Premtarang books and stories free download online pdf in Marathi

प्रेमतरंगं...

"कधी तुझ्या जवळून जाताना, तुझा श्वासाच्या होणार्या स्पर्शानेही.. मन विचलीत होऊन जातं. खुप बोलावसं तुझ्याशी... तेव्हा कुठे, मन तृप्त होईल असं वाटतं.. तुझं वागणं, बोलणं.. तुझ्या असंख्य नजाकती.. अनुभवाश्या वाटतात... कसंकाय जमतं गं तुला.. इतकी सारी हत्यारं घेऊन घराबाहेर पडायला.."


"म्हणजे बाकी कुण्या तरूणीकडंही असतील एखाद दुसर्या अदा.. पण तू.. तु तर अगदी नजरेनंच घायाळ करतेस..


कोरलेल्या तुझ्या भुवयांनी प्रतिप्रश्न करताना..


भिरभिरणार्या पापण्यांनी सगळं वातावरण स्तब्ध करताना..


लयबद्ध चालीनं सर्वांना आकर्षून घेताना..


ओठांचा चंबू करून सेल्फी काढताना..


अंगभर पसरलेल्या ओढणीत अलगद हात

झाकताना..


पाहीलेय मी तुला..


असं निशब्द मला करताना..."


"मी तर वाहावत गेलेलो तुझ्या प्रेमाच्या प्रवाहात.. अगदी कॉलेजच्या पहील्या दिवशी तुला पाहीलं तेव्हापासून.. तुझं मात्र लक्ष नाही गेलं कधी.. माझ्याकडे.. कसं जाणारं बुवा.. मी बुजरा.. कोणाच्याही खिजगिणतीत नसलेला.. कधी कुणाशी बोलणं नाही.. की ओळख नाही.. कॉलेजमध्ये कोणत्याही ग्रुपमध्ये समावेश नसलेला.. अलिप्त.. सर्व जगाशी.."


"तु दिसायचीस जेव्हा जेव्हा.. माझे भाबडे मन प्रयत्न करायचे.. तुझ्याशी नजरेनं बोलायचा.. पण तुझी नजर नाही पडायची तेव्हा माझ्यावर.. मन मारून जेव्हा मी तिथून निघून जायचो.. तेव्हा चालताना शंभरवेळा तरी मागे वळून पाहायचो.. तू मला लपून पाहत तर नाहीस ना.. हेच बघायला.."


"आज या केवळ पंधरा मिनिटात मला माझं पूर्ण एक वर्ष धावल्यासारखं डोळ्यासमोर येत आहे. या संबंध वर्षातला प्रत्येक दिवस तुझ्या विचारांत हरवलेलो मी.."


"जमलंच नाही या संपूर्ण वर्षात.. तुझ्यावरून फोकस हटवणं.. म्हणून कुणाला जवळ केलंच नाही.. पण कदाचित आज मी स्वतःहुन स्टेजवर येण्याची हिम्मत केली म्हणून का होईना.. उद्या ओळख होईल खुप जणांशी.. तु येशील का बोलायला.. खात्री नाही मला.. आणि खरंतर तुझ्याशी डायरेक्ट येऊन बोलण्यापेक्षा.. मला इथे स्टेजवर बोलणं जास्त सोपं वाटतेय.."


"असो.. जर तुला कळलेच कधी की माझ्या मनातली तरंग तुझ्याविषयी आहेत.. तर नक्की भेटायला ये मला.."


कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी वर्षभर अबोल राहीलेल्या स्वप्नीलने 'मुक्त विचार' च्या नावाखाली मनातले सगळे विचार मुक्तपणे स्टेजवर जाऊन मांडले. त्याच्या म्हणण्यानुसार खरेच पुष्कळ जणांना कॉलेजमधल्या त्याच्या अस्तित्वाची जाणीव नव्हतीच. ना दिसण्यात ना वागण्यात काही असं खास.. जेणेकरून तो कुणाच्या लक्षात राहील. पण स्नेहसंमेलनात स्वतःहुन नाव देऊन त्यानं वर्षाच्या अखेरला का होईना पण त्याचं 'असणं' सर्वांना दाखवलं होतं.


त्याचं बोलणं थांबल्यावर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. शिट्या वाजू लागल्या. आपल्या भावनांना अनपेक्षितपणे मिळालेल्या या प्रतिसादाने स्वप्नील अगदी भारावून गेला. आणि त्याचं बोलणं ऐकताना भावूक झालेल्या प्रीतीच्या डोळ्यांत पाणी भरून यायला सुरूवात झाली होती.


तिने त्याला पाहीलेलं खुपदा तिला न्याहाळताना.. तिही पाहायची त्याला त्याच्याही नकळत. तिला स्टाईलबाज किंवा बोलबच्चन मुलांचा तिटकाराच होता. आणि कॉलेजातल्या अमोल पालेकरांच्या या कॉपीबद्दल तिलाही आपलेपण वाटू लागलं होतं. पण तो येईल का कधी विचारायला या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडेही नव्हते.


अहं.. आज स्वप्नीलने तिचं नावही घेतलं नव्हतं किंवा कधी तिला जाणवूही दिलं नव्हतं. तरीही प्रीती समजलीच की तो तिच्याविषयीच बोलत होता..


कोणत्याही ललनेला ते कळतंच की, आपल्याला कोण पाहत आहे वा कुणाची नजर कशी आहे.. ही तरूणींना उपजतच मिळालेली दैवी शक्ती असते म्हणा ना.. पुरूषांना वाटतं.. मी सफाईने तिला न कळता पाहतो.. पण तिला ते कळतंच..


स्वप्नील स्टेजवरून खाली आला. आणि त्याला जिकडे तिकडे त्याच्या नावाची कुजबुज ऐकायला मिळाली. जो तो त्याच्या धाडसाची प्रशंसा करत होता. साहजिकच इतक्या लोकांसमोर.. ते ही कॉलेजच्या स्नेहसंमेलनामध्ये.. असे काही बोलणे म्हणजे खरेच जिगरवाल्याचेच काम होते.


स्वप्नीलची नजर भिरभिरत तिच्यापर्यंत पोहोचली.. थोड्या अंतरावर मैत्रीणींच्या घोळक्यात ती दिसली. तीचीही नजर त्याच्यावरच होती. तिचे पाणावलेले डोळे पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला.. एव्हाना दुसर्या एकाचा परफॉरमन्स सुरू झालेला..


प्रीती अजूनही स्वप्नीलच्या नजरेत रोखून पाहत होती. तो ही अवाक्.. होऊन पाहत होता तिला.. आजपर्यंत एकमेकांशी कधीच न मिळालेल्या नजरा आज फक्त एकमेकांमध्ये खिळल्या होत्या.


त्या दोघांमध्ये दहा फुटाचं तरी अंतर असेल. स्वप्नीलने अश्याप्रकारे प्रेम व्यक्त करून अलगदपणे प्रीतीच्या मनातल्या तारा छेडल्या होत्या. तिलाही त्याचा आतापर्यंतचा साधेभोळेपणा आवडलेला. आणि आपल्या आयुष्यातील अत्यंत प्रिय गोष्ट.. हातातून निसटून जाऊ नये, म्हणून त्याने केलेला आजचा प्रयत्न तर तीला अजुनच सुखावून नेणारा होता. आपल्यावरंच इतकं प्रेम पाहून ती मनातून जाम खुश झाली होती.


प्रीतीनं नजरेनेच स्वप्नीलला बाहेर यायला खुणावले. त्यानंही मान डोलावून होकार दिला. त्याच्यासाठी बाहेर येणं फारसं अवघड नव्हते. फक्त कोणी पाहायला नको.. एवढंच काय ते सांभाळायचे होते.

तीही कशीबशी मैत्रीणींच्या वेढ्यातून सुटका करून बाहेर आली.


कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ऊत्साहात साजरा होत होता. सगळे आतच कार्यक्रम पाहण्यात मग्न होते.


तिथून बाजूलाच लागून असलेलं कॉलेजचं ग्राउंड.. अन् ग्राउंडच्या कट्ट्याला खेटून असलेले वर्ग.. रात्रीचे साडे आठ वाजले असल्यामुळे बाहेर पसरलेलं अंधाराचं जाळं. आजूबाजूला रहदारी नसल्याने कानांना ऐकू येणारी शांतता.. एका वर्गाच्या पायर्‍यांवर बसलेल्या दोन आकृत्या.. तिथुन दिसणारं आकाशातलं टपोरं चांदणं..


"तु मला इथे बोलावलेस.. याचा अर्थ.." - स्वप्नील (थोडं थोडं क्लिक होत गेलेलं तसं त्याला).


भावूक झालेल्या प्रीतीच्या ओठांवर उत्तर असूनही बाहेर पडत नव्हते..


तरीही पुढच्याच क्षणी प्रीतीने तिच्या ओठांचाच आधार घेऊन उत्तर दिले..


त्यांच्या नजरा अजूनही एकमेकांतच खिळल्या होत्या. फक्त अंतर मघापेक्षा कमी झाले होते.. पाहायला आसपास कुणीच नव्हते.. वर पसरलेल्या अंधार्‍या चादरीतले चंद्र चांदणेच काय ते साक्षीदार होते...


नदीच्या दोन किनार्याप्रमाणे असलेल्या त्या दोघांच्या नजरा.. त्यांनी थोडेसे प्रयत्न केले, तेव्हा मिळाल्याच.. यात व्यक्त होणं हे महत्वाचं.


आयुष्यात व्यक्त न होणार्या भावनांना कधीच हवे ते मोल मिळत नाहीत. म्हणूनच जेव्हा, जसे जमेल तेव्हा मनातल्या भावनांना त्यांची वाट करून देणं केव्हाही चांगलंच.. अगदी ते प्रेम आईवडील, भाऊबहीण, नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी, शिक्षक, मित्र, समाज कुणीही असो.. आपलं त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त व्हायला हवं..

समाप्त..


© https://nil199.wordpress.com