दिलदार कजरी - 16 in Marathi Novel Episodes by Nitin More books and stories Free | दिलदार कजरी - 16

दिलदार कजरी - 16

१६

हरिनाथ मास्तरांची भेट

आपल्या तंबूत दिलदार पोहोचला. सारा वृत्तांत समशेरच्या कानी घातला तेव्हा दिलदारला थोडे हलके वाटायला लागले. दोघांची गहन खलबतं झाली.

त्या दिवशी रात्री कजरीच्या गावात घोड्यांच्या टापांचा आवाज घुमला. सारी घरे आतून कड्याकोयंडे लावून चिडीचुप्प झाली. फक्त वाड्याच्या माडीवरून एका कवाडाला किलकिले करून कजरी पाहात होती. दोन घोड्यांवरून दोन जण चाललेले.. तिचा अंदाज खरा होता. त्यातील एक तोच पोस्टमन होता..

घोड्यावरून स्वार दिलदार विचारात पडलेला.. गुरूजी कजरीला काय सांगतील? पोस्टमन नि दिलदार .. दोघांबद्दल. आणि अजून काही.. त्यांना पळवून नेले त्याबद्दल .. पण आता इलाज नव्हता. जे जे होईल ते ते पहावे म्हणत दिलदार घोडा हाकीत होता. कजरीच्या गावातून टापांचा आवाज नाहीसा झाला. सारे गाव सुटकेचा निश्वास टाकत उठून जागे झाले नि डाकूंच्या टोळीबद्दल चर्चा करत राहिले. कजरी आपल्या अंथरूणात विचारात मग्न पडून राहिली.

दिलदार आणि समशेर गावाबाहेर घोडे सोडून हरिनाथ मास्तरांच्या गावात शिरले. सकाळी सकाळी मास्तर उठून प्रार्थना करत होते. दोघांना पाहताच ते एकदम दचकले..

"नमस्कार गुरूजी.."

दोघे त्यांच्या पाया पडले.

"तुम्ही? काय इकडे कुणीकडे? नवीन काही शिकायचेय?"

"काय सांगू गुरूजी .."

"काहीच नको सांगूस बाकी. ज्या कामासाठी आलास ते सांग."

"कजरी.."

"वा! भेटली तुला? पुढे काय? कुठवर प्रगती?"

"नाही गुरूजी. म्हणजे होय गुरूजी."

"नाही आणि होय एकावेळीस? घाबरू नकोस. हा समशेर डाकू बरोबर असताना घाबरण्याची गरज काय? हो की नाही समशेर?"

"गुरूजी तुम्ही पण.."

समशेरला काय बोलावे कळेना.

"बोल दिलदार .."

"मी आज पोस्टमन म्हणून आलोय गुरूजी .."

"पोस्टमन?"

"होय गुरूजी.."

"तू पोस्टात कधी लागलास?"

"नाही गुरूजी.. हा पोस्टात नसलेला पोस्टमन आहे.. म्हणजे फक्त एका माणसासाठी पोस्टमनचे काम करतो.. माणूस म्हणजे ती .. कजरी.."

"म्हणजे तू म्हणालास ते करून दाखवलेस.."

"नुसते करून दाखवले नाही. हा रोज चकरा मारतोय सायकलीवरून. चिठ्ठ्या लिहितोय.. स्वतःच स्वतःच्या चिठ्ठ्या पोस्टमन बनून देऊन येतो.."

"पण इकडे कसा काय?"

"चिठ्ठी घेऊन.."

"माझ्यासाठी? तुला पाठवले तिने?"

"काय आहे गुरूजी, तिला ह्याने सांगितलेय की हा हरिनामपुरातला पोस्टमन आहे. मित्राची चिठ्ठी द्यायला खास रोज कजरीच्या गावी जातो.."

"छान. चांगलीच मजल मारलीय.."

"गुरूजी, तुमच्या विद्यार्थिनीने चिठ्ठी दिलीय .. ती द्यायला आलोय."

"अरे वा! कजरीबेटीची चिठ्ठी?"

"तुम्हाला कसे कळले कजरीची चिठ्ठी?"

"तू अजून कोणाची आणणार? माझीच विद्यार्थिनी ती. हुशार आहे खूप.."

"होय गुरूजी."

"छान. इतक्यात तुला पत्ता लागला तिच्या हुशारीचा?"

"होय गुरूजी.."

"काय म्हणतेय?"

"ते नाही ठाऊक गुरूजी .. पण तिला कळलेय तुमचे अपहरण झालेले ते .. त्याबद्दल असणार.. असं म्हणाली ती .."

मास्तरांनी चिठ्ठी हातात घेतली. वाचून झाल्यावर म्हणाले,"तू वाचलेस, तिने काय लिहिले ते?"

"नाही गुरूजी. मी डाकिया फक्त. अशा चिठ्ठ्या कशा वाचेन?"

"सगळे ठीक आहे म्हणून सांग तिला.."

"तुम्ही चिठ्ठी द्याल तर ती घेऊन ये म्हणाली ती.."

"चिठ्ठी कशाला? पण हुशार आहे कजरीबेटी.. आणि चांगलीही. इतक्या वर्षांनंतर ही विसरली नाही. आठवण ठेवली तिने .."

"म्हणजे तुम्ही तिला माझ्याबद्दल काही सांगणार नाहीत. मला वाटलं चिठ्ठीत लिहून काही .."

"दिलदार .. मी तसे काहीच करणार नाही. ती तशी हुशार आहेच."

मास्तरांना दिलदारने परत आपली गोष्ट विस्ताराने सांगितली. पोस्टमन बनून तो तिला भेटतो कसा हे नि बोलण्याच्या ओघात अगदी ते ज्योतिषी बनण्याचे सोंग कसे घेतले हे ही.

"कमाल आहे दिलदार तुझी. आणि त्यासाठी परत अजून दोघांना पळवून आणलेस?"

"तो नाही म्हणत होता गुरूजी. मी म्हटले पळवून आणू. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पण कोणाला कसलीच इजा न करता. दुसऱ्या दिवशी दोघे आपल्या घरी .."

"म्हणून एकदम ज्योतिषी बनलास तू?"

"आणि काय करणार गुरूजी..? मला वाटले कजरीला तिच्या घरच्यांनी घरात बंद करून ठेवलेले.."

"का?"

"माझी पहिली चिठ्ठी लागली असेल हाती तर .."

"गुरूजी .. कैद में है बुलबुल म्हणत होता हा.."

"म्हणून म्हटले एकदा घरात शिरूनच पहावे. पुजाऱ्याच्या घरी जाईल तो ज्योतिषीच.."

"एकूण दिलदार तू चांगलाच गुंतला आहेस .. आनंद आहे.. आणि कजरी चांगली मुलगी आहे.."

"आणि मी?" दिलदार निरागसपणे विचारता झाला.

"वाल्याचा वाल्मिकी होतो.. तू मुळात वाल्या नाहीस ..नव्हतास. बाकी मी काय सांगू .."

"म्हणजे दिलदार तू काय वाल्मिकी होत नाहीस कधी.. झालो तर मीच होईन.." समशेर म्हणाला.

मास्तरांचा निरोप घेऊन दोघे निघाले.

"आम्ही निघतो गुरूजी.."

"या असे भेटायला मध्ये मध्ये .."

"गुरूजी, असे डाकूंना म्हणणारे तुम्हीच.. नाहीतर कोणी म्हणणार आहे असे काही कधीही?"

"समशेर बेटा.. आयुष्य असेच आहे बेटा. कठीण असते सारे काही. झालेल्या गोष्टी बदलता येत नाहीत .. विसरून ही जाता येत नाहीत. फक्त मागे सोडून देता येतात. नवे आयुष्य सुरू करता येते.. त्यासाठी लागते ती आतून इच्छा. इच्छा तिथे मार्ग निघतोच. इच्छा जेवढी प्रबळ तितकी त्यातून मार्ग काढण्याची इच्छा प्रबळ.. नाहीतर हा दिलदार.. लिहायला शिकला असता? एखाद्या म्हाताऱ्या ज्योतिषाच्या रूपात कजरीकडे गेला असता? आता अजून पुढे काय काय करेल सांगता येत नाही हा भाग वेगळा."

"खरेय गुरूजी.. दिलदारचा काही नेम नाही. आणि ते कुणाला पळवून आणण्याचे काम मी करणार.. पाप माझ्या खात्यात. आणि दिलदार नामानिराळा .."

"समशेर.. शेरच माझ्या कामी येतो नेहमी .. गुरूजी आम्ही येतो.."

"या. आणि चांगली कोणती तरी बातमी घेऊन या.."

"म्हणजे कजरीबद्दल?"

"ती ही.. आणि समशेर.. तू ही.. तुझ्याकडून.."

"नाही गुरूजी .. माझी कोणी नाही .."

"गुरूजी, हा खोटे सांगतोय.. आजकाल गुरुदासपुरात फेऱ्या वाढल्यात याच्या.. त्या नाटकातील हिंमतलालला पळवून आणले तेव्हा नजरेस पडली याच्या. मांजर डोळे मिटून दूध पिते.. पण इतरांना दिसत असते सारे.."

"तू गप रे. गुरूजी ह्याला स्वतःवरून जग ओळखण्याची सवय आहे.. आम्ही निघतो.."

समशेर आणि दिलदार घोड्यावरून निघाले खरे.. भर दुपारी कजरीच्या गावावरून जायचे.. कजरीने पाहिले तर पंचाईत.

"कजरीला दिसलो तर?"

"सांग तुझा जुळा भाऊ असणार एक.. लहान असताना हरवला .. गावच्या जत्रेत. तो दिसला असेल."

"वा! अजून एक गोंधळ."

"मग काय छानच! गोंधळात गोंधळ! विचार कर जेव्हा कजरीला तू कोण ते कळेल तेव्हा काय होईल?"

"तुला काय वाटते? काय होईल?"

"व्हायचे काय.. कजरीदेवी डाकुओंकी महारानी बनेल. संतोकसिंग टोळीच्या महाराणीपदावर कजरी देवी!"

"तू काही पण बोलतोयस .."

"आणि तू करतोयस ते? एका निरागस मुलीच्या मागे लागला आहेस. जेव्हा तिला कळेल तेव्हा बिचारीची हालत काय होईल."

"तुझं पटतेय रे. पण कळतंय पण वळत नाही. दिलदार का दिल है जो मानता नहीं. आजवर जसे एकातून एक बाहेर पडलोय .. तसेच पुढे ही होईल. ज्याने कजरी घडवली माझ्यासाठी तोच तिच्यापर्यंत जाण्याचा मार्ग ही दाखवेल .. नाहीतर गुरूजी म्हणाले असते का चांगली बातमी घेऊन या म्हणून?"

"ते गुरूजी आहेत रे.. त्यांना सगळ्यांचे चांगलेच दिसते.."

"पण तुझ्या ध्यानात आले.. गुरूजी दोन तीनदा म्हणाले, कजरी खूप हुशार आहे.. म्हणजे कदाचित तिच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. त्या दिवशी ती विचारत होती.. हरिनामपुराचा रस्ता तिकडून कुठे जातो?"

"मग तू काय म्हणालास?"

"सांगितले डोंगरातून आतून जातो जवळचा रस्ता.. आता घोड्यावर पाहिल ती.. काय करूया?"

"एवढेच? हे सोपे आहे. अरे दुसरा रस्ता आहे की.. थोडा अवघड आहे .."

"अवघड?"

"तू ठरव.. तुझ्या कजरीला तोंड देणे अवघड की हा रस्ता अवघड अधिक ते.."

"चल.. रस्ता काही प्रश्न विचारणार नाही .. कजरी विचारेल.. आणि तो दुसरा रस्ता सोडला तर अजून दुसरा कुठला रस्ता नाही.."

Rate & Review

Nitin More

Nitin More Matrubharti Verified 4 months ago

Shraddha Madivale

Shraddha Madivale 4 months ago

I M

I M 4 months ago