मायाजाल - २० in Marathi Novel Episodes by Amita a. Salvi books and stories Free | मायाजाल - २०

मायाजाल - २०

                                                              
                                                                         
                                                                       मायाजाल- २०
       प्रज्ञाशी बोलणं चालू  असताना सुरेखा  आल्यामुळे  हर्षदला निघावं लागलं; आणि बोलणं अर्धवट राहिलं. पण आपल्या प्रेमाचं सुतोवाच् प्रज्ञाकडे केलं आहे.  ती त्यावर नक्कीच विचार करेल याविषयी त्याच्या मनात शंका नव्हती. वाट पहाण्याची त्याची तयारी होती. गेली अनेक वर्षे तो त्याचं प्रेम व्यक्त करू शकला नव्हता. आज त्याला त्याचं प्रेम  प्रज्ञासमोर प्रकट करायची संधी मिळाली होती;  हीसुद्धा त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्याच्या मनाची अनेक दिवसांची घुसमट कमी झाली होती. पण आता प्रज्ञाचं उत्तर काय असेल; याची हुरहूर त्याच्या मनाला लगली होती. एक आशेचा किरण  त्याला  दिसत  होता.  प्रज्ञाने त्याची खूप स्तुती केली होती; आणि   इंद्रजीतला तिने पूर्णपणे मनातून काढून टाकलंय!; असं म्हणाली होती.  
                                  ********
       हर्षदने ठरवलं होतं की प्रज्ञाला विचार करायला एक आठवडा द्यायचा; पण  कालपासून त्याचं मन  इतकं  बेचैन झालं होतं  की  त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं.  प्रज्ञाचा निर्णय काय असेल; या विचाराने जीव कासावीस  झाला होता; त्यामुळे  आजच  सोक्षमोक्ष लावून  टाकायचा, या निर्णयाप्रति तो आला होता.  संध्याकाळी त्याने प्रज्ञाला फोन केला. तो तिला म्हणाला, 
   "मी काल जे काही बोललो, त्यावर  तू काही  विचार  केलायस का? तू माझं प्रेम समजून घेशील; याची मला खात्री आहे! मला तुझ्याकडून लवकर उत्तर हवंय! खूप दिवस वाट पाहिली! आता माझी सहनशक्ती संपली आहे! तुझा होकारच असेल; याची मला खात्री आहे; पण तुझ्या तोंडून ऐकण्यासाठी मी अधीर झालोय!" हर्षद किती अस्वस्थ आहे, हे त्याच्या असंबद्ध बोलण्यावरून कळत होतं. 
      हर्षद कधी ना कधी हा प्रश्न विचारणार हे काल प्रज्ञाच्या लक्षात आलं होतं. काय उत्तर द्यायचं हे सुद्धा तिनं ठरवलं होतं. त्यामुळे ती लगेच म्हणाली,
     "मी कालच तुला सांगितलं; की आता जीतला मी विसरून गेले आहे!  मला अजून खूप शिकायचं आहे! मी पुढे स्पेशलायझेशन करायचं ठरवलंय; त्यामुळे काही वर्षे माझा लग्नाचा विचार नाही. एवढ्यात लग्न करून मला माझं शिक्षण थांबवायचं नाही! माझी वाट पाहू नकोस!  तुला माझ्यापेक्षाही चांगली जोडीदार  मिळेल! " एका झटक्यात हर्षदला नकार द्यायचा पण त्याला दुखवायचं नाही; हे तिने ठरवूनच ठेवलं होतं.
   "जोडीदार म्हणून मी तुझ्या जागी कोणालाच पाहू शकत नाही! तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस!" तिच्या स्पष्ट नकाराने हर्षद हबकला होता. 
   "प्लीज माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नको! तुला मी नेहमीच माझा चांगला मित्र मानत आले; पण ह्या नजरेने मी कधीच तुझ्याकडे पाहिलं नाही! आपली मैत्री नेहमीच राहील; पण प्लीज, हा विषय पुन्हा माझ्याकडे काढू नकोस!" प्रज्ञाने त्याला स्पष्ट शब्दात समज दिली.
  पण हर्षद हार मानणा-यांपैकी  नव्हता.
 " आपण फोनवर बोलण्यापेक्षा भेटून बोलूया का?  मला थोड्या वेळाने आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये भेटशील? आपल्या मैत्रीची शपथ आहे तुला! नक्की ये! मी तुझी वाट पहातो." आणि त्याने फोन खाली ठेवला. प्रज्ञा कदाचित् भेटायला नाही म्हणेल; या भितीने त्याने तिला काही बोलायला त्याने अवसर दिला नाही. 
"ती नक्की येईल! आणि मी तिला माझं प्रेम पटवून देईन! लग्नासाठीही राजी करेन. इंद्रजीतपेक्षा काय कमी आहे माझ्यात? " तो आत्मविश्वासाने मनाशी म्हणाला.  
     गार्डनमध्ये हर्षदला बराच वेळ वाट पहावी लागली. संध्याकाळ सरून सूर्यास्त झाला  पण प्रज्ञा आली नाही.
 " थोड्याच वेळात रात्र होईल; प्रज्ञा येईल असं वाटत नाही. तिला माझी  पर्वा आहे;  असं दिसत नाही. काल मी जीव तोडून बोलत होतो; पण तिची  प्रतिक्रिया  थंड  होती!  तेव्हाच मी ओळखायला हवं होतं! माझं नशीबच वाईट आहे. एवढा  आटापिटा  केला, पण  काहीही  उपयोग  झाला नाही. " तो नशिबाला दोष देऊ लागला.
      पण गेटवर प्रज्ञाला पहाताच त्याचा चेहरा खुलला. प्रज्ञा खूप थकलेली दिसत होती. बहुतेक  बाहेरून आली होती.  गुलाबी संधिप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. हिरव्या पंजाबी  ड्रेसमध्ये ती  सुंदर गुलाबाच्या कळीप्रमाणे भासत होती. हर्षद भान  विसरून तिच्याकडे  पहात होता.
 " मी काहीही करून तिला माझ्या प्रेमाचा स्वीकार करायला भाग पाडेन!  हे सौंदर्य माझं झालंच पाहिजे! ती  बाहेरून आली आहे; म्हणून  तिला एवढा वेळ लागला! मी उगाच घाबरलो होतो! फोन केला; तेव्हा ती कुठून बोलतेय हे सुद्धा विचारलं नाही!" त्याचा आत्मविश्वास आता परत आला होता..
      "तुला बराच वेळ वाट पहावी लागली का? मला आज हाॅस्पिटलमध्ये बोलावून घेतलं होतं. पुढच्या आठवड्यात इन्टर्न म्हणून मी तिथे काम सुरू करणार आहे; काही फाॅर्मलिटीज पूर्ण करायच्या होत्या!  मी घरी येत होते तेव्हा वाटेतच तुझा फोन आला. मी तुला सांगणार होते; की मला पोहोचायला थोडा वेळ लागेल. पण त्याआधीच तू फोन ठेऊन दिलास. तुला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण रेंज मिळत नव्हती. मला वाटत होतं, इतक्यात  तू बहुतेक वाट बघून निघून गेला असशील!" 
"हो! आता मला शंका आली  होती; की तू येणार नाहीस! आता निघणारच होतो! बरं झालं; तेवढ्यात तू आलीस! " हर्षद तिला बाकावर बसण्याची खूण करत म्हणाला.
"बोल! कशासाठी बोलावलंस मला?" निर्भयपणे हर्षदच्या नजरेला नजर देत प्रज्ञाने विचारलं. 
जणू  काही  नजरेने, " तुझे डावपेच  जीतकडे  चालले;  माझ्याकडे  चालणार नाहीत"; असंच सुचवण्याचा प्रयत्न ती करत होती. मनातून ती खुप सावध होती.
 "हा हर्षद एवढा हुशार आहे, की त्याने इंद्रजीतसारख्या स्मार्ट मुलाला शह दिला! मला तर बोलता बोलता गुंडाळून ठेऊ शकतो. स्वतःचं लक्ष्य साध्य करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो. तो गोड बोलून आणि भावनांचा हवाला देऊन  मला कधी स्वतःचं म्हणणं मान्य करायला लावेल; सांगता येत नाही. मला सावध राहिलं पाहिजे!" ती स्वतःला बजावत होती.
  " तू  तुझ्या निर्णयाचा फेरविचार करावास असं  मला  वाटतं. तूला जर पुढे शिकायचं आहे, म्हणून लग्न करायचं नसेल; तर तुला  पुढे शिकण्यासाठी मी  पूर्ण सहकार्य करेन. तुला शिक्षण पूर्ण होईपर्यंत  लग्न करायचं नसेल; तरीही हरकत नाही, मी थांबेन तुझ्यासाठी! पण नाही  म्हणू  नकोस! माझं प्रेम नाकारू नकोस!" हर्षद जरा थांबून प्रज्ञाची प्रतिक्रिया अजमावून  पुढे बोलू लागला, 
    " तुझ्याशिवाय इतर कुठल्याही मुलीचा विचार कधीच माझ्या मनात आला नाही. तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. मी गरीब घरातला मुलगा होतो! तुझा हात मागण्याची योग्यता माझ्याकडे नव्हती. पण रात्रंदिवस अभ्यास केला. खूप शिकलो. चांगली नोकरी --चांगलं घर सर्व काही मिळवलं--- फक्त तुझ्यासाठी. --- तू जर मला नकार दिलास तर माझ्या या सर्व धडपडीला काहीच अर्थ उरणार नाही. आणि तू जर अजूनही  जीतची वाट पहात असशील तर ते निरर्थक आहे.  आता त्याला विसरून आयुष्याची वाटचाल नव्याने करण्याची तुला गरज आहे.  तुझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि करिअरसाठी  मी नेहमीच  तुझ्या पाठीशी उभा राहीन. तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर अापण लग्न करू! तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल! फक्त माझ्या प्रेमाचा स्वीकार कर!"  प्रज्ञाच्या मनाचा अंदाज घेत  तिला आपलं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न हर्षद करत होता. ही आपल्याला मिळालेली शेवटची संधी आहे, हे त्याला माहीत होते, त्यामुळे  आपलं म्हणणं प्रज्ञाच्या गळी उतरवण्याचा तो जीव तोडून  प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून कोणाचंही मन विरघळलं असतं! पण प्रज्ञा हे सगळं होणार; हे गृहित धरून आली होती.
      काही न बोलता त्याचं बोलणं ऐकत होती! हे सगळं  तो  बोलणार  याचा अंदाज तिला होता; पण हर्षदचा खरा चेहरा प्रज्ञाने ओळखलेला होता. त्याला होकार द्यायचा प्रश्नच नव्हता. फक्त त्याला  न  दुखवता कसं समजवायचं हा विचार प्रज्ञा करत होती. तो जरा थांबताच तिने  बोलायला सुरुवात केली. 
" मी तुला कालच सांगितलं; जीतचा विचार मी कधीच मनातून काढून टाकलाय. मी आता माझं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेय! आणि तुझ्यात काही कमतरता आहे; म्हणून मी तुला नाही म्हणतेय, हा गैरसमज डोक्यातून काढून टाक. तुझ्यासारखा हुशार आणि स्मार्ट जोडीदार भाग्याने मिळतो; पण तुझ्याकडे मी नेहमीच माझा चांगला मित्र म्हणून पाहिलं!." तिचा स्वर शांत होता; आणि  तिच्या मनात कोणतीही दुविधा नव्हती. ती अत्यंत स्पष्ट शब्दात बोलत होती. 

                                                                    **********                 contd---- part २१