Naal books and stories free download online pdf in Marathi

प्रेक्षकांशी अखेरपर्यंत 'नाळ' जोडून ठेवणारा चित्रपट ? नाळ ? - प्रे

प्रेक्षकांशी अखेरपर्यंत 'नाळ' जोडून ठेवणारा चित्रपट
                          ? नाळ ?
                         ⭐⭐⭐⭐  

नुकताच नागराज मंजुळे यांचा  'नाळ' चित्रपट पाहिला. नागराज मंजुळे यांचे चित्रपट म्हणजे सामजिक विषय कलाकृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून समाज व्यवस्थेला मारलेली एक जबरदस्त चपराकच असते. तसाच हा ही एक चित्रपट असून काळजाला भिडणारा न प्रेक्षकांची नाळ शेवटपर्यंत जोडून ठेवणारा असा हा चित्रपट आहे. चित्रपटातून आई व तिचे मूल यांच्यातील ह्रदयस्पर्शी नात्याचा उलगडा केलेला आहे. चित्रपट सुधाकर रेड्डी दिग्दर्शित असून, झी स्टुडिओज व नागराज मंजुळे यांची निर्मिती आहे. सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. अल्पावधीतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, अवघ्या दहा  दिवसातच १९.२५ करोडची कमाई करून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत असून, चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटावर स्तुतीसुमने उधळली आहेत. 

चित्रपटाची सुरूवात आपल्याला काही काळ बालविश्वात घेऊन जाते.चित्रपटात चैत्या या प्रमुख बाल कलाकाराची भूमिका श्रीनिवास पोकळे याने केली असून  ग्रामीण भागातील मुलांचे जसे जीवन असते, तसेच तो जगत असतो. विटी दांडू खेळणे, नदीत पोहणे, गोट्या खेळणे, उनाडपणे फिरणे, आदि. चैत्याच्या वडिलांची भूमिका नागराज मंजुळे यांनी केली असून ते सावकार असतात. चेत्याच्या आईची भूमिका देविका दफ्तरदार यांनी केलेली आहे. आठ वर्षाचा चैत्या जीवनाचा मनमुराद आनंद लुटत असतो. चैत्याचा मामा (ओम भुतकर) जेव्हा बहीणीला भेटायला येतो,तेव्हा चैत्याशी त्याचा होणारा संवाद यामुळे चैत्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागते,चैत्या त्यावेळी संभ्रमात पडतो, काही वेळ गोंधळून जातो. व इथूनच चित्रपटाच्या मुख्य कथानकाला सुरूवात होते. 

 काहीच दिवसापूर्वी जन्मलेले रेडकू जेव्हा मरण पावते.तेव्हा आपले रेडकू दिसत नाही म्हणल्यावर म्हैस हंबरडा फोडते.व दूध देत नाही.सावकार जेव्हा खोटे रेडकू बनवून म्हशी जवळ ठेवतो , तेव्हा क्षणभर पाहून म्हैस त्याला प्रेमाने व मायेने जवळ घेते व दूध देते, खरच ह्रदय पिळवटून टाकणारा हा क्षण आहे. या प्रसंगातून मातृत्वाची मोठी शिकवण दिलेली आहे. हा प्रसंग पाहताना देखील काही क्षण आपले अश्रू ओथंबतात. 


सावकार जेव्हा काही दिवसासाठी आईला गावी सोडण्यासाठी चैत्याला सोबत घेऊन जातात, तो प्रसंगही खूप काही सांगून जातो. तेव्हा सुमीच्या मनात विचारचक्र सुरू होते. ती बैचेन होते. त्या प्रसंगी चैत्या मात्र आनंदी असतो, त्याला उत्सुकता लागलेली असते. पण वाटेतच आई निधन पावते. नंतर बैलगाडी परतीच्या मार्गाने  येते तेव्हा होणारी चैत्याची अवस्था हा प्रसंग पाहताना नकळत आपलेही मन अस्वस्थ होते. 

म्हातारीच्या अंत्यविधी दरम्यान  चैत्याला एक व्यक्ती येणार असल्याचे समजते. तेव्हा चैत्या आनंदी होतो. त्या व्यक्तीची त्याला उत्सुकता लागते. जेव्हा ती व्यक्ती येते, तेव्हा चैत्या सतत त्या व्यक्तीभोवती घुटमळतो. तिला एकटक पाहत राहतो. हा क्षण पाहताना काही क्षण मी अस्वस्थ झालो होतो. आता पुढे नक्की काय होईल,  याची उत्सुकता लागते. चित्रपटाच्या अंतिम टप्प्यात नकळत मी भावनिक झालो होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्या गावी जाते तेव्हा तीच्या मनातील हुरहुर, घालमेल तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळताना पाहून माझ्याही डोळ्यात टचकन पाणी आले. दरम्यान या घडलेल्या प्रसंगानंतर चैत्या आणि त्याच्या आईचे नाते आणखी घट्ट होते. हा प्रसंग खूप काही सांगून जातो. 

चित्रपटातील प्रमुख नायक चैत्या अवघ्या सात आठ वर्षाचे  लहान पोरं. श्रीनिवास जरी लहान असला,  तरी त्याने या पात्राशी एकरूप होऊन जबरदस्त अभिनय केला आहे चित्रपटात बर्याच क्षणी जेव्हा चैत्या रडतो तेव्हा आपणही नकळत भावनिक होतो. तो आनंदाने बागडतो, हसतौ तेव्हा आपल्याही चेहर्यावर अलगद हास्याची कळी उमलते. चित्रपटातील बरेच क्षण काळजाला भिडणारे आहेत.चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी अतिशय सुंदर दिग्दर्शन केले असून, सैराटमध्ये कॅमेरामनची भूमिका बजावणार्या या व्यक्तीच्या नवीन भूमिकेविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. त्यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावलेली असून, चित्रपटाचे संवाद, कथा उत्तम लिहिलेली असून, सर्वच प्रॉडक्शन टीम कौतुकास पात्र ठरलेली आहे. 

या चित्रपटातून अतिशय संवेदनशील विषय मांडला आहे. दरम्यान चित्रपटात काही गोष्टींचा उलगडा होत नाही त्या गुलदस्त्यातच राहतात ,या गोष्टींनी अस्वस्थ होत व विचार करीत, मी चित्रपटगृहाबाहेर पडलो.चित्रपट जसजसा पुढे सरकतो, तसे पुढे काय होईल याची सतत आपल्याला उत्सुकता लागते. दरम्यान मामाच्या भेटीनंतर चैत्या  संभ्रमात का पडतो, चैत्याला उत्सुकता लागलेली ती व्यक्ती कोण होती आदि प्रश्नांची उत्तरे हवी असतील, तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच चित्रपटगृहात जाऊन पाहा. 


लेखक- कुणाल चव्हाण, सातारा.