Daitya - 1 in Marathi Thriller by Likhasa books and stories PDF | दैत्य - भाग 1

The Author
Featured Books
Categories
Share

दैत्य - भाग 1

दैत्य ही कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेत उल्लेख केलेली पात्र, नावे, घटना, स्थळ ह्यांचा वास्तवाशी कुठेही संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. 
कथेत वर्णन केलेल्या घटना, पात्रे आणि प्रसंग हे काल्पनिक असून त्यांचा उद्देश केवळ मनोरंजन आणि सामाजिक वास्तवातील काही पैलूंवर प्रकाश टाकणे हा आहे.
-------------------------------------------------------------------------------

भाग १

रात्रीचे फक्त 8.30 वाजले होते. तरीही रात्र गडद होती…आकाशात ढग दाटले होते.
चंद्र लपला होता…शहराच्या काही गल्ल्या नेहमीप्रमाणे अंधारातच जगत होत्या. दिवसभर असलेली उन्हाची काहीली अजूनही जाणवत होती. आणि अचानक तापलेल्या जमिनीवर काही थेंब टप टप पडले. आणि काही कळायच्या आत 
पावसाच्या सरी अचानक कोसळायला लागल्या.

चिटपाखरू नसलेली ती अरुंद गल्ली... गल्लीच्या टोकाशी नगरपालिकेचा एक स्ट्रीटलॅम्प ... ज्याचा उजेड जशी गल्ली पुढे सरकायची तसा कमी कमी होत जायचा. त्याच गल्लीत आत्ता कोणीतरी जीवाच्या आकांताने पळत होता.
“प्लीज… सोड… मला सोड…!” त्याचा आवाज तुटत होता.
त्याचे पाय घसरत होते… श्वास तुटत होता…पण तो थांबण्याची हिंमत करत नव्हता.
अचानक तो घसरला. जोरात जमिनीवर आपटला. तो मागे सरकत राहिला…डोळ्यांत भिती गोठलेली. आणि तेव्हाच अंधारातून एक सावली पुढे आली. अगदी सावकाश...
पावसाच्या सरींमधून त्याचा चेहरा स्पष्ट होत गेला...
सहा फूट उंच…
कामावलेलं शरीर…
ओले, वाढलेले केस कपाळावर पडलेले…
दाढी-मिशा राकट…
आणि त्याचे ते डोळे
भेदक....निर्विकार... भावहीन.
तो माणूस थरथरत त्याच्या पायाशी आला,“प्लीज… मला सोड… मी परत असं करणार नाही…”
समोरचा माणूस काही बोलला नाही. थंड नजरेने फक्त बघत राहिला. फक्त काही क्षण…मग...त्याने त्याची कॉलर पकडली...एका झटक्यात वेगाने भिंतीवर आपटलं... काहीतरी जोरात फुटल्याचा आवाज आला...आणि क्षणात श्वास थांबला आता पहिल्यांदाच तो बोलला.....“अबीर… कधीच माफ करत नाही.”
पावसाचा आवाज वाढत गेला…आणि काही क्षणांत त्या गल्लीत पुन्हा शांतता पसरली.

संध्याकाळी अंबिका नीताकडे गेली. दोघींचे गप्पांच्या नादात घड्याळाकडे आणि बाहेर लक्ष गेले नाही…अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि अंबिका दचकली. 
"नीते मी निघते... आई बाबा वाट बघत असतील. पाऊस पण येईल वाटतंय. 
मधल्या गल्लीतून गेले तर दहा मिनिटात घरी पोहोचेन." ती घाईने उठत म्हणाली.
"अंबु अगं 7 नंतर त्या गल्लीत कुत्र फिरकत नाही. दादा येईपर्यंत थांब. तो गाडीवर सोडेल तुला." नीता तिला थांबवत म्हणाली. 
"नको मी निघाले..." म्हणत अंबिकाने भरभर बॅग उचलली आणि ती निघाली सुद्धा. 
"अगं थांब छत्री तर घेऊन जा..." हे नीताने म्हणेपर्यंत ती रस्त्याला लागली सुद्धा.

ती बाहेर आली तेव्हा पाऊस अजूनही हलक्या सरींमध्ये पडत होता.
“आज तर पूर्ण भिजणार…”ती स्वतःशीच पुटपुटली. तिने बॅग डोक्यावर धरली…
आणि घाईघाईने चालायला लागली.
केतकीसारखा उजळ तिचा वर्ण पावसात चमकत होता.
तिचे मोठे, तपकिरी हरीणीसारखे डोळे आजूबाजूला पाहत होते.
उंच पोनी मधले केस थोडे सैल झाले होते…
काही बटा चेहऱ्यावर चिकटल्या होत्या.
ती नाजूक होती
पण तिच्या चालण्यात एक जिवंतपणा होता.
रस्त्यावरची गर्दी पावसामुळे भरभर पांगत होती.
तिने घड्याळ पाहिलं.“उशीर होतोय…”, तिने शॉर्टकट कडे पाहिलं. तीच ओळखीची गल्ली. जिथून दिवसा ती अनेकवेळा ये जा करत होती. ती गल्ली आत्ता शांत होती. फक्त अंबिकाच्या चालण्याचा पावसामुळे चप चप आवाज तेवढा येत होता. ती भरभर पावलं उचलत होती. नेहमीसारखीच. ती आत वळली. गल्लीत शिरताच आवाज कमी झाले. फक्त पावसाचा हलका आवाज…टप… टप…
ती वेगाने चालत होती. गल्लीच्या भिंतीला असलेल्या फुटभर पत्र्याच्या शेडखालून  कसेतरी पावसाने भिजण्यापासून ती स्वतःला वाचवत होती. आणि...अचानक तिचा पाय घसरला.
“अरे...घसरलेच असते मी...”ती  सावरली. खाली पाहिलं. पाणी थोडंसं साचलं होतं. पण त्या पाण्यात हलका लालसर रंग पसरलेला होता. तिच्या भुवया जुळल्या. ती थोडी पुढे गेली…आणि भिंतीकडे पाहिलं. पाहून तिचा श्वास अडकला. पावसाने अर्धवट पुसले गेलेले रक्ताचे डाग. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने एकदा मागे पुढे पाहिलं. तिच्याशिवाय कोणीही नव्हतं.
“हे… काय आहे…?” ती स्वतःशीच कुजबुजली. तिच्या पायाला काहीतरी लागलं. ती दचकली.
खाली पाहिलं एक छोटासा इअरपीस. तिने तो उचलला…काही क्षण ती त्या इअरपीस कडे पाहत राहिली आणि अचानक....
“स्टेटस ?” इअरपीएस मधून आलेल्या आवाजाने ती घाबरली.
“अबीर … रिस्पॉन्ड . काम झालं का ?” तिच्या डोळ्यांत आपण एकटंच असल्याची भिती भरली. ती दचकून हळूच मागे वळली…आणि... तिच्या समोर.......तो उभा होता. पावसाच्या सरींमधून त्याचा चेहरा दिसत होता. तोच उंच बांधा…तीच नजर…अबीर. अंबिकाने नकळत भिंतीकडे पाहिलं. पावसाने अर्धवट पुसले गेलेले रक्ताचे डाग...त्यावरून तिची नजर त्याच्याकडे वळली. तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत आता भिती स्पष्ट होती. ती मागे सरकली. एक पाऊल…दोन पावलं…अबीर तसाच उभा होता. न हलता. पण त्याची नजर तिच्यावरच रोखलेली. त्याचे डोळे तिच्यावर खिळलेले. अंबिकाचा श्वास अडकला. तिच्या हातातला इअरपीएस थोडासा थरथरत होता. तो थोडा पुढे आला. ती अजून एक पाऊल मागे गेली. तो तिच्यासमोर थांबला. भितीने तिच्या डोळ्यात हलकं पाणी जमा झालं. पावसाचा आवाज…आणि तिची धडधड. अबीरने हळूच हात पुढे केला. तिच्या बोटांना त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला कळत नकळत …पण तो स्पर्श....थंड…आणि जाणवणारा.अंबिकाचा श्वास अडखळला. त्याने झटकन तिच्या हातातून इअरपीएस काढून घेतला. पण त्याच्याही नकळत तो तिच्या डोळ्यांत पाहत राहिला...तिचे डोळे…आत्ता भितीने भरलेले…पण पळून न जाणारे....तो काही क्षण थोडा जास्त थांबला. सरळ उभा राहिला. त्याची एक नजर परत तिच्या डोळयांकडे गेली. जसं ते डोळे तो लक्षात ठेवत होता. आणि मग....तो वळला. पावसात चालत…हळूहळू अंधारात हरवला.
अंबिका तिथेच उभी राहिली. तिच्या मनात एकच प्रश्न,“इथे काय घडलंय…?”
अंबिकाचं हृदय जोरात धडधडत होतं. पाऊस वाढत होता. त्या शांततेत फक्त तिचा श्वास आणि पावसाचा आवाज. आणि तिच्या अंतरमनाने दिलेला ईशारा तिला जाणवला, " इथून ताबडतोब निघ." ती वळली. चालायला लागली. पहिल्यांदा हळू…मग थोडी वेगाने…आणि मग धावत काही क्षणांत ती त्या गल्लीतून बाहेर निघून गेली.

अबीर तिथेच गल्लीच्या टोकाशी आडोशाला उभा राहिला होता. त्याच्या हातात इअरपीएस अजूनही होतं. त्याने ते घट्ट पकडलं. पण त्याची नजर...जिथून ती गेली होती, तिकडेच... स्थिर होती. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी हालचाल झाली. काहीतरी वेगळं. मग त्याने नजर दूर घेतली. तो वळला…आणि सावल्यांमध्ये अदृश्य होत दिसेनासा झाला.

गल्लीतून बाहेर पडल्यावरही अंबिकाचे पाय थांबत नव्हते...ती वेगाने चालत होती. पावसाच्या सरी अजूनही अंगावर पडत होत्या…पण तिला त्याची जाणीवच उरली नव्हती. तिच्या कानात अजूनही तोच आवाज घुमत होता. “अबीर रिस्पॉन्ड …”
तिने नकळत मागे वळून पाहिलं. गल्ली आता दूर दिसत होती. एकदम शांत. जसं तिथे काहीच घडलं नव्हतं. पण तिच्या मनात सगळं अजूनही होतं. ते रक्ताचे डाग…तो इअरपीएस... तो आवाज…आणि…तो. तिचा श्वास अजूनही सावरला नव्हता. तिने चालणं थांबवलं. हात छातीवर ठेवला...धडधड थांबवायचा प्रयत्न करत,
“हे सगळं… खरंच होतं का?” ती स्वतःशीच म्हणाली.
एक क्षण तिला वाटलं, कदाचित ती जास्तच विचार करतेय. पण मग तिला तिच्या बोटांवर तो स्पर्श पुन्हा जाणवला....थंड....खराखुरा. ती थोडीशी थरथरली. काही वेळाने…ती घरी पोहोचली. दार उघडताच घरातला नेहमीचा उबदारपणा समोर आला.
“अंबिका? एवढा उशीर?”आईचा आवाज आला.
ती थोडा वेळ काहीच बोलली नाही.“पाऊस…आला अचानक.”ती फक्त इतकंच म्हणाली.
तिच्या बाबांनी पेपरवरून नजर वर केली.“भिजलीस पूर्ण…जा आधी डोकं पूस. कपडे बदल. सर्दी होईल बेटा.”ते म्हणाले.
तिने काही न बोलता मान हलवली. सगळं नेहमीसारखंच होतं. घर…आई-बाबा…
साधं, सुरक्षित आयुष्य…पण आज काहीतरी बदललं होतं. रात्री…अंबिका झोपायचा प्रयत्न करत होती. पण डोळे मिटले की तेच दृश्य पुन्हा समोर येत होतं. ती शांत गल्ली…पाऊस...भिंतीवरचे रक्ताचे डाग…आणि ते डोळे...भेदक.... ती झटकन उठली. खिडकीतून बाहेर पाहताना पावसाच्या सरी अजूनही तशाच पडताना दिसत होत्या. रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात त्या थेंबांना एक चमक येत होती.
अंबिकाने हात खिडकीच्या काचेला टेकवला…थंड काच…आणि तेंव्हाच तिला पुन्हा त्याच्या बोटांचा क्षणासाठी झालेला तोच स्पर्श आठवला. ती पटकन मागे सरकली. डोळे घट्ट मिटले.
पण काही गोष्टी…डोळे मिटले तरी जात नाहीत.

तिने पाण्याचा ग्लास घेतला. हात अजूनही भितीने थोडे थरथरत होते. “काही नाही… विसरून जा…”ती स्वतःलाच समजावत होती. पण मन ऐकत नव्हतं. प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात येत होते .“तो नेमका कोण …?” " तिथे काय घडलं असेल?" अंबिकाला झोप लागली नाही. 
त्या रात्री पाऊस थांबला. पण तिच्या आयुष्यात एक वादळ तिच्याही नकळत सुरू झालं होतं. 


To be continued....
                        ******************