Teaching is the work of Pune books and stories free download online pdf in Marathi

शिकवणं पुण्याचं काम

शिकवणं हे पुण्याचं काम?

शिकवणं हे पुण्याचं काम असं कोणी म्हटल्यास लोकं आश्चर्यचकीत होतील. कारण आजच्या काळात शिकविण्याला किंमत उरलेली नाही. किंमत आली आहे पैशाला. कारण पैसा फेक तमाशा देख या वृत्तीनुसार आज जो शिक्षणावर जास्त पैसा खर्च करतो. शिक्षणही त्यालाच मिळत असते. तसं पाहता शिक्षणाला अलिकडे भरपूर पैसा लागत आहे. साधारण डॉक्टरकीचा अभ्यासक्रम शिकतो म्हटल्यास पंचवीस ते तीस लाख रुपये वर्षाकाठी मोजावे लागतात. आजचे शिक्षकही शिक्षण शिकविण्यासाठी भरमसाठ पैसा घेत असतात. त्यामुळंच आज शिकविणे हे पुण्याचं काम राहिलेलं नाही तर ते एक पैसा कमविण्याचं साधन झालेलं आहे.
आज गुणवत्ता सरेआम बाजारात विकत मिळत असून तिची बोली लावली जात आहे. गुणवत्तेला तर आज किंमतच उरलेली नाही. तसेच आजच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणी म्हणतात की जिथं मुलं शिक्षकाला चिडवीत असतील वा गोंधळ करीत असतील. तिथं शिक्षण असतं.
वरील गोंधळाच्या बाबतीत विचार केल्यास एकप्रकारे म्हणता येईल की तेही म्हणणं बरोबर आहे की मुलं जर गोंधळ जास्त करीत असतील वा शिक्षकाला जर चिडवीत असतील तर तिथं शिक्षण असतं. कारण आज शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास शिक्षणाचा गोंधळच नाही तर खेळखंडोबाच करुन टाकला आहे शिक्षण तत्ववेत्यांनी. कुठं शिला नाचते, अन् कुठं शांता नाचते. झिंग झिंग झिंगाट तर सर्वच करतात.
सरकारनं दर दहा वर्षांनी अभ्यासक्रम बदलवला. असाच अभ्यासक्रम बदलवला सन १९९५ ला. या काळात सरकारनं जो अभ्यासक्रम आणला, तो राबवतांना सांगीतलं की आता शिक्षकानं वर्गात शिकवितांना अगदी नाचून बागडून अभ्यासक्रम शिकवावा. मुलं चांगलं शिकतील आणि तेही जास्त प्रमाणात. त्यानंतर प्रत्येक शिक्षक वर्गात नाचून लागला. त्याबरोबर मुलंही नाचून लागली. शिक्षीकाही नाचून लागल्या, त्याचबरोबर मुलंही नाचून लागली. त्यानंतर मुलांमधील शिक्षकांचा असणारा जो आदरभाव होता, तो संपला व मुलांना शिक्षक आपल्या भावा बहिणीसारखा वाटू लागला. आपल्या भावाबहिणीसारखा याचा अर्थ आपल्या घरचा. मग जशी घरी आपल्याला कालांतरानं आपल्या आईवडीलाचा धाक राहात नाही. तेच घडलं शाळेतही. शाळेत मुलांबरोबर नाचत असणाऱ्या या शिक्षकाचा मुलांवर धाकच उरला नाही. त्या शिक्षकाचा आदरयुक्त दरारा ओसरला व पुढील काळात मुलं शिकली नाही तर ती लयास गेली. इथं ज्ञानानं अज्ञानाला वर केलं व येथूनच खऱ्या अर्थानं सरकारी शाळेला गळती लागली.
सुरुवातीला हे शिक्षण चांगलं वाटलं. मुलांनाही वाटलं की शिक्षक आमच्यासोबत नाचतो आहे. आपल्यातीलच कोणीतरी आहे. ती प्रेमानं जवळ येवू लागली. शिक्षकांचं ऐकू लागली. परंतु त्याला अभ्यासाबाबत सांगितल्यास ती हेकाडी दाखवू लागली शिक्षकांना. तसंच त्यांना मारु नये वा त्यांचा अपमान करु नये या शिक्षकांच्या धोरणात्मक बदलामुळे ती मुलं भविष्यात शिक्षकांचं ऐकत नव्हती व ती ती अभ्यास करीत नव्हती व येथूनच सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान झालं. आता मुलं सरकारी शाळेत निव्वळ गोंधळ करतात. शिक्षण उरलं नाही. कारण विद्यार्थ्यांचा अपमान होतो, म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना काहीच बोलत नाही. दंड वा मार देत नाही. प्रेमानं समजावतो. म्हणतो, "बाबा, शिकशील तर शिक नाहीतर नको शिकू. परंतु शाळेत येत जा. अन् मुलं शाळेत दररोज जातात. कारण महागाईच्या काळात मायबाप दोघंही कामावर जातात. ते दिवसभर बाहेरच असतात. मग मुलं सुरक्षीत कुठं राहतील. ती शाळेतच राहतील. म्हणूनच शाळा हे मुलांना सांभाळण्याचं माध्यम झालं. शिक्षणाचं माध्यम नाही.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पुर्वी असं नव्हतं. शिक्षण होतं. कारण शिक्षक वर्गात नाचून शिकवीत नव्हते. त्यामुळंच धाकही तेवढाच होता. पुर्वी शिक्षक एखादा विद्यार्थी काही चुकल्या त्यावर रागवत होते. त्यामुळं अपमान जरी होत असला तरी तो विद्यार्थी दृष्टीकोनातून हितावह होता. तसंच दंड म्हणून शिक्षक रागावत व कधीकधी मारतही. त्यामुळं धाक होता व विद्यार्थी काही चुकण्यापुर्वी ती चूक होवू नये याचा आधीच विचार करायचे. त्यामुळं चुका वारंवार होत नव्हत्या. एखादी चूक व्हायची. त्याची शिक्षा मिळायची. त्यामुळंच शिक्षणही होतं.
आज तसं नाही. आज तर एखादा शिक्षक कितीही चांगला शिकवीत असेल तरी त्याच्या शिकविण्याला किंमत नाही. खाजगी शाळेत संस्थाचालक हाच मालक असल्यामुळेच तो शिक्षक आपल्या वेतनातून त्या संस्थाचालकाला किती पैसे देतो. त्यानुसार त्या शाळेत त्या शिक्षकाची किंमत असते. जरी त्याच्यात गुणवत्ता नसेल तरी आणि ज्याच्याकडे गुणवत्ता असते. परंतु तो जर अशा मालकरुपी संस्थाचालकाला पैसे देत नसेल तर तो शिक्षक काही कामाचा नाही अशी वृत्ती प्रत्येक शाळेत आज पाहायला मिळत असल्यानं आज अशा खाजगी अनुदानीत शाळेत गुणवत्ता दिसत नाही व मुले पालक सहजच कॉन्व्हेंटला नेवून टाकतात. सरकारी शाळेतही असंच होत आहे. म्हणूनच सरकारी शाळा ओस पडत आहेत व कॉन्व्हेंट शाळा जोर पकडत आहेत. कारण कॉन्व्हेंट शाळेत आजही शिक्षक नाचत नाही. नाचून शिकवीत नाही. विद्यार्थ्यांना धाक दिला जातो. कधी कधी मारही व तो मार जरी पडत असला तरी कोणताच पालक अशा शाळेवर चालून जात नाही. कारण शाळेतील मुख्याध्यापक सरळ सरळ म्हणतो की नसेल पटत तर घेवून जा आपल्या मुलाला शाळेतून. अशावेळेस समस्या उत्पन्न होतात व पालक नरमतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास अलिकडील काळातील सरकारला सरकारी शाळा बंद करायच्याच असल्यानं त्यांनी जाणीवपूर्वक शिक्षकांना वर्गात नाचून शिकवायला लावलं. ते शिक्षकांच्या लक्षात आलं नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना मारु नका म्हटलं. शिक्षकांच्या ते लक्षात आलं नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना काही बोलल्यास विद्यार्थ्यांचा अपमान होतो म्हटलं. तेही शिक्षकांच्या लक्षात आलं नाही. परंतु त्याचा परिणाम हा झाला की मुलं शिकली नाही. उलट शिक्षक नाचून शिकवतो व माकडलीला करतो, म्हणून ते कॉन्व्हेंटला गेले व आपोआपच मराठी माध्यमातील मुलं कमी झाली. आता मुलंच नाही तर भरत्या कशा कराव्या? सरकारसमोर प्रश्न पडला व सरकारनं भरत्या बंद केल्या. तसं पाहता सरकारला तेच अपेक्षीत होतं. परंतु सरकारनं काही ते कोणाच्या लक्षात येवू दिलं नाही. सर्व दोष शिक्षकांवर लावला व ते मोकळे झाले. आता शाळेत शिक्षक आहेत, परंतु मुलंही नाहीत. मग कोणासाठी शिक्षकभरती करायची? दोन चार मुलांसाठी अन् शासनाच्या खजिन्याला चुना लावायचा. असा विचार करुन सरकारनं निर्णय घेतला वीस किमी अंतरावर शाळा भरवायची. मग विद्यार्थी येवो की न येवो आणि तिथंही मुलं पुढं नाही आली की त्याही शाळा पटसंख्येअभावी बंद करायच्या हेच सरकारचं सरकारी धोरण. मेला तो शिक्षक नावाचा मासाच. सरकारनं पाण्यात अर्थात सरकारी शाळेत मान अपमानाचं जहर मिसळवलं आहे. म्हणूनच पाण्यात राहूनही मरणारा मासा शिक्षकच. पाण्यात राहून याचा अर्थ सरकारी शाळेत असतांना पटसंख्येअभावी मरणारा शिक्षक. अन् पाण्याच्या बाहेरचा मासा याचा अर्थ कॉन्व्हेंटचा शिक्षक. बिचाऱ्याला वेतन नसतं. तो एवढा शिकूनही त्याला मिळणारं वेतन हे वेठबिगार कामगारांपेक्षाही कमी असते. ते तुटपुंजे असते.ज्यानं शिक्षकाचं दोन वेळचंही पोट व्यवस्थीत भरता येत नाही.
विशेष सांगायचं झाल्यास शिकविणे हे पुण्याचे काम आहे. देवानेच हे काम करण्यासाठीच शिक्षकाला पाठवले आहे. आपण मागील जन्मात जे काही चांगले कर्म केलेले असतात. त्या कर्मानुसार आपल्याला शिक्षकांचा जन्म मिळालेला असतो. परंतु सरकार त्यांना तसे काम करत देईल तेव्हा ना. ते तसं काम करु देत नाही व देवाच्या कार्यात अडचण आणतात. म्हणूनच त्यांचा शाप लागून देशात विदेशी भाषेची चतुराई वाढते. शिक्षणाच्या नावावर कॅबरे डान्स वाढतो व पाश्चात्यीकरणाच्या नावावर तोकडे कपडे वाढतात. जनता हवालदिल होते व देशीय भाषेच्या निरक्षररुपी अंधाराचं राज्य निर्माण होते हे तेवढंच खरं आहे. म्हणूनच शिक्षकाला त्याचं कार्य त्याच्या पद्धतीनं करु द्यावं. त्याच्या कार्यात दखलंदाजी करु नये. ही दखलंदाजी निर्माण झाल्यानं पुर्वी पटसंख्या भरपूर असलेल्या देशातील देशील भाषेत शिकणाऱ्यांची संख्या रोडावली व ती पाश्चात्य पाश्र्वभूमीवर इंग्रजीकडे वळली.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आज आपल्याला आपली देशील भाषा समृद्ध बनवायची आहे. कारण ती आपली भाषा आहे. आपली मातृभाषा आहे. ती वाढवावी. आपली मुलं आपल्याच भाषेच्या शाळेत शिकवावी. जेणेकरुन आपल्या भाषेची अंधकाररुपी निरक्षरता वाढणार नाही. ज्ञानाचा अंकुर वाढेल. पुढं त्याचा वटवृक्ष होईल व शाळेत पटसंख्याही भरपूर वाढेल. जशी पुर्वी होती तेवढी व त्याच वटवृक्षावर राहायला देश विदेशातील शिकणारी इतर भाषेची पाखरं परत येतील हे तेवढंच खरं. जशी पुर्वी आपल्याच देशातील नालंदा, तक्षशिला विद्यापीठात येत होती तशी. तेव्हाच येथील देशीय शिक्षणाला खऱ्या अर्थानं महत्व प्राप्त होईल व देशाचा प्रत्येक नागरीक म्हणेल आता पुरे झालं विदेशी शिक्षण आमच्याच भाषेतील शिक्षण बरं. मग सरकार कितीही भाषेचं शिक्षण तोडण्यासाठी प्रयत्न करो. ते कधीच यशस्वी होणार नाहीत. विफलच होतील. यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०