Bhagy Dile tu Mala - 68 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ६८

बदल जाती है तकदिरे
किसीं के आने के बाद
कम्बक्त नही बदलती जमाने की सोच
भला कैसे इसको पार किया जाये??

ती सकाळची वेळ होती. अन्वय आज त्यांच्या घरी लग्नाबद्दल बोलायला जाणार होता म्हणून लवकरच उठला होता किंबहुना त्याला टेन्शनमुळे नीट झोप लागली नव्हती. स्वराच्या घरून तर त्यांना कुठला अडथळा झाला नव्हता पण त्याच्या घरून त्याला परवानगी मिळेल की नाही म्हणून अन्वय चिंतीत होता. त्यामागे तशी बरीच कारण होती फक्त तो कुणाला सांगू शकत नव्हता. त्याने घाई-घाईत लग्नाचा निर्णय तर घेतला होता पण हा निर्णय त्याच्या घरच्यांना तो इतक्या लवकर पटवून देऊ शकेल का ह्याच विचाराने त्याची झोप उडवली होती. एकीकडे त्याची स्वप्न होती जी त्यांनी काही तासात रंगवली होती तर दुसरीकडे होत त्याच कुटुंब. जे त्याला त्याच्यापेक्षा जास्त प्रिय होत. घरून नकार आला तर स्वरासाठी तो संघर्ष करू शकेल का ह्या एकाच विचाराने त्याला हैराण करून सोडलं होत. खूप सोपं असत जगाशी भांडण करणं पण एकाच वेळी आपले दोन लोक समोर असतात तेव्हा संघर्ष असतो तो पार करणे खूप अवघड जात. ह्याच फेजमध्ये तर कित्येक अन्वय हार मानतात म्हणून अन्वयच विचार करणं स्वाभाविक होत.

अन्वय आज सकाळी- सकाळीच अंघोळ करून तयार झाला होता. स्वरानेही त्याला निघायचं असल्याने लवकरच उठून चहा नाश्ता बनवून घेतला होता. त्याने चहा-नाश्ता आटोपला तेव्हा जवळपास ८ वाजले होते. त्याची नागपूरहून दुपारची ११.४५ ची फ्लाइट असल्याने त्याला लवकर निघणे भाग होते म्हणून नाश्ता होताच तो उठला. जाताना सुद्धा त्याच्याकडे सर्वच आशेने बघत होते. त्यालाही जरा दडपण आलं होतं आणि तो तिच्या आई-बाबांना समंजावणीच्या स्वरात म्हणाला," मला माहित आहे सध्या तुमच्या डोक्यात बरेच प्रश्न आहेत, त्याची उत्तरे सध्या माझ्याकडे नाहीत पण मी ती लवकरच शोधून तुमच्याकडे पोहोचेल. शक्यतो मी आजच घरी बोलून घेईल. प्रयत्न करेन त्यांना मनविण्याचा. त्यांनी सहज स्वीकारलं तर आनंदच आहे पण…?? काहीही झालं तरी मी दिलेला शब्द नक्की पूर्ण करेल. मग समोर कुणीही असले तरी हरकत नाही. विचार करतोय तशी वेळच येऊ नये. तुम्ही हजार प्रश्न मनात आणा फक्त एक सोडून. जगात काहीही झालं तरी मी स्वराशीच लग्न करेन त्यात कुठलाही बदल होणार नाही."

अन्वय एका श्वासात सर्व बोलून गेला. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा झळकत होत्या. अन्वय मनाला वाटेल ते बोलत होता पण स्वराच्या बाबांनाही माहीत होतं घरच्यांना फेस करणं कितपत अवघड असत म्हणून तिचे बाबा मिश्किल हसत म्हणाले," अन्वय आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही निवांत कळवा. काहीच घाई नाही. प्रयत्न करा आईबाबांच्या सर्व मनाने करायचं कारण घरी भांडण झाली तर तुम्ही एकत्र राहून देखील आनंदी राहू शकणार नाही. एकदा उशीर लागला तरीही चालेल पण आई-बाबांना दुखावून काहिच नका करू."

अन्वय मिश्किल हसला आणि घराच्या बाहेर पडला. अन्वयला एक तर आधिच टेन्शन आला होत त्यात स्वराच्या बाबांनी त्याला अधिकच टेन्शन दिलं. कदाचित इतकंही सोपं नव्हतं अन्वयसाठी स्वराला भांडण न करता स्वीकारणं. अन्वय घराच्या बाहेर तर निघाला होता पण त्याच्या चेहऱ्यावर असलेले टेन्शन साफ दिसत होते. ह्या काही तासात नेमकं काय होणार आहे ह्याबद्दल अन्वय जरा जास्तच विचार करू लागला होता. अन्वयच्या चेहऱ्यावर ते साफ दिसत असल्याने स्वरा अन्वयला सोडायला बसस्टॉपवर जाऊ लागली. स्वराचे बाबाही येणात होते पण तिने त्यांना नकार दिला. ते दोघेच आता बाहेर निघाले. अन्वय निघाला तर होता पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. स्वराचे बाबा जे म्हणाले होते त्याच टेन्शन आलं होतं त्याला कारण जर त्यांनी नकार दिला असता तर त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याशिवाय पर्याय नव्हता तेव्हा भांड्याला भांड लागणारच होत म्हणून तो काहीच बोलला नाही. स्वरा त्या पूर्ण वेळात फक्त त्याच्याकडे बघत होती. त्याचीही स्थिती तिला समजत होती म्हणून ती काहीच बोलली नाही. पहिली वेळ होती जेव्हा अन्वयचा विश्वास डळमळीत झाला होता.

ते दोघेही आता बसस्टॉपवर पोहोचले. अन्वयच्या चेहऱ्यावर अजूनही काहीच बदल झाला नव्हता आणि केव्हाची शांत बसलेल्या स्वराने विचारले," अन्वय सर खूप भीती वाटत आहे का?"

अन्वयने तिच्याकडे बघितले. त्याच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित पसरले होते आणि तो म्हणाला," खोट नाही बोलणार स्वरा. खरच खूप भीती वाटत आहे. आजपर्यंत कधी- कुणासाठी भीती वाटली नाही पण आज तुझ्यासाठी भीती वाटत आहे. कारण आयुष्यात गमावण्यासाठी काहीही नव्हतं. आज अशी व्यक्ती आयुष्यात आहे जिला मी गमावूं शकत नाही म्हणून जरा जास्तच भीती वाटत आहे. घरच्यांनी होकार दिला तर बेस्ट आणि नकार दिला तर स्वरा? खूप विचार येत आहेत. नाही माहिती मला कसलीच उत्तरे. बाबा म्हणाले तस आपल्याच लोकांना दुखावून आपण खुश राहू शकणार आहोत का?"

अन्वयच्या चेहऱ्यावर आज हसू दिसत नव्हतं तर स्वरा मिश्किल हसू ओठावर आणत म्हणाली," अन्वय सर मग लग्न कॅन्सल करूया का? मला तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त काहीच नको. अगदी लग्न सुद्धा नाही."

अन्वय आता तिचा हात हातात घेत उत्तरला," अजिबात नाही स्वरा! भरपूर वाट बघितली मी आधीच, आता नाही वाट बघवणार. त्यांचं उत्तर काहीही असू दे पण मी माघार घेणार नाही. तस पण स्वरा त्यांचा नकार असेल तर तो कधीच होकारात बदलणार नाही हे माहिती आहे मला. स्वयमने जी चूक केली ती मला नक्कीच करायची नाही. मला तुला नाही गमवायच. उलट मला अस वाटत की त्यांचा नकार असेल तरीही आपण लग्न करू म्हणतात सहवासात राहिल्यावर लोक सुद्धा बदलतात सो ते बर पडेल. तू तिथे असशील तर कदाचित काही दिवसात त्यांना बदलू शकशील. मला विश्वास आहे तुझ्यावर पण स्वरा अस नको बोलुस. तू माझी आहेस आणि कुणामुळेच मला तुला दूर जाऊ द्यायचं नाही."

अन्वयच्या डोळ्यात निस्सीम प्रेम ती बघत होती. ते बघून स्वराही शांत झाली. तिला आता काय बोलु समजत नव्हते. दोघांच्याही चेहऱ्यावर थोडीशी भीती तशीच होती आणि अन्वय म्हणाला," स्वरा, बाबा म्हणाले की घरी भांडण करून लग्न नको पण खरंच त्यांनी नकार दिला तर मग??"

स्वरा आता त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली," मग काही नाही आपण हे घरी नको सांगूंया. फक्त आपल्यात ठेवू आपलं सिक्रेट! आपण मिळुन सर्व नीट करू मला विश्वास आहे मग कुणाला काही सांगायची गरजच पडणार नाही. आता हे टेन्शन वगैरे जाऊद्या अन्वय सर. थोडं हसा ना माझ्यासाठी. प्लिज!! मला नाही बघवत हो तुम्हाला अस. प्लिज!!"

स्वरा केविलवान्या नजरेने अन्वयकडे बघत होती आणि अन्वयच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल. त्याच हसू येताच स्वराची भीती क्षणात नाहीशी झाली. ते एकमेकांना बघतच होते की तेवढ्यात समोरून बस येताना दिसली आणि स्वरा पटकन म्हणाली," अन्वय सर घाबरू नका. जे होईल ते मिळून सहन करू. दोघांनी मिळून केलं तर काहीच मोठं वाटणार नाही. प्रेम वाटून जास्त होत तर दुःख वाटल्याने कमी सुद्धा होईल. ह्या पूर्ण प्रवासात एकदाही भीती वाटली तर डोळे बंद करून मला आठवा, मी आहे तुमच्यासोबत हे विसरू नका. एल.आय.सी. सारख. जिंदगीभर और जिंदगी के बाद भी."

ती बोलून गेली आणि काहीच क्षणात समोर बस येऊन थांबली. त्याला बोलायची संधीच मिळाली नाही. अन्वय हसत-हसतच बसमध्ये बसला. बस सुरू झालीच होती की अन्वय मोठ्याने ओरडत म्हणाला," स्वरा घरी जायला सायंकाळ होईल. मी त्यांच्याशी बोलून तुला कॉल करतो. जास्त काळजी करू नकोस. मला आशा आहे की ते होकारच देतील सो जास्त विचार करू नकोस. मै हु ना.. टेक केअर डिअर..बाय..बाय"

अन्वय हात हलवून तिला " बाय बाय" करत होता. त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर का असेना तिला आनंद दिसला होता म्हणून स्वरानेही त्याला हसतच " बाय " म्हटले. एकमेकांना बघता-बघता काहीच क्षणात बस दिसेनाशी झाली. स्वरा-अन्वय काही वेळेसाठी वेगळे झाले होते पण विचारांची टांगती तलवार अजूनही त्यांच्यावर तशीच अडकून होती.

जमाने की बंदीशो से
भला कोण बच पाया है
प्यार करणे वाले टूत गये
पर जमाने के कब उनको अपणाया है?

स्वरा घरी परतली तर होती पण तिच्याही मनात काही कमी प्रश्न नव्हते. हा पूर्ण दिवस तिलाही काढणे आज कठीण जाणार होते. तिने मनाची तयारी तर केली होती पण ते तेवढंही सोपी नव्हतं म्हणून स्वरा विचारात हरवली होती. स्वरा घरी येताच आई उत्तरल्या," गेले का अन्वय? काय म्हणाले ग जाताना? काही टेन्शन वगैरे आहे म्हणाले का?"

स्वरा क्षणभर हसत आईला म्हणाली," म्हणाले की डोली तयार ठेवा आणायला!! मग सजवायची का डोली?"

स्वराची आई तिच्या बोलण्यावर तर हसल्या होत्या पण त्यांनाही माहीत होतं की स्वराच हे हसू वरवरचं आहे, मनात तर स्वतःशीच ती एक युद्ध लढते आहे पण जिथे लेक कणखर होती तिथे आईला कमजोर पडून चालणार नव्हतं त्यामुळे त्याही हसतच उत्तरल्या," त्यांना म्हणावं घेऊन याच. मुलीकडले काही कमी नाहीत. त्यांचं जोरदार स्वागत करू. अस स्वागत जे त्यांनी कधी बघितलं सुद्धा नसेल. काय म्हणता स्वरा मॅडम तुम्ही सांगणार त्यांना की आम्ही सांगू?"

स्वरा क्षणभर हसली आणि जरा हळुवार आवाजात उत्तरली," हो करा तयारी. जल्लोष करा शेवटी आपल्या सर्वांच स्वप्न पूर्ण होतंय. बर आई एक ना, रात्री मला नीट झोप आली नाही. मी आता जाऊन पडते. थोडं उशिराच अंघोळ वगैरे करेन. चालेल ना ?"

स्वराच्या आई तिच्या केसांवरून हात फेरत म्हणाल्या," हो जा! माझी लाडकी थकली खूप करून करून. आराम कर. जेव्हा झोप होईल तेव्हा ये बाहेर."

आईची परवानगी मिळताच स्वरा बेडरूममध्ये गेली आणि दार लावून ती एकटीच आतमध्ये बसली. खर तर तिला आज झोपायच नव्हतं. तिच्या डोक्यात एवढे विचार आले होते की तिला त्याची उत्तरे शोधल्याशिवाय समोरचा मार्ग गाठणे अवघड होते. अन्वय ह्यावेळी स्वतःच टेन्शनमध्ये असल्याने आता तिला स्वतःच काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार होती आणि ती त्यासाठी सज्ज झाली होती. कदाचित अन्वयच्या बोलण्यातूनच तिचा संघर्ष कसा असणार होता ह्याचा तिला अंदाज आला होता म्हणून ती उत्तर येण्याआधीच मनाची तयारी करत होती.

स्वरा एकटीच बेडरूममध्ये विचार करत होती. बेडरूमच दार बंद होत सोबत सर्व खिडक्याही तिने बंद केलेल्या. लाईटचा प्रकाश येऊ नये म्हणून त्याची वाटही तिने बंद केली होती. सर्विकडे होता तो अंधारच अंधार. कदाचित ह्या अंधारातूनच तिला नवीन सुरुवात करायची आहे ह्याची खात्री झाली होती म्हणून ती ह्या अंधारातच कितीतरी वेळ विचार करत होती. विचार करता करता ती स्वतःच स्वतःला म्हणाली," स्वरा अन्वय सर आज केवळ तुझ्यामुळे घाबरले आहेत. ते कधीच कुणाला घाबरले नाहीत. तुला गमावण्याची भीती त्यांना वाटते आहे ह्यावरुन तू त्यांना किती महत्त्वाची आहेस ह्याची जाण ठेव. ते जेव्हा एवढ्या विश्वासाने नकाराबद्दल बोलत आहेत ह्याचा अर्थ त्यांना घरची स्थिती माहिती असेल. नाही तर ते इतके घाबरणार नाहीत. त्यांनी निर्णय घेतला आहे पण आता तुला मनाची तयारी करावी लागेल. तुझ्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत ह्याची काळजी तुला घ्यावी लागेल. स्वरा आजपर्यंत तू काही कमी त्रास सहन केला नाहीस पण हा त्रास काहीतरी वेगळं असेल. माहिती आहे तुला पुढे त्रास होणार आहे पण अन्वयला खुश बघायच असेल तर त्यांच्यापर्यंत कुठलीच गोष्ट पोहोचु देऊ नकोस. आजपर्यंत त्यांनी खूप काही केलं तुझ्यासाठी आताही करत आहेत. तेव्हा आता तुला आपलं प्रेम सिद्ध करावं लागेल. परिणाम जे व्हायचे असतील ते होतील पण तुला आता पुन्हा एकदा कठोर बनाव लागेल आणि काही वर्षे डोळ्यांचा अश्रूंना मनातच साठवून ठेवावं लागेल. कारण तुझे अश्रू बाहेर आले तर अन्वय सर कोलमळून पडतील आणि तेव्हा तुझं प्रेम हरेल. स्वरा तुझे श्वास थांबले तरीही त्यांना हरु देणार नाहीस हे स्वतालाच वचन दे. कारण ते हरले तर कदाचित जगातुन प्रेम हरेल आणि ते तू अजिबात होऊ देऊ नकोस. सो आजपासून पुन्हा एक परिक्षा द्यायची आहे तुला. बनव मन घट्ट आणि ह्याही प्रवासाला सामोरे जा. स्वरा जमेल तुला फक्त हिम्मत हरू नकोस आणि हरलीस तर त्यांचा चेहरा आठ्व. मी विश्वासाने सांगते तू कधीच हरणार नाहीस."

तिने स्वतःच्याच मनाला ताकीद दिली होती. जणू तिने स्वीकारलंच होत की तिला त्रास होणार आहे पण ती त्यासाठी देखील सज्ज झाली होती. तिला थोडं टेन्शन आलं होतं पण तिने डोळे मिटले आणि अन्वयचा चेहरा येताच जणू हिम्मत तिच्यात क्षणात भरली. आज ती कितीतरी वेळ एकटीच रूममध्ये बसून होती. तिने सर्व काही सहन करून प्रेम निभावण्याचा निर्धार केला होता. आज तिच्या डोळ्यात अश्रू आले होते पण ते कदाचित शेवटचे होते कारण आजनंतर ह्या अश्रूंना सुद्धा तिने डोळ्यात येण्याचा हक्क दिला नव्हता. एक व्यक्ती प्रेम जिंकायला जगाशी, घरच्यांशी लढणार होता तर एक स्वतःशीच. काय असणार होती ही कथा??

ती रूमच्या बाहेर आली तेव्हा १ च्या वर वाजून गेले होते. तिने येताच आधी अंघोळ केली. आई स्वराला जेवण कर म्हणून सांगत होत्या पण आज तिची काहीच खायची इच्छा नव्हती. तीने कसातरी दुपारी चहा घेतला आणि फोन हातात घेत अन्वयला कॉल केला. अन्वयने कॉल रिसिव्ह केलाच होता की स्वरा उत्तरली," पोहोचलात का मुंबई?"

अन्वय हसतच उत्तरला," हो जस्ट लॅंड झाली फ्लाइट. आता अडीच तासांचा ब्रेक आहे मग जाईल हीच फ्लाइट दिल्लीला. सो थोडा वेळ आहे माझ्याकडे."

स्वरा काळजीयुक्त शब्दात उत्तरली," हम्म. वेळ आहे ना थोडा तर मग बाहेर जाऊन खाऊन घ्या आणि वेटिंग रूम मध्ये थोडा वेळ आराम करा म्हणजे जास्त त्रास होणार नाही. खूप महत्त्वाचं काम करायचं आहे ना आज!!"

अन्वयनेही हसतच म्हटले," स्वरा मी जरा निष्काळजी आहे ग. तू ये ना माझी काळजी घ्यायला. मग सर्वच सोपं होईल माझं आयुष्य. येशील ना?"

स्वराही त्याच्या बोलण्यावर क्षणभर हसतच उत्तरली," आज स्वतःच स्वतःची घ्या. ह्या क्षणानंतर मीच घेईन तुमची काळजी. मग तुम्हाला बोलायची पण गरज उरणार नाही किंवा अस म्हणा की तुम्ही म्हटलं तरीही काळजी करणं सोडणार नाही. इतकं पुरेस आहे सर?"

अन्वय तीच प्रेम बघून क्षणभर हसतच राहिला तर स्वरा पुन्हा उत्तरली," जा व्हा फ्रेश. मी बोलत बसले तर बोलतच बसेन. उगाच उशीर होईल तुम्हाला आणि आठवणीने कॉल करा हा रात्री. मी वाट बघते आहे त्याशिवाय झोपणार नाही. चला ठेवते मी फोन बाय बाय.."

अन्वयही हसतच उत्तरला," बाय..."

आजचा दिवस लवकर निघाला होता पण तो स्वरासाठी खूप लांब होता. आज एक- एक सेकंद काढणे स्वरासाठी जड जात होते. डोळ्यावर झोप नव्हती की डोक्यात विचारांनी थांबणे बंद केले नव्हते. स्वाभाविकच त्याच्या घरच्यांची उत्तरे काय असतील, पुढे काय होईल ह्या विचाराने तिला टेन्शन आलं होतं. स्वराच्या आईलाही ते आज जाणवत होतं. स्वरा जर आज अशीच एकटीच बसून राहिली तर तिच्या डोक्यात बरच काही साठून राहील म्हणून स्वराच्या आईने तिला जरा बाहेर फिरायला नेले. त्यांना काही कपडे वगैरे खरेदी करायचे असल्याचा बहाणा करून स्वराच्या आई तिला बाहेर घेऊन गेल्या होत्या. स्वराच्या आई तिला बाहेर घेऊन गेल्या आणि काही क्षण का असेना तिच्या विचारांची शृंखला बंद झाली...सरता-सरता शेवटी सूर्यही बुडाला. तो बुडाला होता पण उद्याची आशा घेऊन येणार होता की पुन्हा एक वादळ घेऊन येणार होता..

कैसे समझाये दिलं को
जमाने ते तौर तरिके
पिस जाते है यहा ईश्क करणे वाले
मिट गये है यहा लाखो मोहब्बत के परिंदे


वेळ सायंकाळी ७.३०. स्थळ अन्वयच घर. अन्वयने दारावर बेल वाजवली आणि काही क्षण वाट बघू लागला. थोडीशी भीती होतीच पण घरच्यांना भेटण्याचा आनंद त्याहून जास्त होता. तो विचार करतच होता की त्याच्या आईने काहीच क्षणात फार उघडले आणि अन्वयला बघून जरा चिडतच म्हणाल्या," अन्वय कुठे गेला होतास? काल येतो म्हणून सांगून गेला होतास आणि आज उगवतो आहेस. कॉल केले तर साहेब उचलायला तयार पण नाहीत. असा कसा रे तू? तुला काळजी नाही का घरच्यांची? "

अन्वय अजूनही दारावरच होता की निहारिका( अन्वयची लहान बहीण) हसत म्हणाली," ए आई आधी दादाला मध्ये तरी घे. थकून आला आहे ते नाही आणि लागलीस प्रश्न विचारायला. तो लाडका आहे तुझा देईल उत्तरे पण मध्ये नाही घेतलंस तर पुन्हा पळून जाईल दारावरून. चालेल का तुला?"

निहारिका, अन्वय आता दोघेही हसतच होते की त्याच्या आई उत्तरल्या," हो भावाची लाडकी! जशी मला काळजीच नाही माझ्या मुलाची आणि इथून पळायची हिम्मत त्याच्या वडिलांनी कधी केली नाही तर तो काय करणार? पळून तर दाखव म्हणा मग सांगते त्याला."

अन्वय आईच बोलणं ऐकत होता. आईने बोलणं बंद केलं आणि ओरडतच म्हणाल्या," आता काय निमंत्रण देऊ घरात यायला. चल ये मध्ये नाही तर तुझी लाडकी बहीण मला पुन्हा एकवायची."

अन्वय आईचे गाळ ओढत हसतच मध्ये आला आणि निहारिकाच्या कानाजवळ जात हळुवार त्याने विचारले," काय करतेय ती? मी भेटू जाऊन."

निहारिका हळूच हसत उत्तरली," ती ना झोपून आहे. मामाची वाट बघून- बघून कंटाळली आणि झोपली बिचारी. तू फ्रेश हो मग भेटवते तिला. चालेल ना की तिला सांगू तिचा मामा तिला भेटायला आतुर आहे ते."

अन्वय हसलाच होता की आई त्याच्या हातात टॉवेल देत म्हणाली," घाणेरडा कुठला! आधी फ्रेश व्हावं हे सुद्धा समजत नाही का? जा गीजर लावलाय. पाच मिनिटात पाणी गरम होईल. अंघोळ करून ये बाहेर. मग मारत लाडक्या बहिणीशी आणि तिच्या मुलीशी गप्पा!! आम्ही काय म्हातारे झालो आहोत. कुणाला येते आमची आठवण?"

पाणी गरम व्हायला ५ मिनिट लागणार होते म्हणून अन्वय आईच ऐकूनही सोफ्यावरच बसून राहिला आणि हसतच त्याने विचारले," आई, बाबा कुठे गेलेत ग? तुला घाबरून घर तर सोडून नाही गेले ना?"

त्याचे शब्द येताच निहारिकाने त्याला टाळी दिली. दोघेही हसतच होते की आई जरा रागावतच उत्तरली," त्यांना कोणते काम आहेत? गेले असतील मित्रांसोबत टवाळक्या करायला? रिटायरमेंट नंतर करणार सुद्धा काय? झालाय त्यांचाही वेळ. येतीलच इतक्यात. तुला खूप काळजी ना त्यांची. मी इथे आहे त्याच काहीच नाही पण बाप नाहीये तर लागला लगेच विचारायला. बरोबर म्हणतात इथे आईची कुणालाच कदर नाही."

अन्वय काही मिनिट आईकडे बघत निवांत बसलाच होता की आई त्याला सोफ्यावरून उठवत म्हणाल्या ," आळशी कुठला!! बापावर गेलात दोघेही. कधी कधी प्रश्न पडतो की मीच तुम्हाला जन्म दिला आहे ना? कारण एक सुद्धा गुण माझे नाही तुमच्यात? ए नालायका चल उठ. एकदा सांगितलं तरी कळत नाही का तुला?"

अन्वय आळस देत उठला आणि जाता- जाता म्हणाला," जातोय पण लवकर स्वयंपाक बनव. पोटात कावळे ओरडू लागले आहेत. मी बाहेर आल्यावर हवय मला जेवण!"

अन्वय उठलाच होता की निहारीका म्हणाली," आई त्या नर्सला विचार ना की तिने आम्हाला चेंज तर नाही केलं ना? तुला प्रश्न पडतोय म्हटल्यावर होऊ शकत ना तस?"

अन्वय तीच बोलन ऐकून क्षणभर तिथेच थांबला. दोघेही हसतच होते की आई म्हणाल्या," तू ना आणि तुझा भाऊ सारखेच. आळशी कुठले. भावाला बोललं की मिरची लागते ना तुम्हाला?"

निहारिका आता हसतच उत्तरली," आळशी तर आळशी!! कसाही असू दे. तस पण तुलाच कमी जाणवते त्याच्यात. बाकी जग तर फॅन आहे त्याच. तुला नाही कळणार तो. खडूस आई, जगातला सर्वात मस्त भाऊ आहे तो. लव्ह यु ब्रो!!"

आई निहारिकाला धपाटा घालतच होती की तेवढ्यात बाबा बाहेरून येत म्हणाले," हा हे मात्र खरं हा निहू.. तुझा भाऊ आणि माझा मुलगा खरच कमाल आहेत. फक्त तुझ्या आईलाच माझ्या मुलांत खोट काढायची असते."

अन्वयची आई आता रागावतच उत्तरली," हा तुम्ही वाटच बघत असता माझ्या विरुद्ध बोलण्याची. आता स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून नाही तर बघितलं असत दोघांनाही. भाऊ आला की लगेच टीम बदलता ना तुम्ही सर्व?"

आई पाय आपटत किचन मध्ये गेल्या आणि इकडे निहारिका-बाबा हसतच होते. अन्वय सुद्धा हसतच अंघोळ करायला मध्ये गेला.

जवळपास १५ मिनिट होऊन गेले होते. अन्वय फ्रेश होऊन बाहेर आला आणि बाबा त्याला म्हणाले," महाशय कशी झाली तुमची मिटिंग?"

अन्वय सोफ्यावर बसतच उत्तरला," ९० % पक्की आहे. फक्त १०% बाकी आहे. ती देखील आज फायनल होऊन जाईल. बस तुमची साथ हवी आहे मला."

बाबा पुन्हा हसतच म्हणाले," गुड गुड!! कामात मन लावा आणि जरा लग्नाचंही मनावर घ्या. बघितलं ना आई कशी चिडचिड करतेय. तुमच्या आईच वय होतंय राजे. कामाला कुणी सोबत नको का?"

अन्वय क्षणभर हसलाच कारण त्याला आज ह्याच विषयावर बोलायच होत. घरच वातावरण एकदम आनंदी आनंद होत म्हणून त्यालाही जरा बर वाटल. काहिच क्षण गेले. अन्वय निहारिका जवळ जात म्हणाला," अजून उठली नाही सृष्टी? इतक्या वेळ कशी झोपली? तिला माहिती आहव ना मामाला करमत नाही तिच्याविना."

निहारिका हळू आवाजात उत्तरली," अरे आताच झोपली आहे ती!! तिची तब्येत बरी नव्हती ना म्हणून नाही तर कुशीत असती तुझ्या."

अन्वय पटकन म्हणाला," हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होतीस ना?"

निहारिका हसतच उत्तरली," हो शरद आले होते. जाऊन आलो आम्ही. घाबरायचं कारण नाही. थोडा ताप होता. आता तो उतरला आहे म्हणून झोपली मस्त."

तीच उत्तर ऐकून अन्वय सोफ्यावरच बसला तर निहारिका अन्वयचे केस पुसून देत होती. आज त्याच्या घरच वातावरण खूपच सुंदर होत त्यामुळे काही क्षण का असेना त्याच्या मनातून भीती नाहीशी झाली होती आणि सर्व काही सांगायला योग्य प्रसंगही तयार झाला होता.

काही वेळ पुन्हा असाच गेला. अन्वयला खूप भूक लागली असल्याने आईने तासाभरातच स्वयंपाक बनविला. स्वयंपाक तयार होताच सर्व टेबल वर बसले. आई आज अन्वयला पोटभर वाढत होती आणि निहारिका उत्तरली," बघितलं बाबा!! कशी भरवत आहे दादाला! मला तर कधी अस भरवल नाही. माझ्यावर तर तुम्हीच प्रेम करता. तीच बोलणं ऐकून सर्व हसू लागले आणि आई डोळे मोठे करत म्हणाल्या," हो बापाची चमची!! आता ना उपाशीच ठेवते थांब. मी देत नाही ना काही तुला तर बघतच राहा मग."

आई बोलून गेल्या आणि निहारिका हसत उत्तरली," ए आई मी नाही ग असे बाबा म्हणाले. मी तर फक्त त्यांच्याकडून बोलत होते."

बाबा घाबरतच उत्तरले," ए निहारिका! स्वतःला वाचवावे म्हणून मला फसवत आहेस होय. ए लता मी अस काही म्हटलं नाही ग!!"

बाबांना घाबरलेल बघून अन्वय-निहारिका क्षणभर हसतच होते तर बाबा घाबरून आईकडे बघत होते. आज टेबल वर नुसती मस्ती सुरू होती आणि अन्वयच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल होत. जवळपास अर्धा तास असच सर्व सुरू होत.

सर्वांची जेवण आटोपली आणि सर्व टीव्ही बघण्यात व्यस्त झाले. सर्व आज खुश वाटत होते पण अन्वय मनातून घाबरला होता. त्याला कुठून सुरुवात करू, कस विचारू काहीच कळत नव्हतं. त्याच्या हृदयाचे ठोके जलद गतीने सुरू होते. तो एक क्षण इकडे तर कधी टीव्हीकडे बघत होता. त्याला वाटत होतं की आज विचारूच नये पण कधी ना कधी विचारायचं होतच म्हणून त्याने हिम्मत एकवटून मनाची तयारी केली. टीव्ही सुरूच होती की त्याने टीव्ही बंद केली आणि समोरून निहारिका चिडत उत्तरली," दादा टीव्ही बंद का केलीस?"

अन्वय सर्वांच्या बाजूने वळत म्हणाला," मला तुमच्या सर्वांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायच आहे म्हणून टीव्ही बंद केली. काहीतरी खूप महत्त्वाचं आहे. प्लिज फक्त काही वेळ द्या मला. खूप हिम्मत करून सर्व सांगतोय."

तो बोलून गेला आणि सर्व त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले.

सर्व त्याच्याकडे बघत होते. त्याने तिरकस नजरेने सर्वांचे चेहरे बघितले आणि उत्तरला," फायनली मी लग्न करायला तयार आहे."

त्याच उत्तर ह्याव आणि घराच वातावरण क्षणात शांत झाल. काही क्षण कुणाला आपल्या कानावर विश्वासच बसेना. सर्व एकमेकांकडे बघत होते की निहारिका विचारू लागली," दादा सूर्य आज दुसऱ्या दिशेने उगवला होता का? तू आणि लग्न? ते पण स्वताहून तयार झालास कस शक्य आहे? इतके वर्ष आई ओरडून ओरडून थकली पण केलं नाही आणि आज अचानक? भानगड नक्की काय आहे? प्रेमात वगैरे आहेस का कुणाच्या?"

बाबा मात्र हसतच उत्तरले," अन्वय मी थोड्या वेळेपूर्वी म्हटलं ते एवढं सिरीयस घेतलंस की अगदी काही मिनिटात लग्नाला तयार झालास? माझं मनावर घेतोस हे ऐकून बर वाटल राजे. फायनली ह्या घरात सुद्धा सनई-चौघडे वाजणार. निहू धम्माल करूया आपण!! काय ते आज मेरे यार की शादी है.."

निहू-बाबाच काहीतरी वेगळंच सुरू होत तर अन्वयची आई हसतच त्याच्याजवळ जाऊन बसली त्याच्या डोक्यावरून हात फेरत म्हणाली," अन्वय किती सुंदर बातमी दिलीस तू!! मी खूप आनंदी झाले. फायनली सुनेच तोंड बघायला मिळेल. मी उद्यापासूनच सुंदर सुंदर मुली बघायला घेते. सांग तुला कशी हवी मुलगी? मी पूर्ण जग शोधेल पण तुला हवी तशिच मुलगी आणेन. जगातली सर्वात सुंदर मुलगी तुझ्यासाठी आणेन म्हटलं होतं ना तर ते शब्द नक्की पूर्ण करेन. बोल ना अन्वय कशी हवी तुला मुलगी?"

आई उत्साहातच होती की अन्वय तिला अडवत म्हणाला," त्याची गरज नाहीये आई! मी शोधली आहे आधीच मुलगी."

अन्वयचे शब्द ह्यावे आणि पुन्हा एकदा वातावरण शांत. निहारिका पुन्हा हसत उत्तरली," मी म्हटलं ना अगदी सेम आहे. बाबा, दादा बहुतेक लग्न फायनल करायला गेला होता. म्हणूनच म्हणाला तुमची साथ हवी आहे डील फायनल व्हायला. मी बरोबर बोलतेय ना दादा?"

निहारिका बोलून गेली आणि ते दोघेही अन्वयकडे बघू लागले. अन्वय त्यांच्याकडे बघतच उत्तरला," लग्न फायनल केलं अस म्हणू शकता पण तुमची परवानगी हवी आहे. हे सर्व एकाच दिवसात घडलं म्हणून तुम्हाला सांगू शकलो नाही. मुलीची इच्छा आहे की कोर्ट मॅरेज व्हावं तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना?"

अन्वयची आई आता रागातच उत्तरली," कोर्ट मॅरेज?? वेड लागलं का तुला? तू मुलगी निवडली त्याच आम्हाला काही नाही पण कोर्ट मॅरेज अजिबात चालणार नाही. मी माझ्या मुलाच लग्न धूम-धडाक्यात करणार आहे. सांग मुलीला आम्हीच सर्व करू पण लग्न कोर्टात कदापि शक्य नाही. दे नंबर मीच बोलते तिच्याशी."

अन्वय लगेचच म्हणाला," आई पण…"

त्याच्या आई रागातच उतरल्या," पण नाही न बिन नाही. मी बोलते त्यांच्याशी. करतील ते लग्न धूम-धडाक्यात. बर ते सोड आमचं आम्ही मॅनेज करू. आधी मला मुलीचा फोटो दाखव. बघू तरी माझ्या मुलाने किती सुंदर मुलगी शोधून आणली आहे. घराला शोभेल अशीच आणली असणार ह्यात शंका नाही. काय बरोबर बोलतेय ना मी?"

आईने फोटो दाखव म्हटलं आणि अन्वय जणू शांतच झाला. आता खऱ्या अर्थाने त्याच्या हार्ट बिट वाढल्या होत्या. तेवढ्यात निहारिका म्हणाली," दाखव ना दादा!! बघू माझ्या वहिनीला कशी दिसते? तुझ्यापेक्षा सुंदर तर नाही ना ती म्हणून दाखवत नाहीयेस ना?"

सुंदरता हा शब्द येताच अन्वय शांत झाला. अन्वय सर्विकडे बघत होता. तेही त्याच्याकडे एकटक बघत होते. अन्वयच्या तोंडाच पाणी पळाल होत आणि अन्वय घाबरतच उत्तरला," तिच्याबद्दलच काहीतरी महत्त्वाचं बोलायच आहे. जरा शांत बसा. मग म्हणाल तर फोटोही दाखवेल पण सध्या गप्प बसा."

अन्वय जरा त्रासिक स्वरात उत्तरला. अन्वय अस कधीच बोलत नसे म्हणून ते ते सर्व त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. त्यांच्या नजराना नजर देणे अन्वयला कठीण जात होते पण त्यांचा होकार येणे गरजेचे होते म्हणून चेहऱ्यावर खोट हसू आणत एकाच श्वासात म्हणाला," तुम्हाला वाटत तस काहीच नाही. जगाच्या मते ती दिसायला अजिबात सुंदर नाही. अगदी भूत, माकड म्हणून बोलतात तिला सर्व. मला विचारणार तर जगातली सर्वात सुंदर मुलगी आहे ती. ती जन्मजात कुरूप झाली नाही. तिला कुरूप बनवलं ते पुरुषी अहंकाराने. तिच्यावर ऍसिड अटॅक झाला आहे आई. मला जगाच्या विचारांची पर्वा नाही. मला हवी आहे ती. मी तिला लग्नाचं वचन देऊन आलोय मला फक्त तुमचा होकार हवा आहे. "

अन्वय एकाच श्वासात बोलून शांत झाला तर अन्वयच्या आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणात बदलले होते. एवढंच काय सर्वांच्याच बदलले होते. अन्वयने लग्नाचं सांगितलं तेव्हा जितकी शांतता नव्हती त्यापेक्षा जास्त शांतता आता जाणवत होती आणि आतापर्यँत आनंदात असलेली आई रागात उत्तरली," अन्वय नाही दिला होकार तर? नको करू लग्न म्हटलं तर?"

अन्वयने पुढच्याच क्षणी दीर्घ श्वास घेत म्हटले," मी तिला वचन दिल आहे की कुणीही विरोधात असेल तरीही तुझी साथ सोडणार नाही. त्या कुणीही शब्दात अगदि सर्वच येतात. तुलाही माहिती आहे मी माझं वचन कधीच मोडत नाही."

अन्वय बोलून गेला आणि हे ऐकताच अन्वयच्या आई रागातच उठून जाऊ लागल्या. अन्वयने पटकन त्यांचा हात पकडत म्हटले," आई अशी उठून जाऊ नकोस. मनात असेल ते पटकन बोल. ओरडायच अस तर ओरड पण अशी जाऊ नकोस. रागाव हवं तर!!"

अन्वयच्या आईनी मागे वळून बघितले. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता, डोळे लाल भडक झाले होते आणि त्या म्हणाल्या," अन्वय बोलायला तू बाकी काय ठेवलं आहेस? सर्वच तर ठरवून आला आहेस मग तुला आमच्या परवानगीची नक्की गरज काय? तुला माहिती आहे ना अन्वय मागच्या काही वर्षात मी किती सुंदर सुंदर मुलीचे स्थळ आणले पण तू काही ना काही कारण देऊन नकार दिलास. मी तेव्हाही काहीच म्हणाले नाही. तू प्रत्येक वेळी मुलींना नकार देत होतास आणि मी लोकांची बोलणी खात राहिले. नंतर-नंतर तर एक वेळ अशी आली की मला सर्वाना ओरडून सांगावं लागलं की माझ्या मुलांसाठी सर्वात सुंदर बायको आणणार आहे म्हणून मला ह्यातली एकही मुलगी आवडली नाही. हीच का रे ती सुंदर बायको? भूत, माकडासारखी दिसणारी? तुझी काय अपेक्षा आहे मी ह्या भुताला माझ्या घरी ठेवून घ्यावं आणि का फक्त माझ्या मुलाच प्रेम आहे म्हणून. तू तर तुझा निर्णय घेतलास अन्वय पण मी बोलून गेले ते शब्द कसे परत घेऊ. आता जेव्हा ते सर्व मला विचारतील तेव्हा त्यांना काय उत्तर देऊ? अस नाही वाटत अन्वय तू आम्हाला गृहीत धरतो आहेस. अन्वय तू आपल्या प्रेमासाठी माझी मान खाली झुकवली आहेस अस नाही वाटत का तुला? वरून म्हणतो आहेस की काहीतरी बोल. काय ठेवलं आहेस बोलायला तू. एका निर्णयाने माझा स्वाभिमान हिरावून घेतला आहेस हे समजतंय का तुला? अजून काही ऐकवू की हवं आहे पुन्हा. अन्वय मी आता रागात आहे तरीही एकदा विचारतेय तू पक्क लग्न करणार आहेस तिच्याशी? तुला आई हवी की बायको कारण तिला स्वीकारलं तर मी काधिच साथ देणार नाही. तेव्हा विचार करून सांग"

अन्वय काही क्षण शांत होता. त्याला काय बोलू सुचत नव्हतं आणि आईने ओरडतच विचारले," मी काय विचारते आहे अन्वय?"

आईच्या आवाजाणे घर शांत झाल आणि अन्वय घाबरतच उत्तरला," आई वचन दिले आहे मी तिला..."

त्याचे शब्द पूर्ण होण्याआधीच आई मोठ्याने ओरडत म्हणाल्या," ऑल द बेस्ट मग!! पण आधीच सांगतेय ती तुझी फक्त बायको असेल. माझी सून कधीच होणार नाही. जिच्या येण्याने माझी समाजात मान खाली झुकली जाईल, तिला मी सून कशी म्हणू? अन्वय मी तुला अडवणार नाही लग्न करायला पण हेही ठामपणे सांगते की मी तिला कधीच स्वीकारणार नाही. ह्याबाबतीत माझ्याकडून कसलीही अपेक्षा करू नकोस. तू मला दुखावलं आहेस त्या मुलीसाठी आणि मी हे कधीच विसरू शकणार नाही. मी रागात बोलत नाहीये अन्वय पण तू आईला दुखावून स्वतःचा संसार थाटतो आहेस हे कायम आठवणीत राहील."

आई रागातच बेडरूमला गेल्या. अन्वय काही क्षण शांतच झाला होता. त्याला जवळपास अंदाज होताच की असच काहीतरी होणार आहे पण अंदाज असणे आणि प्रत्यक्षात घडणे ह्यात खूप फरक असतो आणि जेव्हा ते प्रत्यक्षात घडलं तेव्हा ते सहन करण्यापलीकडच होत. त्याची नजर आता हळुवार बाबांवर गेली आणि बाबाही नाखूष होत म्हणाले," अन्वय गेल्या ५ वर्षांपासून आई- तुझ्यात मी लग्नावरून भांडण बघत आलोय. तू नकार देत राहिलास आणि आईने लोकांची बोलणी ऐकून सर्वात सुंदर मुलगी आणेन अस म्हटलं. तुला कुठली मुलगी आवडत होती तर आधी सांगायचं होतंस तस. खूप सारी स्वप्न दाखवून अचानक तोडशील तर ह्याला काय अर्थ? आज अन्वय पहिल्यांदा तू चुकला आहेस. आईला दुखावलंस तू!! हरकत नाही. तुला माझं उत्तर हवं असेल पण मी आजही शांतच राहील. मी आजही कुणाचीच बाजू घेणार नाही. जशी आधी घेत नव्हतो. तुझा लग्नाचा विचार पक्क आहे म्हणून सांगतो की मी तिला त्रास देणार नाही पण हेही सत्य की मी तिची बाजू घेणार नाही. ह्याबाबतीत तू आपल्या होणाऱ्या बायकोची बाजू घे आणि मी माझ्या बायकोची. आशा आहे तुला माझ्या निर्णयाने काहिच प्रॉब्लेम होणार नाही."

अन्वय समोर बघतच होता की बाबाही रागात उठून गेले. निहारिकाला तर कस रिऍक्ट करू कळत नव्हतं. अन्वय- निहारिका दोघेही एकमेकांना बघतच होते की आई बेडरूममधून मोठ्याने ओरडत म्हणाल्या," ए निहारिका कुठे मेलीस? ही तुझी लेक रडून माझं डोकं दुखावत आहे बघ. हिला घे आणि जमलं तर लवकर ह्या घरून जा. तो आता अशी मुलगी आणणार आहे जिला आपणच बघू शकत नाही तर ही लहान मुलगी काय बघणार. तुझ्या मुलीला काही झालं तर सासू उगाच ओरडायची आमच्यावर. येतेस की कस की तुलाही ओरडूनच सर्व ऐकायचं आहे."

आईचा आवाज येताच निहारिका धावतच गेली. अन्वय आताही तिथेच स्तब्ध मूर्तीसारखा बसून होता. त्याला नक्की काय करू काही कळत नव्हतं. त्याच डोकं क्षणभर शांत झाल होत. काही वेळेपूर्वी हसत-खेळत असणार घर क्षणात एका निर्णयाने तुटल होत आणि महत्त्वाचं म्हणजे स्वराला नक्की काय बोलावं हे त्याला समजत नव्हतं. इकडे अन्वय आपल्याच विचारात हरवला होता तर तिकडे स्वरा त्याच्या फोनची वाट बघत होती. नक्की काय असणार होती स्वरा-अन्वयची प्रेम कहाणी??

लाखो गुनाहो को एक सजा काफी है
मोहब्बत की दास्ता सुनाना अभि बाकी है
कैसे बताये उनको जवाब मेरी नाकामी का
जवाब मे उसका शहर ढेहँ जाना अब भी बाकी है..