Saubhagyavati - 32 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 32

३२) सौभाग्य व ती !
सकाळचे आठ वाजत होते. आभाळात ढगांनी गर्दी केली असली तरी पावसाची लक्षणे मात्र दिसत नव्हती. दोन-तीन दिवसांपूर्वी अचानक पाऊस सुरू झाला आणि काही तासातच तो थांबला असला तरी तेव्हापासून ढग मात्र मुक्काम ठोकून होते. मधूनमधून काही क्षणांसाठी सूर्यदर्शनही होत होते.
अनेक चांगल्या गोष्टींची नोंद त्या दिवशी नयनच्या आयुष्यात होणार होती. तिच्या कष्टाचे चांगले फळ तिला त्यादिवशी मिळणार होते. आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तिचा सत्कार तर होणार होता परंतु तो तिच्या दृष्टीने गौण होता. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यादिवशी माधवीच्या लग्नाची बोलणी होती. तसे लग्न ठरल्यातच जमा होते. शाळेला ग्रँट मान्य झाल्यानंतर त्यापोटी नयनला मिळालेली थकबाकी, अनेक वर्षे महिन्याच्या पगारातून तिने टाकलेली शिल्लक अशी मिळून एक लाखापेक्षा अधिक रक्कम तिच्याजवळ होती. शिवाय काम पडलेच तर पतसंस्थेचे कर्जही उचलण्याची तिने तयारी करून ठेवली होती. कुणाकडे हात पसरायची तिला गरज भासणार नव्हती. ही एक फार मोठी गोष्ट तिच्यासाठी समाधानकारक होतीः
आदर्श शिक्षिकेचा राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल नयनचा आणि आमदार म्हणून निवडून आल्याबाबत खांडरे साहेबांचा सत्कार असा एक कार्यक्रम त्याच दिवशी नगरपालिकेने आयोजित केला होता. पाहता-पाहता नयनच्या नोकरीला आणि त्या संस्थेला दीड तप होत होते. सासर सोडलं तेव्हा माधवी पोटात होती. ती एक वर्षाची असताना नयनला नोकरी मिळाली होती. कशी होती ती परिस्थिती? तीन- चार दिवस फिरल्यानंतर कुठे पहिला विद्यार्थी मिळाला होता. नंतर हळूहळू संख्या वाढत गेली. शिक्षक येत-जात राहिले. पण नयनसोबत एकटे गायतोंडे टिकून होते. नयन आणि त्यांनी पगारवाढीची कधी अपेक्षा केली नाही. अध्यक्ष खांडरे जी पगार देत गेले त्यात दोघेही समाधान मानत गेले. त्या निष्ठेचे, प्रामाणिकपणाचे, कष्टाचे फळ दोघांनाही शाळेला अनुदान आणि त्यानंतर पगारवाढीच्या रुपाने मिळाले होते.
बाहेर ऑटो थांबल्याचा आवाज आला. नयन दारात आली. ऑटोतून बाळू, मीना व त्यांचा मुलगा उतरत होते. बाळूचे केस कुठे-कुठे पांढरे दिसत होते. बाळू आणि नयन एकाच वयाचे परंतु नयनचे बरेच केस पांढरे झालं होते.
"या. आत या." तिघांना आत घेत नयन म्हणाली.
"हे काय? आज कार्यक्रम आणि घरात एवढी शांतता? कुणी दिसत नाही..."
"बाळू, अरे, आजचा कार्यक्रम माझ्या मुलीचा आहे. आठ दिवस अगोदर सांगूनही भाऊ आईला घेऊन पंढरपूरला गेले आहेत तर माधव रात्रीची ड्युटी घेऊन सोलापूरला गेलाय. मीराबाई उठतील आता. माधवी स्नानाला गेली आहे. मीना, बसा. मी चहा टाकते. आलेच." असे म्हणत नयन स्वयंपाक घरात गेली. बैठकीतला आवाज ऐकून मीरा आतून म्हणाली,
"बाळू, मीना बसा. मी आलेच हं..."
चहा घेवून आलेल्या नयनकडे मीना एक पुडी देत म्हणाली, "हा घे पेढा. वर्तमानपत्रातील तुझा फोटो पाहून विठाला वाटलेत आणि आम्ही इकडे येणार म्हणून सांभाळून ठेवले आणि काल आठवणीने आणून दिले..."
"अग बाई.... माझी विठाबाई.. तिने पेढे दिले..." असे आनंदाने किंचाळत नयनने ती पुडी घेतली. दोघे चहा घेत असताना सुस्नान माधवीने तिथे येऊन दोघांनाही नमस्कार केला.
"माधो, अग किती उशीर? साडेनऊ होताहेत. येतील ती माणसे एवढ्यात."
"कितीचा वेळ दिलाय पाहुण्यांना?" बाळूने विचारले.
"साडे नऊ-दहापर्यंत येतो म्हणाले गायतोंडेभाऊ." नयन म्हणाली.
"हे गायतोंडे म्हणजे तुझ्या शाळेतले शिक्षकच ना?"
"हो तेच! सख्ख्या भावापेक्षा जास्त आधार आहे त्यांचा. त्यांनीच पुढाकार घेऊन हा योग घडवून आणलाय. मुलगा चांगल्या कपनीत नोकरीला आहे. सुस्वरूप असून सुस्वभावीही आहे. नाव ठेवायला कुठेही जागा नाही."नयनने भावी जावयाचे कौतुक केले. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर आगळेवेगळे तेज आणि समाधान पसरले होते.
"बर झालं बाई... चांगलं झालं. अगोदरच आपली एक बाजू लंगडी आहे. घरबसल्या ठिकाण चालून आलं. किती भाग्याची आहे आपली माधवी. नयन कमावलंस ग. जिंकल सारं. तू भोगलेल्या अनंत कष्टाचं हे एकच फळ तुला मिळालं. पण ते खरोखरीच अत्यंत महत्त्वाचं आहे ग. अग आजकाल चपला झिजवूनही वर्षानुवर्षे असं ठिकाण मिळत नाही." मीना बोलत असताना सदाशिवने दिलेला चेक नयनजवळ देत बाळू म्हणाला, "नयन हे घे..."
काहीशा असमंजस अवस्थेत नयनने तो घेतला. त्यावर एक नजर टाकताना धनादेश देणाराचे नाव दिसताच ती रागाने थरथरू लागली. तिचे डोळे जणू आग ओकल्याप्रमाणे लालभडक झाले. काही क्षणापूर्वी चेहऱ्यावर असलेला आनंद दुसऱ्याच क्षणी मावळला. एक जळजळीत कटाक्ष बाळूकडे टाकत तिने त्या धनादेशाचे तुकडे-तुकडे केले आणि संतापून बाळूला म्हणाली,
"सासरी मी काढलेल्या रात्रींची किंमत पाठवली वाटते? त्याचे जाऊ दे. तो एक महामुर्ख, महा कपटी आहे. कदाचित त्याने केलेल्या असंख्य जखमांवर छिडकण्यासाठी या रकमेतून मीठ आणावे अशी त्याची इच्छा असावी पण बाळू तुला रे कस काहीच वाटलं नाही? तुला हा चेक घ्यावाच कसा वाटला?..."
"नयन, तू अगोदर शांत हो. तुझा राग मी समजू शकतो. तुला काय वाटलं मी सहजासहजी घेतला? अगं, परिस्थितीच अशी निर्माण झाली की..." असे म्हणत बाळूने त्यादिवशी घडलेला सारा वृत्तांत नयनला सांगितला. तो थांबताच बैठकीमध्ये शांतता पसरली. नयन, मीरा, मीना, माधवीसह बाळूच्याही डोळ्यात आसवांची दाटी होती. सर्वांनी आतल्या आत आसव टिपली. सकाळपासून आकाशात धावणाऱ्या ढगांना बाजूला सारून स्वच्छ ऊन पडलं होतं. कुणी काही बोलण्यापूर्वीच बाहेर एकामागोमाग एक काही ऑटो थांबल्याचा आवाज आला. नयन व बाळू ताबडतोब पुढे झाले. गायतोंडे परिवाराचे त्यांनी स्वागत केले. बैठकीत येऊन सारे स्थानापन्न झाले. परिचयाचे एक आवर्तन झाल्यानंतर सूत्रे हाती घेतल्याप्रमाणे बाळू म्हणाला,
"सांगा. गायतोंडेसर, आपला विचार सांगा."
"म्हणजे?" गायतोंडेंनी विचारले.
"सर, अहो मी पुढल्या व्यवहाराची बोलणी करावी असे म्हणतोय." बाळू म्हणाला.
"दादा, सांगा ना..." असे म्हणत गायतोंडेंनी भावाकडे पाहिलं.
"अरे, सांग. तू काय वेगळा आहेस?" दादा म्हणाले.
"बाळूकाका, नयनताई, आम्ही काहीही मागणार नाही. थांबा. हुंडा, सोने नाही म्हणजे दुसऱ्या स्वरूपातही काहीच मागणी नाही. तुमचा जो काही संकल्प असेल तो सांगा. आम्ही लगेच होकार देऊ..."गायतोंडे म्हणाले.
"भाऊ, आता मात्र तुम्ही तुमच्या बहिणीला धर्मसंकटात टाकले हं. तुम्ही काही तरी नाव ठेवले असते तर आम्हाला सोपे झाले असते."नयन म्हणाली.
"नाही. बिल्कुल नाही. तुमचा संतोष, समाधान हे आमचे सुख..." गायतोंडेंचे दादा म्हणाले.
"तसे असेल तर तुमच्या या उदार भावनांना नाव तरी का ठेवायचे? आम्ही काहीही सांगत नाहीत. आमच्या ऐपतीप्रमाणे आणि आमच्या इंजिनियर जावईबापूला शोभेल असा थाटमाट करू..." बाळू म्हणाला.
"बाळासाहेब, अगदी माझ्या तोंडातले शब्द हिरावलेत बघा तुम्ही. ठीक आहे. आम्हाला मुलगी, नारळ, खडीसाखर आणि दहीभात दिला तरी चालेल. बोलवा मुलीला..." मुलाचे वडील म्हणाले.
"बाळू, अरे, बाजारातून शाल, पेढा, हार..."
"थांबा, थांबा. अहो, आम्ही सारे घेऊनच आलो आहोत. लग्न ठरवायला आलो आहोत. बाजार करायला नव्हे तर बाजार करूनच आलो आहोत. पेढा, हार, शाली, दोन अंगठ्या..."
"अहो, पण..."
"ताई, एवढ्या साऱ्या चांगल्या गोष्टी घडत असताना हा पण कशाला? तुम्ही आणले काय आणि आम्ही आणले काय? एकच ना! कुणीही आणले तरी शेवटी येणार तर इकडेच ना?" मुलाचे वडील म्हणाले.
अतिशय साध्या, पवित्र आणि मंगलमय वातावरणात माधवी-इंद्रजीत दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. मीरा आणि मीनाने स्वयंपाक केला. उदबत्त्याच्या घमघमाटात नि हास्याच्या फटकेबाजीत जेवणे झाली. सारे निरोप घ्यायच्या मनःस्थितीत असताना इंद्रजीतची चुळबूळ बाळूने हेरली. त्याने माधवीला बाहेर बोलावले आणि म्हणाला,
"गायतोंडे सर, आपल्या सर्वांच्यावतीने मी इंद्रजीत-माधवीला त्यांचा एकमेकांशी दृढ परिचय व्हावा, या दृष्टीने फिरायला जाण्याची परवानगी देतो." दुसऱ्याच क्षणी टाळ्या वाजल्या आणि पडत्या फळाची आज्ञा घेवून निघालेल्या जोडप्यास गायतोंडे म्हणाले,
"अरे, पाच वाजता ताईंचा सत्कार आहे. लक्षात आहे ना?..."
"काका, तो दुग्धशर्करा योग आम्ही विसरू का?" इंद्रजीत म्हणाला आणि दोघे बाहेर पडले. डबडबलेल्या डोळ्यांनी नयन बघत राहिली...
००००