पैसे आमचे, नियम तुमचे!
प्रत्येक व्यक्ती आणि बँक यांचा जवळचा सहसंबंध असतो. त्यादृष्टीने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात बँकेला एक महत्त्वाचे स्थान असते. आपल्या आयुष्यातील कष्टाच्या कमाईतील काही रक्कम सुरक्षित राहिली
पाहिजे. भविष्यातील गरजांसाठी तिची बचत योग्य दिशेने व्हावी आणि आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत, या उद्देशाने आपण बँकेशी जोडले जात असतो.
पूर्वी बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित नव्हते. त्यामध्ये विश्वास, आपुलकी, सहकार्य आणि सेवाभावी वृत्तीला विशेष महत्त्व होते. ग्राहकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, याकडेही बँकेतील कर्मचारी लक्ष देत असत व आपुलकीने वागणूक देत असत. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे, अशी त्यांची भावना असायची. पण हल्ली तसे दिसून येत नाही.
काळ बदलला, तंत्रज्ञान आले, बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. व्यवहार अधिक वेगवान आणि सुलभ झाले. ऑनलाइन बँकिंग, एटीएम, मोबाईल बँकिंग अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. परंतु या बदलत्या व्यवस्थेबरोबरच बँकिंग क्षेत्राचा दृष्टिकोनही अधिकाधिक व्यावसायिक होत चालला आहे, तसेच कर्मचारी आणि ग्राहक यांच्यातील संवाद काहीसा कमी होत चालला आहे, असे जाणवते. ग्राहकांना सुविधा मिळाल्या; पण त्याचबरोबर अनेक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचे आर्थिक मूल्य ठरू लागले.
असाच एक छोटासा अनुभव मला नुकताच बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेलो असताना आला. त्या अनुभवातून मनात काही प्रश्न निर्माण झाले. विशेष म्हणजे, बँकेतील कर्मचाऱ्याशी झालेला माझा संवादही काहीसा मिश्कील होता. त्या संवादातूनच मनात एक विचार आला...
पैसे आमचे, नियम तुमचे!
पूर्वी बँका ग्राहकांना अनेक सुविधा देत होत्या. मात्र आजच्या तुलनेत त्या सुविधांवर आकारणीचे प्रमाण आणि स्वरूप वेगळे होते. पूर्वी बँक व्यवहाराचा दृष्टिकोन वेगळाच होता. सेवाभावी वृत्ती असायची. आताही आहे. नाही असे नाही. पण आता अधिक व्यावहारिक दृष्टिकोन आढळतो.
असे मी का म्हणत आहे, याला कारणही तसेच आहे. मी आज बँकेत रक्कम जमा करायला गेलो. मी काउन्टरला विचारले की, मला रोख रक्कम भरायची आहे.
ते म्हणाले,
‘भरा, काही हरकत नाही.’
‘मी पैसे भरले.’
मेसेजही आला. सोबत दुसराही मेसेज एकशे पंधरा रुपये कमी झाल्याचा आला. मला सांगण्यात आले की, ती रक्कम जमा केल्यावर ती नगदी रक्कम भरण्याची शुल्क आकारणी आहे.
मी सहजच म्हटले,
‘का हो! तुम्ही मला आधी नाही सांगितले. शिवाय इथे कुठे ती माहिती सूचना फलकावर दिसत नाही.’
ते म्हणाले,
“तो आमचा नियमच आहे.”
मी गंमतीने म्हटले,
“अहो, आमचेच पैसे, तुमच्याकडे ठेवायला दिले. त्यात तुमचा फायदाच की नाही. तुम्ही त्यावर अधिक व्याज कमविणार. हो की नाही?
“तो आमचा व्यवसायच आहे.” कर्मचारी म्हणाला.
“पण राजे हो, हा आमच्यावर अतिरेकच आहे की नाही. तुम्हीच सांगा? खरं आहे की नाही.”
तो शांत राहला.
“नाही तसा तुमचा दोष नाही म्हणा. राग नका मानू राजे हो!”
“पण खरं सांगा राजे हो. हे अजबच आहे की नाही.”
“तुम्हांला तरी पटते का सांगा बरं!”
तो हसला.
“हे बघा. ए टी एम सुविधा आली. फार चांगले झाले. आमची सुविधा झाली. आता आम्हांला सवय झाली. पण तुम्ही या सुविधेसाठी आकारणी करता. हो की नाही!
मोबाईल बँकिंग, ऑनलाईन बँकिंग सारख्या सुविधा आणल्या. चांगले झाले, नं हळूहळू तुम्ही प्रत्येक व्यवहारावर आकारणी सुरु केली. पूर्वीलाही तुम्ही सुविधा द्यायचे, पण अशी आकारणी नव्हती.”
बँक म्हणजे आमच्या कष्टाच्या पैशांच्या सुरक्षिततेची हमखास जागा, अशी आमची समजूत असते. पण शुल्क आकारणीमुळे आम्हां मध्यमवर्गीय लोकांची चांगलीच गळचेपी होत चालली. ना घरी पैसे ठेवता येत नाही. ना कुठे ठेवता येत नाही. बँकेत ठेवावे तर तुम्ही जमा करण्याचेही शुल्क आकारतात. थोडे व्याज देता खरं, पण या आकारणीने आमचे नुकसान खूप होते. राजे हो!
आमची तर अशी अवस्था झाली की, घरी ठेवावे तरीही चिंता आणि तुमच्या बँकेत टाकावे तर तुमची शुल्क आकारणी परवडत नाही.
बरं! तुम्ही योग्य माहितीही देत नाही. तसे शुल्क आकारणीचे दर सूचना फलकावर लावत नाही. पूर्वीला कसे गोड बोलत असे. पण आता तशी माहितीही देत नाही. म्हणता की ग्राहकाने सतर्क राहावे. करणारे वेगळे आणि आम्हीच कसे दोषी. तुम्हींच सांगा राजे हो!
प्रत्येक सुविधेसाठी शुल्क, प्रत्येक व्यवहारासाठी नियम आणि प्रत्येक सेवेसाठी आर्थिक आकारणी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रत्येक संस्थेला स्वतःचे नियम असतात. नियम असणे आवश्यकही आहे. परंतु नियमांची अंमलबजावणी करताना ग्राहकांच्या समाधानाचाही विचार व्हायला हवा.
केवळ 'हा आमचा नियम आहे' असे सांगून जबाबदारी संपत नाही. त्या नियमाची माहिती ग्राहकाला देणे, त्यामागचे कारण समजावून सांगणे आणि त्याला योग्य पर्याय उपलब्ध करून देणे हेही महत्त्वाचे आहे.
ग्राहकाला बँकेकडून मोफत सेवा मिळावी, अशी अपेक्षा नाही. बँकेने व्यवसाय करावा, नफा मिळवावा, यात गैर काहीच नाही. परंतु ग्राहकानेही बँकेवर विश्वास ठेवून आपली कष्टाची कमाई तिथे ठेवली आहे, याचे भान बँकेने ठेवायला नको काय?
नियम असावेत, शुल्कही असावे; पण त्यामध्ये पारदर्शकता आणि ग्राहकांविषयी आपुलकी असावी. कारण बँकेचा व्यवसाय केवळ पैशांवर चालत नाही, तर ग्राहकांच्या विश्वासावरही चालतो.
आजच्या काळात पैशाला महत्त्व आले आहे. प्रत्येक गोष्टीचे आर्थिक गणित मांडले जाते. सेवा देतानाही त्यामागे किती उत्पन्न मिळेल, याचा विचार केला जातो. पण माणसांमधील आपुलकी, सहकार्य आणि समजूतदारपणा यांचे मूल्य पैशांत मोजता येत नाही. व्यवसाय करणे चुकीचे नाही; पण व्यवसाय करताना माणुसकी हरवता कामा नये.
आपण केवळ बँकांनाच दोष देऊन चालणार नाही. ग्राहकांनीही बँकेचे नियम, शुल्क आणि अटी समजून घेणे आवश्यक आहे. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची माहिती करून घेणे हिताचे आहे.
मात्र बँकेनेही ग्राहकाला योग्य माहिती देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.
बँकेने ग्राहकांकडून आर्थिक शिस्तीची अपेक्षा ठेवावी, तर ग्राहकानेही बँकेकडून सेवाशिस्तीची अपेक्षा ठेवणे गैर आहे काय?’
शेवटी एकच म्हणावेसे वाटते…
'पैसे आमचे, नियम तुमचे' ही परिस्थिती बदलून 'पैसे आमचे, बँक आमची आणि विश्वास दोघांचाही' अशी झाली, तर बँकिंग व्यवहार अधिक आनंददायी होतील.
ग्राहक बँकेत केवळ पैसे ठेवत नाही, तर आपल्या कष्टाच्या कमाईबरोबरच आपला विश्वासही ठेवत असतो. त्या विश्वासाचे मोल शुल्क आकारणीपेक्षा निश्चितच मोठे असते!
काय काळ आला बघा.
आमचे पैसे, नियम तुमचे.
तुम्हां व्यावसायिक लोकांचंही आम्हां मध्यमवर्गीय लोकांसारखं झाले बघा. थोडक्यात समाधान नाहीच.
'काय करावं, काही सुचेनासे झाले बघा. असू द्या. तुम्ही तरी काय करणार! तुम्हीही आमच्यासारखेच. शेवटी आलिया भोगासी, असावे सादर! असेच म्हणावे लागेल.’
…….. O…….
दि. 27 नोव्हेंबर, 2026.
प्रा. डॉ. विनोद राऊत,
से. नि. प्राध्यापक,
अमरावती.