Petalach ki books and stories free download online pdf in Marathi

पेटलाच कि !

मी भग्या, आवंदा चौथी पास झालाय ह्यो गब्रू! आता तर उन्हांळ्याचा सुट्ट्या हैत. रट्टाऊन जेवायचं अन गावभर हुंदडायचं, हेच आपलं काम. शाळा आसन, तर बी हेच काम असत आपलं! आत्ता बी मी आमच्या रानात चिंचाची बोटक खाया आल्तो. खाऊन खिसाभर संग घेतल्यात.

मी खाकी चड्डी वर करून दोन पायावर उकिडवा बसलो अन कडब्याच्या गंजी खाली वाकून बघितलं, तर काय? बा बिड्या वडताना जसा भकाभका धूर काढितो, तसा धूर खालुन निघत होता! गन्जीच्या टोकाला पायलतर, भली थोरली धुराची वावटळ आभाळात घुसली व्हती! मायला, गंजी पेटली का काय? म्या पुन्नानदा गंजीच्या टोकाकडे बगतील तर, गप्पकन जाळच निगाला! पेटलंच कि! दोनी हातानं ढगाळी चड्डी कमर जवळ गच्चीन्ग धरली ( गळून पडूने म्हणून ), मुंडी खाली घालून झिंगाट गावाकडं धूम ठोकली. खाली मुंडी घालून धूम पळत होतो, त धबेलदिशी, एका निबर डोकं ढेरीला धडकलो. कोन भाड्या आडवा आला म्हनून, वर मुंडक केलंत, फडलंदिशी मुस्काटात बसली! डोळ्या म्होरं काजव चमकले! बरुबर! असली व्हटकाळीत जोगदंड मास्तर, नाय तर आमचा बाच हांतु! आता उन्हाळ्याच्या सुट्या हैत, तवा ह्यो बाच असणार!
"असं रानडुकरागत पळाया काय झालं? म्होरल माणूस बी दिसेना का ?"
" आबा, पेटलंय! " मला पळून धाप लागली व्हती.
" पेटलं? अन काय?
" रानात!"
"भाड्या, नीट सांग कि, का दिऊ आनि एक टोला!"
" नग! दम त खाउ दे! आर, आपल्या रानात गन्जी पेटलीया!"
"तू, नीट बगितलंस का?"
"व्हय! गप्पकन जाळ झाला अन धूर बी लई झिरपतूया!"
मग, बा न दम खाल्ला नाई, 'तुक्या, लक्ष्या, अरे, पळा मर्दानु रानात, कडबा पेटलाय जनू !' म्हनून हाळी देत, शेताकडे धूम पळाला!
मी पारावर दम खाया टेकलो. आपलत काम झालं! आता मोठी मानस काय का करनातं!
००००००००
पंचायती म्होरं एक दांडग पिंपळाच झाड हाय. त्याला थोरला पार बी बांधलाय. सांच्या गावचे लोक पारावर चकाट्या मारीत बस्त्यात. तंबाकूची, बिड्या कांड्याची देव घेव व्हती. डिगा, मजा मैतर, म्हंतु कि ते 'राजकारांन' करत्यात. डिग्याला समद कळत. का? कि तो माज्या पेक्षा मोठा हाय. समुरल्या खंबा वरल्या लाईटीचा उजेड पारावर पडतु, तीत गावचे लोक 'राजकारन ' करत्यात अन आमी पोरं, झाडाच्या मागल्या अंगाला, गोट्या नाय तर गिल्ली -दांडू खेळतावं. अंधार झाल्यावर घरी जाताव, नाय तर कवा -कवा मोठ्या मानसाच्या गप्पा ऐकत झाडाला टेकून बस्ताव. लई मजेशीर असत्यात त्यांच्या गप्पा! आत्ता बी मी तेच करतुया!
"येश्या, आज तुजी गंजी पेटली जणू. "
"व्हाय हो, दाजी. चार -दोन हजाराचा फटका बसला बगा!" बा बोलला.
" पैशाच काय घिऊन बसलास मर्दा, चार महीन गुर उपाशी मरतील तेच काय?"कदम बोलला.
" खर हाय कदमा, एकी कून पैसा गेला, अन दुसरीकून जनावराचे हाल! आता पुना नवा कडबा घेन आलं."
"पर असा एका एक कसा पेटला?" शिंदे मास्तरन, कदम काका शेजारी टेकत इचारलं.
"कोणास ठाव?"
"उन्हाच्या तडाक्यानं पेटलं आसन, एखांदी बार!" दाजी बोलला.
"का र येश्या? तुज्या गंजी वरन लाईटीची वायर बियर तर नाय ना गेली?" मास्तरनं बा ला विचारलं.
" नाय बा. माजी कोरडी शेती, मला लाईट लागत नाय. अन खंबा पन नाय शेतात. पर तेन काय होतयं?"
" एखांदी बार शॉर्ट सर्किटची चिलागीं पडून पेटू शकत."
"मास्तर, मला एक डाउट हाय. बगा, मंजे पटतुय का? हि भानामतीची तर भानगड नसन?" कदमांन वेगळाच पाईंट काढला.
"पर तुला असं का वाटत?" बा न इचारलं.
" मंजी बाग, गेल्या सालीबी अश्याच गंज्या पेटल्या व्हत्या! कस? काय? कायपन उमगलं नव्हतं! असल्या इनाकारण आगी, भानामतीतच लागत्यात म्हन! म्हनून आपलं, मला एक वाटतंय. "
" कदम्या, येडा का खुळा मर्दा? भानामती -बिनामती असलं काय नसत. तुज्या डोक्यातलं हे खूळ काडून टाक! अन दुसऱ्याच्या डोक्यात खुपसू बी नगस!" शिंदे मास्तरन जबर दम दिला कदमला. बरंच झालं, बेन त्याच कामाचं हाय! जरा टैमान मास्तर अन बरीच मानस उठून गेली. मजा बा, अन कदम काका दोगच पारावर उरले होते.
"कदमा, हि भानामतीची काय भानगड हाय?"बा न इचारलं.
" लय बेक्कार भानगड असतीया! कडबा, कदि कापड, तर कवा कवा घर बी पेटतय! अपुआप! "
"आर तिच्या मारी! मायला, माजावर तर कोन भानामती केली नसन ना?"बा न घाबऱ्या आवाजात इचारलं.
"तुज्या वर? अन तुला असं का वाटतंय?"
" अरे सकाळ धोतराला जळाल्यागत भोक पडलीत! हे बाग! अन सांच्या गंजी पेटली!" बा न धोतराची भोक कदमाला दावली. आमचा बा बी येडाच हाय! ह्यो बिड्या पितो. काल दाराम्होर बाजवर बसून बिडी पेटवत व्हता तवा पेटती काडी मोडून धोतरावर पडलेली म्या बघितली! त्यो ते इसरला. अन आता मन भानामती! आपल्याला काय करायचंय मना! मरना! काय सांगाया गेलं तर थोबाड फोडतो! काय करायचाय असला मारकुटा बाप? दिस भर बिड्या, सांच्या दारू,अन रातच्या राडा! रोजचंच झालया.
"येश्या, जपून र बाबा! मला काय लक्षन खरं दिसत नाय! " कदमा न बाला चांगलंच घाबरावलंकी!
" याला उपाय?"
" खालच्या आळीतला बाबू गोसावी, भानामतीचा बंदुबस्त करतो म्हन! आता तूच बग गेल्या चार सालात ,गावच्या समद्या गंज्या कवा न कवा पेटल्या,पर तेचि? एक डाव बी नाय पेटली!"
हे मातर खरं हाय!
००००००
मी तुकडा खाऊन भाईर पडलो तवा खोपटा भायेर बा, अन गोसावी बाबा अंगणातल्या बाजवर बिड्या पीत होते.
" येतो सांच्या! टाकू करून बंदुबस्त! तू नग काळजी करुस. सागतीलेलं सामान अनुन ठिव! तेवढं बिदागीच मातर इसरु नगस! पाशे एक रूपे अन कोंबड! या कामात उधारी नसती बरका!" गोसावी बाबा, बिडी जमिलीवर चिरडून बोललेला म्या ऐकलं.
०००००००
कूट कूट भटकत,रमत गंमत दिवे लागणीच्या टायमाला मी गोसावी बाबाच्या शेतात पोउचलो. गोठ्या बाहेर मक्याच्या कडब्याची टोलेजंग गंजी ऐटीत हुबी व्हती. मी चड्डीच्या खिशातून काडी पेटी काडली. काडी चेतवली, अन अल्लाद गंजीच्या बुडात टाकली.! बिदागी पाशे एक रूपे अन कोंबड, व्हय रे भाड्या! काय त म्हन भानामती! आत्ता घे, तुलाच भानामती!

मी खाकी चड्डी वर करून दोन पायावर उकिडवा बसलो, अन कडब्याच्या गंजी खाली वाकून बघितलं, तर काय? बा बिड्या वडताना जसा भकाभका धूर काढितो, तसा धूर खालुन निघत होता! गन्जीच्या टोकाला पायलतर, भली मोट्ठी धुराची वावटळ आभाळात घुसली व्हती! मायला गंजी पेटली का काय? म्या पुन्नानदा टोकाकडे बगतील तर गप्पकन जाळच निगाला ! पेटलंच कि! दोनी हातानं ढगाळी चड्डी कमर जवळ गच्चीन्ग धरली, मुंडी खाली घालून झिंगाट गावाकडं धूम ठोकली!
गावात खबर द्याया, पाहिजेल का नको?

---सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे . पुन्हा भेटूच Bye .