Keval Maza Sahy Kada books and stories free download online pdf in Marathi

केवळ माझा सह्य कडा

केवळ माझा सह्य कडा :

गेले काही दिवस बरेच विषय हाताळले बऱ्याच विषयांवर बरीच चर्चा आणि काही लेख लिहिले .त्यातील बरेचसे लेख हे राजकारण आणि सामाजिक प्रश्नांशी निगडीत होते . कोणताही संवेदन शील व्यक्ती आवडी निवडी बाजूला ठेवून प्रथम सामाजिक प्रश्नांवर लक्ष देईल अशीच सध्याची अवस्था आहे . तरी देखील प्रत्येक माणसाचा एक पिंड असतो जसा मी जातीने गिर्यारोहक किंवा निसर्गप्रेमी तो पिंड ती व्यक्ती कधीच सोडत नाही , सोडू नये कारण त्यात त्याला मिळणारा खरा आनंद असतो . अश्या निखळ आनंदा मुळे माणसाचे मन आणि शरीर दोन्ही ताजे राहते . तोच एक त्याच्या साठी मार्ग असतो जो मोक्षप्राप्ती करून देऊ शकतो . लहान पणा पासून Trekking , Martial art , Wildlife ची खूप आवड . त्यानुसार आमच्या शाळेत विकास चे वर्ग चालायचे त्यात जायचो त्यात सूर्यनमस्कार , योगा , संस्कार , कराटे असा सगळ्याचा समावेश होता . व्यायाम , शिक्षण आणि बांधिलकी हि विकासची त्रिसूत्री तसच वर्षातून २/३ वेळा मामणोली , येउर , अश्या ठिकाणी वृक्षारोपण आणि राजमाची , तुंगी , भीमाशंकर अश्या ठिकाणी २/३ दिवसाचा कॅम्प असायचा . त्यात सुद्धा बऱ्याच चांगल्या गोष्टी आणि जास्त करून सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाशी जवळीक करण्यावर भर असायचा . त्या सगळ्याचे श्रेय अर्थात आमचे सर सुहास जावडेकर ह्यांना द्याव लागेल . पण त्या सगळ्याचा त्या वयात त्या बालमनावर खूप चांगला परिणाम झाला आणि का कुणास ठाऊक पण हि जंगल हा सह्याद्री आणि ह्या जंगलातले प्राणी पक्षी हे सर्व जणूकाही आपल्याच मालकीच आहे आणि त्या सगळ्याच रक्षण , सांभाळ , जतन हे सगळ करण्याची आणि हा वसा पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे कुठेतरी मनात वाटायला लागले . नंतर जस जसे वय वाढत गेले तसे मित्रांबरोबर आणि काही गिर्यारोहण संस्थां बरोबर भटकू लागलो . नवीन नवीन किल्ले रायगड , राजगड , तोरणा , राजमाची , बहिरी , रतन गड , कळसुबाई , हरिश्चंद्र गड , अलंग मदन कुलंग , सिंहगड , पुरंदर असं करता करता जवळ जवळ सह्याद्रीच पालथा घातला . त्यात राजमाची मुळे ह्या माझ्या भटकंती मध्ये खूपच फरक पडला . आज पर्यंत ५०/६० वेळा गेलो असेन पण राजमाची शी काही वेगळंच नात जडल आहे . ते शब्दात वर्णन करणे कठीण आहे . शनिवार रविवार आणि जोडून सुट्टी आली कि इथे शहरात कधी थांबलोच नाही . बऱ्याच गिर्यारोहकांचा हाच अनुभव असेल आजच्या सारखी तेंव्हा महागाई नव्हती आणि गरजाही खूप कमी होत्या कुठे हि जायचं म्हणजे एस.टी . महामंडळाच्या बस ने त्या किल्ल्याच्या किंवा त्या ठिकाणच्या पायथ्या जवळ असलेल्या गावा पर्यंत जायचं तेंव्हा आत्ता सारख्या विक्रम रिक्षा नव्हत्या आणि गाडी नी जायचं तर कधी डोक्यात सुद्धा आल नाही . मग ती बस खूप वेळा मुक्कामाला गावातच असायची आणि रात्रीची वेळ अश्या वेळी कोणाच्याही घरा बाहेरच्या पडवीत किंवा बस मध्येच चालक किंवा वाहकाला सकाळी लवकर उठवा हो असा दम देऊन आपल्याच मालकीची बस असल्या सारख झोपायचं . आणि सकाळ होताच किल्ल्याच्या दिशेने चालू पडायचं . तेंव्हा आत्ता सारख्या Branded sack आणि shoes नसायचे . किल्ल्यावर जेवणाची सोय झाली तर ठीक नाहीतर लाकड जमा करायला जायचं आणि गुपचूप जेवणाची तयारी करायची . खूप वेळा गुहेत राहायला लागायचं कातळ पाठीला लागायचा आणि थंडीत बर्फा सारखा थंड असायचा तरी पण डोक्याखाली sack घेऊन त्यावरच झोपायचं अगदीच खुमखुमी आली तर रात्री गुहेतून बाहेर पडून फिरायला जायचं . मग तेंव्हा अमावस्या असो कि पोर्णिमा आम्हाला सगळ दिसायचं . रात्री डोंगर माथ्यावर फिरण्यात काही वेगळीच मजा असते . निरभ्र आकाश असेल आणि अमवस्या असेल तर खूपच छान चांदण्या आणि आकाशगंगा , नक्षत्र सुद्धा दिसतात . ते बघताना आपण किती क्षुद्र आहोत ह्याची जाणीव होते . त्यातून रात्री कोकण कड्यावर असू तर तसच निमुटपणे आकाशा कडे बघत पडून राहायचं ... स्वर्ग सुख म्हणतात ते ह्याहून वेगळ नसेल . दिवसा उन्हाने कातडी रापे पर्यंत फिरायचं जंगलातील मेवा जांभूळ , करवंद , कैऱ्या , बोर असं मिळेल ते ओरबाडून खायचं . किल्ले बघायचे , त्यातील तटबंदी बुरुज , तोफखाना , नगारखाना आणि उरलेले अवशेष बघायचे इतिहासाशी संबंध जोडून काही काळ इतिहासात जायचं आणि सुर्यास्त बघण्या साठी परत किल्ल्याच्या टोकावर जायचं . डोंगरावरची कातरवेळ हि सगळ्यात आवडती वेळ तुम्ही कोणत्याही mood मध्ये असा पण ह्या वेळेस काही वेळ का होईना पण खिन्न वाटत एक वेगळंच feeling असत . क्षितिजावर बुडणाऱ्या त्या लालबुंद सूर्याला नमस्कार करायचा आणि परत लाकड जमा करून रात्रीच्या जेवणाची आणि Camp Fire ची तयारी करायची . गप्पा , गोष्टी , गाणी असं सगळ यथासांग झाल्यावर झोपायचं . Jumbo Trek असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून दुसऱ्या किल्ल्याच्या दिशेने चालायला लागायचं . ह्या डोंगर दऱ्या मध्ये सूर्य मावळला कि रात्र आणि उगवला कि दिवस हा नियम अजून आहे ... ! आपल्या शहरा सारख light , Television नसल्याने रात्री १० वाजता मध्य रात्र झाल्यासारखं वाटत . आणि निसर्ग नियमा प्रमाणे झोप झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी एकदम Fresh वाटत . परत दिवस चाल चाल चालायचं रात्री दुसरा किल्ला बाकी दिनक्रम तसाच काही फार फरक नसतो फक्त अजून दमल्यामुळे अजून लवकर झोप येते किंवा येत नाही मग तारे मोजत बसायचे . ह्या सगळ्यात अधून मधून किल्ले आणि जंगल संवर्धन होण्या साठी उपयुक्त अशी कामे सुद्धा केली . जंगलातील कचरा जमा करणे , किल्ल्यातील पाण्याच्या टाक्या साफ करणे इतर बरेच गिर्यारोहक अशी काम करतात आणि करायलाच पाहिजे मुळात साफसफाई करण्यापेक्षा लोकांनी कचरा किंवा दारूच्या बाटल्या ह्या जंगलात टाकता कामा नये ह्यावर भर दिला पाहिजे . पावसाळ्यात बरेच Trekker आणि काही नवशिके ट्रेक ला जातात अचानक ह्या लोकांच निसर्ग प्रेम जागृत होत . गुहेत पिण्याच्या पाण्याच्या टाक्यात जेंव्हा कांद्याची साल आणि प्लास्टिक ची पिशवी दिसते तेंव्हा तळ पायाची आग मस्तकात जाते . बहिरीला किंवा अजून काही ठिकाणी गुहेतच देवाला बळी म्हणून कोंबडा किंवा बोकड द्यायचे नंतर ती पिसं किंवा बोकडाचे काही अवशेष पाण्यात दिसायचे . एकदा आठवतंय बहिरी वरूनच येताना जंगलात कुठे पाणी नव्हतं आणि आमच्या कडच पाणी संपल होत तेंव्हा एके ठिकाणी अजगर पाण्याच्या जागी पडलेलं दिसलं आणि आम्ही त्या अजगराला बाजूला करून त्या डबक्यातल पाणी प्यायल होत ...!

आता वय आणि जबाबदारी नुसार आधी सारख फिरणं जमत नाही शरीर सुद्धा साथ देत नाही जस जमेल तसं जातो पण मन आजही गडदे च्या बहिरी मध्ये , रतन गड च्या नेढ्या मध्ये , हरिश्चंद्र च्या कोकण कड्यावर , रायगडच्या भवानी टोकावर , राजगडच्या बालेकिल्ल्यात , तोरणाच्या बुधला माचीवर , भीमाशंकर च्या शिडी घाटात , कळसुबाई च्या टोकावर , कुलंग च्या गुहेत आणि राजमाची च्या झोपडीत गुंतलेल असत .

आजकाल मुल बघतो तेंव्हा त्यांना आई ओरडते मातीत जाऊ नको , Mineral Water पीत जा बाहेर गेल्यावर , थंडी असेल तर स्वेटर घाल असं बरंच काही माझ्या आई ला हि मी एकुलता एक आज समजत तिला काळजी वाटत नसेल का माझी ? पण तिने कधी माझ्यावर बंधन नाही लादली . जाताना ती पण बोलायची पाण्यात जाऊ नकोस , हिरोगिरी करू नकोस पण नंतर तिला ह्याची जाणीव झाली कि आपला मुलगा नीट जाऊन नीट घरी येतो . त्या माझ्या आई ला हा केवळ माझा सह्य कडा समर्पित ...!

अमर जुवेकर

Mobile : 9869371363