Bhagy Dile tu Mala - 69 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ६९

हजारो की भिड मे
कोई अपना था मिला
मेरी सांसो मे बसा था वॊ
लोगोने क्यू न जाणे उसे दुष्मन कहा

ती भयानक रात्र होती. एकीकडे अन्वय आपल्याच रूममध्ये निवांत बसला होता तर दुसरीकडे स्वरा केव्हापासून त्याच्या फोनची वाट बघत होती. अन्वयला तर अंदाजही नव्हता की घरच वातावरण अचानक एवढं खराब होईल. त्याला नकार येईल हे माहिती होत पण तिची त्यापेक्षा जास्त खराब अवस्था ह्या घरात होऊ शकते ह्याचा त्याला विचारही आला नव्हता पण जेव्हा त्याने ते समोरच बघितलं तेव्हा तो एकदम शांतच झाला. त्याला आपल्याच कानावर विश्वास बसत नव्हता. अचानक त्याला लक्षात आलं की आपल्या घरचे असे वागत असतील तर बाहेरचे लोक तिच्यासोबत कसे वागले असतील? त्यांनी तर रागाच्या सीमाच ठेवल्या नसतील. तिने काय सहन केल असेल हे आता त्याच्यासमोर प्रत्यक्ष दिसू लागलं त्यामुळे तो निशब्द झाला होता. तो तिच्या सोबत नसतानाही तो तिचा प्रवास फिल करू शकत होता. लोकांचे शब्द असो की नजरा त्याला सर्वच समोरच घडत असल्याचा भास होऊ लागला होता. तो असा शांत झाला की त्यानंतर त्याची फक्त नजर बोलत होती. त्या नजरेत स्वराबद्दल प्रेम होतं, आदर होता, तिच्याबद्दल काळजी होत पण ते सर्व कुणीच बघितलं नाही. त्यांनी तिला जज केलं ते फक्त चेहऱ्यामुळे. हे सर्व त्याच्या घरातच सुरू असल्याने अन्वय आज स्वराशी कोणत्या नाकाने बोलू ह्याबद्दल सतत विचार करत होता. जागा तीच होती पण अन्वय आज वेगळा भासत होता.

रात्रीचे जवळपास ११ वाजले होते. स्वरा सायंकाळीच बाहेरून आली होती पण तीच मन काही जाग्यावर नव्हतं. अन्वय केव्हा एकदा तिला कॉल करतो अस झालं होतं पण त्याच्या फोनची वाट बघण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडे लागाव म्हणून तिने थोडा वेळ टीव्ही बघण्याचादेखील प्रयत्न केला होता पण त्याचाही काहीच फायदा झाला नव्हता. तिला आज एक-एक सेकंद जड जात होता. राहून-राहून ती घरातच चकरा मारत होती. तीच पूर्ण लक्ष मोबाइलवर होत पण मोबाइल होता की वाजायच नावच घेईना. आज ती इतकी बेचैन झाली होती की तिने जेवायलादेखील नकार दिला होता पण आईच्या हट्टासमोर तीच काहीच चाललं नाही. स्वरा कितीतरी वेळेपासून त्याच्या फोनची वाट बघत होती. बेडरूममध्येच ती इकडून तिकडे चकरा मारत होती पण अन्वयचा कॉल येण्याची काही चिन्हे दिसेना. ११ वाजून गेले तरीही कॉल आला नाही म्हणून तिच्या डोक्यात शंका- कुशंकानि स्थान निर्माण केलं आणि शेवटी हार मानून तिने त्याला कॉल केला.

इकडे अन्वय अंधारात एकटाच बसून होता. मोबाइलवर तिचा कॉल दिसला आणि अन्वयच्या लक्षात आलं की आपण आपल्या नादात तिला कॉल करायचं विसरूनच गेलो. ती टेन्शनमध्ये आली असेल. तिला आपली काळजी असेल म्हणून त्याला कॉल दिसताच त्याने आपला मूड चेंज केला आणि हळूच कॉल रिसिव्ह करत मोबाइल कानाला लावला. स्वरा आधीच नर्व्हस होती त्यामुळे पटकन बोलून गेली," अन्वय सर तुम्ही कॉल करणार होतात ना? किती वाट बघायची माणसाने. तिथे काय झालं असेल म्हणून मन घाबरत होत. तुम्हाला काळजीच नाही माझी. मी किती टेन्शन मध्ये असेल ह्याचा एकदाही विचार आला नाही ना? स्वतःहून कॉल करणार नव्हते पण तुमच्या काळजीने मन शांत बसत नव्हते. फायनली पेशन्स संपले आणि मी आता कॉल केला. अन्वय सर किती हा बेजबाबदारपणा?"

अन्वयचा आवाज जड झाला होता. त्याच्या तोंडून शब्द निघत नव्हते तरीही पूर्ण हिम्मत एकवटून तो पुढच्याच क्षणी म्हणाला," सॉरी! घरच्यांशी गप्पा मारण्यात बराच वेळ गेला शिवाय भाचीशीही खेळत होतो म्हणून विसरलो सॉरी! तुला त्रास झाला असेल माझ्यामुळे त्यासाठी सॉरी. पुन्हा नाही होणार अशी चूक."

त्याचा आवाज ऐकून स्वराच्या जीवात जीव आला आणि ती शांत होत उत्तरली," हुश्श!!! मला काही वेगळच वाटत होतं. किती घाबरले होते माहिती आहे, हातपाय पण थरथर कापत होते. नाऊ आय एम रिलॅक्स. सर्व काही ठीक आहे हे ऐकून बर वाटल."

स्वरा बोलून गेली पण अन्वय काहीच बोलला नाही. तो शांतच होता. तो स्वराशी नक्की काय बोलायचं आहे ह्याच गणित मांडत होता तर स्वरा त्याने समोरून सर्व काही सांगावं म्हणून वाट बघत होती. काही वेळा स्वराही शांतच होती पण तिचे पेशन्स संपले होते आणि नकळत ती बोलून गेली," अन्वय सर बोललात तुम्ही घरी? बोलणार होतात ना तुम्ही घरी."

स्वरा बोलून मोकळी झाली होती तर अन्वयने शांत बसनेच पसंद केले होते. दोघात पहिल्यांदाच इतकी शांतता होती कदाचित एकमेकांशी नक्की काय बोलावं ह्याबद्दल दोघांनाही अंदाज येत नव्हता. अन्वयला आता काय बोलू कळत नव्हतं पण तिला काहीतरी उत्तर देणे गरजेचे होते म्हणून घाबरतच तो बोलून गेलां," हो..!!"

अन्वयची आज अवस्था काहीशी वेगळी होती. तो पहिल्यांदा इतका घाबरला होता की त्याच्या तोंडून नीट आवाज येत नव्हते, हात-पाय कापत होते, हृदय धडधड करत होते. त्याच्या डोळ्यातून फक्त अश्रू यायचेच बाकी होते आणि स्वराने पुन्हा प्रतिप्रश्न केला," मग काय म्हणाले घरचे? "

अन्वय तिचा प्रश्न ऐकून पूर्णता शांत झाला होता. आज त्याला तिच्याशी नक्की काय बोलावं कळत नव्हतं. खर तर त्याला तिच्याशी ह्यावेळी बोलायचच नव्हत नाही तर तो पूर्ण कमजोर पडला असता पण त्याने कॉल कट केला असता तर ती टेन्शनमध्ये आली असती म्हणून डोळे मिटून दीर्घ श्वास घेत तो उत्तरला," स्वरा, स्वयम आणि त्याची आई तुला आताही स्वीकारायला तयार आहेत ना?"

आता स्वरा शांत झाली होती. अन्वय नक्की काय बोलतोय तिला समजत नव्हतं. स्वरा आपल्याच डोक्यात अन्वयच नक्की काय सुरू आहे ह्याचे अंदाज बांधू लागली होती पण त्यात तिलाही अपयश आल आणि ती दबक्या आवाजात म्हणाली," हो पण तुम्ही अस का बोलत आहात? काही घडलं का अन्वय सर? नकार आला का? बोला ना प्लिज. मला भीती वाटत आहे. काही खूपच सिरीयस झालं आहे का माझ्यामुळे? तुम्हाला खूप काही बोलले का घरचे?"

स्वरा एकावर एक प्रश्न विचारत होती आणि अन्वय जड आवाजात उत्तरला," स्वरा खोट नाही बोलणार कारण मला तुला फसवायच नाहीये. इथे मी जशी समजत होतो त्यापेक्षा परिस्थिती जरा जास्त गंभीर आहे. इथे तुला स्वीकारणं तर दूरच पण प्रत्येक क्षणी तुला त्रासच मिळणार आहे. तुला इथे त्रासाशिवाय दुसर काहिच मिळणार नाही. आदर तर दूरच पण अवहेलना मिळेल. प्रेम माहिती नाही पण रोज द्वेषयुक्त शब्द ऐकावे लागतील. स्वरा तुला जगप्रमाणे इथेही घृणाच मिळणार आहे. तुला जर आनंद मिळणारच नसेल तर माझ्यासोबत राहून देखील काय फायदा? मला तुझ्यासोबत राहायला आवडेल पण त्यासाठी तुला रोज दुःखात बघणे मला नाही जमणार स्वरा. तू पुन्हा एकदा विचार कर लग्नाचा!! तू स्वयमशी लग्न केलंस तरीही मी काही म्हणणार नाही. तू आनंदी असशील हे ऐकूनच मी आनंदी राहील पण तू इथे आलीस तर कदाचित..."

अन्वय अचानक बोलता-बोलता शांत झाला. त्याचा आवाज जड झाल्याने वातावरण गंभीर झालं होतं. त्याचे हात- पाय थरथर कापत होते, श्वासांचा आवाज तिला स्पष्ट ऐकू येत होता आणि ती मिश्किल हसत उत्तरली," अन्वय सर तुम्हाला माहिती आहे मी आयुष्यात दोनच निर्णय खूप हिमतीने आणि मनाच ऐकून घेतले. एक राजला धडा शिकविण्याचा. त्याच फळ मला मिळालं आणि आजही ते मी भोगत आहे पण मी खूप खुश आहे आणि दुसरा निर्णय मनात असलेला प्रेमाचा तिरस्कार बाजूला करून तुमच प्रेम स्वीकारण्याचा. ह्या दोन्ही निर्णयात त्रास होणार हे माहिती होत तरीही स्वतःहून स्वीकारले त्याच कारण एकच ते म्हणजे मला होणाऱ्या त्रासापेक्षा मला मिळणारा आनंद. राजबद्दल मी त्रास सहन केला पण मी माझ अस्तित्त्व गमावून त्याची झाले नाही ह्याचा आनंद आहे..मला अंदाज आहे सर तिथे काय झालं असेल. आज तुम्ही पहिल्यांदा सर्व बघत आहात ना म्हणून जरा जास्तच वाटत आहे. मी रोज सहन केलंय हे म्हणून आता मला फरक पडत नाही. मी लोकांचे बोलणं खाऊन जगत आलेच आहे सर तेव्हा तुमच्यासाठी आणखी काही लोकांचे बोलणे खायला मला काहीच वाटणार नाही. इथे ना मला त्रासापेक्षा तुमच्या सोबत असण्याचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटतो. तुम्ही कॉल करायच्या आधिच मी दुपारीच निर्धार केला की आता जे होईल त्याला सामोरे जाईल. तुमच्यासोबत हातात हात घालून चालायला आवडेल मला. मग ती साथ दुःखात असो की आनंदात. एकटीने प्रवास करून कंटाळले सर मी, मलाही साथ हवी आता तुमची. माझा त्रास कधी कमी झाला नव्हता ना पुढे होणार पण तुम्ही सोबत असणार तर आयुष्याचे काही वर्षे नक्किच चांगले जातील आणि ते क्षण मला स्वयम सोबत नाही तर तुमच्या सोबत जगायचे आहेत. त्यात मला तडजोद करायची नाही. तुम्हीच म्हणाला होतात ना की करिअर साठी एवढा संघर्ष करू शकतो तर प्रेम मिळवायला किती करायला हवा? मी तयार आहे सर सर्व सहन करायला पण तुम्हाला वाटत असेल की आपण लग्न नको करू तर मला तेही मान्य आहे पण ह्या जन्मात मी तुमच्याशिवाय कुणाचीच होणार नाही. प्रेम करत राहीन तुमच्यावर कायम. जस तुम्ही माझ्यावर केलत, तेही निस्वार्थीपणे. मी फक्त तुमची आहे. आता तुम्ही सांगा तुम्हाला काय हवंय. मला तुमचा प्रत्येक निर्णय मान्य असेल."

तिचे शब्द आले आणि काही वेळ शांतता तशीच राहिली. ती त्याच उत्तर ऐकायला आतुर होती आणि अन्वय म्हणाला," तू लग्नाला तयार असशील आणि मी नकार दिला तर माझ्यासारखा घाबरट कुणी नसेल!! प्यार किया तो डरना क्या? नाही माहिती ह्या घरात तुला होणाऱ्या त्रासाची सीमा काय असेल पण तुझ्यासोबत प्रत्येक सुख-दुःखात साथ द्यायला मी तयार आहे. मीही तुझाच आहे स्वरा. विचार करत होतो की तुला कस सांगू पण तू माझे सर्व टेन्शनच दूर केले. तू माझी आहेस आणि आता कायमस्वरूपी राहशील. मी उद्या जातोय कोर्टात अर्ज करायला. मला नाही बघायची वाट आता. तू ये लवकर."

स्वराच्या चेहऱ्यावर क्षणभरात हसू आलं आणि ती म्हणाली," मलाही वाट आहे सौ स्वरा अन्वय इनामदार होण्याची. तुमच नाव माझ्याशी जुळणे म्हणजे माझे भाग्यच. मग त्यासमोर प्रत्येक त्रास सहन करायला मी तयार आहे."

ती हसतच होती की अन्वय म्हणाला," बर चल प्रवास करून थकलो. आपण उद्या बोलू बाय गुड नाईट.. काळजी घे माझ्या बायकोची. सध्या तू घे, इकडे आल्यावर मी घेईन बाय.."

स्वराही हसतच उत्तरली," तुम्हीही घ्या स्वतःची. बाय!!"

स्वराने फोन ठेवला आणि बेडवर शांत पडली. तिच्या चेहऱ्यावर हसू- दुःखाचे संमिश्र भाव होते आणि आई आत येत उत्तरली," स्वरा मग केव्हा ठरली तारीख?"

आईच्या शब्दाने स्वराच लक्ष त्यांच्यावर गेलं आणि स्वरा हसतच उत्तरली," ते म्हणाले की उद्या कोर्टात अर्ज देतो मग एक-दीड महिन्यात कळेल तारीख.!!"

आई तिच्या बेडवर बसत म्हणाली," अरे वा!! जवळच आहे की मग तर मग आमची चिऊ लवकरच हे घर सोडून जाणार."

स्वरा काहिच बोलली नाही उलट आईच्या कुशीत पटकन शिरली. ते दोघेही सोबतच होते पण काही क्षण कुणी कुणाशीच बोललं नाही. स्वराच्या श्वासांचे आवाज येत होते. तिच्या आईला तिची स्थिती समजत होती आणि आई म्हणाली," स्वरा मी सर्व ऐकलं तुमचं बोलणं. भीती वाटतेय का बाळा तुला? वाटत असेल तर सांग मला, मी भीती दूर करू शकत नाही पण तुझी ह्याक्षणी साथ नक्कीच देऊ शकते."

आई तिच्या केसांवरून हात फेरत होत्या आणि स्वरा हळुवारपणे उत्तरली," हो आई खूप भीती वाटतेय! आजपर्यंत इतकी भीती कधीच वाटली नाही. अस नाही की मी कधी हे सर्व फेस केलं नाही पण ते सर्व माझ्यापुरतंं होत. इथे माझ्यामुळे अन्वय सरांना प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून भीती वाटते आहे. लोक मला बोलतील ते मी सहन करेन पण त्यांना माझ्यामुळे नजर खाली करावी लागली तर कदाचित मी स्वतालाच सांभाळू शकणार नाही. माझ्यामुळे ते आपल्या घरच्यांपासून कायमचे दुरावले तर काय करू मी आई?"

स्वरा बोलून शांत झाली तर आईला काय बोलू सुचेना. आपल्या लाडक्या लेकीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आज त्या आईकडे सुद्धा उत्तरे नव्हती. त्या तिला प्रेमाने कुरवाळत म्हणाल्या," मग काय विचार आहे स्वरा तुझ्या डोक्यात? तू होकार दिलास ना त्यांना मग आता काय? आता नकार देणार आहेस का?"

स्वरा आता कुशीतून उठत, आईचा हात हातात घेत बेडवर बसत म्हणाली," नाही आई आता मागे वळून बघायच नाही मला. खूप विचार केला दुसऱ्यांचा पण पहिल्यांदा स्वार्थी व्हावस वाटत आहे. अन्वय शिवाय मी जीवनाचा विचार देखील करू शकत नाही त्यामुळे त्यांच्या घरच्यांची मन जिंकण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन, माझं पूर्ण प्रेम त्यांना वाटून देईन पण त्यांच्यापासून सरांना वेगळं होऊ देणार नाही. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. खर सांगू आई आजपर्यंत मी एकटी संघर्ष करत होते तेव्हा काहीच वाटलं नाही पण आता सर सोबत आहेत म्हणून जास्त भीती वाटत नाही पण मी तुझी मुलगी आहे तेव्हा हार मानणार नाही. जिंकले तर आनंदच आहे नाही तर कदाचित इथेच माझा प्रवास संपेल. हा शेवटचा प्रयत्न आहे आई. एक तर लोकांना जिंकेल नाही तर मग मला हे शरीर सुद्धा नको."

स्वरा बोलण्याच्या ओघात बोलून गेली आणि आई मोठ्याने ओरडल्या," स्वरा…."

स्वरा पुढच्याच क्षणी आईचा हात पकडत उत्तरली," माहिती आहे तुला त्रास होतोय हे सर्व ऐकून पण शेवटी भाग्यासमोर कुणाच चालत आई. त्याला मंजूर असेल तेच होईल. काही गोष्टी कितीही मेहनत केली तरीही मिळत माहीत आई, कधीकधी भाग्याची साथ लागतेच पण आई तुझ्या ह्या मुलीच वचन आहे की मी नात निभावताना कुठलीच कमी ठेवणार नाही. मान्य की मी अन्याय सहन करत नाही पटकन बोलून देते पण आता हे जग स्वराच नवीन रूप बघणार आहे. सहनशीलता..मी सर्व सहन करेन पण अन्वय सरांना त्रास होऊ देणार नाही. मी तयार आहे माझ्या शेवटच्या प्रवासासाठी शेवटी भाग्याला जे मंजूर असेल ते होईलच. तू बघ उघड्या डोळ्याने काय लिहिल आहे तुझ्या लेकीच्या भाग्यात."

आई तिच्या चेहऱ्यावरून बोट कळकळ मोडत म्हणाली," गुणाची ग बाई माझी तू!! मला विश्वास आहे, माझी मुलगी ह्या प्रवासात जिंकेल आणि ह्यावेळी भाग्याला तिच्यासमोर हार मानावीच लागेल. स्वरा तू सर्वाना हरवून जिंकणार आहेस मला विश्वास आहे."

स्वरा क्षणभर हसली पण तिला ह्या शब्दांवर अजिबात विश्वास नव्हता कारण काहीच काळात तिने पूर्ण आयुष्य पाहिलं होतं आणि तिला कशाचीच अपेक्षा नव्हती. ती जगाला ओरडून सांगेलही पण तिला स्वतःला स्वतःच्या भाग्यावर विश्वास नव्हता. ती पुन्हा आईच्या कुशीत शांत पडली एका नव्या आशेवर कारण हिच गोष्ट होती जी सतत तिच्यासोबत होती. ह्या प्रवासात स्वरा एक तर इतिहास लिहिणार होती नाही तर मग स्वता एक कथा बनून राहणार होती. शेवटी प्रश्न एकच काय होती तिच्या भाग्याची कहाणी??

************


इकडे स्वरा प्रत्येक गोष्ट सहन करून नात निभवायला तयार झाली होती पण अन्वयने जो आज घरात नजारा बघितला होता त्यातून तो बाहेर आला नव्हता. ते सर्व अगदीच त्याच्या डोळ्यासमोर जसच्या तस उभं होत. त्याने आज फक्त प्रोमो बघितला आणि तो क्षणात घाबरून गेला. स्वरासोबत समोर-समोर काय होईल ह्या विचाराने त्याला झोप लागत नव्हती. बाहेरच्यांना तर तो हवं तेव्हा ओरडू शकत होता पण घरच्यासमोर तो काय करणार होता? स्वरासाठी तो प्रत्येक वेळी खरच तिची बाजू घेऊ शकणार होता का? आणि अस करताना त्याच्या इतर नात्यांच काय? एक नात निभवायला इतर सर्व नाती पणाला लागली होती. त्यामुळे आज त्याला झोप येणे शक्य नव्हते. आईचे शब्द आज जसेच्या तसे त्याच्या डोक्यात घट्ट बसले आणि तो स्वतःच स्वतात हरवत गेला.

रात्रीचे जवळपास ११.३० वाजले होते. तो अंधारात बसलाच होता की निहारीका दार उघडत, लाईट ऑन करत त्याच्याजवळ आली. तिला बघून तो अजूनही पुतळ्यासारखा बसून होता. निहारिका बेडवर बसताच त्याचा हात हातात घेत म्हणाली," माहिती नाही दादा तू बरोबर केलंस की नाही पण मी तुझी साथ कायम निभावेन. तुही माझी साथ कायमच निभावली आहेस तेव्हा तुला एकट सोडणार नाही मी. कायम लक्षात ठेव की ही तुझी बहीण कायम तुझ्या पाठीशी आहे. मग कुणी सोबत असो वा नसो मलाही फरक पडत नाही. आई काहीही म्हणू दे पण मला माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे हेच सांगायला मी तुझ्याकडे आलेय. प्राउड ऑफ यु दादा. तू खुप सुंदर मुलगी निवडलीस ह्याचा आदर आहे मला."

अन्वयचे आता पहिल्यांदा तिच्यावर लक्ष गेले आणि तो हळूच म्हणाला," निहारिका मला माहित आहे ते सर्व. इतकं तरी ओळखतो मी तुला पण मी काय म्हणतोय ते आधी ऐक."

निहारिका खुश होत उत्तरली," हो बोल ना दादा. तू म्हणशील तसच होईल. बोल मी काय करू तुझ्यासाठी?"

अन्वय बेडवरून उठत म्हणाला," तू ह्यात अजिबात पडू नकोस बस एवढंच कर. तू मला साथ दिलीस तर आईचा, सासूबाईंचा विरोध तुला सहन करावा लागेल आणि मला हे अजिबात आवडणार नाही. ही माझी लढाई आहे आणि मी करेन सर्व मॅनेज पण माझ्यामुळे तुम्ही विभाजित झालेलं मला अजिबात आवडणार नाही तेव्हा तू ह्या सर्वांपासून दूर राहा. तू आपल्याकडे लक्ष दे बाकी मी सर्व बघतो. वाटली गरज तर सांगेन तुला."

त्याच बोलणं होताच निहारिका रागावतच उत्तरली," पण दादा.."

अन्वय तिला पुन्हा अडवत म्हणाला," तू म्हटलस ना मी म्हणेन ते करशील. मग ऐक माझं. मी तुला रागावून काहीही सांगत नाहीये. चारही बाजूने विचार करूनच सांगतोय. वेळ पडली तर स्वतःहून मागेल तुझी मदत पण प्लिज आता नको पडू ह्यात. मी करेल सर्व ठीक. तुला आहे ना तुझ्या दादावर विश्वास?"

निहारिका उदासपणे उत्तरली," हो पूर्ण विश्वास आहे."

अन्वय पुन्हा तिला समजावत म्हणाला," मग म्हटलं तस कर आणि ऐक. आताच सृष्टीला घेऊन जायची गरज नाही. मी लग्नाचा निर्णय घेतला आहे सो लग्न नक्कीच करेन. कदाचित एक दीड महिना लागेल तिला ह्या घरात यायला, तोपर्यंत इथेच राहा. लग्नाच्या आधी मी तुला सांगेन मग घेऊन जा तू सृष्टीला, परत आणू नकोस इथे."

अन्वय जितक्या शांत राहता येईल तितक्या शांतपणे बोलत होता तर निहारिका रागातच म्हणाली," तुला काय वाटत दादा मी पण आईसारखा विचार करणारी आहे? तु आम्हाला एकाच पारड्यात मोजू पाहतो आहेस ना? पण मी नाहीये तशी. तू दुखावतो आहेस मला अस बोलून दादा. भांडण तुमचं आहे त्यात तू मला का शिक्षा देतो आहेस? माझी काय चूक ह्यात?"

अन्वय तिच्या केसांवरून हात फिरवत शांतपणे उत्तरला," नाही आहेस माहिती आहे मला पण तुझ्या आजूबाजूला लोक कसे असतील ह्याचा अंदाज मला आजच आलाय. मग ती आई असो की तुझी सासू. तू कदाचित काहिच बोलणार नाहीस पण ह्या दोघी एक संधी सोडणार नाही तुझ्या मुलींवरून स्वराला ऐकवायला आणि मला ते नकोय. ह्यासाठी म्हणतोय. समजून घे ना निहू मला तू. नाहीये ग मी सध्या उत्तर देण्याच्या स्थितीत."

निहारिका शांतपणे उत्तरली," सॉरी दादा!! तू सांगशील तेच करेन. पुढे नाही बोलणार कधीच काहीच पण माझी कधीही गरज वाटली तर सांग. मी आहे सोबत."

ती बसूनच होती की अन्वय पुन्हा तिच्याकडे बघत उत्तरला," निहू जाताना लाईट ऑफ कर आणि दार ओढून घे. आज मला एकट सोड. मला माझ्याच मनाची तयारी करायची आहे कारण उद्यापासून एक युद्ध सुरू होणार आहे आणि ते कुठे जाऊन थांबेल माझं मलाच माहिती नाही. मला आज शांत राहायच आहे."

तिला समजलं त्याला काय म्हणायचं होते म्हणून ती लगेच बाहेर निघाली. पुन्हा लाईट ऑफ झाला आणि दार बंद करत ती बाहेर पडली. क्षणात रूममध्ये काळोख झाला आणि अन्वय पुन्हा कोणत्या तरी विचारात हरवला!! ते विचार होते की युद्ध? अन्वय ह्याला युद्ध का म्हणाला होता?

त्या रात्री अन्वयला झोपच आली नाही. तो कितीतरी वेळ कसला तरी विचार करत होता. कदाचित स्वराप्रमाणे त्यानेही आज स्वतःशीच कसला तरी निर्धार केला होता. आजपर्यंत अन्वयला खूप सोपं होतं जगाशी लढून स्वराला मुक्त करणं पण आता जेव्हा त्याच्या सोबतीच्या नात्यांसोबतच त्याला संघर्ष करावा लागणार होता तेव्हा तिला मुक्त करणं अवघड जाणार होत. तो नेमका आता काय करणार होता? असाच शांत राहून तिची झालेली अवस्था बघणार होता की तो तिच्यासाठी सर्व नाती पणाला लावून भांडून करणार होता. जगाशी, घरच्यांशी संघर्ष करून तिला समाजात हक्काच स्थान मिळवुन देणार होता? हा प्रवास दोघांसाठी खास होता कारण एक निर्णय अन्वय-स्वराला सर्व काही मिळवून देऊ शकत होता तर तोच निर्णय सर्व काही हिरावुन सुद्धा घेऊ शकत होता.

*******

अन्वयला पहाटे- पहाटे झोप लागली असल्याने तो सकाळी १० च्या आसपास उठला. आज त्याच जरा डोकं जड झाला होत म्हणून तो आधी अंघोळ करायला निघाला. काहीच क्षणात तो अंघोळ करून बाहेर पोहोचला. आज घरात भयानक शांतता वाटत होती. हॉल मध्ये निहारिका सृष्टीला खेळवत होती. अन्वयने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि आईच्या रूममध्ये पोहोचला. आई बेडवर एकटीच बसून होती. अन्वय रूम मध्ये आला तरीही ती काहीच बोलली नाही. आईला शांत बघून अन्वयच म्हणाला," आई माहिती आहे माझी चूक झाली पण त्याची शिक्षा तिला नको देऊस. काल रात्री जे घरात झालं त्यावरून अंदाज आला मला समोर काय काय होऊ शकत म्हणून म्हणेन की अटलिस्ट तिच्याशी वागताना तरी माणुसकी दाखवा. भूत म्हणून चिडवू नका. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे, तिची ह्यात काहिच चूक नाही. चूक पूर्णता माझी आहे तेव्हा शिक्षा द्यायची असेल तर मला द्या. तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आई मला तुझ मत मान्य आहे पण जगातल्या फक्त काही लोकांसाठी मी माझं प्रेम विसरू शकत नाही. मी तिला शब्द दिलाय कुणीही विरोधात असेल तरीही तिची साथ निभावेन आणि तुला माहिती आहे मी माझा शब्द शेवटच्या श्वासापर्यंत निभावतो. तेव्हा मी तिच्याशीच लग्न करणार आहे आणि मी कुणाला सोडून जाणार नाही. तिच्यासोबत असताना नवऱ्याच कर्तव्य निभावेन आणि तुमच्यासोबत असताना मुलांचं. थोडस मॅनेज करून घ्याल ही अपेक्षा करतो. मी आता कोर्टमध्ये तारीख काढायला जातोय लग्नाची. मी लग्नाची तारीख तुम्हाला सांगेल बाकी तुम्ही ठरवा तुम्हाला यायचं आहे की नाही ते. येतो आई तू माझ्यामुळे दुखावली गेली आहेस त्यासाठी सॉरी."

अन्वय बोलून गेला पण त्याची आई समोर काहीच बोलली नाही आणि अन्वय लगेच रूममधून बाहेर पडला. तो हॉलमध्ये पोहोचलाच होता की निहारिका म्हणाली," दादा कुठे जातो आहेस गडबडीत? चहा, नाश्ता केला नाहीस आणि असाच निघत आहेस. जरा थाम्ब मी आलेच घेऊन."

अन्वय जरा जड आवाजातच उत्तरला," निहारिका मला कामानिमित्त बाहेर जायचं आहे. सो मी बाहेरच करेन सर्व. मला रात्रीही यायला कदाचित उशीर होईल तेव्हा रात्रीच जेवण बनवू नका. बाकी काही राहील तर मी कळवतो तुला."

अन्वय जातच होता की निहारिका उत्तरली," दादा अटलिस्ट सृष्टीला तरी घे. तुमच्या भांडणात तिला कशाला विसरतो आहेस?"

अन्वयने तिच्याकडे बघितलं. क्षणभर का होईना त्याचा मूड छान झाला. तिला हातात घेत तो म्हणाला," हाय जाण! कसा आहेस? ३-४ दिवस झाले ना आपण भेटलो नाही. तुझी तब्येत बरी नाही म्हणे. लवकर चांगली हो मग आपण मस्त खेळू. आता मी तुला मामी आणायला जातोय मग बोलू हा आपण."

अन्वयने तिला पप्पी दिली आणि पुन्हा निहारिकाच्या हातात सोपवत म्हणाला," काळजी घे हिची! काही जास्त वाटलं तर सरळ कॉल कर. लहान आहे आमच्या भांडणात तिच्यावर दुर्लक्ष नको व्हायला."

एवढंच बोलून अन्वय बाहेर पडला. त्याने कार सुरू केली आणि क्षणात पसार झाला. त्याच्या मनात एक वादळ घेऊन तो सहज वावरत होता पण आपल्या हट्टासमोर कुणाला त्याच प्रेम दिसलच नाही.

सकाळचीच वेळ. इकडे स्वरा आज लवकर उठली होती. ती फायनली अन्वयची होणार म्हणून तिचा चेहरा आनंदाने खुलला होता. तिने ही बातमी बाबांना दिली आणि पूर्ण घर कस आनंदाने बहरून निघालं. पण हे अस लग्न होत की ज्याबद्दल कुठेही बाहेर वाच्यता केली जाणार नव्हती. स्वरा आणि अन्वय एक होणार होते पण कदाचित पूर्ण जगाला त्याची खबर लागणार नव्हती. सकाळी-सकाळीच माधुरीचाही कॉल स्वराला येऊन गेला होता. स्वराच्या लग्नाची बातमी ऐकून माधुरी खुप खुश झाली होती. फायनली माधुरीने जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण झालं होतं. अन्वयने स्वराला प्रेमातच पाडल नव्हतं तर तिला आपलं नाव सुद्धा तो देणार होता. एकीकडे माधुरीच स्वप्न पूर्ण झालं होतं पण दुसरीकडे स्वयम- त्याच्या आईच स्वप्न अपूर्ण राहील होत. त्यांना कस सांगू, ते कसे रिऍक्ट करतील असे कितीतरी प्रश्न स्वरासमोर होते. तिला स्वयमला सांगणं सोपी होत पण त्याच्या आईला ती काय सांगणार होती. इथे अन्वय- स्वरा एकत्र होणार होते पण ह्या एका नात्यामुळे कितीतरी नाते वेगळे वळण घेणार होते. एका क्षणात सर्व विखरणार होत. त्यामुळे स्वरा आनंदी असूनही तिच्या चेहऱ्यावर तेज नव्हता. ती अन्वयची होणार असूनही लग्नाचा तो ग्लो तिच्या चेहऱ्यावर नव्हता ह्याला कारणीभूत होती ती सभोवतालची परिस्थिती. अन्वय असो की स्वरा पुढे काय होणार आहे हा प्रश्न दोघांच्याही मनात होता.

ती सायंकाळची वेळ होती. स्वराने अन्वयला दिवसाला खूप कॉल केले होते पण त्याने एकही उचलला नाही. ती मोबाईलवर लक्ष देऊनच होती की समोरूनच त्याचा कॉल आला आणि ती फोन रिसिव्ह करत रागावतच म्हणाली," अन्वय सर केव्हाची कॉल करते आहे. कुठे गेला होतात? तुम्हाला काही काळजी वगैरे नाही का माझी? जीव टांगणीला लागतो माझा माहिती आहे ना तुम्हाला."

अन्वय तीच बोलणं ऐकून हसतच उत्तरला," लग्नाच्या आधीच बायको बनली आहेस स्वरा तू! लग्नानंतर काही खर नाही माझ. देवा वाचव रे मला!"

अन्वयच बोलणं ऐकून स्वरा क्षणातच हसली आणि लाजतच उत्तरली," काहीच दिवसात होणार आहे मग प्रॅक्टिस नको का करायला? ते सोडा तुम्ही विषय नका बदलवू..मला सांगा कुठे होतात तुम्ही इतक्या वेळ?"

अन्वय जरा हसतच उत्तरला," मॅडम आपल्याच कामासाठी गेलो होतो. कोर्टात होतो लग्नाची तारीख घ्यायला!"

स्वराने गोड हसत विचारले," मग कोणती मिळाली तारीख?"

अन्वयनेही हसतच उत्तर दिले," विचार कर!!"

स्वरा पटकन बोलून गेली," १४ फेब्रुवारी प्रेमाचा दिवस!! बरोबर ना?"

अन्वय जरा गोड हसतच उत्तरला," हो अगदी बरोबर! देणार नव्हता पण दिले त्याला पैसे आणि घेतली तारीख. बघा इथे पण सेटिंग करावी लागली. आता फक्त एक महिना आहे आपल्या हातात. चला लागा कामाला. बरोबर १४ ला तू आणि मी नवीन प्रवासाला सुरुवात करू. दिवस प्रेमाचा असेल आणि कहाणी सुद्धा जगावेगळी. स्वरा आणि अन्वयच्या प्रेम कहाणीला ह्यापेक्षा सुंदर दिवस सापडूच शकत नाही, बरोबर ना स्वरा?"

लग्नाची बातमी ऐकून स्वराचा चेहरा खुलला. ती मोठ्याने ओरडत म्हणाली," आई १४ फेब्रुवारीला तारीख मिळाली. "
बातमी मिळताच घरात आनंदाच वातावरण निर्माण झालं. त्या आपला आनंद शेअर करतच होत्या की अन्वय म्हणाला," बर आनंद साजरा करा नंतर आधी मी काय सांगतोय ते एक."

स्वरा," हमम..बोला."

अन्वय थोडा सिरीयस होत म्हणाला," लग्नाचं करतो मी सर्व मॅनेज. तू आधी आईबाबांना दिल्ली आणायच बघ. ते तेवढ्या दूर एकटे राहिलेले मला आवडणार नाही. त्यांचं तुझ्याशिवाय कुणीच नाही सो तेही इकडे दिल्लीलाच राहतील. माझ्या ओळखीच एक अपार्टमेंट आहे जवळपास. तिथे मी बोललो आहे. राहायची सोय झाली आहे सो आता तुम्ही पटकन या इकडे."

स्वरा हळुवारपणे म्हणाली," ते नाही आले तर?"

अन्वय हसत उत्तरला," तू बोलून बघ तुझ्यासाठी ते कुठेही येतील. तरीही नाही ऐकल तर मी बोलेन. तो मोठा प्रॉब्लेम नाही. सो दोन दिवसात मुंबईला जा आणि तिकडे काही काम उरले असतील तर करून घ्या आणि हो बाबांना सांग की सामान नका आणू. मी आधीच सर्व सेट करून ठेवतो फक्त कपडे घेऊन ह्या म्हणावं. मग मिळून तयारी करू लग्नाची. "

स्वरा विचार करत उत्तरली," सर मग मी रेजीग्नेशन
टाकू का? कारण एक महिना तर मला जावं लागेल ना जॉबवर?"

अन्वय आता हसतच उत्तरला," त्याची गरज नाही. मी ट्रान्सफर करून घेतो तुझं दिल्लीला. दोन दिवसात लेटर पोहोचेल तिकडे. ते सर्व माझ्याच हातात आहे. तू फक्त पुडच्या १५ दिवसात दिल्लीला यायची तयारी कर बाकी टेन्शन घ्यायला मी आहे."

स्वरा हसतच उत्तरली," किती केअरिंग नवरा मिळाला आहे मला. लग्न करून सर्वात सुंदर काम करतेय अस वाटतय मला. इतकंच प्रेम करणार ना माझ्यावर कायम?"

अन्वय क्षणभर तिच्या बोलण्यावर हसत होता तर स्वराला न बोलताही तीच उत्तर मिळाल होत.

अन्वयने फोन ठेवला. तिचे आईबाबा मागे तिची वाट बघत होते आणि तेव्हाच आई म्हणाली," काय म्हणाले मग जावई बापू?"

स्वरा हसत उत्तरली," तुमचे जावई बापू म्हणाले की पुढच्या १५ दिवसात तुम्ही सर्व दिल्लीला येणार आहात. तुम्ही म्हणजे मी आणि तुम्ही. तेही कायमस्वरूपी. त्यांनी सर्व अरेंजमेंट केली आहे. "

आई विचार करत उत्तरल्या," आम्ही काय करणार तिकडे? इथे गावातच बेस्ट आहोत. वाटलं तर भेटायला या. "

स्वरा रागावतच उत्तरली," काय करणार म्हणजे? माझ्या अवती भवती राहणार. त्यांनी जरी म्हटलं असलं तरीही मलाही तसच वाटत. माझ्याशिवाय तुमचं कुणी नाही. तिथे असाल तर माझी काळजी मिटेल आणि जर तुम्हाला नको असेल तर मी लग्नच करणार नाही. बोला आता?"

स्वराचे बाबा हसतच म्हणाले," बर बाबा हरलो मी. येऊ आम्ही."

स्वरा जरा खडूस होत उत्तरली," गुड!! मी प्लेनचे तिकीट बुक करते आपले दोन दिवसाने. तुम्ही बॅग भरायला घ्या. बाकी काही लागणार नाही. आधी मुंबई जाऊ मग तिथून सरळ दिल्ली."

स्वरा क्षणभर शांत होती आणि आई म्हणाल्या," बर मॅडम आणखी काय हुकूम? काही असेल तर सांगा!!"

स्वरा पुन्हा खडूस होत उत्तरली," आता बस एवढंच बाकी काही राहील तर सांगते."

स्वराच उत्तर ऐकून सर्व शांत झाले आणि काहीच क्षणात सर्व हसू लागले. स्वराने आईला मिठी मारली आणि म्हणाली," किती मोठी झाली ना आपली स्वरा! मागे काही काळात आपण हिच्या लग्नाचं स्वप्न पाहनच सोडून दिलं होतं. कधी वाटलंच नव्हतं की कुणी स्वराला स्वीकारेल पण आता आपल्या मुलीचही लग्न होणार. तीही सुखाचा संसार करणार."

बाबाही जरा खुश होत उत्तरले," हो ना प्रत्येक आईवडिलांच स्वप्न असत आपल्या मुलीच लग्न पाहण्याच आणि शेवटी तो आनंद आपल्यालाही मिळणारच. दुःखाचे ढग हटले सारिका. आता आपल्याही मुलीच्या आयुष्यात आनंद येणार. खूप म्हणजे खूप आनंद येणार."

आई- वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघून स्वरा खुपच खुश झाली होती. आजपर्यंत त्यांनी तिच्यासाठी खूप काही केलं होतं पण आज तिच्यामुळे ते खुश झाले होते. ते आनंद साजरा करतच होते की स्वरा उत्तरली," हो बाबा मीही स्वप्न पाहीन, आनंदी राहीन ते फक्त अन्वय सरांमुळे. त्यांचा सारखा लाइफ पार्टनर, मुलगा सर्वानाच मिळो अशी प्रार्थना करेन. देवा असे कितीतरी अन्वय तू निर्माण कर म्हणजे कुठलीच स्वरा अपूर्ण राहणार नाही, एकटी राहणार नाही."

स्वरा आईबाबांना मिठी मारून होती आणि आई म्हणाल्या," स्वरा देवाच्या घरी उशीर होईल पण कधी ना कधी मिळतच. तो आहे ना मग कसली चिंता नाही."

मोहिते कुटुंब आज कितीतरी दिवसाने खुश होत आणि त्याच एकमेव कारण म्हणजे अन्वय. त्याने आपल्या काही जवळच्या लोकांना दुखावलं पण त्याने दिलेल्या वचनाला तो मागे हटला नाही. खर प्रेम तेच तर असत जे कुणाचाही विरोध न जुमानता केल्या जात. मग ते आपले असो की परके ह्यांनी फरक पडत नाही पण प्रश्न एकच होता आपल्या लोकांविना त्यांचा संसार खरच सुखाचा होणार होता का की स्वरा-अन्वयच्या आयुष्यात आणखी काही वेगळं वळण लिहिलं होतं.

बाट दिया है लोगो ने धर्म को
मोहब्बत को कैसे बाटोगे
कर लोगे तुम साजिश उन्हे मारणे की
वो मरकेभी अमर केहलाऐंगे..