग तो तिचं बोलणं असत्य कसं ठरवू शकणार ......

"अनि .. तुम्ही ..मी आणि महेशी युगा युगापासून बंधनात अडकलो आहोत... आपलीही एक कथा आहे.. त्यात तुम्ही युवराज होतात..तुमचं नाव राघवेंद्र होतं ....महेशी जानकी होती ...प्रधानकन्या आणि मी वैदेही..राजकुमारी... आपण तिघही पती-पत्नी या नात्यांमध्ये अडकलेलो होतो..." पुढे शांभवीने त्याला ती कथा सांगितली. नंतर शांभवीने साधू बाबा ने तिला तिचं कुठलं कर्तव्य पार पाडायला सांगितलं आहे, तेही सांगितलं. अनिकेत साठी हे सर्व पचण्यास जरा जड होतं, भलेही राधा म्हणजेच महेशी त्याचं पहिलं प्रेम होती, तरीही आता तो शांभवीशी विवाहबंधनात अडकलेला होता. भलेही ती एक आत्मा असो तरीही त्याचं निर्मळ मन त्याला ह्या गोष्टीला परवानगी द्यायला धजत नव्हतं...

"महेशीशी लग्न...तुझ्या समोर...!!शांभवी मला हे शक्य नाही..."अनिकेत.

"अनि...मी जे पुर्व जन्माबद्दल सांगितले...तेंव्हाही..आणि आताही.. अनंत काळापासून तुमचं महेशीवरच प्रेम होतं मी प्रत्येक वेळी मध्ये आलेली ... तरीही तुम्ही प्रामाणिकपणे दोघींना समान प्रेम देण्याचा प्रयत्न केला... पण जेव्हापासून कळलयं महेशीच राधा होती..सारखं वाटतंय महेशीच्या वाट्याचं प्रेम मी तुमच्याकडून हिसकावून घेतलंय... आणि आधीही..जे तिला एकटीला भेटायला पाहिजे होतं ते माझ्यामुळे तिला वाटून घ्यावं लागलं.."शांभवी.

"शांभवी हे कितीही सत्य असलं.. तरी माझं मन मानत नाही आहे ..."अनिकेत.

"अनि मी मध्ये आले नसते तर... कदाचित तुमचं लग्न महेशीशीच झालं असतं ..महेशीने माझ्या साठी तिच्या प्रेमाचा त्याग केला.. " शांभवीचं बोलणं संपत नाही तोवर अनिकेतने झटक्यात मान वर केली. तो शांभवीइकडे आश्चर्याने बघायला लागला .

"हो अनि.. मला हे माहित आहे पण मला हे फार उशिरा कळलं ...कदाचित महेशीच राधा आहे जर आपल्या लग्नाआधी मला कळलं असतं तर ...आज तुम्ही महेशी सोबत सुखात असता... पण अनि ...हे विधिलिखित होतं ..आपले तिघांचे ऋणानुबंध एकमेकांशी जोडलेले आहेत .......प्रत्येक जन्मामध्ये आपण असे एकमेकांना सोबत जगत होतो ....मागच्या जन्मी महेशीचा तुमच्याशी विवाह होऊन दोन वर्षांनी तीचा मृत्यू झाला होता... मग त्यापुढच्या आयुष्यामध्ये मी तुमची सहचारिणी होती ...या जन्मात मला मला मृत्यू आला... आता यापुढे महेशी तुमची सहचारिणी असेल ...अनि..!! बाबा असेही म्हटले की ह्या जन्मानंतर आपल्याला ह्या लोकातून कायमची मुक्ती मिळेल ...प्रभूचरणी आपल्याला स्थान मिळेल ....अनिsss ..मला माझं कर्तव्य करू द्या.. मी बाबांना वचन दिलं आहे... की उद्या मी तुमचं महेशी सोबत लग्न लावून देईल... तुम्ही मला मुक्त करा अनि..." शांभवी चे डोळे भरून आले होते. अनिकेतही भाऊक झाला त्याने तिचा हात पकडला .

"नाही शांभवी ..!! नाही ...मी तुला कुठेच जाऊ देणार नाही... तुझं कर्तव्य आहे ना ..आपण ते करू ...मी महेशीशी लग्न करेल ...पण तू कुठेच जाऊ नकोस...."अनिकेत.

" मला असं अडकवू नका अनि... मघाशी तुम्ही बघितलं होतं मी इथं मोहात अडकले ...आणि माझ्या अंगाची लाही लाही व्हायला लागली.... मी आतून जळत होते.... माझा वेळ संपत आहे ...माझं शेवटचं कर्तव्य मला करू द्या आणि मुक्त होऊ द्या..."शांभवी.

"शांभवी मला हे खूप जड जाणार आहे ..."त्याने रडतच शांभवीला मिठी मारली..

"अनि मी स्वतःला खूप नशीबवान समजते... की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात... मला तुमच्याकडून भरभरून प्रेम भेटले ...आता मी भरल्या मनाने जाईल..." शांभवीला क्रिश ,आदिती आणि महेशी गेटमधुन आत येताना दिसले ,तशी ती उठली .

"अनि विवाहाची तयारी करायला पाहिजे लवकर..." ती त्याला पाठमोरीच जड अंतकरणाने बोलली .अनिकेत मागून शांभवी शांभवी आवाज देत राहिला पण ती आत निघून गेली..

"असं कसं हे विधिलिखित..?? कुठल्या धर्मसंकटात पडलो मी... ??मान्य आहे मला राधा माझं प्रेम होती.....पण शांभवी तू माझी पत्नी होतीस.. तुझ्यासमोर मी इतर कुणाशी विवाहबद्ध कसा होऊ... तुझ्या डोळ्यात दिसणारे दुःख मी कसं सहन करू.. महेशीने तरी हे दुःख सहन केलं होतं का..?? निघून गेली होती ना ती आपल्या लग्नाच्या आधी...प्लीज शांभवी.. मला अपराधी नको बनवू.." तो स्वतःशीच खिन्न मनाने बोलत होता.

महेशीने अनिकेतला झोक्यावर विचारात मग्न पाहिले पण ती त्याच्याकडे गेली नाही ती सरळ आत आपल्या रूममध्ये निघून गेली.

****

"आजी अनिकेत लग्नाला तयार आहे ...आपल्याला उद्याच्या उद्या या दोघांचं लग्न पार पाडावं लागेल..." ती बरंच थंडपणाने बोलत होती.

" शांभवी बाळा एवढी काय घाई आहे... आपण काही दिवसांनी सुद्धा करू शकतो ना ..."आजी.

"नाही आजी माझ्याकडे वेळ नाही आहे... उद्याच्या उद्या हा विवाह सोहळा संपन्न व्हायला पाहिजे....
तुम्ही फोन करून गुरुजींना ह्या सर्वांची कल्पना द्या....."शांभवी तेथून क्रिशच्या रूमकडे निघून गेली.आत मध्ये जाण्याच्या आधी तिने तोंडावर खेचून स्मित आणले.

" अरे हे काय क्रिश... तू तर आराम करतो आहेस ...आता शेवटच्या कार्यात मला मदत नाही करणार का...??"शांभवी.

" कसली मदत ...कोणतं शेवटचं कार्य...शांभवी.."क्रिश.

" उद्या अनिकेत आणि महेशीचा विवाह संपन्न करायचा आहे..."शांभवी.

" पण एवढ्या लवकर कशासाठी ..."क्रिश.

"असं समज माझ्याकडे फक्त उद्याचाच वेळ आहे..."शांभवी.

" शांभवी असा वेळ कुठे ठरवलेला नव्हता ना..?? मग हे मध्येच काय .."क्रिश.

"आज साधूबाबा आले होते... मी त्यांना वचन दिलं आहे.. की उद्याच या दोघांचं लग्न संपन्न होईल म्हणून... आणि हो आदितीला ही सांगून टाक माझ्यासमोरच ...वाटलं तर आज रात्रीच बोल ..... "शांभवीच्या चेहऱ्यावर अजूनही खोटे हसू झळकत होते.

"शांभवी.. तू गंमत नाही करत आहेस ना ....??"क्रिश.

"नाही क्रिश ... माझी वेळ झालेली आहे .."शांभवी

"नको ना जाऊस ..."तो लहान मुलासारखा रडायला लागला, शांभवी त्याच्याजवळ गेली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

" क्रिश आयुष्य खूप मौल्यवान आहे... याला गमावू नकोस ...अदीती चांगली जोडीदार आहे... तुला साथ देईल... आज बोलून टाक तिला.. कदाचित तुझं मला भेटणं नंतर अदीतीला भेटणंही विधिलिखित असेल...तुला आत्महत्येपासून वाचवण्यासाठी...अदीतीला भेटवण्यासाठी...बस ऐवढंच सांगेल.. सुखाने पुढचं आयुष्य जग...." शांवीचे डोळे भरून आले होते.

"शांभवीsss.. हे आजी काय सांगत आहेत..??'
महेशी धावतच क्रिश चा रूम मध्ये आली,
तिला धाप लागली होती.

"मला माफ कर महेशी...! खूप घाईगडबडीत तुझं लग्न लग्न उरकत आहे... पण माझ्याकडे वेळ कमी आहे.."शांभवी.

" वेळ ..!! कसला वेळ..!! उलट हे लग्न उशिरा झालं तुला तेवढा वेळ आमच्या सोबत थांबता येईल ...आणि माझी तर इच्छा आहे हे लग्न होऊच नये ...तू ..अनिकेत तुम्ही पूर्वीसारखेच रहा... आता जरी तू आत्मा असली तरी तु जिवंत मनुष्यासारखी वावरू शकतेस.."महेशी.

"नाही महेशी ...हे शक्य नाही ..जे विधिलिखित आहे.. ते आपण बदलू शकत नाही.. मी फक्त इथं थांबण्याचा विचारच केला होता.. त्यानेच माझ्या अंगाची लाही लाही व्हायला लागली ...परमेश्वराला हे मान्य नाही... मी निसर्गाचे नियम मोडू शकत नाही... साधू बाबा आले होते ..मी त्यांना वचन दिलं आहे... प्लीज माझी मदत कर महेशी..."शांभवीने महेशीचे हात हातात घेतले.

" शांभवी... मलाही खूप जड जाईल ... अनिकेत ते तरी तयार आहेत का याच्यासाठी...?? "महेशी.

" हो महेशी... मी त्यांना पूर्ण कल्पना दिली आहे.. त्यांना सर्व सत्य सांगितलं आहे...मला माहित आहे तुम्हा दोघांना हे खूप जड जाईल.. पण पण आपल्याला हे करावाच लागेल.."शांभवी.

***

.

अनिकेत रात्रीच्या अकरा वाजता स्विमिंग पूल मध्ये पाय टाकुन बसला होता. महेशीने त्याला दुरुन बघितले ,तीही त्याच्या जवळ येऊन बसली.

" अनिकेत तुम्ही या सर्वांसाठी तयार आहात का..??"महेशी.

" तू आहे का तयार..??"अनिकेत.

दोघांनी उत्तर द्यायचं टाळलं...
"तुला आधीपासूनच माहिती होतं ना.. हे.. की आज असं काही वळण येणार आहे..."अनिकेत दुसरीकडे बघून बोलला.

"हम..."शांभवी.

"तू मला आधीच का नाही सांगितलं.. राधा ..."अनिकेत राधा शब्दावर जोर देवून बोलला.
महेशीने चमकून त्याच्याकडे बघितले.

" हो मला कळलं आहे.. तूच राधा आहेस ते..."अनिकेत .

"तुमची मनस्थिती नव्हती सर्व समजून घेण्याची... मला आधी तुमची मैत्रीण म्हणून.. तुम्हाला दुःखातून बाहेर काढायचं होतं.."महेशी.

"तुला समजतं आहे ..माझ्या आयुष्यात आज किती विचित्र घटना घडल्या... आणि किती विचित्र वळणे येऊन राहिले आहेत..."अनिकेतच्या सर्व भावना थंडावल्या होत्या असं तो बोलत होता.

"हो मला कळत आहे.. सामान्य माणसाच्या आयुष्यात असल्या घटना घडत नसतील.. पण अनिकेत आपण सामान्य नाही आहोत ...आपला संबंध अनंत काळापासून चालत आलेला आहे.... त्यात आपण तिघे एकाच धाग्यात ओळले गेलेले आहोत ... हे सत्य स्वीकारण्याशिवाय पर्याय तरी आहे का..??"महेशी.

" पण एवढ्या विचित्र पद्धतीने.. म्हणजे आपलं लग्न करण्यासाठी शांभवीला आत्मा बणून यावं लागलं..."अनिकेत.

"आपण विधात्याने रचलेल्या कथेची पात्र आहोत फक्त अनिकेत... त्याने आपली कथा जास्त मनोरंजक लिहिली आहे.. असं समजा हवं तर...."महेशी.

"तरीही महेशी.. मी माझ्या पत्नी समोर दुसरा विवाह.. महेशी तुला मी स्पष्टच सांगतो तू माझी मैत्रीण आणि पहिलं प्रेम होतीस... शांभवी माझी पत्नी आहे... मी तिच्यासोबत आयुष्य जगायचे स्वप्न बघितले होते... जगतही होतो... ती.. ती समोर नसती तर कदाचित मला हे.. हे एवढं जड नसतं गेलं.. पण तिच्यासमोर दुसऱ्या कोणासोबत विवाहबद्ध व्हायला मन मानत नाही आहे...."अनिकेत.

"तुमची जशी मनस्थिती आहे.. माझी ही तशीच आहे... पण मी असा विचार केला की.. माझ्या ह्या करण्याने शांभवीचं भलं होत असेल.. ती तिच्या त्रासातून मुक्त होत असेल.. तर मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे... मला वाटतं तुम्हीही असाच विचार करावा..." एवढं बोलून महेशी तेथून उठून गेली.

खाली हॉल मध्ये फक्त घरातल्याच लोकांमध्ये लग्न करण्याचं ठरलं, तिथेच लग्नमंडप उभारला होता.

****

"शुभ मंगल सावधान..." सर्वांनी अनिकेत महेशीच्या डोक्यावर अक्षतांची उधळण केली. सप्तपदी आटोपली .अनिकेतने महेशीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. शांभवी ते बघून कृतकृत्य झाली.

जेवणे आटोपली,भलेही फारसे कुणाला गेले नाही..पण आज शांभवी स्वतः च्या हाताने सर्वांना वाढत होती म्हणून सर्वांनी एक दोन घास खाल्ले.

"हा आता मला निघायला हवं... क्रिश तू बोलतोस ना अदितीशी..."शांभवी .
परत सर्वजण भाऊक झाले क्रिशने मान डोलवली.

क्रिश आदिती च्या समोर गुडघ्यावर बसला. "आदिती माझ्याशी लग्न करशील... मला खात्री आहे.. मी तुला तुझ्या मनासारखा आयुष्य नक्की देऊ शकेल.. विल यु.. माईन फॉर एव्हर .." क्रिशला बोलणे जड जात होते.

आदितीने महेशीकडे बघितलं ,महेशीने संमतीने होकारार्थी मान डोलवली.

"एस एस... "अदीती.
सर्वांच्या चेहऱ्यावर किंचित स्मित झळकले,पण त्यांच्या आनंदाला आज एक दुःखाची झालर ही होती...

शांभवी सावी जवळ आली तिला मिठीत घेतले, तिचे खूप सारे पापे घेतले, आणि तिला महेशीच्या कुशीत दिली. अनिकेतचा हातही तिच्या हातात दिला.
" माझ्या सावीची आणि अनिची काळजी घेशील... चला निघतो आम्ही आमच्या गावा..आमचा राम राम घ्यावा...." हसत हसतच ती अंतर्धान पावली.
"शंभूsss" महेशी तिथेच कोसळली .

********

जवळपास साडेचार वर्षानंतर...

"अनिकेत..!! किती वेळ लावणार आहात आवरा लवकर.. "महेशी.

"काय मॅडम ...तुम्ही तर आज आम्हाला नौकरच करून टाकला आहे..."अनिकेत.

" माझ्या एकटीच्याच लेकीचा वाढदिवस आहे का?? तुमच्याही लेकीचा वाढदिवस आहे ना.. मग लवकर लावा ते फ्लावर्स.. बच्चेकंपनी येईलच आता.."महेशी.

"आई..!! हे काय मी डान्सिंग बार्बीचा केक मागितला होता.. अम्ब्रेला घेतलेली बार्बी आहे ही.."सावी.

" बेटा हे माझं काम नाही ..तुझ्या बाबांचं काम आहे.. बघ ना एक काम धड करत नाही ..."महेशी.

"काय चुगल्या करणं सुरू आहे माझ्या लेकीकडे ...हं.. मी त्याला डान्सिंग बार्बीचा केक सांगितला होता ..आता त्याने नाही दिला त्यात माझी काय चुकी.."अनिकेत चिडला.

"अलेले सावीच्या बाबांना राग आला वाटतं..
सावी बेटा यावेळेस असू दे... पुढच्या वेळेस आईच तुझ्यासाठी केक घरी बनवेल..."महेशी.

"आई.. क्रिश मामा नाही आला अजून.. त्याने मला या बड्डेला बार्बी चे घर आणायचं प्रॉमिस केलं होतं ..."सावी.

"आलाय तो ..बाहेर गार्डनमध्ये शंभू सोबत आहे...."महेशी.

"अहो एक काम करता का.. शंभू आणि आजीला बोलवता का ..??त्यांची तयारी बाकी आहे अजून.."महेशी केकवर मेनबत्ती लावत बोलली.

"जा मी नाही ऐकणार तुझं ...काम करा तर करा.. वरतून बोलणेही ऐका त्यांचे.."अनिकेत.

महेशीने हळूच तिचे ओठ त्याच्या गालावर टेकवले.
" आता जाल..."महेशी.
त्याने हसत मान डोलवली आणि बाहेर गेला..

"शंभूsss.. बाबांकडे कोण येईल..."अनिकेतने दोन्ही हात पसरले. एक वर्षाचा शुभम दुडूदुडू धावत अनिकेतच्या मिशीत शिरला.

"खूपच मस्तीखोर आहे तुझा शुभम ..."क्रिश .
"आईवर गेलाय..."अनिकेत हसत त्याला आत घेवून आला.
***

सर्वजन केकजवळ जमले होते.

"हॅपी बर्थडे टू यु ...हॅपी बर्थडे डिअर सावी... हॅपी बर्थडे टू यु..."

सावीने आनंदाने केक कापला.

खरंच काळच सर्वात सुरेख औषध आहे सर्व दुःखांवर....

समाप्त.

माझी ही कथा काल्पनिक होती .त्यातले पात्र काल्पनिक होते. ह्या कथेतून मला कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता .तरीही जर चुकून अनावधानाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व.

धन्यवाद.

©® शुभा.