Rutu Badalat jaati - 22 in Marathi Love Stories by शुभा. books and stories PDF | ऋतू बदलत जाती... - भाग..22

ऋतू बदलत जाती... - भाग..22
ऋतू बदलत जाती....२२

"अहो सर ...आपलं फक्त बघायचं ठरलं होतं ....आता बघून झालं असेल तर करता का इन्स्पेक्टर विशाल ला फोन....??"मानमोडे.

"काय पाहिजे आहे तुम्हाला ..??"अनिकेत.

"माहिती नाही का सर... का उगाच वेड्याचं सोंग घेत आहात.... त्या इन्स्पेक्टर विशाल ला कॉल करा मी सांगतो तसं सांगा..."मानमोडे.

******
आता पुढे...

"कुणाला काही फोन करायची गरज नाही ....विशाल तुमचा माल घेऊन येतच आहे...." क्रिश दारातून आत येत बोलला.

क्रिशने शांभवीला इशारा केला.
शांभवी मानमोडे च्या मागे गेली. तिला मानमोडे च्या अंगात शिरायचं होतं. त्या नीच आणि नालायक माणसाच्या अंगात शिरायला तिलाही किळस येत होती ... तरीही ती मानमोडेच्या अंगात शिरण्यासाठी प्रयत्न करत होती, पण काहीही करून ती आत जाऊ शकत नव्हती.. तिने हतबल होत क्रिश कडे बघितले , क्रिश ला समजले,ही योजना काही कामात येणार नाही, आता त्याला काहीतरी करून मानमोडे च्या हातातली बंदूक मिळवावी लागणार..

मानमोडे ने बंदूक क्रिश कडे ताणली.

" कोण आहे तू.. ??.. ईथं काय करतोय..??"मानमोडे.

"मी कोण आहे ..याच्याशी तुला काही देणेघेणे नाही आहे ... तुझ्या फायद्याचं बोलतोय ते ऐक...विशाल येतोय तुझा माल घेऊन ह्या लोकांना फ्री कर..."क्रिश.

" ऐ चल हट... तू कोण हे सांगणारा ..??आधी त्या विशालला येवू दे इकडे..."स्टॉक किपर.

क्रिश हळूहळू चालत मानमोडेकडे येत होता.

"ए जिथ आहे तीथच थांब ..! नाहीतर यातल्या सर्वच सर्व गोळ्या डोक्यात उतरवील..."मानमोडे.

"मी जास्त वेळ उभा नाही राहु शकत... व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे मला... बसू दे जरा सोफ्यावर ..." क्रिश आरामात येऊन सोफ्यावर बसला ,अनिकेत त्याच्याकडे जरा आश्चर्याने अन् रागाने बघत होता.

क्रिश बरोबर मानमोडे च्या पुढे जाऊन बसला. मानमोडे बिलकुल क्रिशच्या पाठीमागेच उभा होता.

शांभवी समोरच उभी होती.
शांभवी ने इशारा केला तसा क्रिशने त्याचे दोन्ही हात वरती घेतले आणि पटकन पाठीमागे उभ्या मानमोडेच्या हातातली बंदूक स्वतःकडे खेचली. क्षणाचाही विलंब न लावता, त्यातून त्याने त्या स्टॉक कीपर च्या पायावर गोळी झाडली ,तसा तो स्टॉक किपर विव्हळत खाली पडला.

पण क्रिशला माहित नव्हतं ,की सावीचा रूम मध्ये अजून एक माणूस आहे.तो माणूस बाहेर आला, आणि तो क्रिशवर गोळी झाडणार .. तेवढ्यात प्रसंगावधान राखून अनिकेतने त्याच्यावर झडप घातली ,पण ती गोळी क्रिश च्या दंडाला चाटून गेलीच.. क्रिशही विव्हळत खाली बसला..त्याच्या हातातली बंदूकही कुठेतरी उडाली. मानमोडे उठून क्रिश वर धावून आला, पण अनिकेत परत क्रिशच्या मदतीला धावून आला. आता मानमोडे आणि अनिकेत मध्ये बऱ्यापैकी जुंपली होती.... सावीचा रूम मधला तो तिसरा माणूस परत क्रिशवर गोळी झाडणार, तेवढ्यात मागून महेशीने त्याच्या डोक्यात फुलदाणी घातली ..त्या धक्क्याने त्याची बंदूक बाजूला सोफ्याखाली गेली.तो डोकं हातात पकडून, महेशीवर धावून गेला..महेशी मागे मागे सरकत होती.. तो पुढे पुढे...महेशी भिंतीला टेकली त्याने तिच्या गळ्यालाचं पकडलं..महेशीचा श्वास कोंडायला लागला..

"अनिकेत...महेशी..!!"क्रिशची नजर तिकडे गेली तसं त्याने अनिकेतला ओरडून सांगितले.

अनिकेतने लाथेने मानमोडेला दूर केले आणि जवळची एक खूर्ची उचलून त्याच्या साथीदाराच्या पाठीत घातली..तसं त्याने महेशीला सोडले आणि तो अनिकेतकडे वळला..ईकडने मानमोडेही अनिकेतला लाथा बुक्क्यांने मारत होता..पण अनिकेत दोघांना पुरून उरत होता...कधी काळी हौस म्हणून शिकलेले कराटे आता कामात येत होते.

तेव्हाच विशाल त्या बॅग घेऊन आत आला. अनिकेत दोन दोन जणांसोबत जुंपला आहे बघून, विशालने त्या बॅग तीथेच फेकल्या आणि तो अनिकेतच्या मदतीला धावला.. त्याच्यामागून त्याचे सशस्त्र साथीदार ही आत शिरले.
स्टॉक कीपरला केव्हाच ताब्यात घेण्यात आले होते, पण मानमोडेला ती बॅग दिसली आणि सोफ्या खाली असलेली बंदूक...तो अनिकेत च्या हातातून सुटून सावीच्या रुमकडे पळाला.. कुणालाही समजायच्या आत त्याने सावीला उचलले आणि बंदुक तिच्या कानफटीला लावली.

"जो जिथे असेल तिथेच थांबून जा ...नाहीतर या मुलीच्या डोक्यातून गोळी आरपार जाईल.."मानमोडेने सावीला आपल्या काखेत पकडले होते.

"सोड तिला!!.. सोड !.."अनिकेत थोडा पुढे सरसावला, तशी त्या मानमोडेने अजून जोरात बंदूकीची नळी सावीच्या डोक्याला टोचली. आधीच त्याने तिला पोटावर त्याच्या बलदंड हाताने पकडलेलं होतं, त्यामुळे ते दुखत होतं त्यात तो अनोळखी भसाड्या आवाजाचा..राकट चेहऱ्याचा क्रुर माणूस..हो सावी साठीही तो क्रूर होता ,जो तिला निट हाताळत नव्हता .ती रडत होती त्याला बघून....त्यात अजून डोक्याला ती नळी टोचली, ती अजून जास्त जोरात रडायला लागली.
अनिकेत जीथं आहे तिथेच थांबला. क्रिश शांभवीला सांगत होता, की माझ्या अंगात शीर.. पण शांभवी मानेने नाही म्हणत होती,कारण क्रिशच्या अंगात शिरून सुद्धा सावीला सोडवता येणार नव्हते...क्रिशने काही हालचाल केली तरी, मानमोडे एकतर क्रिशला.. नाहीतर सावीला काहीही करू शकत होता,म्हणून तिने परत मानमोडेच्या अंगात शिरण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या माणसाच्या अंगातही शिरण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ ती फक्त क्रिशच्याच अंगात शिरू शकत होती.

महेशी, शांभवी ,अनिकेत सर्व जण हताश, केविलवाणे सावीकडे बघत होते. शांभवी, महेशी आजी देवाला धावा करत होत्या. शांभवी शिवशंभु चे स्मरण करत होती...

अजूनही सावी खूप जोरात रडत होती. तिचे डोळे अखंड वाहत होते.... ..मानमोडे तो तर मनुष्य नव्हताच फक्त प्राणी होता...

"अहो दादा...! तिला सोडा... वाटलं तर माझ्या डोक्यावर बंदूक लावा.. मला होस्टेज बणवून घेऊन जा....पण सावीला सोडा हो... ईवलस बाळ आहे ते..लागतयं तिला.. ...जरा थोडी दया दाखवा... "महेशी केवीलवाण्या विनवण्या करत होती...पण त्या मानमोडेला काही फरक पडला नाही...ती हतबल रडत खाली बसली .

त्याने महेशीकडे कुत्सित नजरेने बघितले आणि त्याच्या माणसाला त्या बॅग उचलायला सांगितल्या..

खरं तर तिथे शस्त्रधारी दहा-पंधरा तरी लोक होते, पण त्याने वेठीस पकलेल्या बाळाकडे बघून सर्व निशस्त्र होऊन गेले होते. एका मोठ्या माणसाला वेठीस धरण्यापेक्षा एका लहान बाळाला वेठीस धरणे त्याच्या दृष्टीने बरेच सोपे होते. आजूबाजूचे इतर लोक मोठ्या माणसांपेक्षा छोट्या बाळामध्ये भावनिक गुंतवणूक जास्त दाखवतात ..आणि कुठेलेच धाडस करायला धजावत नाहीत...त्यामुळे सावीचा वापर करून मानमोडे तिथून पसार होऊन बघत होता.
मानमोडे जसाजसा मागे बघत पुढे जात होता ,तसे तसे घरातले सर्व त्याच्या पाठी जात होते .

"हे दूर थांबायचं जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही तर बघा..हं.."मानमोडे.

मानमोडेचा एक साथीदार आणि तो दोघे घराच्या बाहेर पडले ,स्टॉक किपर घरातच विव्हळत पडलेला होता.

"त्या बॅग बघायला पाहिजे आपल्याला .. माल आहे की नाही चेक करायला पाहिजे ...."मानमोडेने त्याच्या साथीदाराला बॅग खाली ठेवायला सांगितल्या.

त्या बॅग मध्ये छोट्या छोट्या पिशव्या होत्या.. तो माणूस प्रत्येक पुडीला नाक लावून सुंगून परत बॅग मध्ये ठेवत होता.. पण या कामात त्याला बराच वेळ लागत होता. .... मानमोडे ने अखेर त्याच्या हातातल्या सावीला तिथंच पालथ फरशीवर ठेवलं.. ते वेडं बाळ आता आपल्याला महेशी माऊ कडे जायला भेटेल ,ह्या आशेने रांगत तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या नालायक माणसाने मागुन तिचा एक पाय पकडून ठेवला होता.. दोन-तीन वेळा ती पुढे जाण्याच्या प्रयत्नात तिथं फरशीवर आपटली होती. खूप लागलं होतं तिला डोक्यावर.. तापलेल्या त्या फरशीवर तिच्या कोवळ्या शरीराला चटकेही बसत होते...आणि आता तर रडून रडून तिचा घसाही बसला होता....सर्वांचा जीव तीळतीळ तुटत होता. अनिकेतला तर वाटत होतं काहीही हो याच्या डोक्यात दगड घालतो मी ..आता जीवच घेतो... पण त्याच्या साथीदाराने एका हाताने सावी वर बंदूक ताणून धरलेली होती .त्यामुळे अनिकेत हतबल होता.

"अरे निच माणसा...!! जरा तरी दाखव ...माणूसकी थोडी शिल्लक आहे तुझ्यात..खाल्लेल्या मिठाला जरा तर जाग....बघ...रक्त येतयं तिच्या डोक्यातून..ईवलासा तो जीव...तुला जराही किव येत नाही का?..."आजीही रडत महेशीला बिलगल्या.

"खाल्लेल्या मीठाला जागतोय म्हणून..तुम्ही सर्व जीवंत तरी आहात...नाहीतर केव्हांचे..फुस्स्.."मानमोडेने तोंडाचा चंबू करून फुग्यातली हवा काढून घेतल्याचा आवाज केला.

"हे शिव शंभू ..!!.हे महादेवा ..!! तुला जराही दया येत नाही आहे का रे ....?? माझी पोर ह्या उन्हात त्या गरम फरशीवर विव्हळत आहे ... बघ तिच्या डोक्याला किती लागलयं...तिच्या रडण्याचा जराही आवाज आला तरी ..जिथ कुठ असेल मी धावतपळत यायची ...आणि आज माझ्या डोळ्यासमोर तिला जखमा झालेल्या आहेत .....ती रडते आहे ....तिला त्रास होतो आहे.. पण मी काहीच करू शकत नाही ...काय म्हणावं या आईला....शंभू या आईची आर्त हाक ऐक....धाव शंभू धाव... तुझ्या गणात भुतांचा समावेश आहे ना..?? मग या भुताला मदत नाही करणार का तू ...?? शंभू माझ्या नावात ही तूच आहेस ना..... एवढी वर्ष मनोभावे जर मी तुझी पूजा केली असेल तर देवा ....आता तरी पाव ...दे माझ्या अंगात बळ दे.. माझ्या मुलीला मला वाचूवू दे..." शांभवी आकाशाकडे हात करून देवाला विनवत होती. तेवढ्यात ढग दाटून आले ,त्या तप्त लाव्हारसाच्या गोळ्याला काळ्या कुट्ट ढगांनी झाकून टाकले.... अचानक भर दुपारी काळोख दाटला विजा कडकडायला लागल्या, सोसाट्याचा वारा सुटला....

सर्व आता बदलणाऱ्या वातावरणाने अचंबित झाले. मानमोडे आणि त्याचा साथीदार पटापट हात चालवायला लागले,पण तेव्हाच.. मानमोडे आणि त्याच्या साथीदाराच्या हातातल्या बंदुकी कोणीतरी हवेतच भिरकावून फेकल्या...तशी महेशी सावीकडे धावली तिला उचलून छातीशी धरलं...

"उ..उ..माझं बाळं..रडू नाही...माऊ माऊ आली बघ...माऊ जवळ आहे तू..."महेशी आपल्या ओढणीने सावीचं तोंड पुसत होती तिच्या जखमेवर ती हळूहळू फुंकर मारत तिला उगी करत होती.

"महेशी तू सावीला आणि आजीला घेऊन घरात जा... "क्रिश त्याचा हात पकडत बाहेर आला.

पण महेशीची नजर समोर खिळलेली होती, तेवढ्यात क्रिशचीही नजर तिथे गेली, मानमोडे आणि त्याचा साथीदार हवेत उडत होता...
आणि परत जमिनीवर आपटत होता...

"शांभवी...sss" अनिकेत डोळे मोठे करून समोर बघत होता.

"याच ..! याच.. तप्त फरशीवर माझी सावी धरपडत होती... याच फरशीवर आज तुम्ही आपटून आपटून मराल... शांभवी चिडली होती.. तिचा आवाज आता सर्वांना ऐकू जात होता..तिचे केस हवेत अस्तव्यस्त उडत होते...डोळे लाल होवून आग ओकत होते...हवेत तरंगत ती एक भयानक आत्मा भासत होती. तिथे असलेले शस्त्रधारी सुद्धा त्या अस्मानी शक्तीपुढे गुडघ्यावर हात जोडून बसले होते.

"शांभवी माझी शांभवी... तू आहेस ..इथेच आहेस.. मार त्यांना ..मारं त्यांना ..सोडू नकोस तुला माझ्यापासून यांनीच दूर केलं... आपल्या सावीचे हाल हाल केलेत.. मार त्यांना.. अजून मार..." अनिकेतही आता पुढे आला होता आणि लाथेने जमिनीवर पडलेल्या त्या दोघांना मारत होता.

तसे क्रिशने पुढे येऊन अनिकेतला सावरले पण शांभवीचा राग अजून शांत होत नव्हता.

"बोल नालायक माणसा.... काय बिघडवलं होतं मी तुझं ....का माझा जीव घेतलास.... एक महिना एक महिना ...मी त्या रस्त्यावर उभी होती.. या आशेत की.. मला कधी माझी सावी दिसे कधी माझा अनि दिसेल... तुझ्याच मुळे.. तुझ्याच मुळे किती तरफडले मी ...किती तरफडले... " शांभवीचा राग शांत होत नव्हता...

"शांभवी शांत हो शांत हो शांभवी.. त्यांना शिक्षा होईल.. सोड त्यांना.. "क्रिश तिच्या जवळ गेला.

"नाही ..!! नाही सोडू शकत मी... माझी काही चुकी नसताना त्यांनी मला जीवे मारले ..आता माझ्या सावी ला किती त्रास दिला..." त्या रौद्र रूपातही शांभवीची डोळे भरून आले..

महेशी आणि आजी सोडून सर्वजण क्रिश कडे आश्चर्याने बघत होते, जीची सर्वांना भीती वाटत होती, त्या शांभवी जवळ क्रिश कसा जात आहे..?? एका वेळेला तर अनिकेतला ही वाटलं की क्रिशला थांबवू.. कदाचित शांभवी क्रिशलाहि काही अपाय करेल .

तसा अनिकेत हे पुढे सरसावला, त्याने तिच्या हाताला पकडले. भरलेल्या डोळ्यांनी त्याने मानेनेच तिला नाही सांगितले.. त्याच्या डोळ्यातले अश्रु बघून शांभवी शांत झाली, हळूच ती खाली जमिनीवर उतरली...

"अनि... "त्याला बघून तिचेही डोळे भरून आले होते... तिने हाताने त्याच्या चेहऱ्यावर गोंजारले .. त्याने थोडे स्मित झळकवत मानेने होकार दिला... आणि दुसर्‍याच क्षणी ती त्याच्या मिठीत गेली.

ऋतू बदलत जाती...
ग्रीष्म होरपळत येतो....
वर्षा मलम लावते...
आयुष्याच्या वळणा वळणावर...
सुख..दुःखाचा पाठशीवीचा खेळ..
हीच दैवाची रे निती.....
ऋतू बदलत जाती.....

क्रमक्षः..
********

भेटूया पुढच्या भागात....

©®शुभा.