Swaraja Surya Shivray - 7 books and stories free download online pdf in Marathi

स्वराज्यसूर्य शिवराय - 7

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग सात

॥॥ बंधन विवाहाचे, कंगन स्वराज्याचे ! ॥॥

जिजाऊंची तळमळ, दादोजींची दूरदृष्टी, शिवरायांची चिकाटी, जनतेची साथ, शहाजीराजे यांचा पाठीशी असणारा हात या अशा संगमातून पुणे सावरत होते, उभे राहात होते, बारसे धरत होते, हळूहळू चालत होते. जनतेचा विश्वास संपादन केल्यामुळे, त्यांच्या अडीअडचणीला धावून गेल्यामुळे शिवबा-दादोजींच्या हाकेला लोक हातातला घास हातात आणि तोंडातला घास तोंडात अशा अवस्थेत त्यांच्या मदतीला धावत होते. पुण्याचा कायापालट होत असताना, पुणे पुन्हा पहिल्यासारखे उभे राहात असताना दादोजींच्या कुशल मार्गदर्शनातून लालमहाल उभा राहिला. योग्य मुहूर्त पाहून शिवराय जिजाऊंसह लालमहालात राहायला गेले. रयतेमध्ये मिसळत असताना, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवत असताना शिवरायांनी अनेक मित्र, साथीदार मिळवले. ते नियमितपणे त्यांच्याशी संपर्क साधून असल्यामुळे कधी त्यांच्यामध्ये मैत्रीचे घट्ट धागे विणल्या गेले हे कुणालाही समजले नाही. हे मावळे हुशार, चाणाक्ष, प्रामाणिक, जीवाला जीव देणारे, कष्टाळू, चपळ असे होते. शिवरायांचा शब्द ते वरचेवर झेलत असत. शिवराय या मावळ्यांसोबत दिवस दिवस हिंडून जहागीरीचा सारा भाग, डोंगर कपारी, ओढे, नदीनाले, देवस्थाने इत्यादींची खडानखडा माहिती घेत होते. प्रत्यक्ष भेट देऊन हा सारा भाग डोळ्याखालून घालत होते. काही दिवसातच शिवरायांना आपल्या जहागीरीसोबतच कोंढाणा सुभेदारीची बारीकसारीक माहिती झाली. या मावळ्यांसोबत हिंडून फिरून घरी आले की, शिवराय जिजामातेच्या कानावर सारा वृत्तांत टाकत असत. शिवरायांची तळमळ, जिज्ञासूवृत्ती पाहून जिजाऊंना शिवबाचा अभिमान वाटत असे. त्या म्हणत,

"शिवबा, भोसले घराण्याचा तू वारस शोभतोस बरे. आपले भोसले घराणे म्हणजे थेट प्रभू श्रीरामचंद्राचे वारस. श्रीरामाची न्यायबुद्धी, पराक्रम हे आपले वैशिष्ट्य! जनतेला सुखी करणे हे आपले परम कर्तव्य ते तू मन लावून पार पाडतो आहेस. दुसरीकडे तुझे आजोळ म्हणजे जाधवांचे घराणे. या जाधव घराण्याचा पूर्वज म्हणजे श्रीकृष्णाचे घराणे! ही दोन्ही घराणी पराक्रमी तर आहेतच परंतु जनतेचे कैवारी, रक्षक ! प्रत्यक्ष श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा तू वारसदार आहेस." जिजाऊंचे बोल ऐकून शिवबा एका वेगळ्याच प्रेरणेने, स्फूर्तीने पेटून उठायचे. सारे कसे मनाजोगते घडत असताना ती आनंदाची बातमी लालमहालात येऊन धडकली. शहाजीराजे लवकरच पुण्यात काही दिवसांसाठी येणार होते. ते ऐकून सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. शहाजीराजांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली..…

ठरलेल्या दिवशी शहाजीराजे यांचे पुणे प्रांतात आगमन झाले. अल्पावधीतच पुण्याचे बदललेले स्वरूप पाहून, पुण्याने टाकलेली कात पाहून शहाजीराजे आश्चर्यचकित झाले. आपण टाकलेली जबाबदारी जिजाऊ, शिवबा यांच्या मदतीने दादोजींनी जहागीरीत फुंकलेले प्राण पाहून शहाजीराजेंना खूप आनंद झाला. आदिलशाहीच्या आक्रमणामुळे ओसाड पडलेल्या वस्त्या, खेडी, गावं पुन्हा उभी राहिली असून, गजबजलेली पाहून शहाजीराजे हरखून गेले. शेतीमध्ये शेतकरी नांगर चालवत आहेत हे पाहून राजांना गहिवरून आले. ते आनंदाने म्हणाले,

"व्वा! दादोजी, व्वा! बहुत खुब! पुण्याची गेलेली रया, रुबाब तुम्ही परत आणलात. तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत." ते ऐकून दादोजी अत्यंत विनयाने म्हणाले,

"महाराज, मी फार काही मोठे काम केले असे नाही. आऊसाहेबांची तळमळ, त्यांचे प्रोत्साहन यामुळेच हे सारे घडले. केलेल्या कामाचे चीज होणार हे माहिती असल्यामुळे काम करणारांना हुरूप येतो, उत्साह येतो आणि मग त्यातून अशक्य ते सारे शक्य होते. आणखी एक गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी हे सारे करायचे ती व्यक्ती शिवबा. महाराज, शिवबाजवळ असलेले कर्तृत्व, करून दाखवण्याची धमक, रयतपोटी असलेली आत्मियता, धडाडी पाहून मी प्रेरित होऊन माझ्या हातून थोडेबहू कार्य घडले आणि तुम्ही टाकलेला विश्वास मला नेहमीच कार्यरत ठेवत होता."

तितक्यात तिथे उपस्थित असलेल्या जिजाऊ म्हणाल्या,

"महाराज, एक गोष्ट आपल्या कानावर घालायची आहे. पाहता पाहता शिवबा दहा वर्षांचा झाला आहे तेव्हा....." जिजाऊंना मध्येच थांबवून शहाजीराजे म्हणाले,

"आले. लक्षात आले. तुम्हाला सूनमुख पाहायची घाई झालेली आहे. आमच्याही मनात ते होतेच. ठीक आहे. असेल तुमच्या मनात, पाहण्यात एखादी मुलगी तर दादोजींच्या हस्ते निरोप पाठवा आणि द्या बार उडवून."

दोन तीन दिवस राहून शहाजीराजे पुन्हा बंगळूरकडे रवाना झाले. जाण्यापूर्वी त्यांनी दादोजी कोंडदेव आणि इतर अनेक व्यक्तींचा त्यांच्या कामगिरीबद्दल यथोचित सत्कार करून, मौल्यवान वस्तू इनाम देत सर्वांचा निरोप घेतला. राजे निघून गेले परंतु त्यांनी अजून एक महत्त्वाची जबाबदारी जिजाऊ आणि पर्यायाने दादोजी कोंडदेव यांच्यावर टाकली होती ती म्हणजे शिवरायांच्या लग्नाची. हा होता विश्वास! आपण नसलो तरीही आपल्या पश्चात कोणतीही जबाबदारी पेलण्याची आणि ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समर्थ अशा व्यक्ती आहेत हाच तो विश्वास! जिजाऊंच्या नजरेत एक ठिकाण, एक मुलगी होती. मनामध्ये शिवरायांच्या लग्नाचा विचार शिरतो शिरतो तोच जिजाऊंच्या चाणाक्ष नजरेने हेरलेली, निवडलेली मुलगी म्हणजे फलटणचे सरदार नाईक-निंबाळकर यांची कन्या सई ! जिजाऊंनी तो विचार दादोजी कोंडदेव यांना बोलून दाखवला. दादोजींनी संमती दिली. जिजाऊंची परवानगी घेऊन दादोजी एका नाजूक परंतु अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीवर निघाले. ते फलटणला निंबाळकरच्या दरबारी दाखल झाले. त्यांनी शिवरायांसाठी सईबाईंना मागणी घातली. प्रचंड आनंदी झालेल्या सरदार नायकांनी तो प्रस्ताव वरचेवर झेलला. भोसले घराण्याचा कुलदीपक आपला जावाई होणार या कल्पनेने त्यांना झालेला आनंद लपवता येत नव्हता. दोन्ही घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. वराचे वडील राजे शहाजी एका महत्त्वाच्या कामगिरीवर असल्यामुळे त्यांना लग्नाला येता येणार नव्हते ही बातमी लालमहालात पोहोचली आणि काही क्षण लालमहालात नैराश्य पोहोचले परंतु लगेच सारे सावरले. हे विश्वची माझे कुटुंब म्हणून अख्खं जीवन व्यतीत करणारांसाठी असे प्रसंग नवीन नसतात. घरावर तुळशीपत्र ठेवणारांना अशा प्रसंगांना नेहमीच सामोरे जावे लागते. शिवरायांच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट शहाजीराजांना कळविण्यात येत होती. राजे धावपळीत असतानाही स्वतः लक्ष घालून एकूणएक गोष्ट जाणून घेत होते.

उजाडला तो दिवस, आला तो क्षणही आला. निंबाळकर घराण्यातील सुलक्षणी, कर्तव्यदक्ष कन्या सईबाई हिने देवब्राम्हणांच्या साक्षीने, पै पाहुणे, मित्रांच्या उपस्थितीत भोसले घराण्याचे कुलदीपक, प्रभू रामचंद्राचे वंशज, जिजाऊ-शहाजी यांचे सुपुत्र शिवाजी भोसले यांच्या गळ्यात वरमाला घातली. रीतीरिवाजाप्रमाणे, परंपरेनुसार भोसले घराण्याचे माप ओलांडून लालमहालात प्रवेश केला त्यावेळी सईबाईंचे वय होते आठ वर्षे तर शिवरायांचे वय होते दहा वर्षांचे! हसण्याचे, खेळण्याचे, बागडण्याचे, रुसून बसण्याचे वय असताना संसाराचा भार खांद्यावर घ्यावा लागणारा असा तो काळ! लग्नसोहळा अत्यंत दिमाखदारपणे, उत्साहात संपन्न झाला. सर्वत्र आनंदाचे, समाधानाचे वातावरण असूनही शहाजीराजे नसल्याची खंत, रुखरुख जाणवत होती. तिकडे राजांची अवस्था का वेगळी होती? परंतु नाइलाज होता....

त्यादिवशी बंगळूरहून एका खास दूताने लालमहालात प्रवेश केला. शहाजीराजांचा एक खास लखोटा घेऊन तो दूत आला होता. शहाजीराजे यांची आणि पुणे येथील त्यांच्या कुटुंबीयाशी भेट होऊन बराच कालावधी लोटला होता. सूनबाई सईबाईंनाही त्यांनी पाहिले नव्हते. बंगरूळ येथे शहाजीराजे त्यांची दुसरी पत्नी तुकाबाई यांच्यासोबत राहात होते. तुकाबाईंना एकोजी नावाचा मुलगा होता तर जिजाऊ-शहाजींचा मोठा मुलगा संभाजी हाही शहाजीराजांच्या सोबत बंगरूळ मुक्कामी राहात होता. शहाजीराजांनी त्या दूतासोबत निरोप पाठवला होता की, आमची अशी इच्छा आहे की, आपण सर्वांनी बंगळूर मुक्कामी यावे. काही दिवस एकत्र राहूया. राजांचा तो निरोप ऐकून लालमहाली सर्वांना आनंद झाला. ताबडतोब बंगरूळ येथे जाण्याची तयारी सुरू झाली. देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंची खरेदी झाली. महाराजांची आणि इतरांची भेट होणार या विचाराने शिवराय आनंदी झाले. सोबतच आदिलशाही व्यवस्था पुन्हा नव्याने जवळून पाहायला मिळणार या विचाराने शिवराय बंगरूळला जाण्यासाठी तयार झाले.

पुणे-सुपे या जहागीरीची, कोंढाणा या सुभ्याची सुयोग्य व्यवस्था लावून, योग्य व्यक्तींच्या हाती कारभार सोपवून एके दिवशी जिजाऊ, शिवराय, दादोजी मोठा लवाजमा घेऊन बंगरुळच्या दिशेने निघाले. मजल दरमजल करत, मोठ्या उत्साहाने तो ताफा बंगरूळ शहरी दाखल झाला. शहाजीराजांना कळविण्यात आले. शहराचे वैभव डोळ्यात साठवत सारेजण शहाजीराजांच्या वाड्याजवळ आले. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ वाड्यातून सनई, चौघडे यांचे मंगल स्वर ऐकू येत होते. त्या मंगलमय स्वागताने सारे भारावून गेलेल्या अवस्थेत वाड्यात शिरले. समोर शहाजी राजे स्वागतासाठी उभे होते. त्यांना पाहताच शिवराय पुढे झाले. त्यांनी वडिलांच्या चरणांना स्पर्श केला. दादोजी कोंडदेवही शहाजीराजांना मुजरा करण्यासाठी वाकत असताना राजांनी त्यांना अडवले. आलिंगन देऊन शहाजीराजे म्हणाले,"नाही. तुम्ही वाकू नका. शिवबाचे भाग्य थोर, त्याला तुमच्यासारखा मार्गदर्शक मिळाला...." शिवबा त्याच्या दुसऱ्या आईला... तुकाबाईंना भेटायला गेल्याचे पाहून शहाजींनी विचारले, "मला सांगा, शिवबा, तुमच्या मताप्रमाणे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागतो ना?"

"महाराज, आमचे कसे आहे, आम्ही सहसा मळलेल्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न करतो परंतु शिवबाचे तसे नाही. ते धाडसी आहेत. वेगळीच निर्णय क्षमता त्यांच्याजवळ आहे. ते सल्ला जरूर घेतात परंतु अचानक वेगळाच ठोस, अचूक निर्णय घेतात. तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी मलाच काय पण कदाचित आपल्याला ही बाळराजे स्वतःच्या मार्गाने नेऊ पाहतील..." दादोजींचे ते बोल ऐकून शहाजींना मनोमन आनंद झाला. एक वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरले.

शिवराय आणि जिजाऊ बंगळूरला आले आणि शहाजींच्या मनात घोळत असलेल्या एका महत्वाकांक्षी विचाराने उचल खाल्ली. शिवराय आणि सईबाई यांच्या लग्नाला कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे शहाजी राजे उपस्थित राहू शकले नाहीत. त्याची खंत कुठे ना कुठे त्यांच्या मनाला सलत होती. ते एक विचार करीत होते. त्यांनी तो विचार जिजाऊंना बोलून दाखवला. तेंव्हा जिजाऊ म्हणाल्या,

"आपला विचार बरोबर आहे. जी खंत आपणास वाटते आहे तीच सल घेऊन आम्ही आला दिवस ढकलत आहोत. आपण आमच्या तोंडातला विचार बोलून दाखवला. आपली तयारी असेल तर आपल्या उपस्थितीत, आपल्या साक्षीने, आपल्या आशीर्वादाने शिवबाचे दुसरे लग्न करायला आम्हाला आनंदच होईल."

जिजाऊंच्या तशा बोलण्याने शहाजी राजे मोठ्या आनंदाने तयारीला लागले. सरदार मोहिते यांची मुलगी सोयराबाई हिची त्यांनी सून म्हणून निवड केली. तसा प्रस्ताव त्यांनी मोहितेंकडे पाठवला. मोहिते मोठ्या आनंदाने तयार झाले आणि लगोलग शिवरायांचे दुसरे लग्न झाले.

शिवराय बंगरूळ येथे आपल्या माणसात होते. ते त्यांच्याशी रममाण होत असले तरी ते आतून अस्वस्थ होते, बेचैन होते. फावल्या वेळात ते बंगरूळ आणि पर्यायाने आदिलशाहीच्या बाबतीत जाणून घेत असत. त्यावेळी त्यांना समजले ते भयंकर होते.त्यामुळे त्यांना आदिलशाही राजवटीचा तिटकारा आला, संताप आला, एक प्रकारे चीड निर्माण. हिंदू राजांची राजवट क्रुरपणे कशी संपुष्टात आणली, विरोध करणारांच्या कत्तली कशा करण्यात आल्या, प्रसंगी काही राजांच्या जिवंतपणी त्यांच्या अंगावरील कातडी कशी सोलून काढून त्यांना कसे अपमानित केले अशा अंगावर शहारे आणणारी वर्णने ऐकायला मिळाली. ते सारे ऐकून शिवरायांच्या मनात आदिलशाहीबद्दलचा तिरस्कार मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे बंगरूळ शहरातून केव्हा एकदा निघून जावे असे शिवरायांना वाटू लागले.शिवरायांची मनस्थिती त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून

जाणवू लागली. शिवबा नाराज आहे हे ओळखून शहाजी राजे जिजाऊ, शिवराय, दादोजी आणि इतरांना घेऊन विजापूर येथे पोहोचले. तिथे तरी वेगळी परिस्थिती होती का? रस्तोरस्ती, चौकाचौकात हिंदू लोकांना डिवचण्यासाठी, खिजवण्यासाठी तिथल्या खाटकांनी आपापल्या दुकानात मुद्दाम गाईंना सोलून त्यांची कातडी लटकावलेली दिसत होती. ते पाहून शिवराय संतापाने थरथरू लागले. त्यांचा राग अनावर झाला. सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचताच शिवरायांनी तिथे राहायला स्पष्टपणे नकार दिला. शहाजीराजे म्हणाले,

"शिवबा, मी तुमची मनस्थिती समजू शकतो. तुम्हाला इथे राहायचा मी आग्रह करणार नाही. तुम्ही इथे आलाच आहात तर जाण्यापूर्वी एकदा आदिलशाहाला मुजरा करण्यासाठी दरबारात..."प्रत्यक्ष पित्याचा तो प्रस्ताव ऐकून शिवरायांचा राग अनावर झाला. ते संतापाने शहाजींना म्हणाले,"तातश्री, आपले भोसले घराणे थेट श्रीरामाच्या वंशाचे, आमचे आजोळ...जाधव घराणे हे श्रीकृष्णाच्या घराण्यातील.... अशा पराक्रमी घराण्यातील वारसाच्या....तुमच्या पोटी मी जन्म घेतला आहे. हा जो तुम्ही म्हणताय तो बादशहा कुणाच्या जीवावर बादशहा झाला तर आम्हाला गुलाम करून, आमची मंदिरे धराशायी करून, आमच्याच लोकांना कंठस्नान घालून हे मोठे झाले आणि आपण यांच्यासमोर झुकायचे? पिताजी, आम्ही आपल्यापुढे, जिजाऊसाहेबांच्या समोर, भवानीमातेच्या पुढे, शिवशंभोपुढे एकदाच काय हजारदा लोटांगण घालू परंतु या जुलमी...."

शिवरायांचा तो अवतार पाहून शहाजीराजे क्षणभर आश्चर्यात पडले. दुसऱ्याच क्षणी म्हणाले,"शिवबा, तुझे जरी बरोबर असले तरी त्याच आदिलशाहीने आपल्याला जहागीर दिली आहे. त्यामुळे आपल्याला मानमरातब मिळतो आहे."

"मला नाही तसे वाटत. या मुलखावर राज्य करणारे पूर्वीचे आपले राजेच खरे राजे! जोरजबरदस्तीने हिसकावून घेतलेले हे राज्य मुळात यांचे नाहीच तर हे कशाच्या जोरावर जहागीरी वाटत असतात? त्यांच्या मर्जीमुळे? उद्या यांचे आणि आपले पटले नाही तर हे ती जहागीर काढून घेणार नाहीत?" शिवबाचे ते सडेतोड बोल ऐकून आनंदाने सद्गतीत झालेले शहाजी राजे म्हणाले, "व्वा! शिवबा, व्वा! तुमचे बोल ऐकून आम्ही खुश झालो आहोत. आमच्या मनात असूनही आम्ही स्वतःचे राज्य स्थापन करू शकलो नाही ती आमची इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्हाला समाधानच आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आम्ही तुम्हाला जमेल तशी मदत करू. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या माँसाहेब आणि दादोजी कोंडदेव तुमच्यासोबत आहेत. सर्वांना सोबत घेऊन, त्यांच्या विचाराने काम करा."

प्रत्यक्ष पित्याचा आशीर्वाद मिळाल्याने शिवराय प्रचंड आनंदी झाले. परंतु तरीही त्यांच्या मनात एक अपराधीपणाची भावना दाटून आली. आपण पिताश्रींना तसे बोलायला नको होते असे त्यांना राहून राहून वाटत होते. आपले वडील अत्यंत पराक्रमी आहेत. परकियांची चाकरी करणे हे त्यांना मनापासून आवडत नाही परंतु त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता आणि नाही. आपले स्वतःचे राज्य असावे म्हणून त्यांनी एकदा नव्हे दोन वेळा प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने त्यांना यश मिळाले नाही. आजही त्यांना आपल्या मुलाने बादशहाला कुर्निसात करावा हे पटलेच नसावे. जर आपण दरबारी जाऊन मुजरा केला असता तर पिताश्री अंतःकरणात दुखावले गेले असते. त्यांचीही इच्छा आपण स्वतंत्र राज्य निर्माण करून रयतेला सुखी करावे हीच आहे. तसे त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यांनी आपल्याला आशीर्वादच दिला आहे

शहाजी राजे यांनी दादोजी कोंडदेव यांच्या मदतीसाठी अजून काही हुशार, कर्तबगार व्यक्ती देऊन शिवराय, जिजाऊ यांना पुन्हा पुणे जहागीरीच्या दिशेने रवाना केले. परंतु शहाजींचा निरोप घेऊन निघालेले शिवबा वेगळ्याच विचाराने प्रेरित होऊन, मनोमन स्वराज्य स्थापनेचे कंगन बांधून तिथून निघाले. एक वेगळेच तेज, एक वेगळाच आत्मविश्वास,दृढनिश्चय, कठोरता त्यांच्या मुखकमळावर झळकत होती....…

नागेश सू. शेवाळकर