स्टॅम्प पेपर भाग 1 in Marathi Crime Stories by Dilip Bhide books and stories PDF | स्टॅम्प पेपर भाग 1

Featured Books
Categories
Share

स्टॅम्प पेपर भाग 1

स्टॅम्प पेपर

पात्र परिचय

प्रशांत.               वाड्याचा मालक

विशाखा               प्रशांतची बायको.

विजय राघव           प्रशांतचा  मित्र आणि बिल्डर

जयसिंग              भाडेकरू.

मल्हार              भाडेकरू.

अप्पासाहेब            भाडेकरू.

विश्राम               आप्पासाहेबांचा मुलगा.

गणेश                भाडेकरू

सुधाकर               भाडेकरू 

 

भाग 1

 

“जयसिंग तू जे काय म्हणतो आहेस त्याचा अर्थ तुला तरी कळतो आहे का? अशी भाषा करणं तुला शोभतं  का?” प्रशांत चांगलाच संतापला होता.

“मी काय चुकीचं बोललो? तू भयंकर स्वार्थी आहेस हे मला जेंव्हा कळलं तेंव्हा मला सुद्धा असाच धक्का बसला होता. पण आता मी सावरलो आहे आणि जे बोललो ते फायनल आहे.” – जयसिंग

“अरे पण ....” प्रशांत बोलतच होता, पण त्याला हातानेच थांबवत जयसिंग म्हणाला,

“आता बोलण्या सारखं काही उरलं नाहीये, मी जे सांगितलं त्यावर विचार कर, हाच एक ऑप्शन तुझ्या जवळ आहे.” आणि असं बोलून जयसिंग तेथून चालला गेला. प्रशांत त्यांच्या पाठमोर्‍या आकृती कडे बघतच राहिला. शेवटी तो पण घराच्या वाटेला लागला. त्याचा नुसता संताप संताप होत होता. घरी आल्यावर विशाखाने त्याचा चेहरा पाहिला आणि समजून चुकली की जयसिंग बरोबरची मीटिंग फसली होती म्हणून. तशी तिला खात्रीच होती की जयसिंग आडमुठे पणा करणार म्हणून, तिने प्रशांत जवळ तसं बोलून पण दाखवलं होतं, पण प्रशांतला काही ते पटलं नव्हतं. किती झालं तरी जयसिंग त्याचा बालमित्र होता. पण त्यांचे सगळेच अंदाज चुकले होते.

“तुला जी शंका होती, तसंच झालं. जयसिंग काही ऐकून घ्यायलाच तयार नाही”- प्रशांत विशाखा काही बोलली नाही. काही बोलून अजून भडका उडाला असता. ते तिला नको होतं.

“तू काहीच का बोलत नाहीयेस? मी तुझं ऐकायला हवं होतं. चुकलंच माझं. पण आता काय करायचं?” प्रशांत निराश झाला होता. विशाखा त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. त्याचं डोकं आपल्या छातीवर टेकवून त्याच्या केसांमधून  हात फिरवत राहिली. थोड्या वेळाने प्रशांत शांत झाला. विशाखाच्या  मनात पण विचारांचं काहूर उठलं होतं पण आत्ता यावेळी प्रशांतला शांत करणं हे फार जरुरीचं होतं. तो कोलमडून गेला असता तर गोष्टी खूप कठीण झाल्या असत्या.

“आता तो विजय राघव आल्यावर त्याला काय उत्तर देऊ?” – प्रशांत.

“विजय राघव म्हणजे बिल्डर? तो कशाला येणार आहे?” – विशाखा.

“मला वाटलं होतं की जयसिंग ऐकेल आणि कामं सुरळीत पणे मार्गी लागतील. म्हणून त्याला मीच बोलावलं होतं.” – प्रशांत.

“जयसिंग काय म्हणाला?” – विशाखा.

“त्याने काही ऐकून घ्यायलाच नकार दिला. त्याने जे आधी सांगितलं तेच फायनल आहे असं म्हणाला.” – प्रशांत.

डोंअर बेल वाजली. विशाखाने दार उघडलं. विजय राघव आत आला.

“काय प्रशांत शेठ काय झालं? निपटला का मामला?” – विजय.

“नाही मामला अजूनच अवघड झालाय. आत्ताच मी जयसिंगला भेटायला गेलो होतो, पण तो ऐकत नाहीये.” – प्रशांत.

“जयसिंग सध्या बाजूला ठेवा, तुमचे बाकीचे भाडेकरू काय म्हणताहेत? २० भाडेकरू आहेत ना?” – विजय.

“२० पैकी १५ लोकांचा काही प्रश्न नाहीये. त्यांना एक एक फ्लॅट हवा आहे आणि वरती 5 लाख. पण जयसिंग हे मानायला तयार नाहीये. त्याला 3 BHK फ्लॅट हवा आहे आणि वरती 40 लाख पण हवे आहेत. आणि आणखी चार लोकं त्या जयसिंगने दाखवलेल्या मृगजलात अडकले आहेत.” – प्रशांत.

“अरे, त्याला वेड  लागलं आहे का? तो तर तुमचा अधिकृत भाडेकरू पण नाहीये, मग असा विचार त्याच्या डोक्यात आला कसा?” – विजय.

“आणि आता तो बाकीच्या लोकांची मीटिंग घेऊन त्यांना पण भडकावण्याचा प्रयत्न करतो आहे.” – प्रशांत.

“चार जण तर त्यांच्या अमिषाला फासले आहेत. बाकी लोकं त्याच्या जाळ्यात फसतील की नाही हे माहीत नाही.” – विजय.

“असं वाटत तर नाही. ते सज्जन आहेत. पण काय सांगावं? तो जयसिंग काय वाट्टेल ते सांगून त्या लोकांची दिशाभूल करूच शकतो.” – प्रशांत.

“ओके, आपण उद्या जाऊन बाकी सर्व लोकांशी मीटिंग करू. आणि मग ठरवू पुढची दिशा. पण प्रशांत तू काही काळजी करू नकोस, हे असले प्रसंग आम्हाला नवीन नाहीत. जयसिंग मुळे थोडा वेळ लागेल, पण आम्ही त्याला बघून घेऊ” – विजय.

आता प्रशांत घाबरला, त्याने बिल्डर लोकांच्या अनेक कथा ऐकल्या होती. तो म्हणाला,

“म्हणजे काय करणार तुम्ही? ए बाबा, काही मारपीट करायचा विचार असेल तर सोडून दे. मी हे प्रोजेक्ट कॅन्सल करून टाकतो.” – प्रशांत.

“डरो मत यार, आम्ही असलं काहीही करणार नाहीये, आमच्या जवळ इतर बरेच मार्ग असतात. तू निश्चिंत रहा. त्यांच्या शरीराला खरोच सुद्धा न येता  मामला मार्गी लावू, तू टेंशन घेऊ नकोस.” – विजय.

प्रशांतच्या चेहऱ्यावर अजूनही भीती दिसत होती, तो म्हणाला,

“आम्ही साधी  सरळ माणसं आहोत. कुठल्याही खोड्यात अडकण्याची माझी मुळीच इच्छा नाहीये.”- प्रशांत.

“तू निश्चिंत रहा. आपण उद्या सकाळी बाकीच्या लोकांना भेटायला जाऊ. तुझ्या संमती शिवाय मी काहीही करणार नाही. मग तर झालं?” विजय असं बोलला आणि निघाला.

तो गेल्यावर बराच वेळ प्रशांत आणि विशाखा एकमेकांकडे पहात बसले होते. दोघंही विचार करत होते. काही महिन्यांपूर्वी घडलेला प्रसंग प्रशांतच्या डोळ्या समोर उभा राहिला.

****

दहा भाडेकरू एका संध्याकाळी त्याला भेटायला आले होते. प्रशांत ऑफिस मधून यायचा होता. विशाखा सर्वांनाच ओळखत होती आणि सर्वांशी सौहाद्रा चे संबंध होते. तिने चहा पाणी करून त्यांना बसायला सांगितलं.

प्रशांत आला आणि त्याने या सर्वांना बघितलं.

“अरे वा आज काय खास? एकदम मीटिंगच भरवली आहे की?” – प्रशांत.

“प्रशांत आम्ही एका गोष्टीचा बरेच दिवस विचार करत होतो, तुला आवडेल की नाही याचा. पण शेवटी ठरवलं की तुझ्याशी बोलावंच.” – सर्वांच्या वतीने जेष्ठ अप्पासाहेब बोलले.

“अरे, असं काय आहे की माझ्याशी बोलायला तुम्हाला संकोच वाटतो आहे? या अगोदर तर असं काही झालं नाही.” – प्रशांत.

“तसं नाही, यावेळेचा विषयच तसा आहे म्हणून.” – अप्पासाहेब.

“नि:संकोच बोला.” – प्रशांत.

“प्रशांत, आमची घरं जवळ जवळ ७५  वर्ष जुनी झाली आहेत. वेळोवेळी आम्ही डागडुजी करून इतके दिवस काढले, पण आता सगळंच जर्जर झालं आहे, तेंव्हा, आमचा प्रस्ताव असा आहे की ही चाळ रिडेव्हलपमेंट ला घ्यावी.” – अप्पासाहेब.

“अरे वा चांगला विचार आहे. अप्पासाहेब, माझ्या आजोबांनी ही जागा तुमच्यासाठीच घेतली होती. चाळ सुद्धा तुमच्या साठीच बांधली. त्या वेळी सर्वच आमच्या कंपनीत काम करत होते. माझ्या वडिलांना आजोबांनी स्पष्ट सांगितलं होतं की ही जागा तुम्हा लोकांसाठीच आहे. स्वत:च्या फायद्या साठी या जागेचा उपयोग करायचा नाही. मी सुद्धा आजोबांनी दिलेला शब्द पाळतो आहे. असं करा, तुम्ही सर्वांचं मत घ्या आणि बिल्डर ठरवा. माझी काही हरकत नाही.” – प्रशांत.

“आम्ही सर्वांनी यथा शक्ति काही रक्कम जमवली आहे. पण तेवढ्या रकमेने काम होईल का याचा अंदाज येत नाहीये. तुझ्या मदती शिवाय हे काम होईल असं वाटत नाही. हीच विनंती करायला आम्ही आलो आहोत.” – अप्पासाहेब.

“अप्पासाहेब, एक किंवा दोन लोकांना मदत करणं वेगळं आणि २० लोकांना करणं वेगळं. मी काही टाटा बिर्ला नाहीये.” – प्रशांत.

“आम्ही तुझ्याकडे पैश्यांची मदत मागत नाहीये. तू बिझनेसमन आहेस. तुझ्या बऱ्याच ओळखी आहेत. त्याचा उपयोग करून तू आम्हाला चांगलं डील मिळवून दिलस तर बरं होईल. आणि हीच विनंती करायला आम्ही आलो आहोत.” – अप्पासाहेब

“ठीक आहे, माझा एक मित्र आहे. विजय राघव नावाचा. तो डेव्हलपर आहे. तुम्ही म्हणत असाल, तर त्याला विचारतो. आणि त्यांची तयारी असेल, तर तुम्हा लोकांची गाठ पण घालून देतो. बाकी पुढचं तुम्ही बघायचं. मला गुंतवू नका. सध्या मी माझी फॅक्टरी पुण्या जवळ चाकणला हलवण्याच्या प्रोसेस मधे आहे. मला वेळ मिळणार नाही.” – प्रशांत.

“पण प्रशांत या बाबतीत आम्ही अगदीच अज्ञानी आहोत. तो बिल्डर काय सांगतो हे आम्हाला पारखता येणार नाही. तुझी मदत तर लागेलच. अरे आम्ही साधी माणसं आहोत, रोजच बिल्डर बद्दल अश्या काही बातम्या ऐकतो की भीती वाटते फसवले जाण्याची. तूच जर सर्वकश चौकशी केलीस तर बरं पडेल.” – मल्हारराव.

“ठीक आहे मी विजयशी बोलतो. आणि तुम्हाला सांगतो. तो माझा मित्र आहे तुम्ही त्याच्या बद्दल अगदी निश्चिंत रहा. तुम्हाला तो बेस्ट डील देईल.” – प्रशांत.

विशाखा काही बोलत होती, त्यामुळे प्रशांत भानावर आला.

“प्रशांत, कुठे हरवलास? मी काय सांगते, उद्या तुम्ही भेटून या, मग ठरवू. शेवटी जागा आपली असल्यामुळे, तू संमती दिल्याशिवाय पुढे काही होणार नाहीये, मग आत्ताच टेंशन कशाला घेतो आहेस. चल जेवून घेऊ. जरा बरं वाटेल.” – विशाखा.

****

त्याच दिवशी रात्री वाड्या वर सर्व भाडेकरूंची मीटिंग जयसीगने बोलावली. सर्व आल्या नंतर जयसिंगने बोलायला सुरवात केली.

“आज माझी आणि प्रशांतची भेट झाली. तो मला घुमवायचा प्रयत्न करत होता, पण मी तो हाणून पाडला आणि त्याला साफ सांगितलं की आम्हाला ३ BHK फ्लॅट आणि ४० लाख पाहिजेत म्हणून.” – एवढं बोलल्यावर त्याने सर्वांच्या वरुन नजर फिरवली. पण त्याला हवा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही. शेवटी अप्पासाहेब उठले आणि म्हणाले,

“जयसिंग, तुझी मागणी अवास्तव वाटते आहे. तू कोणच्या आधारावर ३ BHK फ्लॅट आणि ४० लाख मागतो आहेस?”- अप्पासाहेब.

“२०००० फुटांचा प्लॉट आहे, आणि ८००० च्या रेट ने जागेचे १६ कोटी होतात. प्रशांतला एक ४ BHK फ्लॅट आणि वरती एक कोटी मिळणार आहेत. मग आपण पण थोडं मागीतलं तर काय बिघडणार आहे?” – जयसिंग

“जयसिंग, एक तर तू या डिल च्या विरोधात आहेस किंवा मुद्दाम काडी करतो आहेस. आम्हाला तू मांडलेला हिशोब मान्य नाहीये. अरे जरा लक्षात घे. आपले मालक प्रशांत काही वाईट गृहस्थ नाहीयेत. आपल्या तीन पिढ्या इथे राहत आहेत. सुरवातीला आपलं भाडं किती होतं? २ रुपये, ३ रुपये आणि आज किती  आहे ६० आणि ७० रुपये. ते आपल्याला १ BHK फ्लॅट आणि वर प्रत्येकाला ५ लाख देणार आहेत. आणि आम्हाला सर्वांना हा सौदा कबूल आहे. तू सुद्धा आमचं ऐक आणि नसत्या भानगडी उकरून काढू नकोस.” आप्पासाहेबांचा मुलगा विश्राम म्हणाला.

“तुम्हाला आपलं हित कशात आहे हे कळत नाहीये. श्रीमंती चालून येत असतांना तुम्ही तिला नाकारता आहात. मग नंतर माझं वैभव पाहिल्यावर तुम्हालाच पश्चात्ताप होईल, पण तेंव्हा वेळ निघून गेली असेल. जो काही विचार करायचा असेल तो आत्ताच करा. मी सांगतो तसं करा. कल्याण होईल तुमचं.” – जयसिंग

“जयसिंग, तू म्हणतो आहेस तसं झालं तर त्यात सगळ्यांचाच फायदा आहे. पण या गोष्टीला प्रशांत कबूल होईल असं वाटत नाही. जास्तीत जास्त तो पांच च्या  ऐवजी १० लाख देईल, या पेक्षा जास्त काही नाही.” – मल्हार

“हे बघा, मी माझ्या वकिलांशी बोलणं केलं आहे. जो पर्यन्त आपण कॉंट्रॅक्ट वर सही करत नाही तो पर्यन्त प्रशांत काहीच करू शकत नाही. आपण सौदेबाजी करू आणि जितकं जास्त पदरात पाडून घेता येईल तेवढं घेऊ. मी सुद्धा ४० लाखांवर अडून बसणार नाही, पण २० लाख तरी कमीतकमी पाहिजे. या पेक्षा कमी नको. बघा विचार करा.” असं बोलून जयसिंग मीटिंग मधून निघून गेला. बाकी तसेच बसून राहिले. प्रत्येकाच्या मनात खूप उलट सुलट विचारांनी गर्दी केली होती. शेवटी अप्पासाहेब उठले आणि बोलायला सुरवात केली.

“मला असं वाटतं की जयसिंग जे काही आत्ता बोलला, मी त्यावर सहमत नाहीये. पण जर इतरांना त्यावर विचार करायचा असेल, तर हरकत नाही. आपण उद्या संध्याकाळी पुन्हा बैठक घेऊ.” – अप्पासाहेब.

क्रमश:......

दिलीप भिडे