world famous clown motel owner... biography books and stories free download online pdf in Marathi

world famous clown motel owner... biography

तो मीच विजय....

हं! तर मी विजय.... होय, मी विजयच.... माझ्या जीवनावर विजय मिळवणारा... मी विजय... मला तरी हे माझं नाव आता सार्थक झाल्यासारखं वाटतंय. अगदी सार्थ सुख-समाधान... आणि.... सारं काही.... शब्दही उणे भासत आहेत. माझ्या मनातील कप्प्यात अनेक तरंग उमटत आहेत. भावभावनांचा कल्लोळ दाटून येतो आहे. काळजातील अनेक वेदनांचा आलेख मी आठवून पाहतो आहे. त्या अस्पष्ट धूसर आठवणी का असेना? निव्वळ आठवणीचा समुद्र...

तसे पाहता समुद्र या शब्दातच अगदी माझं जीवन सामावले आहे. या भुतलावावर असलेली एकमेव ही वस्तू समुद्र... या विश्वातील सर्व मानवाच्या जीवनाला वलय देणारी ही एक मला निरामय वस्तु भासते आहे. होय समुद्र! याबाबत काय बोलावं? अथांग पाण्याचा सागर म्हणजे समुद्र. या विश्वाला व त्या भूमीला कवटाळणारा तो म्हणजेच समुद्र. खळाळणाऱ्या लाटा आणि त्यातील पाण्याचा अथांग प्रवास, अलगद किनाऱ्यावर कित्येकांना मोहवून घेतो. त्यातील उधाणे, पाण्याची वलये कित्येकांना मोहित घालतात.

मी ही त्यातलाच एक बापडा बालक होतो. या समुद्रातील चित्रानेच, दृश्याने माझ्या मनःपटलावर अनंत प्रहार केले. पुढे चालून तर त्याच्याशी गळाभेट घ्यावी. या समुद्राला आलिंगन द्यावे... होय! मला त्या समुद्राच्या पाण्याला मस्तकी लावायचं होतं. इथल्या मातीला, वाळूला नमन करायचं आणि त्याच्या पाण्यातील फेसाला..... काय नि काय वाटायचं? शब्दही उणे पडत आहेत....

होय! मला बोलायचं आहे. पण माझं हे मन, त्यातील स्मृती एवढ्या का महत्त्वाच्या आहेत. एका लहानश्या भारतीय खेड्यातील मानवाचे जगणे का एवढं छान महत्त्वाचे आहे. असो, तुमचं मत अगदी माझ्या कथेविषयी शूनेत्तर असू द्या पण मला माझ्या विषयाची गाथा आपणा समक्ष मांडून मोकळा श्वास घ्यायचा आहे....

या दुनियेतील अनेक माणसं अगदी मृतवत वागताहेत. इथलं जगणं अगदी उकिरड्यातील रहाटगाडग्यागत.... जगावं म्हणून जगणं असतं. जन्माला आलो म्हणून जसे जगता येईल तसं जगणं... ना कुठला ध्यास की मनातला विश्वास त्यांनी तरी काय करावं? या दुनियेच्या भाऊगर्दीत त्यांचे देह हरवले जाते. अगदी उरतो तो एक हाडामासाचा सांगाडा... जिवंत असूनही जगणारं मृतवत शरीर... आणि त्यातील अनेक प्रश्न, समस्या, व्याधी.... होय! सारं काही मनाला बोचणारे, तेवढेच वेदनामय... वेदना देणारे हे जीवन... फक्त यात असावा लागतो जगण्याचा ध्यास... आणि महत्त्वाकांक्षेला चुंबन घालावयास निघालेले मन....

मला तरी कुठे कळत होतं? मी ही त्यातलाच... या गर्दीच्या बाजारात जन्मास आलेला कोवळा जीव होतो... मागे वळून बघतांना, हे सारं काही स्मरतांना वाटतेय.... होय, माझी ही कहाणी आपल्याला सांगावी... अगदी मनातील भावनांचा झालेला कोंडमारा, तनकोंडी होऊन जगण्यापेक्षा, ज्या समुद्राला मी आपलं मानलं, ज्यांनी मला खूप खूप काही दिलंय, त्यालाच अर्पण करावं. आणि त्यासाठीच माझ्या जीवनातील अनेक क्षणकथा मी या समुद्राने कवेत घेतलेल्या या भूतलावावरील प्रत्येक मानवाला सांगतो आहे.

अरेच्चा! आपल्याला आता माझं काहीतरी हितगुज ऐकावं असंच वाटतंय ना! तशी ओढ निर्माण झाली असेल तर... फारच बरे! मी आपणास आता काहीतरी सांगणार आहे.... पण मला जाणीव आहे. मी काही एवढा मोठाही झालेलो नाही. मी काही कुणी सेलिब्रिटीही नाही आणी कुणीतरी मला ऐकावे असा फार महत्वाचा व्यक्तीही नाही. तरीपण मी माझ्या समाधानासाठी बोलणार आहे...

जीवनात सर्वात महत्त्वाचं असतं ते समाधानासन... शरीराच्या संपूर्ण व्याधीला निरामय बनविणारे हे आसन आहे. ते कुठल्या ग्रंथात मला तरी दिसलं नाही. पण माझ्या मनाच्या ग्रंथात एक समाधान मी प्रेम करून बसवले आहे. आणि यातूनच घडत गेला तो माझा चांगुलपणाचा एक प्रवास...

जीवनात जे-जे घडलं ते एक प्राक्तन होतं. पण जे काही घडलंय ते भल्यासाठीच... आई म्हणायची, देव करते ते भल्यासाठी... कधीतरी ऐकलं होतं... अरेच्या! माझ्या जीवनातील ती समुद्र बघण्याची ओढ... माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. अगदी माझ्याच भल्यासाठी... आणि हो, माझ्या जीवनातील संघर्षाला मी या समुद्र पाण्याच्या फेसांनी उधाण आनीत गेलो. समाधानाचे कवडसे पांघरून या भोगवट्याला मी सजवत गेलो. अगदी त्या आरसपाणी ताजमहालासारखं...

होय! तो एक प्रवास अनंताहून अनंत होईल असं कुणालाही वाटणार नव्हतं. की मलाही त्याची जाणीव नव्हती. फक्त मनातील बालपणात आलेले नैराश्य, मिळालेली कुसंगत, आणि माझ्याच कुटुंबाने मला न दिलेला आधारच तो... एवढ्यासाठीच सुरू झालेला हा प्रवास... हो पळून जाणे होते ते....

मी अगदी दहा वर्षाचा असेन. नीट आठवत नाही. त्या आठवणी आठवू पाहतोय. मी माझ्या घरातून पोबारा केला.... काय वय होतं ते? अगदी मनाला कुठलीही समज नसतांना. कुठल्याही जाणिवा, वैचारिक भूमिका समृद्ध झाल्या नसतांना मी उचललेलं पाऊल.... एक माझ्या जीवनातील अविस्मरणीय चूक...

कदाचित जीवन जगण्यापरी संपूर्ण संपणंच होतं. क्षणोक्षणी जगताना मृतवत यातनाचा टाहो होता तो... मनाची, पोटाची भूक आणि साधीशी तहान भागवण्याच्या क्षणालाही परागंदा झालेला.... होय, तो मीच विजय...

होय, या विजयाच्या कथेत आपणास नक्कीच जाणवणार आहे तो संघर्ष... होय, मी संघर्ष केला... या जगण्याशी... या जीवनाशी... मात्र हे जीवन मला हवे तसे आठवत आहे. काळाचा क्रमही सुसंगत असा लागत नाही. नव्हे कालक्रम मी मनात भरून ठेवूच शकलो नाही. कारण दैनंदिनीच्या चोवीस तासात श्वासालाही पारखा झालेला मी.... भुकेला आणि विसाव्याला पारखे झालेले माझे बालपण... ते आजतागायत जीवन.... मला जगायचं होतं... एक जगण्याची ओढ... आणि दुर्दम्य इच्छा.... यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो.