Antarman in Marathi Business by Jaydatta khile books and stories PDF | अंतर्मन - भाग 6

Featured Books
Categories
Share

अंतर्मन - भाग 6

: पहिला घात



भाऊसाहेब सोबत पार्टनरशिप झाली आणि दुसऱ्या दिवशी आमचं ऑफिस बदललं. त्या छोट्या लॉजमधून आम्ही आता भाऊसाहेबच्या मोठ्या गोडाऊनच्या एका कोपऱ्यात शिफ्ट झालो. रामला तर विश्वासच बसत नव्हता. त्याने नवीन शर्ट घेतला होता.

"भाऊ, आता आपण मोठे माणसे झालो," राम म्हणाला.

मी हसलो. पण माझ्या मनात भीती होती. कारण मोठ्या माणसांच्या शत्रू पण मोठे असतात.

पहिल्या दिवशी भाऊसाहेबने मला एक नवीन काम दिलं. तो म्हणाला, "जय, तुझ्या त्या सात दुकानदारांना सांग, आजपासून त्यांना माल मी नाही, तू देशील. पण पैसा माझ्या नावाने गोळा करायचा."

मला हे थोडं विचित्र वाटलं, पण मी हो म्हणालो.

मी पहिल्या दुकानात गेलो - संजय किराणावाला. तो मला बघून खूप खुश झाला. म्हणाला, "जय भाऊ, ऐकलंय तुम्ही भाऊसाहेबचे पार्टनर झालात. आता तर आमचं टेन्शनच मिटलं."

मी त्याला नवीन हिशोब समजावला. तो लगेच तयार झाला.

दुसरं दुकान, तिसरं दुकान... सगळं व्यवस्थित चाललं होतं. पाचवं दुकान होतं - प्रकाश जनरल स्टोअर. प्रकाश हा सगळ्यात हुशार होता. त्याने माझं मॉडेल सगळ्यात आधी समजून घेतलं होतं.

मी त्याच्या दुकानात गेलो. तो काउंटरवर बसला होता. मला बघून तो हसला नाही.

तो म्हणाला, "जय, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय."

"बोल ना."

तो म्हणाला, "तू भाऊसाहेबचा पार्टनर झालास, चांगलं आहे. पण तू आम्हाला विसरलास. तू भाऊसाहेबकडून माल 100 ला घेतोस आणि आम्हाला 110 ला देतोस, मधले 10 रुपये तू खातोस. आम्हाला वाटलं तू आमचा माणूस आहेस, पण तू पण त्यांच्यासारखाच निघालास - दलाल."

माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी म्हणालो, "प्रकाश, असं नाहीये. मी तुम्हाला उधारीची सोय करून दिली, रोजच्या हप्त्याची सोय करून दिली."

तो म्हणाला, "सोय? अरे तू आमच्याकडून रोज पैसे घेतोस आणि भाऊसाहेबला महिन्याने देतोस. मधले व्याज तू खातोस. हे आम्हाला कळलंय."

कोणीतरी त्याला माझं सिक्रेट सांगितलं होतं. आणि ते फक्त एकच माणूस सांगू शकत होता - राम.

रामलाच फक्त माहिती होतं की मी दुकानदारांकडून रोज पैसे घेऊन भाऊसाहेबला महिन्याच्या शेवटी देणार आहे.

मी धावत ऑफिसला आलो. राम तिथे बसला होता.

मी त्याला विचारलं, "राम, तू प्रकाशला माझं गणित सांगितलंस का?"

राम घाबरला. म्हणाला, "भाऊ, मी... मी फक्त सहज बोललो होतो. तो माझा मित्र आहे."

त्याच क्षणी मला कळलं, माझ्या टीममधलाच माणूस फुटला आहे.

मी रामला काहीच बोललो नाही. मी भिंतीवर जाऊन चौथा नियम लिहिला.

नियम 4: धंद्यात मित्र नसतो, फक्त पार्टनर असतो. आणि पार्टनरलाही सगळं सांगायचं नसतं.

त्या संध्याकाळी भाऊसाहेब आला. तो म्हणाला, "जय, ऐकलंय तुझ्या एका दुकानदाराने माल घ्यायला नकार दिलाय."

मी म्हणालो, "हो, पण मी बघतो."

भाऊसाहेब हसला. म्हणाला, "बघ, हाच धंदा आहे. आज एक गेला, उद्या दुसरा येईल. पण एक लक्षात ठेव, तुझी सिस्टम तुझ्या विश्वासावर चालते. विश्वास गेला की सिस्टम गेली."

मी मान हलवली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी प्रकाशच्या दुकानासमोर जाऊन उभा राहिलो. त्याने मला बघितलं आणि तोंड फिरवलं.

मी त्याला म्हणालो, "प्रकाश, तुला वाटतं मी 10 रुपये खातो. ठीक आहे. आजपासून मी तुला माल 100 रुपयालाच देतो. एक रुपया पण नफा नाही घेणार. पण एका अटीवर - तू मला रोज नाही, महिन्याच्या शेवटी एकदम पैसे देशील. जमेल का तुला?"

प्रकाश गप्प बसला. त्याला माहिती होतं, त्याला महिन्याच्या शेवटी पैसे देणं शक्य नाही. त्याचा धंदा रोजच्या पैशावर चालतो.

तो म्हणाला, "नाही जमणार."

मी म्हणालो, "मग मी जे 10 रुपये घेतो, ते दलाली नाही, ती तुझ्या सोयीसाठी घेतलेली फी आहे. समजलं?"

प्रकाशने मान खाली घातली. म्हणाला, "सॉरी जय भाऊ, चुकलं माझं."

त्या दिवशी मला एक मोठा धडा मिळाला. लोकांना स्वस्त हवं असतं, पण सोयीचं महत्त्व ते विसरतात. आणि जो माणूस सोय देतो, तोच राजा होतो.

संध्याकाळी मी रामला बोलावलं. त्याला म्हणालो, "राम, तू माझा भाऊ आहेस, पण आजपासून धंद्याच्या गोष्टी फक्त माझ्या आणि तुझ्या मध्येच राहतील. कोणालाही सांगायच्या नाहीत, अगदी तुझ्या मित्रालाही नाही."

राम रडला आणि म्हणाला, "भाऊ, माफ कर."

मी त्याला माफ केलं. कारण मला माहिती होतं, चूक त्याची नव्हती, चूक माझी होती. मीच त्याला सगळं सांगितलं होतं.

त्या रात्री मी डायरीत लिहिलं - आज पहिला घात झाला, आणि मी वाचलो. कारण माझ्याकडे भाऊसाहेब सारखा मोठा माणूस पाठिशी आहे.