Stamp Paper Part 6 in Marathi Crime Stories by Dilip Bhide books and stories PDF | स्टॅम्प पेपर भाग 6

Featured Books
Categories
Share

स्टॅम्प पेपर भाग 6

स्टॅम्प पेपर

पात्र परिचय

प्रशांत.               वाड्याचा मालक

विशाखा               प्रशांतची बायको.

विजय राघव           प्रशांतचा  मित्र आणि बिल्डर

जयसिंग              भाडेकरू.

मल्हार               भाडेकरू.

अप्पासाहेब            भाडेकरू.

विश्राम               आप्पासाहेबांचा मुलगा.

गणेश                भाडेकरू

सुधाकर               भाडेकरू 

 

भाग  ६   

भाग ५  वरुन पुढे वाचा........

दोन दिवसांनी रविवार होता आणि सगळे ठरल्या प्रमाणे प्रशांतच्या  घरी जमले.  प्रशांतने सर्वांना काय काय झालं याचं अपडेट दिलं, आणि म्हणाला की,

“कोर्टाने पुढच्या आठवड्यातली तारीख दिली आहे, तेंव्हा अमृतलाल पण हजर असेल. सुनावणी होईल. बघू काय होतं ते. आपले निंबाळकर वकिल म्हणाले की अजून एक दोन तारखा पडतील पण आपली बाजू भक्कम आहे आणि अंतिम विजय आपलाच होणार आणि याविषयी निंबाळकरांना पूर्ण खात्री आहे.”

पुढच्या आठवड्यात दिलेल्या तारखेला निंबाळकरांच्या बरोबर प्रशांत,अप्पासाहेब आणि मल्हार उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. थोड्या वेळाने अमृतलाल, जयसिंग आणि त्यांचे वकील अॅड. घोलप पण आले. प्रशांतणे त्यांच्याकडे पाहिलं त्यांची आणि जयसिंगची नजरभेट झाली आणि जयसिंगने प्रशांत कडे बघून एक कुत्सित हास्य फेकलं. प्रशांत चकित. त्याने ही बाब निंबाळकरांना सांगितली. ते म्हणाले,

“त्यांचा लवकरच भ्रमनिरास होणार आहे. स्टे मिळाल्यावर त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होईल. तू टेंशन घेऊ नकोस.” – निंबाळकर

प्रशांतचं समाधान झालं. त्यांच्या केसचा नंबर पुकारल्यावर सर्व कोर्टात शिरले.

न्यायाधीश आले, त्यांनी केस पेपर चाळले आणि म्हणाले,

“फिर्यादी पक्षाने आपली बाजू मांडावी.” – कोर्ट.

“निंबाळकर उभे राहिले, आणि त्यांनी बोलायला सुरवात केली.

युअर ऑनर, प्रतिवादी क्र. १ (अमृतलाल) याने अर्जदारांना खोटी माहिती देऊन, तसेच खोटे कागदपत्र तयार करून, पुनर्विकासाच्या नावाखाली सदर चाळ पाडून टाकली आहे.

प्रतिवादी क्र. १ याने अर्जदारांना असे सांगितले की, जमीन मालक प्रशांत यांची संमती मिळाली आहे. परंतु प्रत्यक्षात प्रशांत यांनी अशी कोणतीही संमती दिलेली नाही.

अर्जदारांच्या माहितीनुसार प्रतिवादी क्र. १ ने जमीन मालक प्रशांत यांच्या नावाने खोटे संमतीपत्र व करारपत्र तयार केले असून त्यावरील सही बनावट आहे.

युअर ऑनर माझे आशील, प्रशांत यांनी अश्या कोणच्याही कागदावर सही केलेली नाही. मुळात अतिशय महत्वाच्या कागदावर म्हणजे बँक किंवा सरकारी पेपर किंवा असे करार मदार यांच्यावर प्रशांतची सही वेगळीच असते. या पेपर वर जी सही आहे ती सामान्य पणे आपण ज्याला  जनरल पत्र व्यवहार म्हणतो, त्यावर जी सही माझे आशील, प्रशांत करतो, ती आहे. सबब हे पेपर खोटे आहेत. हे मी माननीय न्यायाधीश महोदयांच्या नजरेस आणू इच्छितो.” – निंबाळकर.  

“ठीक आहे. अॅड. घोलप तुमचं काय म्हणण आहे?” – कोर्ट.

“युअर ऑनर आम्ही हे सर्व आरोप स्पष्टपणे नाकारतो आहोत. माझे आशील श्री अमृतलाल यांनी काहीही घोटाळे केले नाहीत. सर्व गोष्टी कायद्यानुसारच झाल्या आहेत. आमचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मला श्री प्रशांत यांना काही प्रश्न विचारावे लागतील. कोर्टाने अनुमति द्यावी ही विनंती.”

“प्रोसिड” – कोर्ट.

“तर प्रशांत साहेब, तुमच्यासमोर बसून जर कोणी एखाद्या महत्वाच्या पेपर वर सही केली असेल तर तुम्ही काय करता?” - अॅड. घोलप.

“म्हणजे मी समजलो नाही.” – प्रशांत.

“म्हणजे असं की तुम्ही त्याला थॅंक यू म्हणता, ड्रॉवर मधे पेपर ठेवता की ही सही मान्य नाही असं म्हणता?” – घोलप.

“नाही मान्य नाही असं कसं म्हणेन? माझ्या समोर सही केली म्हणजे काम झालं. त्याल थॅंक यू म्हणेन.” – प्रशांत म्हणाला, आणि निंबाळकरांनी कपाळाला हात लावला. प्रशांत ट्रॅप मधे अडकला होता.

“युअर ऑनर, श्री प्रशांत च्या उत्तराची नोंद घेण्यात यावी. सामान्यपणे हे असंच होतं. माझ्या आशिलाने हेच केलं प्रशांत साहेबांनी करारावर सही केली आणि चॅप्टर संपला. ती सही खरी आहे, की खोटी आहे, आडवी आहे तिरपी आहे हे कोणी बघत नाही. सही केल्यावर पेपर व्हॅलिड होतो. सहीची चौकशी कोणी करत नाही. यांचा अर्थ करार पत्रावर श्री प्रशांत यांनीच सही केली होती हे कोर्टाने लक्षात घ्यावे, आणि स्थगिती उठवावी अशी माझी कोर्टाला नम्र विनंती आहे.” – घोलप

“फिर्यादी पक्षाचं यावर काय म्हणण आहे?” – कोर्ट.

“माझे आशील श्री प्रशांत यांनी कुठल्याही करार पत्रावर सही केली नाही जे करार पत्र अमृतलाल दाखवतो आहे ते खोटं आहे. कोणी तरी प्रशांतच्या सहीची हुबेहूब कॉपी केली आहे.” – निंबाळकर म्हणाले.. निंबाळकर आता जरा हताश दिसत होते. 

“आमचे आशील श्री अमृतला साहेब हे या शहरातले एक प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायी आहेत. अनेक प्रोजेक्ट त्यांनी यशस्वी रित्या पूर्ण केली आहेत. आज पर्यन्त तरी त्यांच्यावर असा डाग कोणी लावला नव्हता. माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी फिर्यादी पक्षाला समज द्यावी की यापुढे ते कुठलाही ठोस आधार नसलेले आरोप करणार नाहीत.” – घोलप

“फिर्यादी पक्षाने युक्तिवाद करतांना थोडा संयम बाळगावा. ही अपेक्षा आहे.” – कोर्ट

“माफ करा. यापुढे काळजी घेईन. आज सकाळीच आम्हाला कारारपत्रांची परत मिळाली. वाचून धक्काच बसला. त्या कारारपत्रात जे काही लिहिलं आहे, म्हणजे माझ्या आशिलाला ३ BHK फ्लॅट आणि वरतून ५० लाख देण्यात येतील असं नमूद केलं आहे त्याला आमची पूर्ण असहमती आहे. जर असा कुठला कारारच झाला नाही, आणि   अमृतलालला माझे आशील श्री प्रशांत ओळखतच नाही तर असा करार त्यांच्या सोबत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही ते करार पत्रच नाकारतो आहोत. हा शुद्ध फसवणुकीचा मामला आहे. आमची कोर्टाला अशी विनंती आहे की सहीची आणि करार पत्रांची फॉरेन्सिक पडताळणी व्हावी.” – निंबाळकर.

प्रतिवादी पक्षाचं यावर काय म्हणण आहे?” – कोर्ट.

“युअर ऑनर आपल्या परवानगीने  मी श्री प्रशांत यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी काय आहे हे कोर्टाच्या समोर आणू इच्छितो.” – घोलप

“ठीक आहे विचारा.” – कोर्ट.

“प्रशांत साहेब तुम्ही चाकण ला मुंबईचा कारखाना शिफ्ट केला बरोबर.?” – घोलप

“हो. बरोबर.” – प्रशांत.

“तो कारखाना मुंबईपेक्षा बराच मोठा आहे. बरोबर?” - घोलप.

“हो” – प्रशांत.

“त्या कारखान्याची  प्रोजेक्ट कॉस्ट काय होती?” – घोलप

“ऑब्जेक्षन युअर ऑनर. या प्रश्नांचा आणी सध्याच्या सुनावणीचा काहीही संबंध नाही. प्रतिपक्षांच्या वकिलांनी गैर लागू आणि व्ययक्तिक प्रश्न विचारू नयेत” – निंबाळकर.

“अॅड. घोलप मर्यादा पाळा.” – कोर्ट.

“युअर ऑनर हा प्रश्न गैरलागू तर नाहीच उलट याचा काराराशी घनिष्ट संबंध आहे, आणि मी हेच कोर्टा समोर आणायचा प्रयत्न करतो आहे.” – घोलप.

“ठीक आहे पण हे जर सिद्ध करण्यात तुम्ही अपयशी ठरलात तर तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. हे लक्षात ठेवा.” – कोर्ट.

मान्य आहे. तशी वेळच येणार नाही. तर प्रशांत साहेब प्रोजेक्ट कॉस्ट काय होती. हे सांगाल का?” – घोलप

“पाच कोटी” – प्रशांत.

“इतकी मोठी अमाऊंट, मग तुम्ही बँकेला किती फायनान्स मागीतलं?” – घोलप.

“ऑब्जेक्षन युअर ऑनर, हे जरा अतीच होतं आहे.” – निंबाळकर

“युअर ऑनर, हे प्रश्न प्रत्यक्ष संबंधित आहे. कृपया परवानगी द्यावी.” – घोलप.

“प्रोसिड” -जज 

“किती लोन मागीतलं?” – घोलप.

“चार कोटी.” – प्रशांत. “

“हां तर हे सांगा बँकेने किती लोन दिलं?” घोलप.

“जज साहेब हा सगळा काय प्रकार आहे?” – प्रशांत.

“तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या.” – जज.

“साडे तीन कोटी.” – प्रशांत.

“का? पूर्ण का नाही दिलं?” – घोलप

“ते मी कसं सांगणार? बँकेच्या नियमात जेवढं बसत होतं तेवढं दिलं.” – प्रशांत.

“ठीक आहे तुम्ही जाऊ शकता.” – घोलप.

“युअर ऑनर, यांना ४ कोटी हवे होते पण बँकेने ५० लाख कमी दिले. या पॉइंट ची नोंद घेण्यात यावी. आता आपण अनुमति दिली तर  मला श्री अप्पासाहेब यांना काही प्रश्न विचारायचे आहेत” – घोलप

“प्रोसिड” – जज

“अप्पासाहेब, तुम्ही सर्वांनी संमती पत्रावर सह्या केल्या त्या कोणच्या वर्षी?” – घोलप

“२००२ मधे.” – अप्पासाहेब.

“तुम्ही संमती पत्र वाचून मगच सह्या केल्या असतील.” – घोलप

“हो पूर्ण वाचून आपसात विचार विनिमय करून मगच सह्या केल्या.” – अप्पासाहेब.

“त्यावेळेस तुम्हाला असं नाही का वाटलं की प्रशांत साहेबांची सही पण आवश्यक आहे म्हणून?” – घोलप.

“वाटलं ना. आणि आम्ही अमृतलाल साहेबांना या बाबत विचारलं सुद्धा.” – अप्पासाहेब.

“मग ते काय म्हणाले?” – घोलप.

“ते म्हणाले हा आमच्या साठी रुटीन जॉब आहे. तुम्ही काळजी करू नाकी दोन चार दिवसांत प्रशांत साहेबांशी भेटून सर्व फायनल करून टाकू.” – अप्पासाहेब.

“मग त्यांनी दाखवलं का प्रशांत साहेबांचं संमती पत्र?” – घोलप.

“हो ८-१० दिवसांनंतर त्यांनी आम्हाला प्रशांत साहेबांचं पत्र दाखवलं.” – अप्पासाहेब.

“त्यामध्ये फ्लॅट आणि ५० लाख देण्याचा उल्लेख होता त्या बद्दल तुम्हा लोकांची काय प्रतिक्रिया होती?” – घोलप.

प्रशांत साहेबांनी आमच्या साठी इतकं काही केले की त्यांना पैसे मिळताहेत बघून आम्हाला पण बरंच वाटलं.” - अप्पासाहेब.

ठीक आहे तुम्ही जाऊ शकता.

क्रमश:......

दिलीप भिडे