Old age love - 8 books and stories free download online pdf in Marathi

वृद्धाश्रमातलं प्रेम - 8

भाग – ८

सायंकाळ होत आली होती. प्रार्थनेची वेळ जवळ येत होती. महाजन काकांनी तसं सांगितलं. सर्वजण उठून मग हळूहळू मंदिराकडे जाऊ लागले. आज महाजन काकांचा दिवस होता. आज फक्त तेच बोलणार होते आणि बाकी सर्वजण ऐकणार होते. प्रार्थनेला अजून काही वेळ होता आणि कुणी आलं नव्हतं त्यामुळे जोशीकाकांनी अतिशय उत्कंठेने विचारलं, “मग पुढे काय झालं?”

महाजन काकांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, “जोशी, अरे दिवसभर लेक्चर देऊन दामलोय मी. कॉलेजमध्ये शिकवायला असतांनासुद्धा इतका बोललो नव्हतो कधी.” त्यांच्या ह्या वाक्यावर सर्व मंडळी खळखळून हसू लागली. त्यांना असं हसताना पाहून बर्वेकाकू जवळ आल्या आणि बर्वेकाकांना म्हणल्या, “काय चाललंय आज? आम्हाला कळू तरी द्या. दिवसभर महाजनांच्या खोलीत आहात तुम्ही.”

“तो चरित्र सांगतोय.” बर्वेकाकांच्या तोंडातून अचानकपणे बाहेर पडले.

“चरित्र म्हणजे, आत्मचरित्र वगैरे कसं लिहितात?” त्याबद्दल माहिती देतोय. जोशींनी वेळ मारून नेली.

बर्वेकाकू गेल्यावर जोशी चिडून म्हणाले, “बर्व्या, आता भांडेफोड झाली असती ना, तर तुला सोडलं नसतं बघ.”

प्रार्थना झाली, आज सुधाकाकू आल्या नव्हत्या. महाजन काकांचे डोळे त्यांनाच शोधत होते. त्या आल्या नाहीत असं बघून त्यांनी चेहर्‍यावर नाराजीचे भाव न आणू देता प्रार्थना म्हटली आणि पाटांगणाकडे जाऊ लागले, मंडळी सोबत होतीच. मग एका बाकावर बसून महाजन काकांनी उत्तरार्धाला सुरुवात केली,

नाशीब आमच्या सोबत होतं. यावेळी सुद्धा आम्ही एकाच वर्गात होतो. त्यामुळे आमच्या आनंदाला पारावार नव्हता. आता आम्ही एकमेकांना नावाने हाक मारायला लागलो होतो. त्यामुले अजून जवळीक वाढली होती. कॉलेजच्या पहिल्या दिवशीतर आम्ही लेक्चरला बसलोच नाही. दिवसभर गप्पा मारत बसलो. तिने पहिलाच प्रश्न केला, “अरुण, तू मला तुझा पत्ता का नाही दिलास?”

“अगं पत्ता दिला असता तर तू मला पत्रं पाठवली असतीस. मगं मला उत्तर पाठवावं लागलं असतं. माझ्या घरी जाऊ दे, कुणाला वाचता नाही येत. तुझ्या घरी कुणी बघितलं असतं तर तुझ्या बाबांनी आमच्या इथल्या पोलिस स्टेशनला फोन लाऊन मला बेड्या ठोकायला लावल्या असत्या. मग लग्नाच्या बेड्यांऐवजी दुसर्‍याच बेड्या पडल्या असत्या हातात.” मी सांगितलं.

या बोलण्यावर ती आधी हसली आणि मग थोडी गंभीर झाली, “खरंय, रे तुझं. मी या सार्‍या गोष्टींचा विचार केलाच नव्हता. यावर विचार करावा लागेल आणि तुला कसं सुचतं रे इतका दूरचा विचार करायला?”

“एकाच गोष्टीचा सतत विचार केला तर ती गोष्ट आपल्या मनात खोलवर जाते आणि त्या गोष्टीची विचार करण्याची सूत्रं मेंदुकडून हृदयाकडे जातात आणि प्रेमाच्या बाबतीत हृदयाचं नाही ऐकणार तर कुणाचं?” मी सविस्तर खुलासा केला.

माझ्या ह्या वाक्यावर ती माझ्याकडे स्तिमित होऊन बघू लागली आणि म्हणाली, “तुला असं बोलायला कसं सुचतं रे?”

“ही एक ईश्वरदत्त देणगी आहे, कुणालाही नाही मिळत. तुझं नशीब चांगलं की तुला आयुष्यभर अशीच वाक्यं ऐकावी लागणार आहेत.” माझ्या ह्या वाक्यावर मात्र तिने माझ्या दंडाला जोरात चिमटा काढला.

मग परत ते सोनेरी दिवस सुरू झाले. तीन वर्ष कशी गेली ते कळलंसुद्धा नाही. या तीन वर्षांत आणि मागील तीन वर्षांत आमच्यात कधी भांडण झाल्याचं मला आठवत नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो पण इतरांसारख्या भल्यामोठ्या अपेक्षा नव्हत्या. आम्ही कधीच कॉलेजच्या बाहेर भेटलो नाही. कधी सिनेमाला गेलो नाही. फक्त आमचं एकमेकांसोबत असणं हे आमच्यासाठी खूप होतं. तिने फूल मळावं आणि मी त्याची स्तुती करावी. कधी फूल नसलंच तर त्याचं नेहमीचं कारण मी ऐकावं. कधीकधी तर मीच तिच्या ढंगात कारण सांगताना तीला हसताना बघण्याचा एक वेगळाच आनंद होता. आम्ही दोघांनी खूप स्वप्न पहिली होती. स्वप्न खूप होती पण लहानशी होती. हां, एक स्वप्न मोठं होतं, आम्हाला दोघांना प्राध्यापक व्हायचं होतं. त्या दृष्टीने तयारी सुरू होती.

शेवटचा पेपर होता. त्या सायंकाळी मला तिच्या घरी जायचं होतं. तिने घरी काही सांगितलं नव्हतं. पण घरच्यांना अट घातली होती, जर प्राध्यापक झाले तर माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न करून द्यावं. घरच्यांनी थोडेफार आढेवेढे घेतले होते, पण नंतर ते तयार झाले. त्यामुळे आम्ही दोघं आनंदात होतो. पेपर झाला. तिला भेटायाला म्हणून गेलो तर ती माझ्यापेक्षा जास्त घाईत होती. मला म्हणली, “आज एक राजकुमार येणार आहे आमच्याकडे. माझा हात मागणार आहे तो. त्याच्यासाठी मस्तपैकी स्वैपाक करायचा आहे.”

मी गालातल्या गालात हसत म्हणालो, “अच्छा, म्हणून घाई आहे का? पण मला बोलायचं आहे तुझ्याशी. थोडं थांब ना.”

“नाही, खरंच घाई आहे. आता चार वाजलेत. तू सात वाजेपर्यंत येणार मग कसं होईल?” ती पुढे जात होती आणि मी तिला थांबवत होतो.

“बरं एकदा मागे वळून तरी बघ.” मी आर्जव केली.

तिने मागे वळून बघितलं. त्या एका मिनिटांत मला मागची सहा वर्ष आठवली. कितीतरी बदललो होतो मी सहा वर्षात, सुधासाठी. मुलींशी न बोलणारा मी, आता सुधाशिवाय राहवत नव्हतं. तिच्याकडे बघतंच राहावं असं वाटत होतं. आम्ही सोबत गेटच्या बाहेर आलो. ती तिच्या वाटेला वळली आणी मागे वळून माझ्याकडे बघत हात हलवला. मीसुद्धा तिला बाय करून खोलीकडे निघालो. का? काय माहीत? पण त्या दिवशी तिच्याकडे बघतंच राहावंस वाटत होतं.

तिच्या घरचा पत्ता तिने एका कागदावर लिहून दिला होता. तिथे ते भाड्याच्या खोलीत रहायचे. शनिपारला वळसा घालून मग कुठेतरी बोळीत तिचं घर होतं. रस्त्यात मी एक पुष्पगुच्छ घेतला. सुमारे पावणे सातच्या सुमारास पोहोचलो. तिथं माला बरीच गर्दी दिसली. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काहीतरी अघटित घडलं होतं. मी एकला विचारलं तर त्याने सांगितलं की इन्स्पेक्टर साठे हे जेलमधून पळून जाणार्‍या कैद्याला अडवताना कैद्याने केलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झाले आणि आता काही वेळापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यांपुढे अंधारी यायला लागली. पेपर संपल्यावर आनंदात असणारी सुधा आता कशी असेल? या विचाराने मला दररून घाम फुटला. तिला बघण्याचीसुद्धा हिंमत होत नव्हती. मी आणलेला पुष्पगुच्छ साठेंच्या प्रेतावर अर्पण केला. त्यांना भेट म्हणून आणलेली वस्तु त्यांना अशा प्रकारे द्यावी लागेल असा विचार मी स्वप्नातसुद्धा केला नव्हता. मी दुरून पहिलं सुधा आणि तिची आई धाय मोकलून रडत होत्या. होत्याचं नव्हतं झालं होतं.

मी तिथून निघालो आणि थेट खोलीवर आलो. दोन दिवस जेवण केलं नाही. घरून पत्रं येत होती, “परीक्षा झाली, केव्हा येणार आहेस?” मी काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेत होतो. घटना घडल्याच्या दहाव्या दिवशी मी तिचं सांत्वन करायला तिच्या घराची वाट धरली. कोण काय म्हणेल याचा विचार केला नव्हता. कारण या वेळी माझी सर्वात जास्त गरज तिला होती. तिच्या घरी पोहोचलो तर तिथं कुलूप होते. शेजारी विचारलं तर समजलं, सुधा आणि तिची आई आजोळी राहायला गेलेत कायमचे. मी मटकन खाली बसलो. काय करावं ते सुचत नव्हतं. मी शनिपारला आलो. तिथल्या मंदीरासमोर बराच वेळ नसून राहिलो. माझ्या डोळ्यासमोर शेवट्याच्या दिवशी पाहिलेली सुधा येत होती. आनंदात असणारी आणि रडणारी. तिचं आजोळ माला माहिती नव्हतं. मी दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो. तिथून माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच हातात आलं नाही. तिच्या मैत्रिणींशी संपर्क केला. त्यांनाही काहीच माहिती नव्हतं. जवळपास महिनाभर मी सुधाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण काही यश आलं नाही. शेवटी घरी परतलो. झालेलं सर्व विसरायला जवळपास सहा महीने लागले. त्यासाठी नदी आणि शेताचा सहारा घेतला. तिथंसुद्धा तिची आठवण यायचीच. मग हळूहळू पूर्वपदावर आलो. प्राध्यापक पदासाठी भरपूर कॉलेजमध्ये अर्ज केले. शेवटी प्राध्यापक झालो. नंतर प्रत्येक वेळी सुधाची शक्य तेवढी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण नाही सापडली ती. तिचा रुमाल आणि तिच्या घरचा पत्ता असलेला कागद एवढंच शिल्लक होतं माझ्याजवळ आणि अजूनसुद्धा आहे. असं म्हणत त्यांनी त्यांच्या पाकीटातून तो कागद काढून सगळ्यांना दाखवला. तो बघताना सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू सुरू झाले होते.

†††