Daitya in Marathi Thriller by Likhasa books and stories PDF | दैत्य - भाग 3

The Author
Featured Books
Categories
Share

दैत्य - भाग 3

भाग  ३   

जुन्या गोदामाच्या वरच्या मजल्यावरची खोली धुराने भरली होती.

लोखंडी टेबलावर शहराचा नकाशा पसरलेला होता. दोन रस्त्यांवर लाल खूण, बंदराकडच्या मार्गावर काळी रेघ, आणि एका गोदामाभोवती गोल.

टेबलाभोवती चार माणसं बसली होती. सगळे निरढावलेले दिसत होते. पण कोणीही आरामात नव्हतं. त्यातल्याच एकाचा पाय सतत हलत होता कदाचित ताणामुळे.

सिगारेट मागोमाग सिगारेट.... खोली धुराने भरलेली. एकजण शांत बसून फक्त बघत होता. 

“उद्याची खेप थांबवली तर नुकसान होईल,” पाय हालवणारा दात आवळत म्हणाला.

खोलीत पुन्हा शांतता पसरली.

पहिल्याने टेबलावर मुठ आपटली,“तो अजून फोन उचलत नाही.”

दुसरा कटाक्ष टाकत म्हणाला, “फोन उचलत नाही… की उचलणार नाही?”

तिसरा पुढे झुकला.

“सरळ बोल.”

“सरळच बोलतोय. दोन महिन्यांपासून हालचाली बाहेर जात होत्या.”

“म्हणजे?”

तेवढ्यात दरवाजा उघडला.

कोणी आत येताना आवाज केला नव्हता… तरी सगळ्यांच्या माना एकाचवेळी दाराकडे वळल्या.

अबीर आत आला. काळा शर्ट. ओल्या केसांवर हात फिरवल्यासारखा विस्कटलेला लूक. दाढी राकट. चाल निवांत… पण जड. तो चालत टेबलपाशी आला. सगळे शांत होते. अबीरने समोरचा नकाशा एकदा पाहिला. मग टेबलावर ठेवलेला मोबाईल उचलला. स्क्रीनकडे पाहिलं. परत ठेवला.

“हं. चालू राहू दे .”त्याचा आवाज मोठा नव्हता...पण खोलीतल्या हवेला वजन आलं.

पहिला माणूस म्हणाला, “उद्याची खेप कोण नेणार ते ठरवायचं आहे.”

“आधी त्याने फोन उचलू देत .”

अबीरने त्याच्याकडे फक्त पाहिलं.

“शेखर.”अबीरची नजर कळून त्याने पटकन उत्तर दिलं.

“त्याचा फोन आणि तो येणार नाही.”म्हणत अबीरने शांतपणे सिगारेट काढून दातात धरली, पेटवली... सिगारेटचा कश भरून घेतला. तितक्याच सावकाशपणे धूर तोंडातून बाहेर सोडला. 

एकाने वाट पाहून विचारलं “का?”

अबीरने उत्तर द्यायला घाई केली नाही. चारही चेहेऱ्यांवर ताण स्पष्ट दिसला. 

तो माणूस गप्प बसला. खोलीत दोन सेकंद जड शांतता राहिली.

“गद्दार होता....” अबीरचा आवाज अजूनही स्थिर होता.

मग तिसरा माणूस धीर करून म्हणाला, “तुला खात्री आहे का ?”

अबीरची नजर त्याच्यावर स्थिर झाली. “प्रश्न विचारण्याआधी विचार कर.”

अबीरने एक हात खिशात घातला... नजर त्याच्यावर रोखली,“मला शंका असती… तर तो अजून जिवंत असता.”

"मग...?" ज्याने विचारलं तो चाचरत म्हणाला. 

एकदम शांतता. बाहेर कुठेतरी लोखंडी पत्रा वाऱ्याने आपटल्याचा आवाज आला.

तिसऱ्याने नकळत घसा कोरडा गिळला.

अबीरने त्याच्याकडे पाहिलं.“मग काही नाही.... संपवला."

तो थोडा पुढे झुकला आणि सावकाश प्रत्येक शब्द वेगळा टाकला.

पहिल्याच्या हातातली सिगारेट थरथरली. अबीरने नजर सगळ्यांवर फिरवली.

“चूक करणाऱ्याला एक संधी देता येते.”

तो थांबला....पुन्हा शांतता.

“पण गद्दार…”त्याने टेबलवर हात ठेवला आणि थोडा पुढे झुकला.

“त्याला माफी नाही .”मग पुन्हा सरळ उभा राहत तो म्हणाला

“मी कोणालाच माफ करत नाही.”

त्या वाक्यानंतर कोणी हललंही नाही.

सगळ्यांना ते आधीच माहीत होतं… पण पुन्हा ऐकलं तरी वेगळं वाटत होतं.

पहिल्याने हिम्मत करून विचारलं, “उद्याची खेप?”

अबीरने नकाशावर बंदराच्या रस्त्यावर बोट ठेवलं.“मार्ग बदलून मी जातोय .”

तिघे एकमेकांकडे पाहू लागले.

दुसरा म्हणाला, “तू स्वतः.......”वाक्य पूर्ण होण्याआधी अबीरची नजर त्याच्यावर गेली. अबीर शांत आवाजात म्हणाला,“आज खूप प्रश्न विचारले गेले.”

तो मागे वळला, “उद्यापासून उत्तरं कमी मिळतील.”

त्याने टेबलवर आधीपासून असलेला फोन उचलला आणि तो दरवाज्याकडे चालू लागला. दारापाशी थांबून अबीरने शेवटचं वाक्य टाकलं

“आतला गळतीचा रस्ता बंद केलाय." तो वळला नाही.“आता बाहेरचे रस्ते.”दरवाजा बंद झाला. खोलीत कोणी लगेच बोललं नाही. पहिल्याने खोल श्वास घेतला. चौथा शांतपणे दरवाज्याकडे पाहत म्हणाला,“तो तसाच आहे. आपण हलक्यात घेत होतो.”


अबीरने बाहेर आल्यावर जवळजवळ तशीच असलेली सिगारेट खाली टाकून पायाखाली चूरडली. बाहेर उभ्या असलेल्या गाडीत ड्रायव्हींग सीट वर बसत त्याने सीटबेल्ट लावला. आणि अचानक त्याचे हात स्टीअरिंगवर घट्ट झाले. तेच तपकिरी डोळे आठवले. भितीने भरलेले… पण न झुकलेले. त्याने डोळे मिटले. क्षणभर. 


सकाळ झाली. घरात नेहमीसारखी लगबग होती. आई स्वयंपाकघरात होती. बाबांच्या हातात पेपर होता. चहाचा वास घरभर पसरला होता. अंबिका मात्र शांत होती.

“काय गं, तब्येत बरी आहे ना?” आईने विचारलं.

“हो.”

“रात्रभर झोपली नाहीस का?” बाबांनी पेपर खाली करत विचारलं.

ती थोडी हसली,“उशीर झाला म्हणून.”

बाबांनी तिच्याकडे पाहिलं,“अंबिका… चेहरा खोटं बोलत नाही.”

ती काही बोलली नाही. बाबांनी पेपर बाजूला ठेवला.

“लक्षात ठेव, चुकीची गोष्ट दिसली तर डोळेझाक करू नकोस. पण उतावळेपणाही करू नकोस.”

तिने त्यांच्याकडे पाहिलं जणू त्यांनी तिच्या मनातलं वाचलं होतं.

नीताला भेटायला जाताना तिची पावलं नकळत पोलीस स्टेशनसमोर थांबली.

ती काही क्षण बाहेर उभी राहिली. आत पोलीस ये-जा करत होते. एक कॉन्स्टेबल तक्रार ऐकत होता. एका बाकावर दोन माणसं बसली होती. सगळं साधं होतं.

पण तिच्यासाठी ते दार जड होतं.

आत गेले तर सांगणार काय?

एक नाव?....अबीर.

फक्त रक्ताचे डाग जे धुतले गेलेत.

इअरपीस? तिच्याकडे नाही.

मारलंय कोणी ते नक्की माहीत नाही.

मृतदेह पाहिला नव्हता.

ती पायरीवर चढली… आणि थांबली.

"पत्रकार व्हायचं म्हणतेस ना? मग आधी सत्य शोध."ती स्वतःशी म्हणाली.

तिने परत मागे वळून बाहेर पाऊल टाकलं.


अबीरच्या मोबाईल ची रिंग वाजली. 

"बोल," अबीरचा स्थिर आवाज.

"ती मुलगी, आज पोलीस स्टेशनला गेली होती पण बाहेरूनच परत फिरली." पलिकडून सांगितलं गेलं.

"हं. ठीक आहे." म्हणून त्याने फोन कट केला आणि गाडीचं इंजिन सुरू करून वेगात निघून गेला.


“काल संध्याकाळी भेटणार होतो, मग आली नाहीस.तू काहीतरी लपवतेय.”नीताने तिचा चेहरा निरखत म्हटलं.

“काही नाही.”अंबिकाने मान हलवत उत्तर दिलं.

“माझ्यासमोर नाटक नको.”नीता तिला बोलायची संधी न देता म्हणाली.

अंबिका काही क्षण शांत राहिली. मग सगळं नाही, पण बरंच काही तिने सांगितलं.

नीता ऐकत राहिली.

“म्हणजे तू त्या रात्री एकटी गल्लीत… आणि समोर तो माणूस?”

“हो.”

“आणि आता पुन्हा तिकडे जायचं?”

“हो.”

नीता कपाळावर हात मारत म्हणाली, “तू खरोखर पत्रकारितेला योग्य आहेस. सरळ धोक्यात घुसतेस.”

अंबिका पहिल्यांदा हलकंसं हसली.“येणार का?”

“तुला एकटीला सोडू का?"नीता मिश्किलपणे म्हणाली.


संध्याकाळी दोघी त्या भागात पोहोचल्या. मुख्य रस्त्यावरची गर्दी सुरू होती. पण गल्ली नेहमीसारखी शांत. गल्लीच्या टोकाशी एक चहाची टपरी होती. दोघी तिथे गेल्या. अंबिकाने चहा घेतला आणि सहज विचारल्यासारखं म्हणाली,

“काका, परवा पाऊस भारी आला ना?”

“हं,” तो म्हणाला.

“उशिरापर्यंत दुकान उघडं होतं?”

“जरा लवकर बंद केलं.”

“त्या वेळी गल्लीत काही गडबड झाली होती का?”

त्याने चहाचे ग्लास रचत हात थांबवले नाहीत.

“गडबड म्हणजे?”

“आवाज… भांडण… लोकांची पळापळ…”

“पाऊस पडला की लोक घरात पळतात. बाकी काही नाही.”

अंबिका शांत राहिली.

“इथे CCTV आहे का आसपास?” तिने पुढचा प्रश्न सहज विचारल्यासारखा विचारला.

या वेळी तो पहिल्यांदा तिच्याकडे नीट पाहू लागला.

“तुम्ही कॉलेजचे आहात का ?”

“हो.”

“मग अभ्यास करा. बाकी चौकश्या नंतर करा.” त्याचा आवाज उद्धट नव्हता.

पण स्पष्ट होता. बोलणं संपलं होतं. दोघी बाजूला झाल्या. नीता म्हणाली, “त्याला काहीतरी माहिती आहे.”

“किंवा बोलायचं नाहीये.”अंबिका बाजूला बघत म्हणाली. अचानक तिला जाणवलं, कोणीतरी तिच्याकडे बघतंय. तिने आजूबाजूला नजर फिरवली पण काही कळलं नाही. रस्त्याच्या पलिकडे एक ब्लॅक SUV उभी होती. त्यात ड्रायविंग सीट वर उंच आकृती जाणवली. नकळत तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तिने बघून न बघितल्यासारखं केलं. नीताने तिच्या हाताला हलकासा दाब दिला. “काय झालं?”

अंबिका ओठ न हलवता पुटपुटली, “समोरची गाडी… बघू नकोस सरळ. कॉलेजच्या बाहेर पण बघितली असं वाटतंय मला.”

नीता नकळत केस कानामागे सारत मोबाईलच्या काळ्या स्क्रीनमध्ये प्रतिबिंब पाहू लागली. SUV तशीच उभी होती. इंजिन बंद… पण उपस्थिती जिवंत.

“आपण निघूया,” नीता शांतपणे म्हणाली.

दोघी चालू लागल्या. अंबिकाने मागे वळून पाहिलं नाही. तरीही ती नजर पाठोपाठ येतेय असं तिला जाणवत होतं.

SUV मध्ये बसलेला अबीर स्थिर नजरेने त्यांना दूर जाताना पाहत होता.


To be continued.....

                         ***************