Dhoom Mate in Marathi Love Stories by संध्या books and stories PDF | धूम मेट

धूम मेट

मागे उभा मंगेश.. पुढे उभा मंगेश...
माझ्याकडे... देव माझा पाहतो आहे...
जन्मजन्मांचा हा योगी...
संसारी आनंद भोगी...
विरागी... की म्हणू भोगी...?
विरागी... की म्हणू भोगी...?
शैलसुतासंगे.. गंगा मस्तकी वाहे...
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...

ह्या गाण्याच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका... आशा भोसले यांच्या सुरेल आवाजातले... हे गाजलेले महानंदा या चित्रपटातील गीत... काल वृषालीचा लेख माझा मंगेशी... ह्यावरन हे गीत आठवलं ... हे अप्रतिम शब्द अर्थातच कवयित्री... गीतकार शांताबाई शेळके यांचे आणि त्यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलाय... प्रतिभाशाली संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी... महानंदा या चित्रपटाची सुरुवातच या गीताने होते... आणि आपण अलगद तरंगत... गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात कधी जाऊन पोहोचतो...

सिद्धहस्त लेखक... नाटककार... जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर साहित्यकृती म्हणजे महानंदा... होय महानंदाच ... जयवंत दळवी यांच्या लेखनशैलीतून त्याकाळचे वातावरण... तो निसर्ग... त्या व्यक्तिरेखा... ती असोशी... नातेसंबंधांची फरफट इतकी सुरेख रेखाटली आहे की... कादंबरी वाचताना आपल्या नजरेसमोरच ते नाट्य घडते आहे... आन त्या व्यक्तिरेखा आपणाशी संवाद करत आहेत... अशी शेवट पर्यंत मन मनाला खिळवून ठेवणारी कथा आहे... नाटककार शं.ना. नवरे यांनी तर.. या कादंबरीच्या प्रेमात पडून त्याचे नाट्यरूपांतर केले... त्यांनी केलेल्या नाटकाचे नाव होते गुंतता हृदय हे...

आता कादंबरीच समीक्षण बोलायचं म्हटलं तर तेव्हढी माझी ऐपत नाही...जयवंत सरांपुढे तर धुळी इतकी पण लायकी नाही माझी...पण ह्याच कादंबरीला अनुसरून थोडा संदर्भ वापरून मी धूम मेट हि छोटीशी कथामालिका सुरु केली आहे... जर कुणी महानंदा वाचली असेल तर नक्कीच लक्षात आलं असेल तुमच्या...वडील लायब्ररी तून पुस्तक आणायचे... तेव्हा नववीत असताना पहिल्यांदा ही कादंबरी वाचली होती... पण आज पुन्हा त्या आठवणींचा उजाळा मिळाला... तेव्हा इतकं कळायचं नाही...

कादंबरी मध्ये लेखकाने अगदी कल्याणीच्या प्रेमात पडून... तीच अप्रतिम देखणं रूप दाखवल्याचे दिसत... जेव्हा कि मुख्य व्यक्तिमत्व तीची मुलगी महानंदा आहे... कल्याणी भावीण ... आणि मामा ला तिची ओढ .. म्हणून लग्न झालेला मामाची मामी चांगली... आणि कल्याणी वाईट हा वाचकांचा गैरसमज होतो.... वास्तविक... स्वच्छ मनानं विचार केला तर... कल्याणीबद्दल सर्वांना सहानुभूती वाटायला हवी... आपल्या समाजानं आपल्या सुखासाठी देवाचं निमित्त करून निर्माण केलेली देवदासी ... भाविणीची संस्था... त्यात बळी कल्याणी.. तिनं केवळ तिची आई भावीण म्हणून तिने शुद्ध सुद्धा देवाला वाहून घ्यायचं... स्वत: लग्न करायचं नाही... जो खोत पैसा देईल.... त्याच्या मनासारखं वागायचं... खोत म्हणजे कोकणात गावाचे प्रमुख किंवा प्रतिष्ठितांना खोत म्हणल जात ...

ह्या कथेचा नायक हा बाबुल .. हा मुंबईमधील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत असतो... बऱ्याच वर्षांनी अगदी सहजपणे... गोव्याच्या निसर्गरम्य ठिकाणी राहणाऱ्या ... मामा-मामींकडे सुटीमध्ये राहावयास येतो... गावातल्याच रवळनाथाच्या देवळात बाबुलची... सहजपणे गाठ पडते कल्याणीशी... कल्याणी बाबुलला ओळखते... देवाची सेवा करणारी भावीण... कल्याणीला सारा गाव ठाऊक... आणि सारा गावदेखील या भाविणीला पुरता ओळखून असतो... हळूहळू बाबुलला सारे कळू लागते... आपल्या मामांचे आणि भाविणीचे संबंध काय आहेत... हेही कळून चुकते कि.. मामीला हे सारे माहीत आहे आणि ती आतल्याआत फक्त तडपत असते... अशाचवेळी बाबुलची गाठ पडते कल्याणीच्या मुलीशी म्हणजेच महानंदाशी. तिला सगळेच मानू म्हनेतात... मानूच्या सौंदर्यामुळे बाबुल पुरता घायाळ होतो... महानंदाशी लग्न करण्याचा असा निर्धार करतो प पण एक भावीण असल्याने.. कल्याणीला हे लग्नबिग्न अजिबात मान्य नसते... कारण.. भाविणीने फक्त देवाचीच सेवा करायची असते... लग्न वगैरे केल्यास देवाचा कोप होईल... मोठे अरिष्ट येईल... असे तिला वाटत असते... त्यामुळे तिची परवानगी मिळणार नसल्याने... पळून जाऊन लग्न केल्याशिवाय... दुसरा कोणताही पर्याय बाबुलपाशी उरत नाही... मानूला विश्वासात घेऊन तसे तिला वचन देऊन बाबुल मुंबईला परततो...
मुंबईहून बाबुल महानंदाला पत्रं पाठवतो की...अमुक दिवशी मी तुला नेण्यास येईल तेव्हा तू तयार राहा... मात्र ही सारी पत्रे गावातला लंपट पोस्टमास्तर ... मध्येच लंपास करून कल्याणीला दाखवतो... ती ताबडतोब तिला पिंगळीला पाठवून देते.... इकडे बाबुल गावी तिच्या घरी येतो... कल्याणी त्याला भलतेच काही सांगते... तिला पाचवा महिना लागला आहे.. आम्ही भाविणी... जो आसरा देतो त्यालाच आम्ही सेवा देतो... तेव्हा तू तिला विसर... मला भेटू नकोस... असे तिने स्पष्ट सांगितले आहे... असे कल्याणीने सांगितल्यावर बाबुल पुरता कोसळतो...

आपल्या मानूने आपल्याला फसवले... असे वाटून त्याचा जगण्यातला सारा रसच संपतो... मुंबईत लग्नासाठी आई बाबुलपाशी हट्ट करते... मात्र बाबुल लग्न करत नाही... पश्चात्तापाच्या आगीमध्ये तो जळत असतो.... बरीच वर्षांनी मामा वारतात म्हणून मामीला भेटायला बाबुल गावी जातो आणि... एका अवचित वळणावर त्याची गाठ पडते महानंदाशी... कल्याणीला पुरते वेड लागलेले असते... थकलेली महानंदा सारे सत्य बाबुलला कथन करते... बाबुल नि:शब्द होतो.... दोघांच्या जीवाची फसवणूक... फरफट करणाऱ्या कल्याणीला चांगलीच शिक्षा मिळाली... असं तो समजतो अर्थात वाचण्यात आपण इतकं गुंगून जातो की... आपल्याला हि तेच वाटत कि कल्याणी प्रेमाची शत्रू आहे... खरतर लेखकाचे वडील मंदिराचे पुजारी आणि त्या मंदिरात ह्या भाविणी असायच्या ... शेवट जे वर्णन कल्याणी च लेखकाने केलंय ते अगदी तंतोतंत खरं आहे... त्या मंदिरात एक भाविणीचं वर्णन त्यांनी केलंय... पण ती तर फक्त देवाचा कोप नको व्हायला म्हणून प्रथा पाळत असते... समाजा विरुद्ध कुणी निरक्षर आणि अडाणी बापड्याला काहीच बोलायचं हक्क नसतो तेव्हा ... त्या रुढी विरुद्ध जाऊन ती मनात असताना ही मुलीचं लग्न लाऊ शकत नाही...

रूढी.. परंपरेच्या जोखडात कोमेजलेल्या ... आणि पुढे सामाजिक बंधनात जखडून गेलेल्या... होरपळलेल्या दोन जीवांची विलक्षण हुरहूर लावणारी आणि वाचकाला अंतर्मुख करणारी... शेवट पर्यंत खिळवून ठेवणारी कथा आहे महानंदा... अगदी आताआतापर्यंत कर्नाटक, गोवा आणि दक्षिण कोकणात गावातल्या काही देवळांभोवती देवदासींची प्रथा अस्तित्वात होती. देवदासी म्हणजे विशिष्ट देवाला वाहिलेल्या मुली... देवाच्या सेवेच्या नावाखाली... या मुलींचे लैंगिक शोषण होत असे... त्यामध्ये गावातली अनेक प्रतिष्ठित मंडळी गुंतलेली असत... देवदासींना लग्न करण्यास परवानगी नसे... पुढे देवदासींचे दोन गट पडले... कलावंतिणी वा नायकिणी आणि भाविणी... ही अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी अनेक राज्यांनी विविध कायदे केले... तरीही... देवदासी संस्था आज पूर्णपणे नामशेष झाली नाही. दळवी यांनी त्या काळातला हा ज्वलंत विषय निवडून त्याभोवती कथा गुंफून महानंदा घडवली ... त्याला खरोखरच तोड नाही.

जयवंत दळवी यांच्या बऱ्याच कादंबरीमध्ये कुणी न कुणी पात्र वेडं असायचं... वेडेपणाचं इतकं वेड (ऑब्सेशन) त्यांना का असेल... असा प्रश्न मला नेहमी पडायचा... पण काही अवलियांच्या सानिध्यात आल्यावर एक गोष्ट समजली... कि आपण फक्त आपल्या चष्म्यातुन या प्रतिभावान लोकांकडं पाहत असतो.... असामान्य प्रतिभेला थोडा (वेडसरपणा मी अजिबात म्हणणार नाही) लहरीपणाचा एक आशीर्वाद असतोच.... स्वतःला वेड बनवून दुसऱ्यांना आनंद देण्यात महिर असतात काही लोक... खरतर ही एक कला आहे अस मी म्हणेन... आणि शेवटी आपण ज्याला समाज म्हणतो... तोही एक ठराविक... सर्वमान्य म्हणजे ज्याला आपण युनिव्हर्सली अक्सेप्टेड म्हणतो... अशाच संकेतावरती चालत असतो....

धूम मेट हि ह्याच कथेतून प्रेरणा घेऊन बनवली आहे... अजून पूर्ण झालं झाली नाही पण चांगला प्रतिसाद जर मिळाला तर नक्कीच ह्याच सगळं श्रेय जयवंत सरांना जात... तुम्ही जिथे कुठे असाल जयवंत सर तिथून आशीर्वाद द्या कि मी ह्या कथा मालिकेला योग्य न्याय देऊ शकेल... कथामलिका जाणून घेण्यासाठी वाचत राहा धूम मेट..

©® श्री.


Rate & Review

I M

I M 8 months ago