To bhetlaa books and stories free download online pdf in Marathi

तो भेटला

विचार करत होते फिरायला जाण्याचा आणि डोक्यात भलतेच येत होते.आज काहीच करावेसे वाटत नव्हते.मन थाऱ्यावर नव्हते.सारखे अस्वस्थ वाटत होते.काय करू सुचत नव्हते.सहजच पायाचा ओला ठसा बघितला आणि ठरवलं जुहू ला गाठण्याच.सगळं कसं अनप्लांड आणि आपसूक घडत होते.वेळ काट्याप्रमाणे थांबायचं नाव घेत नव्हता.घोड्यावर बेभान झाल्यासारखा तो त्याच्या वेगाने निसटत चालला होता.आणि मी इथे माझ्या तयारीला लागले.

तयार होण्यात माझ्या इतका चपळ हातखंडा कोणाचा नसेल बहुधा.तयार होऊन लागले वाट्याला.अंतर कसं कापलं गेलं कळलंच नाही विचारांच्या नशेत मी इतकी धुंद झालेली.समुद्राचा खारा वारा जणू मला खुणावत होता त्याच्याकडे.

एकदाचे पोहोचले तिथे.पोहोचल्यावर इतकं शांत वाटलं.मनाची खोली मोजायची असेल तर आपण जवळीक साधावी खऱ्याखुऱ्या फेसाळ आणि अतिगर्द अश्या विशाल महाकाय समुद्राची.अस्थिर मनाला बांध घालून एखाद्या अलगद पिसासारखे तुमचे मन भासायला लागते.मग कोणाचीच गरज उरत नाही.विचारांना दिलासा मिळतो.मनातले सर्व भाव गळून पडतात.एका अगाध अश्या महामेरू पर्वताप्रमाणे आपण निश्चल आहोत असे वाटायला लागते.

फिरता फिरता माझी नजर गेली एका गोष्टीकडे.एक मुलगा आपल्या हातांवर जिम्नॅस्टिक्स ची प्रॅक्टिस करत होता.चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण त्याचं कसब मनाला इतकं भावलं की नजर हटता हटत नव्हती.त्याच्या चेहऱ्याकडे बघण्याची उत्सुकता वाढली.तिथे एक छोटी मुलगी बसलेली,तर तिला चिडवण्याच्या बहाण्याने मी तिथे गेली.आणि मला जे हवं ते मिळालं.त्याच्या डोळ्यातलं तेज मनात घुमत राहिलं.मी ‘त्याच्या’ प्रेमातच पडले जणू.असं वाटत होतं की प्रॅक्टिस करताना त्याचा तोल जावा आणि ‘त्याचा’ हाताचा स्पर्श मला व्हावा आणि चूक झाली म्हणून ‘त्याने’ सॉरी म्हणावे.म्हणजे त्याच्या डोळ्यांसोबतच त्याचा आवाज सुद्धा ऐकायला मिळाला असता.(हे वय असं काहीसं असतं की मोहात पडणं ही काळ्या दगडावरची रेघ असते.आणि अजून त्यात भर म्हणजे कोणाकडे आकर्षिले जाणे.नाजूक फुलपाखरू जसे त्याच्या कोशातून बाहेर येते आणि मनाला लोभसवाणी) भुरळ घालते त्याचप्रकारे हे चंचल मन वाऱ्यासारखे सैरभैर गाजावाजा करत एका साच्यातून दुसऱ्या साच्यात आपला मोर्चा वळवते.आणि बाहेर फुलणाऱ्या मनाच्या कवडश्यातून बाहेर पडतो आणि मोहरून टाकणाऱ्या साज-शृंगाराने नटलेल्या यौवनाकडे आकर्षिले जातो.)

आज काहीसं वेगळंच वाटत होतं.आरशात निरखून पाहत असताना जाणवलं की दुसरा दिवस असूनही मी कालच्या गुंगीत होते.आजूबाजूचा सुगावा नसल्यासारखे मी समुद्राच्या ‘त्या’ ठिकाणी ओढले गेले जिथे ‘तो’ मला भेटला होता.आज मन काहीसं अस्वस्थ आणि बेचैन होते.(खरी भीती ही वाटत होती की आजही ‘तो’ इथे असेल की नाही?आणि असलाच तर तो माझा विचार करत असेल का?मुळात माझा विचार करायला त्याने थोडीच मला पहिले आहे किंवा आमची काही ‘ओळख’ आहे..हे असे अनेक विचार भंडावून सोडत होते.)

नजर शोधता शोधता स्तब्ध झाली.कारण तो तिथेच होता.मी तिथे पोहोचले तर कालची ती छोटी मुलगी त्याच्या समोर बसलेली.मी तिला आजही भेटण्याच्या बहाण्याने तिच्या बाजूला जावून बसले.तिने हसून प्रतिसाद दिला.मी जवळ येताक्षणीच त्याचा तोल गेला आणि तो मला सॉरी देखील म्हणाला.(अगदी मी काल विचार करत होते त्याप्रमाणेच सर्व घडत होतं.फ़क़्त फरक इतकाच की तो मला न आदळता छोट्या मुलीच्या दिशेने खाली पडला त्यामुळे वाळूचे कण तिच्यावर उडाले.पण मी आपले स्वप्न सत्यात उतरल्याच्या नादात चेहऱ्यावर हसू पुसत होते.जणूकाही हे माझ्याच बाबतीत घडतंय याची पुष्टी करत असतानाच मला भास होतोय की अजून मी साखरझोपेत आहे हे ठरवायची संधीसुद्धा माझ्याकडे नसल्यासारखा अतृप्त आवाज मनाच्या गाभाऱ्यातून आला.)त्या मुलीच्या आवाजाने मी भानावर आले.ती त्या मुलाला भैय्या म्हणून पुकारत होती.त्या आवाजातला केविलवाणा भाव त्याच्या सुरेख हास्याने अजूनच खुलला होता.माझ्याकडे असणारे चॉकलेट तिला देऊ करणार तितक्यात ती उठली आणि मला येऊन बिलगली.मला कळेना काय करावे.(सर्वसाधारणपणे अश्या परिस्थितीत लहान मुलांना आपण उचलून घेतो अथवा त्यांना गोंजारतो.पण मी काहीश्या गुंगीत असल्याने मला भाम्बावल्यासारखे झाले.)मी तिच्याकडे बघतच राहिले.काही सेकंदात भानावर आल्यावर तिच्या आसवांनी माझे डोळे पाणावले.समोरचे दृश्य बघितले आणि माझा तोल जाताजाता वाचला.

तिसरा दिवस असूनही मला आज खूप अस्वस्थ वाटत होते.बेचैन मनाने पुन्हा मी समुद्रावर पोहोचले.’त्याच’ ठिकाणी ‘त्याच’ जागी आणि ‘त्याच’ वेळेवर.(दोन दिवसात बेधुंदपणे वावरत असताना वेळेचं गणित पक्क डोक्यात बसलं होतं.जागेची इतकी सवय झाली की तो कदाचित जागा हलवेल किंचितशी पण मी ठरल्या ठिकाणीच येणार.)माझ्या बॅगेतून ते चॉकलेट काढले.त्या मुलीच्या हातात थांबवले.त्या मुलाजवळ गेले आणि त्याचा ‘पाय’ लावून देण्यात मदत करत होते तोच त्याने पुढाकाराने स्वतःच अर्धेअधिक काम केले.त्याचं डोळ्यातलं तेज मला इतकं भावलं होतं की कधी एकदा त्याला मी माझ्या मनातील गोष्ट सांगतेय असं झालं.

बाजूनेच एक छोटं पोर आणि त्याबरोबर एक छोटी मुलगी गुलाबाची फुलं विकत होते.गुलाबांचा गुच्छ ताजा दिसत नसला तरी त्या मुलांचा तजेलदारपणा त्या फुलांमध्ये उतरला असं मला जाणवत होतं.निरागस डोळ्यांनी त्यांनी माझ्याकडे पहिले.ती छोटी मुलगी आपल्या हातातली अर्धवट केसांची ,गुलाबी झबले घातलेली बाहुली घेऊन धापा टाकत टाकत त्याच्या पाठीमागे येत होती. मी विचार केला की पोर बिचारं थकलं असेल.घोटभर पाणी देऊया याला तर बॅगेतून बाटली काढते न काढते हा पठ्ठ्या ‘त्याच्या’ मांडीत बसून छोट्या मुलीसोबत चॉकलेट खात होता.(मनाला सुखद धक्का आणि आनंद दोन्ही मिळाले.ते दृश्य कॅमेरात कैद करण्याचा मोह झाला परंतु तो विचार झटकून टाकला.अस्तित्वातील क्षण कितीही साठवण्याचे प्रयत्न केले तरीही त्याला त्या वेळेची सर चुकूनसुद्धा मिळणार नाही.मनात थोडे आश्वस्त भाव निर्माण झाले.कधीकधी उगाचच आपण एखाद्या गोष्टीचं दडपण घेतो आणि मनावर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण करतो.)

त्यासरशी मनात पक्का विचार केला की आजपासून मनावर आलेली ओली मरगळ दूर झटकून यांच्यासाठी जे काही शक्य असेल ते करायचे.अस्वस्थ मन उलथून पुन्हा नवी नवलाई घेऊन जोमात काम सुरु करायचे आणि अनायासे गुलाबी वातावरण आहेच तर गुलाबंसकट त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी द्यायची.विचारचक्र सुरु असताना त्या पठ्ठ्याने मला गुलाब घेणार का म्हणून प्रश्न केला आणि मी हसत त्याच्याकडची सर्व गुलाबाची फुले घेऊन २०० रुपयाची नोट हातात ठेवली.तर त्याने मला समजावले की या लहानग्याला २०० रुपये कुठे कळणार?त्यापेक्षा त्याच्या राहण्याची किंवा खाण्याची सोय होत असेल तर उत्तम.असे म्हणताक्षणी मला काहीतरी आठवले,

चौथ्या दिवशी थोडे वेळेच्या आधीच गेले अगदी स्वस्थ मनाने.त्याच्यासमोर आयुष्याची दोरी बांधण्याचा निर्धार पक्का केला आणि त्याला म्हणाले की आजपासून आपण त्याचे पालक होऊयात.त्याच्यासारख्या इतर मुलान्साठीसुद्धा आपल्याला जे काही करता येईल आणि त्यांचे आयुष्य पुढे नेता येईल हा प्रयत्न आपण नेहमी करायला हवा.त्यांच्या डोळ्यातील स्वप्नांना पंख देण्याचे बळ आपण निर्माण करू असे मी मला आणि त्याला वचन दिले.(ज्याप्रकारे पहिल्या दिवशी त्याला पहायची जी ओढ लागून राहिलेली तशीच काहीशी आज आणि;म्हणजे आता वाटत होती,त्याच्या मिठीत शांत डोकं ठेवून मनमुराद रडावं की समुद्राच्या वाळूवर जोरदार उड्या मारत आनंदाने नाचावं काहीच सुचत नव्हतं.मन काहीसं चलबिचल आणि टवटवीत जाणवत होतं.मानसिक समाधान आणि जग जिंकल्याच्या अविर्भावात मी जणू वागत होते.मी काय बोलत आहे,मुद्देसूद बोलत आहे की फ़क़्त बडबड करायची म्हणून बोलत आहे हे भौतिकरीत्या मला समजत नसले तरीही मेंदू जश्या सूचना देईल त्याप्रमाणे माझी जिभेची हालचाल होत होती.शरीर आणि मन हे वेगळे भाग आहेत असे जर कोणी मला त्यावेळी समजावले असते तर मी त्याला खुळा ठरवून मोकळी झाले असते.म्हणजे माझे मन माझ्या ताब्यात असूनही माझ्या ताब्यात नव्हते.) त्याच्या डोळ्यातलं त्यादिवशीचं तेज हे स्तुतीपलीकडचचं होतं.मला जे हवं होतं सर्व मिळालं.अस्वस्थ मनाने घरी परतण्याचा विचार तिथेच विलीन झाला.त्यादिवशी ‘तो’ मला भेटला.

© काजोल मधुकर नम्रता