Daitya in Marathi Thriller by Likhasa books and stories PDF | दैत्य - भाग 4

The Author
Featured Books
Categories
Share

दैत्य - भाग 4

भाग ४    

संध्याकाळ शहरावर अलगद उतरली होती. रस्त्यांवर दिवे लागले होते, दुकानांचे बोर्ड चमकत होते, आणि लोकांची धावपळ अजूनही थांबलेली नव्हती. कुणी ऑफिसमधून घरी जात होतं, कुणी बाजारहाट उरकत होतं, कुणी फोन कानाला लावून घाईघाईने चालत होतं. सगळीकडे हालचाल होती.

पण अंबिकाच्या मनात मात्र विचित्र गोंधळ चालू होता.

दिवसभर ती स्वतःला समजावत होती, काही नाही, जास्त विचार करतेयस, ते सगळं मागे सोड. पण जिथे जाई तिथे तिच्या मनात तीच गल्ली उभी राहत होती.

ती नीताला बाय करून बसस्टॉपवर उतरली. घरापर्यंत दहा मिनिटांचा रस्ता होता. रोजचा. सुरक्षित. ओळखीचा.

तिने फोन काढून नीताला मेसेज टाइप केला.

घरी पोहोचले की call करते.

मेसेज पाठवून ती चालायला लागली.

पहिल्या दोन मिनिटांत सगळं नेहमीसारखंच होतं. भेळवाला. मेडिकलसमोर उभे लोक. कोपऱ्यावर चहा पिणारे दोन तरुण. समोरून येणारी शाळकरी मुलं. मग गर्दी थोडी कमी झाली. रस्ता शांत झाला.

आणि तिला पुन्हा जाणवलं....कोणीतरी पाहतंय. ती थांबली नाही. पण तिची नजर काचांच्या दुकानांतल्या रीफ्लेक्शन वर गेली. मागे कुणी दिसत नव्हतं. ती थोडी पुढे गेली. दुकानं टपरी सगळं मागे पडलं. तेवढ्यात तिच्या शेजारी एक गाडी येऊन इतक्या हळू थांबली की आवाजही झाला नाही. तिची पावलं मंदावली.

पॅसेंजर साईड फ्रंट डोअर क्लिक झालं… आणि हळूच उघडलं.

गाडी अगदीच जवळ थांबल्यामुळे ती दोन पावलं मागे गेली. त्याच क्षणी गाडीतून तो उतरला.... अबीर. तिच्या अंगातून एक थंड शिरशिरी गेली.

“नाही,” ती नकळत पुटपुटली आणि वळू लागली. त्याच्या हालचालीमध्ये घाई नव्हती. धावपळ नव्हती. निवांतपणे दरवाजा पूर्ण उघडून तो तिच्यासमोर उभा राहिला

ती मागे सरकली.

“दूर राहा,” ती कठोर आवाजात म्हणाली.

तो काही बोलला नाही.

तिचा फोन हातात होता. तिने पटकन unlock करायचा प्रयत्न केला.

अबीरने एका क्षणात तिचं मनगट पकडलं. दुसऱ्या हाताने फोन काढून गाडीच्या सीटवर फेकला. आणि त्याची हालचाल जलद झाली.

त्याने तिचे दोन्ही हात पुढे आणले. त्याच्या जॅकेटच्या खिशातून काळा वेलक्रो रिस्ट्रेन्ट बाहेर आला. तिचे दोन्ही हात बोटापासून मनगटापर्यंत घट्ट बांधले गेले.

“सोड! सोड मला.” ती झटापट करू लागली. 

ती थिजलीच.

“प्लीज हेल्प... कोणीतरी वाचवा मला....सोड मला!” भितीने तिच्या घशातून आवाज हळू बाहेर पडत होता. ती झगडू लागली. त्याने तिच्या खांद्यामागे हात ठेवून तिला पॅसेंजर सीट वर बसवलं. दाराला डोकं लागू नये म्हणून हाताने frame पकडला. तिच्या झटापटीतही त्याची हालचाल घाईची नव्हती. तो पुढे झुकला.

सीटबेल्ट ओढला.

तिच्या अंगावरून बेल्ट जाताना ती पुन्हा सुटायचा प्रयत्न करू लागली.

“हात लावू नकोस!”ती कसेतरी ओरडली. तो थांबला नाही. सीटबेल्ट लॉक झाला.

तो सरळ उभा राहिला. एक सेकंद तिच्याकडे पाहिलं. मग दरवाजा बंद केला.

दुसऱ्या बाजूने जाऊन तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. सेंट्रल लॉक ने दार बंद 

झालं. इंजिन सुरू झालंआणि गाडी पुढे निघाली.

अंबिका जोरात धापा टाकत होती. हात बांधलेले. छातीवर बेल्ट . रागाने भितीने तिच्या डोळ्यांत पाणी चमकत होतं.

“तू अडकलायस. तुला कल्पना नाही. मी ओरडेन. लोक बघतील.”

तो शांतपणे गाडी चालवत राहिला.

“ऐकलंस का?”

त्याच्याकडून उत्तर नाही.

ती त्याच्याकडे वळून बसली.

“तुला काय हवंय? मला का पकडलंय?”

तरीही शांतता. गाडीच्या आत फक्त AC चा मंद आवाज होता. डॅशबोर्ड चा फिका प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. त्याच्या जॉ लाईन वर ताण दिसत होता… पण घाबरटपणा नव्हता. तो जणू तिच्या रागाला वेळ देत होता. ती दाराला खांदा मारून दार उघडतंय का पाहू लागली. “गाडी थांबव !”

ती अजून चिडली,“माझे हात सोड!”

या वेळी तो पहिल्यांदाच बोलला “शांत बस.”दोनच शब्द. पण आदेशासारखे .

त्याचा आवाज धीरगंभीर होता...समोरच्याला शांत बसायला भाग पाडणारा.

तो शांतच. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या चेहऱ्यावर राग नाही, चिड नाही, कोणताही गोंधळ नाही. यामुळेच ती जास्त अस्वस्थ झाली.

गाडी शहराच्या रस्त्यांतून बाहेर पडत होती. गर्दी कमी झाली. दिवे विरळ झाले. उजवीकडे रिकामा प्लॉट. डावीकडे अर्धवट बांधकाम.

अंबिकाचा श्वास हळूहळू स्थिर झाला. भिती तशीच होती. पण तिच्यातलं निरीक्षण जागं झालं होतं.

त्याचे हात स्टेअरिंग वर स्थिर होते.

तो वेगात चालवत नव्हता.

तो मागे वळून बघत नव्हता.

त्याने तिच्याकडे बघितलंही नव्हतं.

तो फक्त ड्राईव्ह करत होता.

जसं हे सगळं त्याचं आधीच ठरलेलं होतं. गाडी एका शांत जागी थांबली. दूर शहराचे दिवे दिसत होते. आजूबाजूला कोणी नव्हतं. इंजिन बंद झालं. गाडीत जड शांतता पसरली. तो तिच्याकडे वळला. पहिल्यांदा पूर्णपणे. त्याची नजर तिच्या बांधलेल्या हातांवर गेली. मग चेहऱ्यावर.

“अंबिका देशमुख. जर्नलिझम शिकतेयस .”

ती दचकली. तिचा घसा कोरडा पडला.

“शेवटची एक्झाम बाकी.”

ती काही बोलली नाही.

“नीता कदम तुझी मैत्रीण तुला थांबवते. पण तू ऐकत नाहीस.”

“माझ्यामागे माणसं लावलीयेस?” ती दात आवळून म्हणाली.

तो दुर्लक्ष करून पुढे पाहू लागला.“तू जिथे जाऊ नये तिथे जात आहेस.”

“त्या रात्री काय झालं ?” हे विचारताना नकळत तिच्या नाकपुड्या फुलल्या.

त्याच्याकडून उत्तर नाही.

“तिथे काय घडलं ?”

तरीही शांतता.

“तुझं नाव का होतं तिथे?”

त्याने तिच्याकडे पाहिलं .

ती रोखून म्हणाली, “मी घाबरत नाही.”

त्याची नजर तिच्या थरथरणाऱ्या हातांवर गेली. मग पुन्हा डोळ्यांत.

“घाबरतेस. पण थांबत नाहीस.”तो म्हणाला.

त्या वाक्याने ती गप्प झाली. कारण ते खरं होतं.

तो पुढे म्हणाला,

“ही सवय नक्की जप.”क्षणभर थांबून.....

“पण आधी स्वतःचं रक्षण शिक.”

तो एक एक शब्द शांतपणे उच्चारत होता.

“नाहीतर स्वतःच एक दिवस बातमी बनशील.”तो पुढे बघून म्हणाला.

पुन्हा त्याने गाडी सुरु केली. अंबिकाच्या घराच्या अलिकडे त्याने गाडी आणून थांबवली. ते बघून ह्याने आपली पूर्ण माहिती काढलीये ह्या विचाराने अंबिका भितीने शहारली. तो पुढे झुकला. तिचा सीटबेल्ट काढला. तिच्या मनगटांवरील वेलक्रो रिस्ट्रेन्ट सावकाश सोडलं. त्याच्या बोटांचा स्पर्श थंड होता. घाई नव्हती. ती बसलेल्या बाजूचं दार उघडल्याचा आवाज आला ... आणि त्यानंतर तो तिच्याकडे न बघता समोर रस्त्यावर पाहत बसला. एकही शब्द नाही. तिला समजलं. ती खाली उतरली. बाहेरची हवा चेहऱ्यावर आली. दार बंद करण्याआधी ती वाकून म्हणाली,“मी थांबणार नाही.”

तो हललाही नाही. दोन सेकंदांनी त्याचा आवाज आला. “माहितीय.” तो दार लॉक करत म्हणाला. गाडी सुरू झाली. ती मागे सरकली. गाडी वळली… आणि दूरच्या अंधारात निघून गेली. गाडीचे टेल लाईट लांब जाताना दिसत होते. अंबिका काही क्षण तिथेच उभी राहिली. पाय जड झाले होते. हात मोकळे झाले होते, पण मनगटाभोवती अजूनही त्या पट्ट्यांचा दाब जिवंत वाटत होता. श्वास हळूहळू सावरत होता, तरी छातीतील धडधड कमी होत नव्हती.

ती स्वतःला धीर देत होती. घाबरू नकोस. विचार कर. आठव.

गाडीत बसल्यापासून ती भितीत होती, हे खरं होतं. ती मुलगी होती, एकटी होती, आणि समोर कोण आहे हेही पूर्ण माहित नव्हतं. पण त्याच वेळी तिच्या डोक्यात दुसरी बाजूही चालू होती....निरीक्षणाची.

तो तिला सहज बेशुद्ध करू शकला असता.

तोंडावर कापड, इंजेक्शन , मारहाण… काहीही.

पण तसं काहीच केलं नाही.

तिला बांधलं… पण जखम नाही.

जबरदस्ती नेलं… पण स्पर्शही मोजका.

धमकावलं तेही शांतपणे … हात उगारला नाही.

याचा अर्थ काय?

तो तिला फक्त घाबरवू इच्छित होता… संपवू नाही.

अचानक तिच्या डोक्यात एक तपशील चमकला.

डॅशबोर्ड जवळ, गियर च्या बाजूला काळ्या होलस्टर मध्ये अर्धवट दिसलेली गन .....ती खरी होती की नाही माहीत नव्हतं… पण ती होती. म्हणजे तो तयार होता. प्रत्येक शक्यतेसाठी. ती गप्पच उभी राहिली. क्लास मध्ये सर म्हणाले ते वाक्य आठवलं तिला,“घटना पाहणं वेगळं… तपशील लक्षात ठेवणं वेगळं.”

आज तिला त्या वाक्याचा अर्थ समजत होता.

त्याचा आवाज शांत होता.

हात स्थिर होते.

डोळ्यांत घाई नव्हती.

म्हणजे हा रागाने वागणारा माणूस नाही… ठरवून वागणारा आहे.

तिने मागे वळून रिकाम्या रस्त्याकडे पाहिलं.

भिती अजून होती. पण आता भितीसोबत एक कुतूहल जागं झालं.

हा माणूस नेमका कोणासाठी काम करतोय?

तो गुन्हेगार आहे?

की काहीतरी वेगळंच?

तिने रिकाम्या रस्त्याकडे पाहिलं.

आज तो तिला या खेळात ओढून घेऊन गेला होता.



To be continued......

                   ***********************