Sumantanchya Vaadyaat - 9 - Last Part books and stories free download online pdf in Marathi

सुमंतांच्या वाड्यात - भाग ९ (अंतिम)

सुमंतांच्या वाड्यात (अंतिम)

पात्र परिचय

दिनेश सुमंत                               मोठा भाऊ .

विशाल सुमंत                 धाकटा भाऊ.

शलाका                      दिनेशची  बायको.

विदिशा                      विशालची बायको.

आश्विन आणि विशाखा          दिनेशची मुलं

प्रिया                       विशालची मुलगी

केशवराव                    शेजारी.

प्रदीप                       केशवरावांचा मुलगा.  

गोविंदराव                    विदिशाचे वडील. (वकील)

प्रभावतीबाई                  विदिशाची आई.

राधास्वामी                   मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस.

निशांत                      शोधकर्ता (डिटेक्टिव)

भाग  ९  (अंतिम)  

भाग ८  वरुन  पुढे  वाचा .......

“काय रे चोरी करायला आला होता का तुम्ही? आणि घरात कसे शिरला?” – दिनेश.

काहीही उत्तर नाही. दोघंही काहीच बोलेनात मग दिनेशने चिडून त्याच्या कानफाटात मारली. “अरे बोलतोस का देऊ ठेऊन अजून एक ?” – दिनेश.

तरीही उत्तर नाही. दिनेशने निशांतकडे पाहिलं आता काय करायचं असा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.

“तू थांब. मला सवय आहे, अश्या लोकांशी गप्पा मारण्याची. तू एक काम कर किचन मधून अर्धा चमचा तिखट घे, आणि अर्धा चमचा पाणी घाल आणि घेऊन ये. यांचे डोळे खराब झाले आहेत, अंजन घातल्यावर ठीक होईल.” – निशांत.

दिनेश मागे वळला पण त्याच्या अगोदरच शलाका स्वयंपाकघरात जाऊन अंजन घेऊन आली होती. ते पाहिल्यावर मात्र सीन बदलला. ताबडतोब एक जण बोलला. सांगतो, पण ते डोळ्यात घालू नका.

“हूं, सांग. जे जे आम्ही विचारू, त्यांची उत्तरं दे, हे अंजन तर पहिली पायरी आहे, अश्या बऱ्याच गोष्टी आम्हा पोलिसांना माहीत असतात.” – निशांत.

“तुम्ही पोलिस आहात?” – चोर.

“ते सोड, तुम्ही घरात आलात कसे? ते सांग.” – निशांत.

“आम्ही त्या चोर वाटेने आलो.” चोर म्हणाला आणि त्याने वाघाच्या चित्राकडे बोट दाखवले.

“कसा आलास, दाखव.” – दिनेश.

“माझे हात बांधले आहेत, कसा दाखवू?” – चोर.

“तू सांग, आम्ही त्या प्रमाणे करतो.” – निशांत.

“त्या वाघांचे दोन मोठे सुळे दिसताहेत, एका हाताने त्यांना दाबा, आणि दुसऱ्या हाताने शेपटीवर दाब द्या.” – चोर.

लगेच दिनेशने तसं केलं आणि चित्राचा अर्धा भाग आत मधे उघडला. आत अगदी अंधुक प्रकाश होता. त्या प्रकाशात पायऱ्या दिसत होत्या. निशांत आणि विशाल बघत होते. दिनेश म्हणाला “चला आपण जावूया जिना उतरून. बघू काय आहे ते.”

पण शलाकाने साफ शब्दांत नकार दिला. म्हणाली, “कोणीही खाली जाणार नाही. तिथे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना नाहीये, दिनेश, तू आधी पोलिसांना फोन कर. ते आल्यावर, मगच त्यांच्या बरोबर खाली जा.”

निशांतनी पण शलाकाचं बरोबर आहे असं म्हंटल्याने दिनेशचा नाईलाज झाला. त्याने मुकाट्‍याने पोलिसांना फोन लावला. अर्ध्या तासाने पोलिस आले. दिनेशच्या सुदैवाने, ज्या सब इंस्पेक्टर कडे दिनेशने तक्रार नोंदवली होती, त्याचीच शिफ्ट बदलून तो नाइट ड्यूटीला आला होता. त्यामुळे दिनेशला तक्रारीचा इतिहास सांगण्याची जरूर पडली नाही. मग दिनेशने निशांतची ओळख करून दिली आणि निशांतनी घेतलेले कष्ट, त्याचा अंदाज आणि शेवटी दिवसभर बाहेर राहून रात्री उशिरा येऊन हॉल मधे झोपण्याची युक्ति असा सर्व गोषवारा त्याने PSI साहेबांना सांगीतला. वाघाच्या चित्रा मधे एक कळ आहे, आणि ती दाबली की एक चोरदरवाजा कसा उघडतो ते ही दाखवलं.

“इंगळे,” PSI साहेब म्हणाले, “आधी यांच्या पिशवी मधे काय आहे ते बघा.”

पिशवी उघडली, त्यातून तीन चार लहान मुलांच्या कवट्या, उदबत्त्या, सुया टोचलेली आणि कुंकू शिंपडलेली लिंब असा सगळा मसाला निघाला. बरोबर दोन सिगरेट चे लायटर आणि अर्धा लिटर पेट्रोल चा कॅन पण होता. आता इंस्पेक्टर साहेबांना सगळा उलगडा झाला. एका चोराची मानगुटी पकडून त्याला उभं केलं आणि म्हणाले, “काय करणार होते इथे?”

तो काही बोलला नाही, त्या बरोबर इंगळे शिपायाने त्याच्या नडगी वर सप्पकन काठी मारली. पोलीसांचाच वार तो! चोर जिवाच्या आकांताने ओरडला, आणि मग मात्र ताबडतोब पोपटपंची सुरू झाली.

“हॉल मधे आणि किचन मधे कवट्या आणि लिंब ठेवायची, आणि पेट्रोल टाकून पडद्यांना आग लावायची, आणि इथून निघून जायचं, एवढंच सांगीतलं होतं साहेब, आणि आम्ही तेच करून निघून जाणार होतो. हॉल मधे कोणीच नसेल असं सांगितल्यामुळे आम्ही आज आलो होतो.” – चोर.

“या जिन्याने खाली गेल्यावर कुठून बाहेर निघता तुम्ही?” PSI

“साहेब, दुसऱ्या टोकाला असंच घर आहे. तिथे पण असाच चोर दरवाजा आहे, तिथूनच आलो आम्ही.” – चोर.

“कुठे आहे ते घर ? – PSI

“मागच्या गल्लीत.” – चोर. चोराने असं म्हंटल्यांवर निशांत आणि दिनेश आणि विशालने एकमेकांकडे पाहीले, पण या वेळेला विशालच्या चेहऱ्यावर निशांतच्या बुद्धीबद्दलचं कौतुक होतं.

“कोणी सांगीतलं तुम्हाला? आणि किती पैसे दिले?” – PSI

“साहेब, नाव सांगीतलं तर आमचा जीव घेतील ते.” - चोर.

PSI साहेबांनी शांतपणे कमरेचं पिस्तूल काढलं आणि म्हणाले, “तुम्हा दोघांना आत्ताच गोळ्या घालून या भुयारात फेकून देऊ. किती दिवस तुमची प्रेतं तिथे कुजत पडतील, देवालाच ठाऊक. पण जर तुम्ही नाव सांगीतलं तर त्याला आम्ही पकडू, आणि जेल मधे टाकू, तुम्हाला काही त्रास होणार नाही याची खात्री देतो.”  

“एक काम करा, ते नावाचं आपण नंतर बघू. इंगळे यांना घेऊन चला खाली. जरा तळघर तपासू.”- PSI. मग सगळी वरात तळघरात. तळघर चांगलंच मोठं होतं. तीन प्रशस्त खोल्या होत्या. प्रत्येक खोलीतून शुद्ध हवा खेळवण्या साठी एक पाइप बाहेर काढला होता. एका खोलीत आल्यावर PSI साहेबांनी पुन्हा विचारलं की “कोण इसम होता, ज्याने तुम्हाला हे काम करायला सांगीतलं?

“साहेब, तुम्हाला माहीत नाही, ते लोकं फार भयंकर आहेत. आमचा खरंच जीव घेतील” – चोर.

“साहेब,” निशांत मध्येच बोलला. “साहेब, यांची दृष्टी अधू झालेली दिसते आहे, यांना तुमचा पोलिसांचा ड्रेस दिसत नाहीये, पिस्तूल दिसत नाहीये. म्हणून असं बोलताहेत. जरा हे अंजन यांच्या डोळ्यात घातलं की स्वच्छ दिसायला लागेल.” असं म्हणून त्याने तिखटाचं अंजन असलेली वाटी PSI साहेबांच्या हातात दिली.

“इंगळे घाला अंजन याच्या डोळ्यात. पूर्णं घाला. डोळे एकदम स्वच्छ झाले पाहिजेत.”– PSI

“बोराटे, मानगुट पकडा यांची, आणि मोरूभाऊ तुम्ही यांचे डोळे ताणून धारा. मी अंजन फासतो. दोघांनी तसं केलं आणि इंगळे शिपायाने त्यांच्या डोळ्यात अंजन घातलं अगदी जबरदस्तीने. तो गुरा सारखा ओरडायला लागला.

“आपण जमिनीखाली तळघरात आहोत ,तुझा आवाज बाहेर कुठेही ऐकू जाणार नाही. आता एकाच डोळ्यात घातलं आहे. थोडा वेळ वाट पाहू आणि मग दूसरा डोळा. पहा विचार कर. अजूनही वेळ गेली नाहीये.” – PSI

तेवढ्यात इंगळे शिपायाने दुसऱ्या चोराची मानगुट पकडली आणि म्हणाले “बोराटे घाला याच्या पण डोळ्यात. ही मात्रा मात्र लागू पडली. तो दूसरा चोर ओरडला “ “नको, नको. सांगतो मी सर्व.”

“बोल, कुणी सांगीतलं हे करायला?” – PSI

“सुदाम शेठने सांगीतलं.” – दूसरा चोर.

“कुठे राहतो?” – PSI

चोराने पत्ता सांगितला.

“हे सगळं करण्या मागे त्याचा काय हेतु होता?” – PSI

“नाही माहीत साहेब, आम्हाला पैसे दिले आणि आम्ही काम केलं. बस, साहेब आमचा काही गुन्हा नाही साहेब, आम्ही काही चोरी केली नाही.” - दूसरा चोर.

“इथून बाहेर पडायचा रस्ता कोणचा आहे.?” – PSI

मग सगळी वरात दुसऱ्या घराच्या बाजूला असलेल्या जिन्या पाशी आल्यावर  एक लिवर होता तो खेचल्यावर चित्राची अर्धी बाजू उघडली. अगदी दिनेशच्या घरात उघडली तशीच. आधी इंगळे बाहेर गेले मग साहेब आणि मग बाकी सगळे. घराच्या हॉल मधे दोघं माणसं बसली होती. पोलिसांना पाहून ते दचकले, समोरचं दार उघडच होतं घाई घाईत पळाले. पण पोलिस त्यांच्या मागे धावले आणि त्यांना पकडलं. त्यांना घेऊन हॉल मधे आणल्यावर, एक चोर बोलला.” साहेब, हेच सुदाम शेठ आहेत. यांनीच आम्हाला हे काम करायला सांगीतलं.”

“बोला सुदाम शेठ, हे काय म्हणताहेत?” – इंस्पेक्टर साहेब.

“साहेब, मी यांना ओळखत सुद्धा नाही.” – सुदाम.

“असं? बरं मग इतक्या रात्री तुम्ही इथे येण्याचं काय कारण?” – PSI

“ते आमचे विक्रांत शेठ आहेत, त्यांचाच हा बंगला आहे. त्यांनी सांगीतलं की “आज रात्री सर्व घर साफ करून ठेवा. त्यासाठी दोन माणसं आधीच पाठवली आहेत, तुम्ही फक्त त्यांच्या  कामावर लक्ष ठेवा.” म्हणून मी इथे आलो साहेब, ही माणसं दिसली नाहीत म्हणून वाट पाहत बसलो.” – सुदाम.

ठीक आहे, इंगळे यांना सर्वांना पोलिस स्टेशनला घेऊन चला. उद्या सकाळी विक्रांत शेठला बोलवा. उद्या त्यांना बघू. पोलिस पार्टी दोघा चोरांना आणि सुदामला  घेऊन गेली. इंस्पेक्टर साहेब म्हणाले, “दिनेश साहेब, ही दोन घरं आणि त्या खाली तळघर, हे काय गौड बंगाल आहे, जरा स्पष्ट करून सांगाल का?”

“साहेब, हे सर्व आमच्या साठी पण नवीनच आहे. या निशांत साहेबांनी बराचसा अंदाज बांधला होता, आणि त्या अनुसारच या लोकांना पकडण्यासाठी हा सापळा रचला होता.” दिनेश म्हणाला, “निशांत तूच का नाही सांगत साहेबांना नीट खुलासेवार?”

“ठीक आहे. पण मला वाटतं की आपण घरात वापस जावं, आणि आरामशीर  पणे बसून बोलावं. काय साहेब?” – निशांत. इंस्पेक्टर साहेबांनी मान डोलावली आणि सगळे जण घरात आले.

“निशांत सांग आता सर्व.” दिनेश बोलला.

“साहेब,ही दोन घरं  साधारण १९४० ते ४५ च्या आसपास या दिनेशच्या पणजोबांनी आणि त्यांच्या भावाने बांधली. दोन्ही मुद्दाम वेगवेगळ्या रस्त्यावर उघडणारे प्लॉट घेऊन त्यांनी घरं बांधली. त्या वेळेस देश पारतंत्र्यात होता आणि पत्री सरकारची बरीच धूम होती. अन्डरग्राउंड चा जमाना होता. क्रांतिकारकांचे निरोप पोचवण्याची जबाबदारी अनेकांनी उचलली होती. असे लोकं आणि क्रांतिकारक सुद्धा इथे काही दिवस वास्तव्यास राहून पुढे जायचे. समजा पोलिसांना खबर मिळाली आणि ते तपासायला आलेच तर हे लोकं खालच्या तळघरातून दुसऱ्या घरात जायचे आणि तिथून पसार व्हायचे. पोलिसांना कधीच यांचा मागमूस लागला नाही. पुढे काही वर्षांनंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर याचा उपयोग नव्हता, म्हणून हे तळघर बंदच राहिलं. दिनेशच्या काकांनी एवढंच सांगीतलं की क्रांतिकारक पसार व्हायचे. त्यांना या तळघरा बद्दल काहीच माहीत नव्हतं. या दोन्ही चित्रांबद्दल मी खोदून खोदून विचारलं, पण ते काही सांगू शकले नाहीत. शेवटी आज उलगडा झाला. काकांनी ते घर बऱ्याच वर्षा पूर्वी विकून टाकलं होतं. ते नंतर बिल्डर विक्रांत शेठ ने विकत घेतलं. त्यांना तळघराबद्दल कसं कळलं हे माहित नाही, कदाचित तेच सांगू शकतील.” – निशांत.

“अजून काही असेल तर आठवा, ते ही सांगा.” – PSI

“विक्रांत शेठ हे बिल्डर आहेत. त्यांना मोठी स्कीम बनवायची असेल, म्हणून ते दिनेशचं घर घेण्याच्या खटपटीत असावेत. अर्थात हा माझा अंदाज आहे.” निशांत.

“आत्ता मला लिंक लागली. दोन वर्षांपूर्वी याच विक्रांत शेठने आम्हाला घराची ऑफर दिली होती, पण आम्ही साफ नकार दिला होता. आता सर्व स्पष्ट झालं आहे. पण निशांत, त्यांनी हा मार्ग का चोखाळला? काय कारण असेल?” – दिनेश.

“सोपं आहे. हे घर भुताटकी ने झपाटलं आहे असा समज पसरला तर खूप स्वस्तात त्याला हे घर मिळून गेलं असतं. नव्हे, तुम्ही हे घर सोडण्याच्या तयारीतच होता. बरोबर ना?” – निशांत.

“हो, आम्ही जवळ जवळ निर्णय घेतलाच होता.” – विशाल.

“पण कळत नकळत स्वामींनीच तुम्हाला वाचवलं. त्यांनीच सांगीतलं होत न की घर नव्हे, तर तुम्ही लक्ष आहात म्हणून. मगच तुम्ही निर्णय बदलला.” निशांत.

“हो, खरं आहे स्वामींचे आभारच मानायला हवेत त्या साठी.

“एक गोष्ट मला मघा पासून बोचतेय, की तो चोर मघाशी म्हणाला होता, की त्याला सांगीतलं होतं की हॉल मधे कोणी नाही म्हणून, हे त्यांना कसं कळलं?” – PSI

“हो साहेब, मला पण तो संशय आला होता, म्हणून सर्वांना सांगितलं की जे काही बोलायचं ते बाहेर येऊन. आणि म्हणूनच बहुधा मी रात्री झोपायला इथे येतो हे त्यांना कळलं नसेल. आणि मग सगळंच भांड फुटलं.” – निशांत.

“हो, पण यांचा अर्थ त्यांनी कुठे मायक्रोफोन लावला असेल का? शोधायला हवा.” – PSI

“मी खूप प्रयत्न केला पण काही सापडलं नाही. कुठेही वायरिंग केल्याचं पण आढळलं नाही. साहेब, एक्स्पर्ट टीमला बोलावून शोधावं लागेल.” – निशांत.

“हूं, तसंच करावं लागणार असं दिसतंय” – सब इंस्पेक्टर साहेब.

आता पोलिसांनी हातात घेतल्यावर सर्वच गोष्टी उघड झाल्या. सर्व बाबींचा तपास करून पोलिसांनी विक्रांत शेठला पण अटक केली.

एक भयंकर संकट टळलं. निशांतचं काम संपलं होतं दिनेशने त्यांची फी विचारली. पण तो म्हणाला की “काम गोविंदरावांनी दिलं होतं बिलिंग पण त्यांनाच होईल. बरय चलतो मी आता. बरीच कामं तुंबली आहेत नागपूरला.” आणि निशांत निघाला.

“निशांत, एक मिनिट, अरे हे चित्रामधे जे भगदाड पडलं आहे त्याचं काय करायचं? इथे भिंत घालून बुजवून टाकायचं का? – दिनेश.

“बरोबर आहे. तुम्ही हा दरवाजा तुमच्या सुरक्षे साठी तात्पुरता विटा लाऊन बंद करा. पण नंतर ”तुम्ही एक अर्ज करा की तळघराला मधोमध भिंत घालण्याची परवानगी मिळावी आणि त्याचा निर्णय लागे पर्यन्त दुसरं घर कोर्टाच्या अधिकारात असावं. तुम्ही गोविंदरावांना तातडीने बोलावून घ्या त्यांना सर्व माहिती असेल. ते करतील व्यवस्था.

निशांतचं काम झालं होतं तो नागपूरला जायला मोकळा होता. सुमंत कुटुंबावरचं दडपण आता निघून गेलं होतं. पुन्हा पहिल्या सारखं मोकळं जीवन सुरू झालं होतं.

समाप्त.

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.