Aakashi jhep ghe re paarkha - 3 books and stories free download online pdf in Marathi

आकाशी झेप घे रे पाखरा !! - भाग ३



माझ्यातील स्त्री हार मानायला तयार नव्हती.अर्णवचा विचार मनात येऊन आपण करतोय ते योग्य आहे ना असं किती तरी वेळा माझ्या मनात आलं पण आता जर ठाम निर्णय घेतला नाही तर परत कधीच हे शक्य होणार नाही हे मला पटलं.. मनातल्या मनात याविषयी बरीच द्वंद झाली आणि शेवटी घटस्फोट घेण्याच्या निर्णयास आले..

"आता तुम्हीच सांगा.. काय चुकलं माझं.."

मी फक्त हसून तिच्या पाठीवर हात ठेवला.. तिला धीर दिला पण ती चूक की बरोबर यावर त्या क्षणाला भाष्य टाळले..

एकदा श्रीकांतलाही भेटून त्यांची बाजू ऐकायची मनात ठरवलं.


तशी संधी मला लवकरचं मिळाली.. एक दिवस त्याचाच फोन आला.." तब्बेत बरी नाही. याल का घरी"..

घरी गेले तर त्याचं बीपी वाढलं होत..मी मग सरळ विषयालाच हात घातला.

" श्रीकांत घरी सध्या जे वातावरण आहे, तुम्हाला वाटत नाही का , कुठे तरी यावर तोडगा काढायला हवा ?"..

माझं बोलणं संपण्याच्या अगोदरच, श्रीकांतने उसळून बोलायला सुरुवात केली "मॅडम हे सगळं तुम्ही राधाला सांगा, तिनंच सुरवात केलीय , काय कमी केलं नाही मी तिला, अगदी राणी सारखं ठेवलं. काय गरज आहे तिला नोकरी करण्याची ? आमच्या घराण्यात अजून बायकांनी नोकरी केली नाही.. आम्ही घरातले पुरुषचं एवढं कमावतो की आमच्या घरातील स्त्रियांना या दुनियादारीची गरजचं काय ? "


"सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे आमच्याकडे"... हे सांगताना त्याचा पुरुषी अहंकार डोळ्यातून जाळ ओकत होता..

"अरे ,पण तू तिचं मत तरी ऐकून घे."

हे बघा मॅडम ,आमच्या घरात स्त्रियांचं मत विचारात घेतलं जात नाही. त्यांनी खावं प्यावं आणि घरात मस्त रहावं..

त्याला तो चुकतोय असं कुठं वाटतंच नव्हतं आणि त्याचे आई वडीलही त्याला पाठिंबा देत होते.. कोणीचं राधाच्या मतांना महत्व देत नव्हतं.. या संवादातून, त्यांना एक घर सांभाळणारी सून, त्याला त्याचं ऐकून घेऊन नंदी बैलासारखी मान हलवणारी बायको हवी होती,असचं मला प्रकर्षाने जाणवलं.
कितीही समजावलं तरी पालथ्या घड्यावर पाणी असं दृश्य पाहून मी हबकले आणि तिथून निघाले.

घरी आल्यावर खूप विचार केला. का त्यांनी गरीब घरातीलचं मुलगी केली असावी , याचा थोड्या अंशी उलगडा झाला.

घर कसले ही तर कारा ,
विषसमान मोती चारा...

आता मात्र मला राधाचा निर्णय योग्य आहे असं वाटू लागलं.

थोडे दिवस माझा नी त्या कुटुंबाचा काहीच संबंध आला नाही...

काही दिवसांनी राधाचा मेसेज आला.
तिचा घटस्फोट कोर्टाने मंजूर केला होता.तिने काहीच पोटगी मागितली नाही..

तिला या कठीण परिस्थितीत तिच्या काही मित्र मैत्रिणींनी साथ दिली, तिला नोकरी लवकर मिळावी म्हणून त्यांनीचं प्रयत्न केले . तिला नोकरी असल्याने कोर्टाने अर्णवची कस्टडीही तिला दिली..

आजही ती माझ्या संपर्कात आहे.. तिने नोकरीत मनासारखी प्रगती केलीय .. या पुरुषप्रधान समाजात प्रवाहाविरूद्ध पोहून ती स्वतःचं स्थान निर्माण केलंय..

आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुझ पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगरी हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा !!!

सगळी भौतिक सुखं पायाशी लोळण घेत असताना, किती स्त्रिया फक्त स्वतःचं अस्तित्त्व सिद्ध करण्यासाठी, स्वतः च्या निर्णय- स्वातंत्र्यासाठी पैसा, गाडी , नोकर-चाकर, कुटुंबीयांचा विरोध हे सगळं झुगारून देऊन, अशा टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता , हिंमतीने लढून दाखवतायेत..


स्त्रियांचा सन्मान कसा करायचा हे अर्णवला मात्र ती न चुकता शिकवत आहे..तिला तिच्या घरात अजून एक राधा तयार करायची नसेल बहुतेक..

राधा ने एक उदाहरण समाजापुढे ठेवलंय की स्त्री कधीच अबला नसते,तिला घर, संसार तर प्रिय आहेच पण तिला तिचं निर्णय स्वातंत्र्य त्याहूनही जास्त महत्त्वाच वाटतं..


डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व