Sadhana Tera muskurana gajab ho gaya books and stories free download online pdf in Marathi

साधना: तेरा मुस्कुराना गजब हो गया

तेरा मुस्कुराना गजब हो गया .....

 

पन्नासच्या दशकातील अभिनेत्री शीला रामाणी (फंटूश फेम) जेंव्हा पहिला सिंधी सिनेमा ‘आबना’ त  काम (१९५८ ) करित होती त्यात साधना देखील छोट्या भूमिकेत होती. तिने शीलाचा ऑटोग्राफ मागितला. १४-१५ वर्षाच्या मोहक साधनाला ती म्हणाली ‘ आज मी तुला ऑटोग्राफ  देते पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी  मीच तुझा ऑटोग्राफ घ्यायला येईल!’ शीला रमानीचे शब्द अक्षरश: खरे ठरले. याच सिनेमाच्या सेटवर देव आनंद ने तिला बघितले होते आणि त्याची ही अवस्था ‘ती पाहताच बाला ....’ अशी झाली होती. ’पोर पंध्राची कोर चंद्राची’ अशी तिची रसिली  प्रतिमा बनली होती . साठचे दशक साधनाचे होते. तब्बल १२ सुपर हिट सिनेमांची रांग तिने उभी केली. साधना म्हटलं की मनात रूपेरी पडद्यावर तिच्यावर  चित्रित कितीतरी  गाण्यांचा पाऊस सुरू होतो. उणीपुरी दहा-बारा वर्षांची तिची रूपेरी कारकिर्द पण या छोट्याश्या काळात तिने बिमलदा,यश चोप्रा, राज खोसला,विजय आनंद हृषिदा या सारख्या मान्यवरांच्या चित्रपटातून भूमिका करून आपली वेगळी ओळख करून दिली.

 

असं म्हणतात कुरूपता हि दुर्दैवी असते / वाईट  असतेच पण सौंदर्याचे भग्नावशेष हे अधिक  दुर्दैवी  असतात अधिक वाईट असतात . साधनाच्या बाबतीत नेमकं हेच झालं.एकेकाळी तरुणाच्या स्वप्नातील परी असलेली उत्तरार्धात मात्र आजारपणाने पार मोडून निघाली. मग मात्र तिने रसिकांच्या मनातील तिची लोभस प्रतिमा जिवंत रहावी म्हणून मिडिया पासून स्वत:ला सातत्याने टाळत राहिली. फिल्मी वातावरणापासून ती अलिप्त राहू लागली. फिल्मी माहौल,पार्टी,पुरस्कार सोहळे या पासून तिने स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले. ‘ आपलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी ‘ असं तिने अनेकदा स्वत:शीच म्हटलं असावं !  

 

२ सप्टेंबर १९४१ रोजी कराचीला जन्मलेल्या साधनाला महाविद्यालयीन काळापासूनच सिनेमात काम करण्याचे वेध लागले होते.१९५५ सालच्या आर के च्या ‘श्री चारसो बीस ‘ या सिनेमात ’मुड मुड के ना देख मुड मुड के’ या नादिराच्या क्लब डान्स सॉंग मध्ये साधनाने कोरस गर्ल म्हणून हजेरी लावली होती.शशधर मुखर्जी यांच्या  फिल्मालय मध्ये  तिने रीतसर अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. १९६० साली फिल्मालयच्या ’लव्ह इन सिमला’ या सिनेमातून ती जॉय मुखर्जी सोबत पहिल्यांदा नायिकेच्या रूपात पडद्यावर आली. हा चित्रपट तसा ऐतिहासिक म्हणावा लागेल कारण यातील नायक (जॉय मुखर्जी) नायिका (साधना) आणि दिग्दर्शक (आर के नय्यर) या तिघांचा हा पहिला चित्रपट होता. दिग्दर्शकाला तिचं कपाळ थोडंस मोठ वाटल्याने त्यावर थोडेसे केस आणले.  तिच्या या लोकप्रिय साधना कट हेयर स्टाईलची जादू आजही कायम आहे.हॉलिवूडच्या अ‍ॅड्री हेपबर्न या अभिनेत्रीच्या केश रचनेवरून घेतली होती. तिचं पडद्यावरील रूप तरूणाईला बेफाम आवडून गेलं. या चित्रपटाला संगीत इकबाल कुरेशी यांचे होते. यात नायिके करीता तब्बल  चार पार्श्व गायिकांचा स्वर वापरला होता. चित्रपट टिपिकल लव्हस्टोरी कथानकाचा असल्याने यात गाण्यांना खूप वाव होता. लव्ह का मतलब है प्यार प्यार दिलोंका करार (रफी-आशा), हसिनोंकी सवारी है, मुस्कुराये खेत प्यासे है (रफी- सुमन कल्याणपूर) , अली जबराह अली रे अली पेसो (रफी-सुधा मल्होत्रा),हुस्न वाले वफा नही करते (रफी-शमशाद) . या सिनेमात अकरा गाणी होती जी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिली होती. या सर्व गाण्यात साधना कमालीची ग्रेसफुल दिसली. सिनेमा कृष्णधवल होता पण यातली चुलबुली साधना तरुणाई च्या थेट दिलात जावून बसली. पण साधना मात्र दिग्दर्शकाच्या (आर के नय्यर)  प्रेमात पडली (आणि १९६६ साली ती विवाहबध्द झाली.) याच वर्षी म्हणजे १९६० साली साधनाचा आणखी एक सिनेमा आला होता बिमल रॉय यांचा ‘परख’.लोकशाहीवर उपहास गर्भ टीका करणाऱ्या या सिनेमात साधना अगदी नॉन ग्लमरस होती. यातील ‘ओ सजना बरखा बहार आई’ या गीतातील चंद्रमोळी झोपडीतील पर्युत्सुक नायिका साधना ने काय अफलातून रंगवली होती.यात आणखी एक लडीवाळ गाणं होतं ‘मिला ही किसीका झुमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले’ निसर्गाचं मनोहारी वर्णन असलेली ही गाणी शैलेंद्र च्या लेखणीतून उतरली होती सलील चौधरी यांचं मिठ्ठास संगीत त्यांना लाभलं होतं. बऱ्याचदा एखाद्या सिनेमातील अन्य गाणी गाजली तर एखादे गाणे सुंदर असून मागे पडतं तसचं यात एक गाणे होते ‘मेरे मन के दिये मेरे मन के दिये ‘. साधनाचे सात्विक सौंदर्य पहायचे असेल तर ‘परख’ पुन्हा पुन्हा पाहायला हवा. 

 १९६१ साली तिला नवकेतन चा ‘हम दोनो’ हा चित्रपट मिळाला. यात साधनाने रंगवलेली ‘मीता ‘ हि व्यक्तीरेखा प्रेयसी ची आहे. प्रेमात आकंठ बुडाली असलीए असली तरी सामाजिक भान असलेली, समंजस आणि बुद्धीजीवी नायिका अतिशय तरलतेने तिने साकारली. चित्रपटाची सुरुवात सदाबहार प्रेम गीताने होते ‘अभी न जावो छोडकर के दिल अभी भरा नही.’ या गीतातूनच तिची व्यक्तीरेखा स्पष्ट होते. पाण्यातील साधनाचे प्रतिबिंब पाहणं एक सुखावणारा क्षण होता. प्रेमाला शाप असतो विरहाचा पण इथे पण तिच्यावर चित्रित ‘जहां मे ऐसा कौन है जिसको गम मिला नही’ असा समंजस सुवर्ण मध्य काढीत , आपल्या टपोऱ्या डोळ्यातून समर्पणाची भावना व्यक्त करते.पन्नास वर्षानंतर ४ फेब्रुवारी २०११ रोजी ‘हम दोनो’ रंगीत स्वरूपात झळकला त्यावेळी पुन्हा त्यातील गीत संगीताची जादू अनुभवायला रसिकांनी गर्दी केली. साहिरच्या अप्रतिम रचनांना जयदेव चा स्वरसाज होता.  

 १९६२ साली बिमल रोय यांच्या ‘प्रेम पत्र’ या सिनेमात ती शशी कपूरची नायिका होती. यातली गाणी सलील चौधरी यांनी स्वरबद्ध केली होती आणि रचना राजेंद्र कृष्ण आणि गुलजार यांच्या होत्या. ‘सावन की रातों में ऐसा भी होता है’, ‘ ये मेरे अंधेरे उजाले न होते गार तुम न आती मेरी  जिंदगी में’ हि लता-तलतची दोन गोड युगल गीतं यात होती.  १९६२ सालीच साधना जॉय मुखर्जी सोबत ‘एक मुसाफिर एक हसीना ‘ (दि.राज खोसला) या चित्रपटात झळकली. या सिनेमातील एक ‘हसीन पल’ प्रेक्षकांनी अजून दिलात साठवून ठेवला आहे. रेल्वेत नायक तिच्या चेहऱ्यावरील बुरखा दूर करतो आणि ‘सुभान अल्ला ....’ तो चंद्राहून सुंदर असलेला तिच्या मुखड्याचा ‘दिदार’ होतो! जॉय मुखर्जी सोबत संपूर्ण पिढी घायाळ होते त्या सौंदर्याच्या तेजाने. ऱ्हिदम किंग ओपीचे लाजवाब संगीत असल्याने प्रेमाच्या भावनेला आणखी रंग चढला. ‘आप युंही अगर हमसे मिलते रहे देखिये एक दिन प्यार हो जायेगा’,’ बहुत शुक्रिया बडी मेहरबानी मेरी जिंदगी में हुजूर आप आये’’मुझे देख कर आपका मुस्कुराना ‘ या गाण्यांनी आख्खी पिढी नादवली गेली.( तरी यातील ‘मै प्यार का राही हूं ‘ सिनेमातून वगळण्यात आले होते) तिचे भावस्पर्शी शिंपल्या सारखे डोळे,तिचं ओठाला मुडपून लाडीक बोलणं,तिचे ते लाजून हासणे अन हासून ते पहाणे सारंच तरूणाईला गुदगुल्या करणारं होतं.

 ऋषिकेश मुखर्जी यांनी साधना सोबत चॉकलेट हिरो देव आनंद घेवून १९६३ साली ‘असली नकली’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. शंकर जय किशन यांच्या मधुर संगीताने हा सिनेमा नटला होता. यात पुन्हा साधनाच्या  सात्विक सौंदर्याचे दर्शन घडले. ‘तेरा मेरा प्यार अमर फिर क्यूं मुझको लगता है डर’,’ तुझे जीवन की डोर से बांध लिया है’ या गाण्यातील तिचे अलवार सौंदर्य रसिकांना घडले. १९६३ साली तिच्या रुपेरी जीवनातील माईल स्टोन चित्रपट आला.

  एच एस रवेल यांचा ‘मुस्लीम सोशल ‘ सिनेमा ‘मेरे मेहबूब’. तिच्या सौंदर्याचा आणि अभिनयाचा अनुपमेय अविष्कार दिसला यात दिसला. तिच्या आरस्पानी सौन्दर्यातील अभिनय पहावा की तिच्या अप्रतिम अभिनयाचे सौंदर्य न्याहाळावे असा गोड पेच रसिकांना पडला. अलीगढच्या कॉलेज मधील पोर्च मध्ये झालेली हुस्ना आणि अन्वर ची गंधित भेट. त्या वेळचा तिचा पर्दानशीन लूक रसिक आजवर विसरू शकले नाहीत . ‘ भूल सकती  नही आंखे  वो सुहाना मंजर, जब तेरा हुस्न मेरे इश्क से टकराया था... और फिर राह में बिखरे थे हजारो नग्मे  मै वो नग्मे तेरी आवाज को दे आया था ...’ रफीची काळजाला हात घालणारी ही गजल  लताच्या स्वरात तितकीच अप्रतिम होती आणि त्यावर चार चांद लावले होते साधनाने! ‘मेरे मेहबूब ‘ साधनाच्या करियरचा कळसाध्याय होता. या सिनेमा च्या प्रत्येक फ्रेम वर तिने आपली मोहर उमटवली. नौशाद आणि शकील या जोडीच्या संगीताने इतिहास घडविला. ‘याद में तेरी जाग जाग के हम ‘,’ऐ हुस्न जरा जाग तुझे इश्क पुकारे’,’ मेरे मेहबूब में क्या नही’ ‘अल्ला बचाये नौजवानोसे ‘ या हरेक गाण्यात झळकलेली साधना आजही लख्ख आठवते.

 साधना या काळात हरेक जॉनर चे सिनेमे स्वीकारत होती. याच वर्षी तिचा ‘वह कौन थी’ हा सस्पेन्स चित्रपट आला. यातली शूभ्र वस्त्रांकित साधना तिचे गूढ रूप पाहून भयानकतेलाही सुंदर चेहरा असू शकतो कां असा पेच रसिकांना पडला. यात तिच्यावर चित्रित लताच्या तीन क्लासिक सॉग्ज आणि त्याच्या चित्रिकरणाने उंची गाठली. ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम ‘,’ जो हमने दास्तां अपनी सुनायी आप क्यू रोये ‘ आणि ‘लग जा गले की फिर ये हंसी रात हो न हो शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो ‘ मदनमोहन च्या मेलडी त न्हालेली हि गाणी हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगातील मानाची पानं आहेत. या सिनेमाच्या यशाने दिग्दर्शक राज खोसला याने (सस्पेंस ट्रॉयलॉजी )चित्रतयी बनवली त्यातील पाहिलं पुष्प हा सिनेमा होता.त्या काळाचा प्रत्येक आघाडीचा अभिनेता आपल्या सोबत साधना ला नायिका म्हणून घेण्यासाठी  आग्रही होता. रिबेल स्टार शम्मी कपूर सोबत १९६४ साली ती  ‘राजकुमार’ या दाक्षिणात्य सिनेमात झळकली. एस जे च संगीत खूप गाजलं. ‘आजा आई बहार दिल है बेकरार ‘ ,’ तुमने पुकारा और हम चाले आये’, ‘ नाच रे मन बदकम्म्मा’ ‘दिलरुबा दिल पे तू ‘ हि गाणी सिनेमा हिट करायला कारणीभूत ठरली. यात एका गाण्यात ‘इंस रंग बदलती दुनिया मे इन्सान की नियत ठीक नही’ साधना करीता ज्या ओळी आहेत त्या तिच्या सौंदर्याला पूरक होत्या. ‘मैं कैसे खुदा हाफिज कह दू मुझको तो किसीका यकीन नही छूप जाओ हमारे नजरोसे भगवान की नियत ठीक नही’. साऊथ कडील मुव्ही असल्याने काही ठिकाणी तो बटबटीतपणा कडे झुकला होता.  

 याच वर्षी राजकपूर सोबतचा’ दुल्हा दुल्हन ‘ हा तिचा सिनेमा आला ज्याला संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते. यातील ‘हमने तुझको प्यार किया है जितना कौन करेगा उतना’ ‘मुझे कहते है कल्लू कवाल ‘ ‘जो प्यार तुने मुझको दिया था’ हि लोकप्रिय गाणी असूनही सिनेमाला यश नाही मिळाले. १९६५ सालचा बी आर चोप्रा यांचा एक महत्वाकांशी मल्टी स्टारर सिनेमा आला होता ‘वक्त’ यात साधना सुनील दत्त ची नायिका होती. यात साधना च्या वाट्याला चार गाणी आली होती. पैकी दोन सोलो म्हणजे ‘कौन आया की निगाहो में चमक जाग उठी’,’चेहरे पे खुशी छा जाती है’ आणि दोन युगल गीते ‘ हम जब सिमट के आपकी बाहोमें आ गये ‘’मैने देखा है की फुलो से ‘ यात साधना कमालीची ग्रेसफुल चार्मिंग दिसली. सिनेमापासून तिच्या केश रचनेसोबतच तंग सलवार कमीजची नवी फॅशन देशभर लोकप्रिय झाली. (कोस्चुम डिझायनर भानू अथय्या).

 रामानंद सागर यांनी तिला ‘आरजू’ या नितांतसुंदर संगीतमय चित्रपटात राजेन्द्रकुमारच्या सोबत घेतले. या रोमांतीक सिनेमाने युवा पिढीला निहायत खूष केले.यातील सगळीच गाणी आणि साधनाची अदा लोकप्रिय ठरली. राजेंद्रकुमार एका गीतात तिचा उल्लेख ‘ऐ फुलोंकी रानी बहारोकी मालिका ‘असा करतो! नयनरम्य कश्मीर च्या पार्श्वभूमीवर फुललेली हि प्रणयकथा  खरोखरच लाजवाब होती.’ बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है’,’ छलके तेरी आंखो से शराब और ज्यादा ‘,’ऐ नर्गीसे मस्ताना बस इतनी शिकायत है’,’ अजी रूठ कर अब कहां जाइयेगा जहां जाइयेगा हमे पाइयेगा ‘ या गीतांनी साठच्या दशकातील कितीतरी कॉलेज तरुण तरूणींच भावविश्व समृध्द केले. साधना च्या बाबतीत ’ जहां जाइयेगा हमे पाइयेगा’ प्रत्यय वारंवार येत होता.

 तिच्या यशस्वी सिनेमाची जणू रांगच लागली होती. राज खोसला दिग्दर्शित ‘मेरा साया’ चित्रपटात साधनाची दुहेरी भूमिका होती. सुनील दत्त नायक होता तर संगीत मदनमोहन यांचे होते. हा चित्रपट आपल्या राजा परांजपे यांच्या ‘पाठलाग’ वर बेतला होता. यातील साधनाच्या गाण्यांनी हंगामा केला. आशा भोसले च्या स्वरातील  ‘झुमका गिरा रे बरेली की बाजार में’,’नैनो वाली ने हाय मेरा दिल लूटा’ आणि लताच्या स्वरातील ‘तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा’ आणि ‘नैनो में बदरा छाये बिजली सी चमके हाये ‘(भीमपलासी रागावर आधारीत या गीताला त्या वर्षीचे सूर सिंगार पारितोषिक मिळाले होते) प्रेमचंद यांच्या गाजलेल्या कथेचा चित्रावतार ‘गबन’  चित्रपटात तिची भूमिका निगेटीव्ह शेडची होती.यात लताचे एक रेअर जेम्स गटात मोडणारे ‘ मैने देखा था सपनो में एक चंद्रहार ‘ अप्रतिम होते. शम्मीकपूर सोबतचा ‘बदतमीज’ (दि. मनमोहन देसाई) १९६६ मध्ये प्रदर्शित झाला. शम्मीच्या सिनेमात तसं नायिकांना फारसा वाव नसायचा या सिनेमाच्या बाबतीत तेच झाले. १९६७ साली राज खोसलांचा त्यांच्या चित्रतयी तील शेवटचा ‘अनिता’ प्रदर्शित झाला.’कैसे करू प्रेम की मैं बात पिछवाडे बुढ्ढा खासता’,’गोरे गोरे चांद के मुख पर काला काला ‘,’तुम बिन जीवन कैसे बीता’ हि गाणी गाजली पण सिनेमा मात्र चालला नाही. १९६६ साली तिने तिच्या पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शक आर के नय्यर सोबत लग्न केले. 

 सौन्दर्याची ती अनभिषिक्त राणी होती त्यामुळेच तिचा उल्लेख कधी ‘नर्गीसे मस्ताना’ तर कधी  ‘ बहारोकी मालिका ‘ ‘ फुलोंकी  रानी’ असा व्हायचा. रूपेरी पडद्यावर तिची राजेंद्रकुमार, सुनील दत्त, मनोजकुमार , शम्मीकपूर सोबत चांगली जोडी जमली होती. राज कपूर सोबत ती दुल्हा दुल्हन मध्ये दिसली. देव सोबत ती असली नकली, हम दोनो त होती. दिलीप सोबत मात्र तिचा अभिनयाचा योग हुकला . एच एस रवैल च्या ‘संघर्ष’ साठी तिचा विचार झाला होता पण नेमकं त्याच वेळी तिला आजारपणाच्या उपचारासाठी परदेशात जावे लागले. पण तिकडून आल्यावर तिने ‘इंतकाम’ आणि ‘ एक फूल दो माली’ हे हिट सिनेमे दिले. ‘इंतकाम’ मधील साधनावर चित्रित ‘कैसे रहू चूप के मैने पी ही क्या होश अभी तक है बाकी ‘ हे गाणे १९६९ सालच्या बिनाका गीत माला कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट ठरले. अभिनेता संजय खान सोबतचा ‘एक फुल दो माली ‘हा सिनेमा त्यातील ‘सजना सजना ओ सजना तेरे प्यार में मै खो गई सजना’,’ये परदा हटावो जरा मुखडा दिखावो’,’ सैया ले गयी जिया तेरी पहली नजर’ या गाण्यांनी लोकप्रिय ठरला.

 पण साधनाच्या आजारपणाने तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित व्हायला  सुरुवात केली होती. शम्मीकपूर सोबतच्या ‘सच्चाई’ चित्रपटात (सौ बरस की जिंदगी से अच्छे है प्यार के दो चार दिन) तर दोघेही कमालीचे पोक्त वाटत होते. सत्तरच्या दशकात धर्मेंद्र (इश्क पर जोर नही)  आणि राजेश खन्ना (दिल दौलत दुनिया) सोबतही तिने नायिकेच्या भूमिका केल्या.तिचा शेवटचा हिट सिनेमा राजेंद्रकुमार सोबतचा ‘ आप आये बहार आई’ होता. यातली गाणी मात्र तिच्या जुन्या चित्रपटांची आठवण करून देणारी होती. राजेंद्रकुमार नायक असलेल्या या सिनेमाला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच संगीत होतं. ‘सारे जमाने मी विरानी सी छाई आप आये बहार आई’,’ तुमको भी कुछ ऐसा हि कुछ होता होगां ओ सजना ‘,’ मुझे तेरी मुहोब्बत का सहारा मिल गया होता’,’पूछे जो कोई मुझसे बहार कैसी होती है’,’ कोयल क्यू गाये’ हि गाणी खूप गाजली.

 

हरेक भूमिकेत ती उठून दिसत होती. साधे पणातील तिचं सात्विक सौदर्य पाहायचं असेल तर असली नकली,परख त पहावा . चंट स्मार्ट लुक हवा असेल तर ‘वक्त’ पहावा. अर्थात अभिनयापेक्षा ती सौदर्या साठी जास्त आठवली जाते हे ही खरेच आहे.  तिला तिच्या मर्यादा माहित होत्या,तिला तिची कुवत ठावूक होती.ज्या क्षणी तिला वाटलं आपण आता थांबाव त्या क्षणी ती पडद्यापासून दूर झाली. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने ’गीता मेरा नाम’ (१९७४) चे दिग्दर्शन केले. मग मात्र ती जाणीवपूर्वक रुपेरी पडद्यापासून दूर राहिली. आर के च्या ‘बॉबी ‘ साठी ऋषी च्या आईच्या भूमिकेसाठी तिला विचारले होते पण तिने नम्र नकार दिला.  चरित्र अभिनेत्री ची भूमिका तिने कधीच केली नाही. फार मोठ्या फिल्मी गॉसिप्स मध्ये ती कधी अडकली नाही,तिला कोणतेही मोठे पुरस्कार कधी मिळाले नाहीत, पद्मश्री नाही की कुठे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड नाही.काही काही नाही. पण.... पण रसिकांच्या दिलातील तिचे स्थान आजही अबाधित आहे!

 

 

 

साधना टॉप टेन सॉंग्ज

१.      लग जा गले की फिर ये हंसी – वो कौन थी – लता- मदनमोहन

२.      ओ सजना बरखा बहार आई – परख – लता- सलील चौधरी

३.      नयनो में बदरा छाये – मेरा साया- लता- मदनमोहन

४.      कौन आया की निगाहो में चमक जाग उठी – वक्त-आशा- रवी

५.      अजी रूठकर अब कहा जाइयेगा – आरजू – लता – शंकर जयकिशन

६.      झुमका गिरा रे – मेरा साया-आशा – मदनमोहन

७.      अभी न जावो छोडकर के दिल अभी भरा नही – हम दोनो- लता –रफी – जयदेव

८.      तेरा मेरा प्यार अमर – लता – असली नकली – शंकर जयकिशन

९.      आप युही अगर मुझसे मिलते रहे – एक मुसाफिर इक – आशा-रफी-ओ पी नय्यर

१०.  मुझे तेरी मुहोब्बत का सहारा मिल गया होता- आप आये बहार आई लता-रफी-एल पी

 
 

धनंजय कुलकर्णी

पुणे

(लेखक जेष्ठ चित्रपट अभ्यासक आहेत.)

९९२११९५९२६