Aayushy sadhepanani jaga aani aayushyachi maja dhya.. books and stories free download online pdf in Marathi

आयुष्य साधेपणानी जगा आणि आयुष्याची मजा घ्या..

आयुष्य साधेपणानी जगा आणि आयुष्याची मजा घ्या-

आयुष्य कस जगाव? आयुष्य नेहमीच साधेपणानी जागाव अस सांगितलं जात पण साधेपणानी आयुष्य बऱ्याच वेळा जगता येतच नाही. आयुष्य साधेपणानी जगल तर आयुष्याची मजा प्रत्येक क्षणी अनुभवता येते नाहीतर आयुष्यात ताण वाढू शकतात. बरेच वेळा दलदलीत फसाव तस काही गोष्टीत अडकले जातो. आणि आयुष्य कठीण होऊन बसत. बऱ्याचवेळा ठराविक पद्धतीनी आयुष्य जगण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. त्यांना चौकट सोडून कधी बाहेर पडताच येत नाही. किंवा त्यांना तस करायची इच्छा असते पण त्यांच मन धजावत नसत! पण एक गोष्ट नक्की आहे कि, आयुष्य उत्तम रित्या जगण्यासाठी साधेपणानी जगण आणि आहे त्यात आनंद मानण हे अत्यंत गरजेच आहे. इतरांना स्वातंत्र देण आणि स्वतंत्र होऊन जगण्यातला आनंद घेण अत्यंत गरजेच असत. आपण आपली मानसिकता अशी करून ठेवतो कि नवीन गोष्टी आपल मन लवकर मान्य करतच नाही. आपली वृत्ती बदलायची गरज असते पण तस होत नाही आयुष्य आपल्याला भरभरून देत असत. त्याचा स्वीकार डोळे उघडे ठेऊन कारण गरजेच असत. जे आहे त्यासाठी कृतज्ञता ठेऊन किंवा विचारसरणी बदलून आयुष्य उत्तम जगण्यास मदत होते.

* साधेपणानी आयुष्य जगून आयुष्याचा आनंद कसा घेता येईल-

१. कृतज्ञता दाखवा-

आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी नकळत आपल्याला मिळत असतात. किंवा कधी कधी कोणी जाणीवपूर्वक आपल्याला मदत देखील करत असत. पण त्यासाठी कधी तुम्ही कृतज्ञता दाखवली आहे? अशी कृतज्ञता व्यक्त केली नसेल तर मिळालेल्या आयुष्याबद्दल किंवा आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल आभार मानायला विसरू नका. कृतज्ञता दाखल्यामुळे आयुष्य उत्तम जगण्यासाठी उर्जा मिळत राहते.

२. सारख्या तक्रारी करण टाळा-

बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते.. कोणतीही गोष्ट मनाविरुद्ध झाली कि आपण तक्रार करायला चालू करतो. कधी शांतपणे बसून विचार करा, आज आपण किती वेळा तक्रार केली. तुमच्या लक्षात येईल कि आपण एखादी गोष्ट जरी मनासारखी झाली नाही कि तक्रारीचा पाढा वाचायला लागतो. आणि दुसऱ्यावर दोषारोप करायला लागतो. अगदी समोर कोणीच नसेल तर नशिबाला दोष देण चालू होत. त्यामुळे प्रश्न सुटत तर नाहीच तर उलट त्या गोष्टीचा त्रासच जास्ती व्हायला लागतो. आणि साहजिकच आयुष्यातला आनंद कुठेतरी हरवायला लागतो. त्यामुळे सततच्या तक्रारींना नाही म्हणायला शिका आणि आयुष्य आनंदी बनवा.

३. भविष्यकाळाची चिंता सोडा-

चांगल्या भविष्यासाठी स्वप्न रंगवण आणि त्यासाठी प्रयत्न करण चांगली सवय आहे. पण भविष्यकाळा बद्दल जास्ती विचार करून सतत तणावात राहाल तर ती नक्कीच चांगली गोष्ट नाही. सतत भविष्यकाळाचा विचार करून आजचा प्रत्येक दिवस घाबरून जगण्यात काहीच अर्थ नाही. किंवा भविष्यात कोण कस वागेल याचा सुद्धा अजिबात अंदाज लावता येत नाही. त्यामुळे भविष्यात काय होईल याचा अति विचार करण टाळलेल कधीही उत्तम! त्यामुळे आयुष्यातली मजा कुठेही हरवणार नाही.

४. नियमित व्यायाम गरजेचा-

भरमसाठ उपकरण आणून त्यावर वेळ घालवण्यापेक्षा नियमित व्यायाम केला तर त्याचा सकारात्मक परिणाम आयुष्यावर दिसून येईल. व्यायाम केल्यामुळे ताण कमी होण्यास मदत होतेच आणि त्याचबरोबर निरोगी आयुष्य मिळण्यास मदत होते. आयुष्य उत्तम असलं कि आत्मविश्वास वाढायला मदत होते. बाकी कश्याला प्राधान्य देण्याआधी तब्येत उत्तम ठेवण्याकडे लक्ष द्या. आणि त्यासाठी फक्त नियमित व्यायाम करण्याची गरज असते.

५. झालेल्या चुकांबद्दल दुःख वाटून घेण बंद करा-

आयुष्यात कळत नकळत काही चुका होतात. पण एकदा का चूक झाली कि त्या बाबत काहीही करता येत नाही. त्यामुळे झालेल्या गोष्टीच विनाकारण दुःख करण्यापेक्षा त्या चुका परत होणार नाहीत यावर लक्ष केंद्रित केल कि त्याच चुका वारंवार घडणार नाहीत आणि त्याचा काही त्रास सुद्धा होणार नाही. स्वतःची मत मांडायला लाजू नका आणि जे वाटत आहे ते लपवू नका.

६. टीका करण टाळा-

काही लोकांना कोणाबद्दल चांगल बोलण्याऐवजी टीका करण्याची सवय असते. आणि जेव्हा लोकं टीका करतात त्यावेळी ते स्वतः परिपक्व नसतात. त्यांना अस वाटत असत कि मी कोणावर टीका केली कि मी मोठा होईन. पण अस अजिबात नसत. जेव्हा तुम्ही कोणावर टीका करता त्यावेळी बऱ्याच लोकांच्या टीकांना तुम्ही बळी पडायची शक्यता वाढीस लागते. आणि टीका केल्यानी समोरचा दुखावला जातो आणि साहजिकच नाती बिघडू शकतात. त्यामुळे कोणावर टीका करण्या आधी स्वतःकडे पहाव आणि मगच टीका करायचा विचार करावा.

७. सकारात्मक आयुष्य तुमच्याच हाती आहे-

अस म्हणाल जात, तुम्ही जस विचार करता त्याच विचारांप्रमाणे तुमच आयुष्य बदलत जात. तुम्ही जे विचार करता तेच तुमच्याकडे आकर्षित होत. तुम्ही सगळे नकारार्थी विचार केले उदाहरणार्थ, तुम्ही असा विचार केलात कि मला वेळ मिळतच नाही, माझ्याकडे पैसेच नाहीत किंवा अगदी मला कोणीच मित्र मैत्रिणी नाहीत तर त्या विचारांप्रमाणेच आयुष्य बदलल जात. त्यामुळे आयुष्यात जे जे आहे त्याचा आदर करून त्याच्या बद्दल सकारात्मक विचार केला तर साहजिकच आयुष्याला सुंदर कलाटणी मिळते आणि आयुष्य सुखकर होत. छोट्या छोट्या गोष्टी मधून सुद्धा बऱ्याच संधी उपलब्ध होण्यास मदत होते.

८. आनंद मिळेल अश्या गोष्टी करायला विसरू नका-

सारखा पैसा पैसा करण्यापेक्षा शांत बसून थोडा विचार करा कि कोणत्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. व्यस्त दिनक्रमा मधून थोडा वेळ आनंद मिळवण्यासाठी काढा. आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी केल्या पाहिजेत अस अजिबात नसत. परिवाराबरोबर कॉफी किंवा गप्पा गोष्टी, ब्रेकफास्ट बनवणे किवा अगदी तुमची आवडती मालिका बघणे ज्यांनी तुमच आयुष्य आनंदानी भरून जाईल अश्या गोष्टी न विसरता करा. आणि बिझी रुटीन मध्ये वेळ काढून अश्या लहान लहान गोष्टी जाणीवपूर्वक करायला विसरू नका. रोज थोडा वेळ जरी आंनदी राहण्यास यशस्वी झालात तर नक्कीच तुमचा दिवस सुद्धा आंनदी होईल यात काही शंका नाही.

९. सकाळ नेहमीच फ्रेश ठेवा-

दिवसाची सुरवात जशी होते त्याचप्रमाणे पूर्ण दिवस जातो हि गोष्ट कोणीही अमान्य करणार नाही. दिवस फ्रेश घालवण्यासाठी फ्रेश उठून दिवसाची सुंदर सुरवात करण उपयुक्त असत. भांडणांनी दिवस चालू करण्या ऐवजी कर हसत खेळत दिवस चालू केला तर येणारा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. आणि हि गोष्ट सहज शक्य आहे. त्यासाठी काही वेगळ करण्याची गरज नसते. फक्त प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीनी पाहून विनाकारण होणारे वाद टाळा आणि घरातला एकोपा जपून ठेवा.

१०. करमणुकीवर वर जास्ती वेळ घालवू नका-

आयुष्यात करमणूक आवश्यक असते पण त्यासाठी किती वेळ देता ह्याकडे लक्ष ठेवा. हल्ली व्हॉट्स अॅप, फेसबुक इत्यादी चा वापर खूप होतांना दिसतो. विनाकारण बडबड ज्याचा काहीही उपयोग नसतो अश्यावर वेळ घालवण्याचा कल वाढलेला दिसून येतो. हल्ली प्रत्येकजण कोणत्याना कोणत्या तणावा खाली जगात असतो त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी थोडी करमणूक गरजेची असतेच पण करमणूक किती त्या गोष्टी कडे दुर्लक्ष करू नका. कोणताही अतिरेक कधीही वाईटच. नुसता वेळ घालवण्या ऐवजी काहीतरी चांगल आणि उपयुक्त करण्याकडे भर द्या. तस केल्यानी नव काही केल्याचा आनंद सुद्धा मिळण्यास उपयोग होतो आणि वेळेचा सदुपयोग होतो.

आयुष्य आनंदानी जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्याचबरोबर आयुष्य चांगल्या पद्धतीनी जगण आपल्याच हातात असत. कोणाशी बरोबरी करून ते अजिबात सध्या होत नाही. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते. त्यामुळे प्रतेकानी स्वतःला आनंद मिळवण्यासाठी काय केले पाहिजे ते स्वतः ठरवलं पाहिजे. जे आहे त्यात समाधान मानून त्याबद्दल कृतज्ञता ठेऊन जगल तर आयुष्य नक्कीच सुंदर होईल. आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा बदलायला मदत होईल.

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com