Kaalpravash books and stories free download online pdf in Marathi

कालप्रवास

आदित्यचं काम पुर्ण झालं होतं. तो घरी जाण्याच्या तयारीत होता.

“सर मी तुमच्या सोबत गेल्या ३ महिन्यापासून काम करतोय. मला तुमच्या सगळ्या गोष्टींवर विश्वासही बसलाय. मग आतातरी सांगा मलीसाच्या मर्डर केसचं सत्य काय आहे, तिच्यासोबत नक्की काय झालं होतं आणि त्या केसमध्ये तुमचं नाव का घेतलं गेलं?”

मनीष आदित्यला थांबवत, त्याची नाराजी व्यक्त करत म्हणाला.

“ठिक आहे, सांगेन मी तुला. पण आज नाही. नंतर कधीतरी.”

आदित्य हसत त्याची बॅग खाली ठेवत म्हणाला.

“तुम्हाला ही चेष्टा वाटतीये. मी तुम्हाला गेल्या तिन महिन्यात एकदाही त्या केसबद्दल काहीच विचारलं नाही. मला वाटलं तुम्ही स्वतःहून मला सांगाल. पण तुम्ही स्वतःहून कधीच सांगितलं नाही. वेळ आहे तर आज तरी सांगा किंवा तुम्ही मला कधीच सांगणार नाही असं तरी सांगुन मला मोकळं करा?”

मनीष आदित्यवर रागावला होता. त्याला त्या स्थितीत पाहून आदित्यने त्याला बसायला सांगितले आणि स्वतः त्याच्या समोर जाऊन बसला.

“तू आधी शांत हो. आज तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. तू आज विचारलं नसतंस तरी मी सांगणारच होतो... तर ऐक, टेब्स् शहरातला हॉटेल ब्लु डायमंड. सन २०१३ सकाळी ८ वाजता,

हॉटेलच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव वेगाने एक कार येऊन उभी राहिली. त्यातून हॉटेलचा मॅनेजर उतरला आणि कारची चावी तिथल्या शिपायाला देऊन गाडी पार्क करायला सांगुन तो आत आला. त्याला येताना पाहून काऊंटरवर बसलेले हॉटेलचे कर्मचारी उभे राहिले.

“गेल्या तीन दिवसात काही खास झालं की नाही?”

मॅनेजरने त्याला स्मितहास्य करत प्रश्न विचारला.

“काही खास नाही सर. नेहेमी प्रमाणे लॉजसाठी दोन गिऱ्हाईक आले आले आणि चार गेले.”

“दोन आले आणि चार गेले? म्हणजे जेवढे जण येतात, त्याच्या दुप्पट संख्या जाणाऱ्यांची आहे... आज कोणी आलं का?”

“आज आलं तर नाहीये पण एक महिला आज जाणार आहे.”

“अरे देवा...” मॅनेजरने डोक्याला हात लावला. “... जाणार आहे तर कुठं आहे ती? आठ वाजून गेले. तिने चेक् आऊट करण्याची वेळ सकळी आठची सांगितली आहे ना?”

टेबलवच्या रजीस्टरमध्ये पाहून मॅनेजरने विचारले.

“आम्ही त्यांना काल संध्याकाळीच सांगितलं होतं की जेवढा उशीर तुम्ही कराल त्यानुसार तुम्हाला जास्तीचे पैसे भरावे लागतील.”

“एक काम करा, कोणीतरी तिच्या रुममध्ये जावा आणि तिला पुन्हा एकदा सांगुन या... आपल्याकडं येणाऱ्यांपैकी बरेच लोकं असंच करतात. आधी स्वतःहून उशीरा येतात आणि नंतर त्यांना सांगितलं नाही असं म्हणून इथं येऊन भांडत बसतात.”

मॅनेजरच्या आदेशानंतर एक कर्मचारी मलीसाच्या रूममध्ये गेला. बराच वेळ बेल वाजवल्यानंतरही आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही, तेव्हा त्या कर्मचाऱ्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला. रुमचा दरवाजा उघडाच होता. तो रूममध्ये आत आल्यावर रूममध्ये कोणीही नसल्याचे त्याला समजले. त्याने मॅनेजरला फोन लावला आणि त्यालासुध्दा वरती बोलावून घेतले.

मॅनेजर रुममध्ये आल्याबरोबर त्याने त्या कर्मचाऱ्याला विचारले.

“बाथरूम वगैरे तपासून पाहिलं का?”

“हो सर, बाथरूम आणि गॅलरी तपासून पाहलं. ती कुठंच नाही.”

“गॅलरीचं दार उघडं होतं का?”

मॅनेजरने खिडकी उघडून खाली पाहत विचारले.

“नाही सर. गॅलरीचे दार आतून बंद होते. मला वाटतंय सर ती पळून गेली असणार.”

“ती पळून गेली तरी चालेल. पण तिला जर काही बरं वाईट झालं ना तर आपल्या सगळ्यांना रॉकी सर कामावरून काढून टाकतील. आधीच हॉटेल विरूध्द कॉर्टात पाच केसेस् चालू आहेत. त्यात ही केस जर नव्याने चालू झाली तर येणारे एक दोन गिऱ्हाईकसुध्दा येणार नाहीत.”

दारात उभा कर्मचारी आत आला. त्याच्या चेहेऱ्यावर भितीचे भाव होते. तो अडखळत मॅनेजरला म्हणाला.

“सर, या रुममध्ये राहणारी महिला परदेशातून आलेली होती. जर तिला काही झालं तर हा केस अंतराष्ट्रीय स्थरावर जाईल आणि या केसची चौकशी मोठ्या स्थरावर होईल...”

त्याच्या वाक्याने मॅनेजर आणखी घाबरला. पण काही क्षणातच स्वतःला सावरत तो त्या कर्मचाऱ्याला म्हणाला.

“इथं उभं राहून बडबड करण्यापेक्षा हॉटेलच्या इतर रुमध्ये फोन करून विचारा आणि तरी नाही सापडली तर तिला हॉटेलच्या गच्चीवर शोध.”

“पण सर, गच्चीच्या दाराला तर लॉक आहे आणि त्याची फक्त दोनच चाव्या आहेत. एक तुमच्याकडं आणि दुसरी रॉकी सरांकडं. त्यामुळे ती तिथं नसेल गेली. आणि गेली, तरी दाराला सिक्युरीटी अलार्म सिस्टम आहे. त्यामुळे...”

“या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत, पण तरीसुध्दा तू तिथं जाऊन पहा.”

मॅनेजरची नजर टेबलावर ठेवलेल्या तिच्या सामानावर पडली. टेबलावरच्या पर्समधून त्याने तिचा आयडेंटी कार्ड काढला. सामानाला पाहून मलीसा पळून गेली नसल्याचे त्याला कळाले. तो धावत पहिल्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये आला. त्याने मुख्य प्रवेशद्वारावर लावलेल्या सि.सि.टि.व्ही. कॅमेऱ्याचा व्हिडीयो चालू केला आणि त्यात मलीसाला शोधण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने आयडेंटी कार्डशी मिळता जुळता चेहेरा शोधून काढला. मलीसा त्याला संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाताना आणि रात्री नऊच्या सुमारास हॉटेलमध्ये परत येताना दिसली. पण त्या नंतर ती बाहेर जाताना दिसलीच नाही. त्याने सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मलीसाबद्दल विचारले. परंतू मलीसाला हॉटेलमध्ये शोधणऱ्या कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही मलीसा न सापडल्याचे त्यांनी मॅनेजरला सांगितले. नाईलाजाने त्याने हॉटेलचा मालक रॉकीला फोन लावला.

“सर, एक मोठा प्रॉब्लेम झालाय.”

“आता पुन्हा काय झालं?”

“सर, एक विदेशी महिला आपल्या हॉटेलमधून गायब झालीये.”

“गायब झाली म्हणजे?”

“ती काल रात्रीपर्यंत तिच्या रुममध्येच होती. पण आता ती तिच्या रुममध्ये नाहीये. आम्ही आख्ख्या हॉटेलमध्ये शोधलं. तिचं सामान रुममध्येच आहे. पण ती कुठंच सापडत नाही.”

“सि.सि.टी.व्ही. कॅमेऱ्यांमध्ये पाहिलंत का?”

“पाहिलं... पण ती हॉटेलमधून बाहेर जाताना तर दिसत नाहीये आणि हॉटेलच्या आतही कुठंच सापडत नाहीये.”

“जास्त टाईमपास करू नका. ती बेपत्ता झाली आहे अशी तक्रार पोलीसांमध्ये करा.”

हॉटेलच्या मालकाच्या आदेशावरून मॅनेजरने पोलीसांना फोन लावला. काही वेळातच पोलीस हॉटेलवर पोहोचली. पोलीसाला मलीसाचा आयडेंटी कार्ड देत मॅनेजर म्हणाला.

“तिन दिवसांपुर्वी ही महिला आमच्या हॉटेलमध्ये आली होती. काल रात्री ९ वाजताच्या सुमारास तिला शेवटचं हॉटेलमध्ये येताना पाहिलं होतं. ती आज सकाळी आठ वाजता चेक आऊट करणार होती. पण ती आली नाही म्हणून मी तिला बोलवण्यासाठी म्हणून एका कर्मचाऱ्याला तिच्या रुममध्ये पाठवलं. रुमचा दरवाजा उघडा होता आणि ती आत नव्हती. तिचा सामान रुममध्येच आहे. आम्ही तिला संपुर्ण हॉटेलमध्ये शोधलं. पण ती सापडली नाही.”

“असं सुध्दा होऊ शकतं ना की याच हॉटेलच्या दुसऱ्या एखाद्या रुममध्ये ती गेली असेल किंवा लपली असेल?”

“आमचं हॉटेल जरी दिसायला मोठं असलं तरी यात सध्याला फक्त ३५ जणंच राहत आहेत. आम्ही प्रत्येकाला फोन करून या महिलेबद्दल विचारलं. पण कोणीही या महिलेला ओळखत नाही.”

त्या पोलीस अधीकाऱ्याने त्याच्या सहकाऱ्यांना हॉटेलमध्ये तिला शोधण्याचा इशारा केला. त्याचा इशारा मिळताच सर्वजण आपापल्या कामाला लागले. सोबत आलेले श्वानपथकही त्यांच्या मार्गाने शोध घेऊ लागले.

पोलीस अधीकाऱ्याने मॅनेजरकडं पाहत विचारले.

“तुमच्या हॉटेलमध्ये सि.सि.टी.व्ही. कोण कोणत्या भागात लावलेले आहेत?”

“मुख्य प्रवेश द्वारासमोर, पार्कींगमध्ये, गेटवरती, हॉटेलच्या मागच्या बाजुला आणि लिफ्टमध्ये.”

“अं... एक काम करा. मला गेल्या २४ तासाचे मुख्य प्रवेशव्दाराचे, पार्कींगमधले आणि हॉटेलच्या मागच्याबाजूचे सि.सि.टि.व्ही.चे व्हीडीयो दाखवा.”

त्या पोलीस अधीकाऱ्याला जे काही हवं होतं ते मॅनेजरने त्याला दिलं आणि त्या दिवशी मलीसाच्या शोधाला सुरुवात झाली.

मलीसाबद्दल थोडक्यात सांगतो. मलीसा ही २५ वर्षीय तरूणी, न्यु यॉर्कची रहवासी होती. तिला ५ वर्ष डिप्रेशन हा आजार होता. त्याचं कारण तिचं एकटं राहणं हे आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. उपचारानंतर ती पुर्णपणे स्वस्थ झाली. त्यानंतर तिने पद्वीचा अभ्यास पुर्ण केला. पद्वी मिळाल्यावर तिने जगातील काही देशात पर्यटनासाठी जाण्याचे ठरवले. त्याच कारणासाठी ती या शहरात आली होती. ती हॉटेल ब्लु डायमंडमध्ये चार दिवस राहणार होती. पण ब्लु डायमंड हॉटेलमधला तिचा शेवटचा दिवस तिच्या जिवनाचा शेवटचा दिवस ठरला.

ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली गेली. तिच्या सामानातून सापडलेल्या कागदपत्रांवरून तिच्या घराचा पत्ता काढण्यात आला आणि तिच्या घरच्यांना तिच्या बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली. तिच्या आईच्या म्हणन्यानुसार मलीसाचं आणि तिच्या आईचं आदल्या संध्याकाळीच फोनवर बोलणं झालं. त्यावेळी मलीसा तिच्या प्रवासाला घेऊन खुप खुश होती. तिच्या आईकडून मलीसाबद्दल आणखी एक गोष्ट कळाली की मलीसा टेब्स् शहरातल्याच एका मुलाच्या प्रेमात पडली होती. तो मुलगा म्हणजे अमन मेहेता.

अमनला पोलीसांनी पोलीसस्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवले.

“तुम्ही मलीसा नावाच्या मुलीला ओळखता का?”

पोलीस अधीकाऱ्याने अमनला विचारले.

“हो मी तिला ओळखतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि पुढच्या वर्षी आम्ही लग्न करणार आहोत... पण झालं तरी काय सर?”

“तुम्ही तिच्यावर प्रेम करता आणि तुम्हाला माहित नाही की मलीसा सोबत काय झालं ते?”

“का? काय झालं तिच्या सोबत? आम्ही तिन दिवसांआधी भेटलो होतो. तेव्हा तिने सांगितलं की ती दुसऱ्या दिवशी इजीप्तसाठी फ्लाईट घेणार आहे. ज्या दिवशी ती जाणार होती त्या दिवशी माझी एक महत्त्वाची मिटींग होती. त्यामुळे विमान तळापर्यंत मी तिला सोडायला जाऊ शकलो नाही. पण गेल्या दोन दिवसांपासून मी तिचा फोन ट्राय करतोय. पण फोन लागत नाहीये. सर काय झालं तिला?”

“ती दोन दिवसांआधी हॉटेल ब्लु डायमंड मधून बेपत्ता झाली आहे?”

“बेपत्ता? पण हे कसं होऊ शकतं... म्हणजे त्या दिवशी तर ती हॉटेलमधून सरळ विमानतळावर जाणार होती... ती कुठून बेपत्ता झालीये सर?”

“ती त्या हॉटेलमधून बाहेर गेलीच नाही. ती त्या हॉटेलमधूनच बेपत्ता झाली आहे. तुम्हाला जेव्हा भेटली होती, तेव्हा तिची स्थिती कशी होती, ती तुमच्याशी कशी बोलत होती किंवा काहीही जे विचित्र होतं असं काही तुमच्या नजरेस आलं का?”

“त्या दिवशी सर्वकाही सामान्य होतं. विचित्र वाटण्यासारखं काही झालंच नाही. मला तर वाटतंय हॉटेलमधल्याचं कर्मचाऱ्यांनी मलीसाचा अपहरण केला असणार.”

अमनलाच काय, पोलीसांनासुध्दा हॉटेलच्याच कर्मचाऱ्यांना संशय होता. हॉटेलमधल्या प्रत्येकाची कसुन चौकशी करण्यात आली. पण चौकशीत खास काही सापडलं नाही. पोलीस अधीकाऱ्याने ज्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं नाही त्या गोष्टींना पाहाण्याचे ठरवले. त्याने काही पोलीसांना हॉटेलचे प्रत्येक रुम तपासायला सांगितले, तर काहींना न पाहिलेले सि.सि.टि.व्ही. व्हीडीयो पाहायला सांगितले. चार दिवसांनंतर पोलीसांच्या हाती पहिला पुरावा लागला. पण जो पुरावा त्यांच्या हाती लागला, त्यावर त्यांचाच विश्वास बसत नव्हता.

लिफ्टचा सि.सि.टि.व्ही. व्हीडीयो पाहताना पोलीसांना मलीसा लिफ्टमध्ये दिसली. ज्या सकाळी ती बेपत्ता झाली होती. त्याच्या आदल्या रात्री ३ वाजता ती लिफ्टमधून हॉटेलच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जाताना ती दिसत होती. त्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टचे दार उघडले. मलीसा लिफ्टमधून बाहेर आली आणि त्या मजल्यावर डाव्या बाजूला जाताना सि.सि.टि.व्ही.च्या व्हीडीयोत दिसली. काही वेळाने ती पुन्हा धावत लिफ्टमध्ये आली आणि लिफ्टच्या कोपऱ्यात लपली आणि लिफ्टची बटनं जोर जोरात दाबु लागली. पण लिफ्टचं हालणं तर लांबच लिफ्टचे दारसुध्दा बंद झाले नाही. बराच वेळ तिथं कोणीच आलं नाही म्हणून मलीसा लिफ्टमधून बाहेर गेली. दोन मिनीटांनी लिफ्टचे दार बंद झाले आणि लिफ्ट पुन्हा पहिल्या मजल्यावर आली. त्यानंतर मलीसा कुठंच दिसली नाही.

त्या व्हीडीयोला पाहिल्यानंतर मलीसा हॉटेलच्या छतावर असल्याचा संशय पोलीसांना आला होता. पोलीस अधीकारी त्यांच्या सहकाऱ्यांसह हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी तो व्हिडीयो हॉटेलच्या मॅनेजर आणि मालकला. व्हीडीयो दाखवल्यानंतर पोलीस अधीकारी म्हणाले.

“आम्हाला खात्री आहे की ती महिला हॉटेलच्या टेरेसवर असणार. त्यामुळे तुम्हाला टेरेस उघडावा लागेल.”

ते ऐकून हॉटेल मालकाने मॅनेजरला विचारले.

“हे काय आहे? मी तुम्हाला टेरेसवर सुरक्षेसाठी सिस्टीम लावायला सांगितली होती. तुम्ही काही केलं का नाही?”

“सर, टेरेसचा दरवाजा नेहेमी लॉक असतो. त्या दाराच्या दोनच चाव्या आहेत. एक माझ्याजवळ असते आणि दुसरी तुमच्याजवळ. मी तिन दिवसांसाठी रजेवर होतो. त्यामुळे त्या दिवशी तो दरवाजा उघडणं कोणालाही शक्य होणार नव्हतं. आणि जरी समजा उघडलं तरी टेरेसच्या दाराला अलार्म सिस्टीम आहे. दार उघडल्याबरोबर हॉटेलच्या दोन मजल्यांवर अलार्म वाजतो. तो बंद करण्यासाठी जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा पासवर्ड फक्त आणि फक्त मलाच माहित आहे. त्यामुळे ती जरी त्या मजल्यावर गेली असेल. तरी सुध्दा तिचं टेरेसवर जाणं शक्यच नाही.”

“काय शक्य आहे आणि काय शक्य नाही हे तर लवकरच कळेल. तुम्ही टेरेस उघडून आम्हाला तपासणी करू द्या.”

पोलीस अधीकारी मॅनेजरला म्हणाला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मॅनेजरने त्यांना टेरेसचा दरवाजा उघडून दिला. श्वानपथकासोबत तपासणीला सुरुवात झाली. तपासणीनंतर पोलीसांच्या हाती काहीही लागलं नाही.

“मी सांगत होतो ना तुम्हाला. तिचं टेरेसवर येणं अशक्य आहे.”

मॅनेजर पोलीसांना म्हणाला.

“पण टेरेससाठी एवढी सिक्युरीटी का?”

“गेल्या दहा वर्षात या हॉटेलमध्ये पाच जणांनी आत्महत्या केली आणि दोन जणांचा खुन झाला. जेवढ्यांनी आत्महत्या केली, त्यातल्या चार जणांनी टेरेसवरून उडी मारली होती आणि ज्यां दोन जणांचा खुन झाला, त्यांचा खुन टेरेसवरतीच झाला होता. म्हणून आमच्या सरांनी टेरेवर सिक्युरीटी वाढवायला सांगितली होती.”

“असं होतं तर टेरेसचा दरवाजा कायमचा बंद का नाही केला?”

“टेरेसवर पिण्याच्या पाणीचे चार टँक आहेत. टँकमध्ये पाणी भरण्यासाठी आणि टँकला साफ करण्यासाठी आम्हाला टेरेसवर जावं लागतं. त्यामुळं आम्ही दार कायमचा बंद करू शकत नाही.”

सगळ्या चौकशी नंतर केस पुन्हा त्याच प्रश्नांवर येऊन थांबला जिथं तो आधी होता. विदेशी महिला बेपत्ता झाल्याने तो केस अंतराष्ट्रीय स्थरावर गेला. प्रसारमाध्यमांपर्यंत लिफ्टचा व्हीडीयो पोहोचताच त्यांनी त्या व्हीडीयोला जगभरात पसरवले. संपुर्ण जगभरातून प्रतिक्रीया येऊ लागल्या. त्यामुळे तपासणी करणाऱ्या अधीकाऱ्यांवर दबाव वाढू लागला. पुराव्यांच्या आभावी पोलीस काहीच करू शकत नव्हते. मलीसाचा कुटूंब, तिचे मित्र मैत्रिणी, प्रसारमाध्यमं आणि तिला ओळखणारे, सर्वजण एकच प्रश्न विचारत होते. “मलीसा नेमकी गेली कुठं?”

शेवटी तिन आठवड्यांनी मलीसा सापडली.

(क्रमशः)