Vibhajan - 10 books and stories free download online pdf in Marathi

विभाजन - 10

विभाजन

(कादंबरी)

(10)

यूसुफ त्या लहानग्याचं नाव. तो लहान होता. त्यानंही ते शव पाहिले होते. त्याला धर्म म्हणजे काय?हे समजत नव्हतं. कशासाठी हे मुडदे पाडले हे त्यालाही समजत नव्हतं. तसा तो शव पाहात असतांना त्याची बहिण झरीनानं रडत रडत त्याचा हात धरला व खिचत खिचत त्याला नेवू लागली. तसा तो म्हणाला,

"दिदी, आपण कुठे चाललोय? अन् हे शव का बरं?"

"आपल्याले लपाले हवं. "

"पण कावून?"

युसूफला न उमगल्यानं तो बोलला होता. तशी झरीना म्हणाली,

"युसूफ चूप बैस. ते आंदोलन कारी आपल्याला मारुन टाकतीन. "

"कोण गं ताई?"

तसा आपला एक हात झरीनानं त्याच्या तोंडावर ठेवला. तशी ती म्हणाली,

"मी समदं सांगीन तुले. पण आतं चूप बस. "

युसूफ चूप बसला. तिही चूप बसली. तशी काही वेळानं ती आलेली माणसं निघून गेली.

आंदोलन कारींनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. पण गावातील लोकांनी तिला आपल्या घरात लपवले. तसा थोडा वेळ गेला.

रक्ताची विभागणी........ रक्त....... आज रक्तालाही भाव आला होता. रक्तात काही एक फरक नव्हता. कोणाचं रक्त ओळखता येत नव्हतं. हे हिंदूंचं की मुसलमानांचं? रक्तात काही फरक नव्हता. कोणाचं रक्त लाल तर कोणाचं रक्त निळं नव्हतं. एकच रक्त होतं लाल. त्या रक्तासाठी रक्ताचे असे पाट वाहाणं बरं नव्हतं.

ही आग कोणी लावली होती?कुणास ठाऊक?पण देशात अशी धर्माच्या नावावर कितीतरी माणसं कापली जात होती. सरेआम शवांचा खच पडत होता. नातेवाईकालाही संपूर्ण समाज पारखा झाला होता. आपली स्वतःची पोरं न ओळखता प्रत्येकजण आपआपला जीव वाचविण्याचा विचार करीत होता. प्रयत्नही करीत होता. बापाच्या देवदेखत लेकराचा जीव जात होता. तोही तडपत तडपत. पण बापही काही करु शकत नव्हता. तसेच मायबापांसमोर सख्ख्या मुलींची इज्जत लुटली जात होती. त्यावर मायबापही स्व नजरेनं पाहण्याखेरीज काहीही करु शकत नव्हते. ती जीवांच्या आकांताने ओरडत असली तरी.

मायभुमी..... ज्या मायभुमीसाठी भारतमातेची लेकरं लढ लढ लढली. इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी ज्या भारतमातेच्या लेकरांनी हसता हसता प्राण दिले. पण हिंदू मुसलमान हा भेदभाव पाळला नाही. ती भारतमातेची लेकरं एकमेकांच्या जीवावर उठली होती. आव न पाहता ताव न पाहता मारत होती. मग काय जीवाच्या आकांताने लोक आपला जीव वाचविण्यासाठी लपत होती. कोण केव्हा तलवार घेवून येवून केव्हा ती तलवार आपल्या पोटात टाकेल याचा काही नेम नव्हता.

हिंदू आणि मुसलमान हा मुळात वाद. इंग्रज भारतात येण्यापुर्वी. इथल्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदूंना छळले होते. या भारतात असणारा सोनानाणा लुटून नेला होता. तसेच या देशात असलेलं मंदीर पाडलं होतं. त्या जागी मज्जीद मांडल्या होत्या. बौद्ध लेणीही तोडली होती. त्या जागीही मज्जीदी बांधल्या होत्या. जाणीनबुजून इथल्या सामान्य लोकांना मुस्लिम बनवले होते. तेव्हापासूनच वाद उफानत होता. यात सामान्य लोकांना काही घेणं देणं नव्हतं. पण राज्यकर्त्यांच्या बेबनावपणामुळं भाऊ भाऊ म्हणणारी मंडळी ही क्षणातच आज प्रेमाला पारखी झाली होती, भारत-पाकिस्तान दोन सख्खे भाऊ. हिंदुस्तान नावाच्या मायबापाच्या उदरातून जन्मलेली दोन अपत्ये. एकाचं नाव भारत तर दुसऱ्याचे नाव पाकिस्तान ठेवलं होतं. मग भारतात हिंदूंनी व पाकिस्तानात मुसलमानांनी राहावं असं ठरलं होतं. पण सामान्य माणसांना ते कळलं नसल्याने ते स्थलांतर करीत होते. तर काहीजण स्थलांतर करीत नव्हते. सर्वत्र संभ्रम निर्माण झाल्यामुळे काही मुस्लीम पाकिस्तान मध्ये स्थलांतर करीत होते, तर काही मुस्लीम भारतात स्थलांतर करीत होते. हे सर्व घडलं होतं, मुस्लीम नेत्यांच्या बोलण्यामुळं. आम्हाला स्वतंत्र राज्य म्हणून वेगळा पाकिस्तान मागितला होता.

भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी इथल्या भारतीय नेत्यांना फार मोठा त्याग करावा लागला होता. कित्येक क्रांतिकारक लढले. शहीदही झाले. त्यात हिंदूच नाही तर मुसलमान होते. त्यांची नावे इतिहासात अद्यापही नव्हती. पण त्यांच्याच असीम त्यागानं आज भारतच नाही तर पाकिस्तानही स्वतंत्र्य झाला होता.

थोड्याच वेळात झरीनाला आपल्या आईबाबांची आठवण आली. तशी ती युसूफला घेवून आपल्या घरी आली. तर पाहते काय? मायबापाच्या चिंधड्या उडालेल्या होत्या. एका बाजूला बाप मरुन पडला होता तर दुस-या बाजूला माय. दोघंही रक्ताच्या पडले होते. त्यांना हिंदूंनी मारलं की मुसलमानांनी ते पता चाललं नव्हतं. पण ज्या माणसांनी ठार केलं. ती आपलीच माणसं होती. ती माणसं... ... . ज्यांनी स्वातंत्र्य मिळवायला मदत केली नसेल. कारण त्यांनी जर स्वातंत्र्यासाठी अपार मेहनत घेतली असती तर त्यांनी अशा निरपराध माणसांना यमसदनी पोहोचवलंच नसतं.

झरीनानं आपल्या आईबापाला जसं त्या रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. आपोआपच तिच्या डोळ्यातून अश्रू फुटले. तसा युसूफ म्हणाला,

"ताई, का रडतेस?"

लहानग्या भावाचा बोलका प्रश्न. त्याला मायबाप जरी मेले तरी ते कळत नव्हतं. तसं झरीनानं त्याला छाटीशी कवटाळलं व ती परत ओक्साबोक्सी रडायला लागली. तशी आजुबाजूची माणसं गोळा होवू लागली. तिही रडू लागली.

तो मुसलमानी समुदाय पार नेस्तनाबूत झाला होता. नव्हे तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या हिंदूंनाही त्या टोळीनं मारुन टाकलं होतं. ते हिंदू नव्हते तर हिंदूंच्या नावावर कलंकीत झालेले हिंदूवेडे होते. कारण हिंदूंचा मुळ स्वभाव सहिष्णू होता. मग ते कातिल झाले कसे?

मोहम्मद व शफिनाच्या मृत्यूनं युसूफची एक पिढी गारद झाली. त्याची मैय्यत आटोपली. त्यानंतर युसूफच्या पालनपोषणाची जबाबदारी झरीनावर आली.

झरीना काम करीत होती. त्याचबरोबर आपला भाऊ युसूफचंही पालनपोषण करीत होती. युसूफच्या पालनपोषण करीत असतांना झरीना त्याचं शिक्षणही करीत होती. तसा तो लहानाचा मोठा होत होता.

म. गांधीची हत्या झाली होती. पण महात्माजींच्या बोलण्यातून झरीना काही पाकिस्तानात गेली नाही. तिच्या वडीलांप्रमाणे तिलाही गावातील हिंदू कुटूंबाने सांभाळले. नव्हे तर सर्व प्रकारची मदतही केली.

आज युसूफ लहानाचा मोठा झाला होता. तो शिकला होता. त्याचबरोबर त्याला बापाच्या हत्येची माहीती झाली होती. आज त्याला गावातीलच हिंदू परीवाराने मदत केली होती. त्याच्या मनात त्याच्या बापाच्या हत्येचं खुळ होतं. त्याच्या बापाला हिंदूंनी मारलं की मुसलमानांनं हे माहीत जरी झालं नसलं तरी युसूफच्या मनात आज हिंदूंबद्दल श्रद्धा निर्माण झाली होती. तसेच त्या पाकिस्तानबद्दलही नफरत निर्माण झाली होती. ज्या पाकिस्तानच्या निर्मीतीनं त्याच्या मायबापाचा बळी घेतला होता. त्याच्या दुधाचे ओठ सुकू न देता... ... ...

भारत स्वतंत्र झाला तरी स्वातंत्र्य लढा अद्याप संपलेला नव्हता. भारतात अनेक संस्थाने होती. त्या संस्थांनांना भारतात सामील होण्याच्या किंवा स्वतंत्र राहण्याचा हक्क मिळालेला होता. त्यामुळे अखंड भारताचे राष्ट्रीय सभेचे स्वप्न अपुरे राहिले होते संस्थाने स्वतंत्र राहिल्यामुळे भारताचे अनेक तुकडे पडणार होते. पोर्तुगीज आणि फ्रेंच सत्तांनी भारतातील काही भागावरील सत्ता सोडून दिलेली नव्हती. पण हे प्रश्न भारताने खंबीरपणे सोडवले. भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर संस्थाने होती. असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानांमध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली असताना प्रजा मंडळ स्थापन होऊ लागली. प्रजा मंडळ म्हणजे संस्थानातील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या संघटना होत्या. १९२७ मध्ये अशा प्रजा मंडळांची मिळून अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली. त्यामुळे संघटनांमधील चळवळीला चालना मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थानाच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुसद्दीपणे मार्ग काढला. त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सामील नामा तयार केला. भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. हैदराबाद व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. विलीनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी कणखर भूमिका घेऊन सोडवला.

जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता. त्यांच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला. त्यानंतर १९४८ च्या फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले. हैदराबाद हे भारतातील संस्थान मोठे संस्थान होते. त्यामध्ये तेलगू, कन्नड, मराठी भाषा प्रांत होते. त्या ठिकाणी निजामाची एकतंत्री राजवट होती. तेथे नागरी व राजकीय लोकांच्या हक्काचा अभाव होता. आपले हक्क मिळविण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेने तेलंगण भागात आंध्रा परिषद, मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केल्या. १९३८ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. निजामाने या संघटनेवर बंदी घातली. हैदराबाद स्टेट काँग्रेस ला मान्यता मिळविण्यासाठी व लोकशाही हक्कासाठी लढा सुरू झाला. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. त्यांना नारायण रेड्डी, सिराज उल् हसन तिरमिजी यांची साथ लाभली. ते निष्ठावान अनुयायी होते.

१९४७ च्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला. मात्र निजामाने भारत विरोधी धोरण स्वीकारले. तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला. निजामाच्या सहकारी कासीम रझवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी रजाकार नावाची संघटना स्थापन केली व त्यांच्या साथीदारांनी हिंदूच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार केले. त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागले. निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते. परंतु निजाम दाद देत नव्हता. भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. याला ऑपरेशन पोलो असे नाव होते. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला. हैदराबाद संस्थान भारतात विलिन झाले. संस्थानी प्रजेचा लढा यशस्वी झाला. या लढ्यात आर्य समाजाचे योगदान होते.

या लढ्यात भाग स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंद भाई श्राफ, अनंत भालेराव, आशाताई वाघमारे इत्यादींनी मौलिक योगदान दिले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील मराठवाड्याचे योगदान पाहता त्यांचे योगदान अतिशय वाखाणण्याजोगे आहे. वंदे मातरम चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले. तसेच हैदराबाद मुक्तिसंग्रामात वेदप्रकाश शामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, अब्दुल्लाखान इत्यादींनी हौतात्म पत्करले. त्यांचे बलिदान भारतीयांना प्रेरणादायी ठरले आहे. यावरून हैदराबादच्या मुक्ती लढ्यात मराठवाड्यातील नेत्यांचा व त्यांच्या सहका-यांचा सिंहाचा वाटा होता हे लक्षात येते. १७ सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश १५ ऑगस्ट १९४७ मध्ये झालेला नव्हता. हा प्रदेश १९४८ मध्ये जनतेच्या स्फुर्तीदायी लढ्यानंतर स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आला.

काश्मीर प्रश्न सुद्धा खूप मोठा गंभीर प्रश्न होता. काश्मीर संस्थानांचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते. काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याच्या पाकिस्तानचा डाव होता. यासाठी पाकिस्तान हरिसिंग वर दडपण आणत होते. १९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. तेव्हा हरीसिंगाने भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. अशा प्रकारे भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले. लष्कराने काश्मीर मोठा भाग त्याच्या हातून परत मिळवला. काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला.