mayajaal - 19 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | मायाजाल - १९

मायाजाल - १९

मायाजाल- १९
एकदा हर्षद आॅफसमधून घरी परतत असताना त्याला प्रज्ञाची मैत्रीण- सुरेखा दिसली. त्याने तिला थांबवलं.
"प्रज्ञा बँगलोरवरून आली का ? तिचा रिझल्ट असेल --- आतापर्यंत ती यायला हवी होती--!" त्याने अधीरपणे विचारलं.
" ती गेल्या आठवड्यातच आली! रिझल्टसुद्धा लागला! उत्तम मार्क्स मिळालेयत! आता पुढे शिकणार आहे! गायनाॅकाॅलाॅजीमध्ये स्पेशलायझेशन करायचं म्हणतेय! तू अजून तिचं अभिनंदन नाही केलंस? एवढा मोठा मानसिक धक्का पचवून तिने एवढं मोठं यश मिळवलं! सोपं नाही ते! दुसरी एखादी मुलगी असती, तर खचून गेली असती! मला तर खूप कौतुक वाटतं तिचं! " सुरेखाने इत्यंभूत बातमी दिली.
"हल्ली आॅफीसमध्ये खूप काम असतं! घरी यायला रात्र होते; त्यामुळे माझी कोणाशी भेट होत नाही; आणि काही कळतही नाही! उद्या रविवार आहे. प्रत्यक्ष जाऊनच प्रज्ञाचं अभिनंदन करेन. निघू मी? उशीर होतोय!" म्हणत हर्षद तिथून निघाला.
" आल्यावर प्रज्ञाने मला फोन तरी करायला हवा होता! जाऊ दे---- उद्या प्रज्ञाकडे नक्की जायचं !" तो मनाशी म्हणत होता. प्रज्ञाला भेटण्याची चालून आलेली संधी तो सोडणार नव्हता! प्रेमाने तो एवढा आंधळा झाला होता, की प्रज्ञा त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती; हे त्याच्या लक्षातच येत नव्हतं!
*******
दुस-या दिवशी सकाळीच हर्षद प्रज्ञाकडे आला. अनिरूद्ध आणि नीनाताई शाॅपिंगला गेले होते आणि निमेश क्लासला गेला होता. प्रज्ञा एकटीच घरी होती. तिलाही काॅलेजसाठी नवीन ड्रेस खरेदी करण्यासाठी सुरेखाबरोबर बाहेर जायचं होतं, त्याची तयारी करत होती.
" अभिनंदन प्रज्ञा! तू डॉक्टर झालीस! तुझ्या जागी दुसरी कोणी असती ; तर पार खचून गेली असती-- पण तू मात्र परिस्थितीवर मात करून यश मिळवलंस! तुझं मनापासून अभिनंदन! " प्रज्ञाचं कौतुक करत तो म्हणाला. कोणी घरी नव्हतं; त्यामुळे प्रज्ञा हर्षदशी मोकळेपणाने बोलू शकत होती. तिनं ठरवलं; आज काहीही करून याला बोलतं करायचं! ती त्याच्याकडे शोधक नजरेने पाहत म्हणाली,
" तुझ्या मित्राच्या वागण्याचा परिणाम मी माझ्यावर आणि माझ्या अभ्यासावर होऊ दिला नाही. आज-काल कोण कसं वागेल याचा भरवसा देता येतो का? त्यामुळे कोणाच्या तरी कर्माची फळं आपल्याबरोबर नाहक आपल्या जवळच्या माणसांना भोगावी लागू नयेत याची काळजी घ्यावी लागते!" तिचं बोलणं ऐकून हर्षद ने मान खाली घातली. तो तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता.आपण जे काही केलं ते प्रज्ञाला कळलं तर नाही?' पण दुसऱ्या क्षणी त्याने मनाची समजूत घातली की; प्रज्ञा सहज बोलली असावी. आणि पुढे म्हणाला,
“ हो खरं आहे तु म्हणतेस ते! पण प्रत्येकाला हे जमत नाही! अधिकांश लोक कोलमडून जातात!----"
त्याला थांबवत प्रज्ञा म्हणाली,
" तुझ्यासारखा आत्महत्येचा निर्णय घेणं खूप सोपं असतं! पण ज्यांचं जग आपल्यापासून सुरू होतं; आणि आपल्यापर्यंत संपतं; त्या आपल्या माणसांचा-- आई-वडिलांचा विचार नको करायला?"
शेवटी विषय आपल्यावर येऊन थांबला; हे पाहून विषयांतर करण्यासाठी हर्षद म्हणाला,
" तुझं म्हणणं खरं आहे! माझी चूक नंतर मला कळली! पण तू मात्र इंद्रजीतच्या इथून निघून जाण्याला --- पर्यायाने इंद्रजीतला जास्त महत्व न देता ध्येय गाठलंस! खरंच-- यासाठी खूप मोठी मानसिक शक्ती लागते!"
“नको तो विषय! तू तुझं सांग! तुझी नोकरी कशी चाललीय?"
प्रज्ञाला आता इंद्रजीतचा विषय नको आहे; आणि ती आपली चौकशी करत आहे, हे पाहून हर्षदला मनातून खूप आनंद झाला. तो खुश होऊन बोलू लागला,
" उत्तम! कंपनीने माझं काम पाहून पुढचं प्रमोशनही दिलं मला! पण मी जीत सारखा फक्त स्वतःचा विचार नाही करणार! बाबांनी आणि आईने खूप हलाखीत दिवस काढले. मी आता त्यांना खूप सुखात ठेवणार आहे ! बँकेतून लोन घेऊन जवळच मोठा फ्लॅट बुक केला आहे; एक -दोन महिन्यांत ताबा मिळेल! मोठा हप्ता बसलाय; पण कंपनीने पगाराचं चांगलं पॅकेज दिल्यामुळे मला लोन फेडण्याचा काही प्राॅब्लेम नाही! एकदा ये माझा फ्लॅट पाहायला! " हर्षदला आपली हुशारी प्रज्ञाला किती सांगू; असं झालं होतं.
" तुझी आई बाबा खुप भाग्यवान आहेत की त्यांना तुझ्यासारखा हशार आणि त्यांची काळजी घेणारा मुलगा मिळाला! त्यांच्या कष्टाचं तू चीज केलंस!"
तारीफ ऐकली की माणूस बेसावध होतो; त्याचा जिभेवरचा ताबा सुटतो; हे प्रज्ञा ऐकून होती. हर्षदशी गोड बोलूनच इंद्रजीतच्या वागण्याचं कारण जाणून घ्यावं लागेल; हे तिला पक्कं माहीत होतं. ती पुढे बोलू लागली,
" याउलट इंद्रजीत वागला. तो एवढा पाषाणह्दयी असेल, असं कधीच वाटलं नव्हतं. त्याच्या स्वभावाशी हे सुसंगत नव्हतं. तो जाण्यापूर्वी मला भेटायला आला, तेव्हा त्याच्या मनावर प्रचंड दडपण आहे, हे मला जाणवत होतं. कोणाच्या दबावाखाली येऊन त्याने हा टोकाचा निर्णय घेतला, हेच मला कळत नाही. तुम्ही दोघे सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करता; तुला त्याने नक्कीच. काहीतरी सागितलं असेल!"
अजूनही इंद्रजीतविषयी प्रज्ञाच्या मनात ओलावा आहे, हे तिच्या बोलण्यावरून स्पष्टपणे जाणवत होतं. हर्षदला असूया वाटणं साहजिक होतं. तो जरा रागावून बोलू लागला,
" तुला वाटतं तसा त्याने कोणत्याही दडपणाखाली निर्णय घेतला नव्हता; तर जाणीवपूर्वक आणि व्यवस्थित योजना आखून त्याने तुला फसवलं! तुझं लग्न ठरलं; हे कळल्यावर मला जगण्यात स्वारस्य वाटत नव्हतं! मी आत्महत्येचा प्रयत्न केला! जीत जेव्हा मला भेटायला हाॅस्पिटलमध्ये आला; तेव्हा मी त्याला " माझं प्रज्ञावर खूप प्रेम आहे; तू तिला माझ्यापासून हिरावून घेतलंस; आता मला जगायचं नाही! " असं म्हणालो; त्यावेळी तो हसला आणि म्हणाला;
"मला स्वतःलाच हे लग्न नकोय! तू तुझं प्रेम मिळवायला मोकळा आहेस. मी कायमचा दूर चाललोय!"---- त्याला लग्न करून बंधनात रहायचं नव्हतं. सतत नवीन मैत्रिणी शोधणा-या जीतला तुझ्याशी लग्न करुन त्याचं स्वातंत्र्य गमावायचं नव्हतं! पण तुझ्याशी घाईने साखरपुडा झाल्यामुळे तो चांगलाच अडकला होता. या सगळ्यातून सुटण्यासाठी लंडनला कायमचं जाण्याचा निर्णय त्याने घेतला!-- इतकं सगळं होऊनही तू अजून त्याला ओळखलं नाहीस? " पण बोलताना हर्षद प्रज्ञाची नजर चुकवत होता. खोटं बोलताना प्रज्ञाकडे पहाण्याची त्याची हिंमत होत नव्हती.
त्याने एकीकडे प्रज्ञावरच्या त्याच्या प्रेमाचं मोठ्या हुशारीने सुतोवाच् केलं होतं. आणि दुसरीकडे इंद्रजीत किती उथळ स्वभावाचा आहे; हे सांगून त्याच्याविषयीचं तिचं मत बदलण्याचा प्रयत्न केला होता.
"हा नक्कीच खोटं बोलतोय! " प्रज्ञा मनाशी म्हणाली. आता तिला जीतच्या वागण्याचा उलगडा व्हायला लागला होता.एका क्षणात संपूर्ण सत्य तिच्यासमोर आलं होतं.
"म्हणजे या खोटारड्या हर्षदसाठी जीतनं ना स्वतःचा विचार केला ना माझा! हा त्याच्या जिवावर उठला होता तेव्हाही तो घाबरला नव्हता; पण ह्याने जर जीव दिला; तर आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा ठपका लागेल; या विचारानेच बहुतेक तो पापभीरू माणूस डगमगला! म्हणजेच या सर्व अनर्थाच्या मागे हाच आहे ; आणि याने किती सहजपणे प्रेमाची कबूलीही दिली!" हर्षदसमोर कडक शब्दात त्याच्या पापांचा पाढा वचावा आणि त्याची लबाडी त्याला दाखवून द्यावी, असं प्रज्ञाला मनापासून वाटत होतं पण त्याचा नाटकी स्वभाव माहीत असल्यामुळे तिने स्वतःवर ताबा ठेवला; आणि शांत राहिली. ती स्वतःला समजावत होती,
" हा खूप हुशार आहे. जर काही बोलल्यावर हा दुखावला गेला; तर परत उलटी सुलटी नाटकं करुन मलाही मानसिक दबावाखाली आणून माझ्याही नकळत लग्नासाठी माझा होकार कधी घेईल हे मलाही कळणार नाही.याच्याशी खूप सावधपणे वागलं पाहिजे."
प्रज्ञावर आपलं किती प्रेम आहे हे आपण तिच्या लक्षात आणून दिलं आहे; तिची प्रतिक्रिया काय होते, हे कळावं म्हणून हर्षद तिच्या चेह-याचं निरीक्षण करत होता पण तिचा निर्विकार चेहरा पाहून त्याचा हिरमोड झाला. तशाच निर्विकार आवाजात प्रज्ञा पुढे बोलू लागली,
" तुला कल्पना नसेल; पण मी जीतला पूर्णपणे माझ्या आयुष्यातून बाजूला केलाय! एक काळ असा होता , की निराश झाल्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार करत होते. जीतशिवाय आयुष्य, ही कल्पनाच मला सहन होत नव्हती! अाज मला कळतंय; की या सगळ्यामागे तू होतास!"
"मला तुला त्रास द्यायचा नव्हता! त्याचं खरं रूप तुझ्यासामोर आणायचं होतं----" हर्षद चाचरत म्हणाला.
त्याला थाबवत प्रज्ञा म्हणाली,
" घाबरू नकोस! मी तुला दोष देत नाही! उलट मी तुझे आभार मानते; की तुझ्यामुळे जीतचं खरं रूप माझ्यासमोर आलं! मी आता मागचं सगळं विसरून पुढची वाटचाल करण्याचा निर्णय घेतलाय. मी पुढे शिकायचं ठरवलंय! आता जीतचा विषय माझ्या दृ्ष्टीने मागे पडला आहे!" प्रज्ञा त्याची प्रेमाची कबुली आपल्या लक्षात आलं नाही, असं भासवत म्हणाली.
"प्रज्ञा!----" हर्षद तिला समजावायला सुरूवात करणार; तेवढ्यातच दरवाजातून हाक आली.
"प्रज्ञा! खरेदीला जायचंय आपल्याला! तयार आहेस नं?"
प्रज्ञाला खरेदीसाठी बाहेर घेऊन जायला सुरेखा आली होती.
"तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? साॅरी हर्षद! आमचं कालच ठरलं होतं." हर्षदच्या नजरेतली नाराजी बघून ती म्हणाली,
"तशाही आम्ही खरेदीच्या नावाखाली भटकायला जाणार आहोत; तू पण आमच्याबरोबर येऊ शकतोस! अर्थात् -- तुला वेळ असेल तर----" त्याची समजुत काढल्याप्रमाणे ती पुढे म्हणाली.
"नको तुम्ही जा! मला थोडं काम आहे!" म्हणत हर्षद उठला. बोलणं अर्धवट राहिल्यामुळे तो मनातून चिडला होता. पण आता नाइलाज होता. त्याला तिथून निघावंच लागलं.

*********** contd. -- part 20.

Rate & Review

Bramha Sutar

Bramha Sutar 5 months ago

Arun Salvi

Arun Salvi 2 years ago

Ankush

Ankush 3 years ago

Swapnil Vaishnav

Swapnil Vaishnav 3 years ago

Alka Shinde

Alka Shinde 3 years ago