Stamp Paper Part 5 in Marathi Crime Stories by Dilip Bhide books and stories PDF | स्टॅम्प पेपर भाग 5

Featured Books
Categories
Share

स्टॅम्प पेपर भाग 5

स्टॅम्प पेपर

पात्र परिचय

प्रशांत.               वाड्याचा मालक

विशाखा               प्रशांतची बायको.

विजय राघव           प्रशांतचा  मित्र आणि बिल्डर

जयसिंग              भाडेकरू.

मल्हार              भाडेकरू.

अप्पासाहेब            भाडेकरू.

विश्राम               आप्पासाहेबांचा मुलगा.

गणेश                भाडेकरू

सुधाकर               भाडेकरू 

 

भाग  ५   

भाग ४  वरुन पुढे वाचा........

“जयसिंग ने आणला. तो म्हणाला की तुझ्या बरोबर गोष्टी झाल्या आहेत आणि समाधान झाल्यावरच तू सही केली म्हणून.” – अप्पासाहेब.

“शेवटी त्याने डाव साधलाच. मला आधी पासूनच त्याचा संशय येत होता. आणि म्हणूनच त्याने मी, तुम्ही आणि बिल्डर अशी मीटिंग होऊ दिली नाही. मग आता? तुमचा काय विचार आहे?” – प्रशांत.

“आता तूच कर काही तरी आणि आमची घरं आम्हाला परत मिळवून दे.” – सर्व एकसुरात

“हे बघा, माझ्या सहीचे कागद तुम्हाला दाखवले ते खोटे पेपर होते. म्हणजे हा माणूस फ्रॉड आहे. आता मी विजय ला बोलावतों तोच आपल्याला सांगेल काय एक्शन घ्यायची ते”-  प्रशांत.

“त्याला कशाला? तू एवढा कारखानदार, तुझे वकील असतीलच की.” – अप्पासाहेब.

“असं नसतं अप्पासाहेब, फौजदारी वकील वेगळे, दिवाणी खटले चालवणारे वेगळे, घटस्फोटाचे वेगळे, हाऊसिंग मधले खटले लढवणारे वेगळे. म्हणून विजयचा सल्ला महत्वाचा. त्याला बोलावतो, तुमच्या समोरच होऊन जाऊ द्या  सर्व.” – प्रशांत.

विजय आल्यावर त्याला सगळी कथा सांगितली. तो म्हणाला,

“सर्वात आधी आपल्याला त्याने काम सुरू करू नये म्हणून कोर्टाकडून स्टे ऑर्डर घ्यावा लागेल. प्रशांतचं खोटं संमती पत्र दाखवून त्याने पुनर्विकासाचे काम सुरू केलं आणि चाळ पाडून टाकली आणि राहिवासी लोकांची फसवणूक केली असा मुद्दा आपल्याला कोर्टा समोर मांडावा लागेल. या करिता तुम्हा सर्व चाळकरी लोकांची साथ जरूरी आहे. तुम्ही तयार आहात का?” – विजय.

“हो आम्ही सर्व तयार आहोत.” – अप्पासाहेब.

“ठीक तर मग मी त्या कामाला लागतो. जेंव्हा जरूर पडेल तेंव्हा कोर्टात हजर राहावं लागेल.” – विजय.

मग विजय आणि प्रशांत अॅड. निंबाळकर यांना जाऊन भेटले. निंबाळकर वकील हे विजय राघवचे वकील होते. त्यांच्या प्रत्येक कामात निंबाळकरच सहाय्य करायचे. त्यांना सर्व परिस्थिती सांगितल्यावर ते म्हणाले,

“यांच्या साठी मुंबई सिटी सिविल कोर्टात अर्ज द्यावा लागेल. हा अर्ज मी आज तयार करतो तुम्ही उद्या किमान चार भाडेकरूंना सहीसाठी घेऊन या. दुसऱ्या दिवशी प्रशांत, विजय आणि अप्पा साहेब आणि मल्हार निंबाळकरांच्या ऑफिस मधे पोचले.

“अर्ज तयार आहे. एकदा वाचून घ्या. त्यावर तुम्हा तिघांची सही लागणार आहे मग एक शपथ पत्र द्यावं लागणार आहे ते ही मी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर तयार ठेवलं आहे. प्रशांत अप्पा साहेब आणि मल्हार च्या नावाने.” – निंबाळकर

(सिव्हिल प्रक्रिया संहिता Order 39 Rule 1 & 2 अन्वये तात्पुरता स्थगिती आदेश मिळविण्यासाठी अर्ज)

मा. न्यायालयास सादर विनंती:

अर्जदार हे मागील अनेक वर्षांपासून (४०-५० वर्षे) वादग्रस्त मालमत्तेतील भाडेकरू आहेत.
प्रतिवादी क्र. १ (अमृतलाल) याने अर्जदारांना खोटी माहिती देऊन, तसेच खोटे कागदपत्र तयार करून, पुनर्विकासाच्या नावाखाली सदर चाळ पाडून टाकली आहे.
प्रतिवादी क्र. १ याने अर्जदारांना असे सांगितले की, जमीन मालक प्रशांत यांची संमती मिळाली आहे. परंतु प्रत्यक्षात प्रशांत यांनी अशी कोणतीही संमती दिलेली नाही.
अर्जदारांच्या माहितीनुसार प्रतिवादी क्र. १ ने जमीन मालक प्रशांत यांच्या नावाने खोटे संमतीपत्र व करारपत्र तयार केले असून त्यावरील सही बनावट आहे.
सदर कृत्य हे फसवणूक (fraud) असून अर्जदार व जमीन मालक या दोघांचीही मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे.
प्रतिवादी सध्या सदर जागेवर कोणतेही अधिकृत बांधकाम न करता, विलंब करून अर्जदारांना वंचित ठेवत आहे.
जर प्रतिवादींना पुढील काम करण्यास परवानगी दिली गेली, तर “अन्यथा अर्जदारांना अपरिवर्तनीय नुकसान (irreparable loss) होईल.”
अर्जदारांचा दावा प्रथमदर्शनी (prima facie) बळकट आहे व न्यायालयाने तात्काळ हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
 

म्हणून विनंती:

मा. न्यायालयास नम्र विनंती आहे की:

(अ) प्रतिवादींना सदर जागेवर कोणतेही पुढील बांधकाम, व्यवहार किंवा ताब्यात बदल करण्यास तात्पुरता स्थगिती आदेश (Stay / Injunction) द्यावा.

(ब) सदर वाद निकाली निघेपर्यंत स्थिती जशी आहे तशीच राखण्याचा (Status Quo) आदेश द्यावा.

(क) आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण देण्याचा आदेश द्यावा.

(ड) न्यायालयास योग्य व न्याय्य वाटेल असा इतर कोणताही दिलासा द्यावा.

अर्जदारांच्या वतीने वकील अॅड. निंबाळकर.

अर्जदार क्रमांक १ प्रशांत

अर्जदार क्रमांक २  अप्पासाहेब

अर्जदार क्रमांक ३   मल्हार.

तिन्ही अर्जदारांचे शपथ पत्र अर्जा बरोबर जोडले आहे.

सर्वांनी अर्ज वाचला आणि समाधानाने मान डोलावली. प्रशांत, अप्पासाहेब आणि मल्हार तिघांनीही अर्जावर  आणि शपथ पत्रावर सह्या केल्या.

तिन्ही अर्जदार निंबाळकरांबरोबर कोर्टात गेले. निंबाळकरांनी अर्ज दाखल केला नंबर घेतला. आणि सांगितलं की मॅटर अर्जंट आहे. कोर्टाने ते ऐकलं आणि अर्ज बघितलं. शपथपत्र बघितले

कोर्टाने काही क्षण कागद चाळले न्यायाधीशांनी चष्म्याच्या वरून अर्जदारांकडे पाहिलं.

त्यांनी मल्हारला  विचारलं,

“म्हणजे तुम्ही सांगता आहात की… जमीन मालकाची सही बनावट आहे?” - कोर्ट

कोर्टात क्षणभर शांतता पसरली.

“हो साहेब…” मल्हारचा आवाज थोडा कापरा होता.

“तुम्हाला केंव्हा कळलं की अमृतलालने खोटे पेपर तुम्हाला दाखवले म्हणून?” – कोर्ट

“साहेब, चार वर्ष झाली, काहीच प्रगती होतांना दिसत नव्हती म्हणून आम्ही प्रशांत साहेबांना भेटलो. तेंव्हा आम्हाला कळलं की प्रशांत साहेबांना यातलं काहीच माहीत नाहीये. ते त्यांच्या चाकण च्या कारखान्याच्या कामा मधे व्यस्त होते. मग सर्वानुमते हा अर्ज केला.” – मल्हार.

“हो साहेब मल्हार म्हणतो आहे तसंच झालं आहे. मी माझ्या शपथ पत्रात सर्व लिहिलं आहे.”-  अप्पा साहेब.

कोर्टाने जरा विचार केला, म्हणाले,

“दुसऱ्या पार्टीचं काय म्हणण आहे ते ऐकून घ्यावं लागेल. पण तरी सुद्धा प्रथम दर्शनी प्रसंगातलं गांभीर्य पाहता हे कोर्ट स्टे ऑर्डर देत आहे.

मा. सिटी सिव्हिल कोर्ट, मुंबई

प्रशांत व इतर … अर्जदार
विरुद्ध
अमृतलाल व इतर … प्रतिवादी

आदेश:

अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी असे दिसून येते की अर्जदारांची बनावट सही करण्यात आलेली आहे.

त्यामुळे, पुढील सुनावणीपर्यंत प्रतिवादींना सदर जागेवर कोणतेही बांधकाम किंवा इतर कोणतेही काम करण्यास मनाई करण्यात येत आहे.

प्रतिवादींना नोटीस बजावण्यात यावी.

“झालं पहिली लढाई तर आपण जिंकली पण खरी लढाई यापुढे सुरू होणार आहे. अमृतलाल काय काय लटपटी करतो त्याला उत्तर द्यायला आपण तयार असलं पाहिजे.  आता अमृतलालला आणि आपल्याला पण कोर्टाकडून नोटिस येईल की अमुक अमुक तारखेला सुनावणीला हजर राहावे. जर कोणी गैर हजर राहिला, तर एक्स पार्टी निर्णय होऊ शकतो” – निंबाळकर.

अप्पासाहेब आणि मल्हार च्या चेहऱ्यावर जरा तरतरी आली.

“पण निंबाळकर साहेब, जर अमृतलाल ने ऐकलं नाही आणि काम सुरू केलं तर मग आपण काय करायचं? – मल्हार.

“नाही त्या साइट वर जाऊन तिथे नोटिस चिकटवण्यात येईल. तिथे जयसिंग राहतो आहे तर त्यांची सही घेतल्या जाईल. तुम्ही उद्या जाऊन खात्री करून घ्या. जर काही विपरीत आढळलं तर फोटो काढा आणि मला आणून द्या. बाकी मी बघतो.”– निंबाळकर.

दुसऱ्या दिवशी मल्हार कांदिवली च्या साइट वर गेला. जयसिंग होताचटइथे आणि तो फाटकावर लावलेल्या नोटीसी कडे बघत होता. त्यांच्या हातात पण तोच कागद होता. बहुधा बेलीफ नुकताच येऊन गेला असावा.

“हा काय प्रकार आहे मल्हार?” जयसिंगने विचारले.

“ही स्टे ऑर्डर आहे. आम्ही कोर्टाकडून कालच मिळवली. आता तुझे हाल होणार बघ. मला वाईट वाटतंय पण इलाज नाही.” – मल्हार.

“अरे मल्हार, कोर्टात काय होतं ते मला चांगल माहीत आहे. काहीही होणार नाही, अमृतलाल सगळ्यांचं बारसं जेवून बसला आहे. या सगळ्या गोष्टींचा त्याने आधीच विचार केलाच असेल. बघशीलच तू. पण आता मात्र तुमचं कठीण आहे. तुम्हाला घरं मिळतील की नाही ही शंकाच आहे.” – जय सिंग

“ते आमचं आम्ही बघून घेऊ, पण तू या फ्रॉड केस मधे चांगलाच गुंतणार आहेस. रस्त्यावर येणार हे नक्की.” – मल्हार. मल्हारने मग फाटकांचे आणि साइट चे फोटो काढले. त्यासाठी त्याला मित्राचा डिजीकॅमेरा उसना घ्यावा लागला होता.

दोन दिवसांनी रविवार होता आणि सगळे ठरल्या प्रमाणे प्रशांतच्या  घरी जमले.  प्रशांतने सर्वांना काय काय झालं याचं अपडेट दिलं, आणि म्हणाला की,

“कोर्टाने पुढच्या आठवड्यातली तारीख दिली आहे, तेंव्हा अमृतलाल पण हजर असेल. सुनावणी होईल. बघू काय होतं ते. आपले निंबाळकर वकिल म्हणाले की अजून एक दोन तारखा पडतील पण आपली बाजू भक्कम आहे आणि अंतिम विजय आपलाच होणार आणि याविषयी निंबाळकरांना पूर्ण खात्री आहे.”

क्रमश:......

दिलीप भिडे