Me aek Ardhvatraav - 2 books and stories free download online pdf in Marathi

मी एक अर्धवटराव - 2

२) मी एक अर्धवटराव!
दिवसागणिक मी मोठा होत होतो. आईच्या म्हणण्यानुसार जसे माझे वय वाढत जात होते तसतसे जन्मतःच मला चिकटलेले गुण अधिकच घट्ट होत होते. इतके की, मी काही तरी कारण काढून जेवायचेही टाळत असे. नानाविध कारणे सांगून शाळेत जायचेही टाळत होतो. परंतु घरच्यांचा दट्ट्या आणि गुरुजींचा रट्टा यामुळे उशिराने का होईना शाळेत जात असे. पूर्ण वेळ शाळा कधी केलीय हे मला आठवत नाही. मात्र गुरुजी म्हणत तसा मी एकपाठी होतो. अभ्यासात विशेष परिश्रम न करताही मी सदैव पन्नास-साठ टक्के गुण मिळवत असे. आठव्या वर्गात शिकत असतानाची एक घटना माझ्या कायम स्मरणात आहे. ती गोष्ट आठवली की, मी आजही मनसोक्त, भरपूर हसतो. विज्ञानाचा प्रयोग होता. मी तो प्रयोग अत्यंत व्यवस्थित पार पाडला. गुरुजीनींही शाबासकी दिली. नंतर तो प्रयोग वहीत लिहून काढायचा होता. मी सारे काही क्रमवार, मुद्द्यांसह लिहिले. परंतु प्रयोग करून, ते सारे वहीत लिहून कंटाळा आला आणि मी प्रयोगवहीत काहीही निष्कर्ष न लिहिता, ती जागा कोरी सोडून वही तशीच शिक्षकांकडे दिली. दुसऱ्या दिवशी वर्गात विज्ञानाच्या शिक्षकांनी अशी काही हजेरी घेतली की विचारु नका.
एकदा मराठीच्या शिक्षकांनी माझ्या आवडत्या 'आळस' या विषयावर घरून निबंध लिहून आणायला सांगितला. शाळा सुटली. मी घरी आलो. थोडावेळ खेळलो. सायंकाळी वहीची पाच पाने टराटरा फाडली. पहिल्या पानाच्या कोपऱ्यात माझे नाव, हजेरी क्रमांक ही सारी माहिती लिहिली. काही वेळ त्या पानांकडे, पुस्तकाकडे पाहात बसलो. सारी पाने शाळेच्या दप्तरात व्यवस्थित ठेवून दिली, या विचाराने की, ही पाने घरीच राहिली तर सर शिक्षा देताना आळस करणार नाहीत. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. मराठीचे शिक्षक वर्गात आले. त्यांनी आल्याबरोबर विचारले की, 'कुणी कुणी निबंध लिहून आणला आहे?'
मी सर्वात आधी उभा राहिलो आणि म्हणालो, 'सर, मी आणला आहे...'
'अरे, व्वा! मला वाटले, आळस हा तुझा खास गुण आहे त्यामुळे तू लिहिणार नाहीस. तुला शिक्षा करावी लागणार. ठीक आहे. आळस या विषयावर तुझ्याशिवाय कोण चांगले लिहिणार आहे. पण छान! आण इकडे. आधी तुझाच वाचतो...' असे म्हणत गुरुजी माझ्याजवळ आले. मी त्यांच्या हातात ती पाने दिली. ती चाळत चाळत गुरुजी टेबलाजवळ गेले. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. रागारागाने ते ओरडले,
'उठ. मुर्खा, उठ. तरी मला वाटलेच होते तू एवढा तत्पर कसा झालास ते? मुलांनो, आपल्या या आळशाने निबंध कसा लिहिलाय ते ऐका. वहीची पाच-सहा पाने फाडून घेतली आहेत. पहिल्या पानावर उजव्या कोपऱ्यात स्वतःचे नाव, इतर माहिती सुवाच्य अक्षरात लिहिली आहे. पुढील प्रत्येक पान बघा. काय लिहिले आहे? पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत पूर्ण पानभर एक-एक रेषा मारत गेलाय पठ्ठ्या! शेवटच्या पानावर काय लिहिले आहे ते ऐका... 'आळस या विषयावर खूप काही लिहिता आले असते परंतु खूप आळस, कंटाळा येतोय हो सर, म्हणून लिहायला जमलेच नाही...' असे म्हणत म्हणत गुरुजी स्वतःच हसू लागले. मलाच काय पण सर्व मुलांना वाटत होते की, मला चांगली शिक्षा होणार म्हणून. पण गुरुजी स्वतःच हसू लागल्यामुळे सारेच आश्चर्यात पडले आणि दुसऱ्याच क्षणी गुरूजींसोबत आम्ही सारे हसत सुटलो... जणू 'शोले' चित्रपटात गब्बर सिंग आणि त्याचे सहकारी हसतात त्याप्रमाणे!
शाळेत आळस, कंटाळा, अर्धवट काम करणे या गुणांमुळे अनेकदा शिक्षा झाली पण हे गुण साथ सोडायला तयारच नव्हते. या गुणांसोबत अजून एक गुण वाढत होता तो म्हणजे... धाडस! वर्गातील, शाळेतील कोणत्याही स्पर्धेत, कार्यक्रमात मी सहभागी होत असे परंतु माझी ही आरंभशुरता शेवटपर्यंत कधीच टिकून राहत नसे. माझ्या उत्साहाला आळस या शत्रूची दृष्ट लागायची आणि मी माघार घ्यायचो. हा पळपुटेपणा नसे तर आळसाचा परिणाम असे. एकदा काय झाले, रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. सकाळी नऊ वाजल्यापासून आई सारखी 'दळण आण... दळण आण...' म्हणून मागे लागली होती.
"हो आणतो ना दळण. काय ग आई, रविवारी सर्व कामांना सुट्टी असते आणि तू माझ्यामागे एक सारखे कामे लावतीस ग. हे कर, ते कर, हे आण, ते आण...” मी म्हणालो. तशी आई चिडून म्हणाली,
" हो का, सुट्टी असते का? मग मी पण आजपासून रविवारी सुट्टी घेणार. बघू कोण कामे करते ते. दळण आणले नाहीस ना तर संध्याकाळी जेवायला मिळणार नाही."
शेवटी मी रागारागाने दळणाचा डब्बा उचलला आणि तणतणत बाहेर पडलो. गिरणीत पोहोचलो. पाहतो तर तिथे कुणीच नव्हते. शेजारी मुले क्रिकेट खेळत होती. मी एका मुलास विचारले,
"अरे, गिरणी बंद आहे का ? रविवारची सुट्टी तर नाही ना?"
"अरे, सुट्टी नाही. काका आत्ताच बाहेर गेले आहेत. येतील इतक्यात. ये. क्रिकेट खेळतोस का?"
क्रिकेट म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण! लागलो मुलांसोबत क्रिकेट खेळायला. किती वेळ गेला काही समजले नाही. अचानक आवाज आला,
"अरे, कुणाचा आहे रे हा डब्बा? गायीने सगळी ज्वारी खाल्ली की..." तो आवाज ऐकताच मी भानावर आलो. धावतच गिरणीवाल्या काकाजवळ गेलो.
"काका, माझा डब्बा आहे..."
"अरे, मग गिरणीत ठेवायचा ना? रस्त्यावर का ठेवलास? तुम्हा पोरांना ना, क्रिकेटने पार वेडे केलेय. तू इथे डब्बा ठेवून खेळत बसलास आणि गायीने सारी ज्वारी खाऊन टाकली. जा आता घरी. चांगला मार बसणार आहे..." काका म्हणाले आणि मी रिकामा डब्बा घेऊन घरी आलो.रिकाम्या डब्याची कहाणी ऐकून आईने आणि तितक्यात बाहेरून आलेल्या बाबांनी धो-धो धुतले.
एकदा आमच्या शाळेत देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम होता. त्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीही जयंती होती. रात्री घरी बसून, कंटाळा न करता, आळस झटकून दोन तास जागून मी भाषण लिहून ठेवले. दुसऱ्या दिवशी शाळेत कार्यक्रम असल्याने दप्तर न्यायचे नव्हते म्हणून मी शर्टच्या खिशात तो कागद ठेवला. सकाळी उठून लवकर सारे आटोपून शाळेत पोहोचलो. कार्यक्रम सुरू झाला. काही मुले कागदावर लिहून आणलेले भाषण वाचत होते तर काही मुले तोंडपाठ भाषण करीत होते. मी कान लावून प्रत्येकाचे भाषण ऐकत होतो. बरीच मुले महात्मा गांधीजींवर भाषण देत होते. मी शेजारच्या मुलास हळूच म्हणालो,
"अरे, बघ. सारे जण महात्मा गांधीजींवर भाषण देत आहेत. बरे झाले. मी पंतप्रधानांवर भाषण लिहून आणले आहे."
"खरे म्हणतोस? पण भाषणाचा कागद आणला आहेस ना की, घरीच विसरून आलास?"
"ऐ, मी काही तेवढा बावळट नाही हं. हा बघ भाषणाचा कागद..." असे मोठ्या फुशारकीने म्हणत मी खिशातील कागद काढून त्याला दिला. त्याने माझ्याकडे अविश्वासाने बघत तो कागद घेतला आणि वाचायला सुरुवात केली. काही ओळी वाचून होत नाहीत तोच तो हसत सुटला. त्याचे हसणे ऐकून आजूबाजूचे काही मुले त्याच्याकडे बघत असताना मी त्याला विचारले,
"काय झाले रे? का हसतोस रे?"
"अबे, हे भाषण तू लिहिले आहेस? कुणावर लिहिले आहे?"
"कुणावर म्हणजे? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर..."
"आणि आज जयंती कुणाची आहे?"
"महात्मा गांधी आणि लाल बहादूर... बाप रे! च्या मारी! लोच्या झाला की बे! शास्त्रीजींची माहिती लिहिताना चुकून नेहरूंची माहिती लिहिली यार!"
"आता कसे? हे भाषण वाचलेस तर सर मारतीलच पण सर्व विद्यार्थी हसतील ते वेगळेच."
"आता असे..." असे म्हणत मी सरांना करंगळी दाखवून उठलो आणि जो पळत सुटलो तो थेट घरीच येऊन थांबलो...
तिमाही, सहामाही, वार्षिक किंवा अगदी घटक चाचणी परीक्षेला जातानाही घरातील सर्वांची एकमुखी सूचना असायची की, "अरे, घरातून थोडे लवकर निघ. व्यवस्थित शाळेत जा. तुझ्याच क्रमांकावर बस. सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत काय घोळ केला होतास ते आठवते ना? मारे शिष्यवृत्तीसारखी महत्त्वाची परीक्षा द्यायला गेलास आणि दुसऱ्याच मुलाच्या क्रमांकावर बसलास."
"आणि हो, सगळे प्रश्न सोडव. सोपे-सोपे आधी सोडव. नाही तर कंटाळा आला म्हणून कोरीच प्रश्नपत्रिका सरांच्या हवाली करून येशील..." अशा एक ना अनेक सूचना ऐकाव्या लागत...
दहावीच्या बोर्ड परीक्षेचा किस्सा तसा मजेशीर! माझ्या गुणांना साजेसा असा! दहावीच्या वार्षिक परीक्षेला पोहोचलो. इंग्रजीचा पेपर होता. पेपर सुरू झाला. मी लिहित होतो. दोन तास झाले आणि मला लिहिण्याचा कंटाळा आला. तसाच उठलो आणि निरिक्षक असलेल्या सरांजवळ उत्तरपत्रिका दिली. ते सर माझ्या शाळेतील नव्हते पण माझ्या शेजारीच राहणारे असल्यामुळे ते माझा बहुचर्चित स्वभाव चांगलाच ओळखून होते. ते म्हणाले,
"का रे, काय झाले? एवढ्या लवकर पेपर सोडवलास? थांब..." असे सांगत त्यांनी माझी उत्तरपत्रिका चाळायला सुरुवात केली असताना मी म्हणालो,
"हो सर. पेपर खूप सोप्पा होता त्यामुळे लवकर सोडवला."
"अरे, हे काय? तू तर पेपर अर्धवटच सोडवलास की. असे का केलेस?"
"लिहून लिहून कंटाळा आला हो सर. बोटं दुखायलीत हो. जेवढे लिहिले आहे ना, त्यामुळे नक्कीच पास होतो बघा."
"चल. बस. गाढव कुठला. उरलेले लिहून काढ. म्हणे पास होतो..." असे म्हणत शिक्षकांनी उत्तर पत्रिका माझ्या हातात कोंबली. तसा मी माझ्या जागेवर येऊन बसलो. चरफडत उत्तरपत्रिका उगाचच चाळू लागलो. शिक्षकांची नजरानजर होताच उत्तर पत्रिकेवर पेनने लिहित असल्याचे दाखवू लागलो. काही वेळ गेला. इतर मुले त्यांच्या उत्तरपत्रिका देत असल्याचे पाहून मीही माझी तशीच अर्धवट लिहिलेली उत्तरपत्रिका देऊन बाहेर पडलो. विशेष म्हणजे मी जेवढे लिहिले होते तेवढे एकदम बरोबर होते... अठ्ठावण्ण गुण मिळाले मला... दहावीची परीक्षा संपली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि दरवर्षीप्रमाणे माझी आत्या आणि तिची मुले आठ-पंधरा दिवस राहण्यासाठी आमच्याकडे आली. त्यादिवशी सकाळी सकाळी आईने मला आवाज दिले, गदगदा हलवले, पाठीत रट्टा दिला पण मी उठायचे नाव घेत नाही हे पाहून तिने ग्लासभर पाणी माझ्या अंगावर टाकताच मी खडबडून जागा झालो. झाला प्रकार लक्षात येताच मी आईवर डाफरून म्हणालो,
"हे ग काय आई? सुट्टी असतानाही मला झोपू देत नाहीस. असे काय अडले आहे?"
"अरे, कालचे दूध नासले आहे. वरव्याचे दूध यायला अजून दोन घंटे लागतील. आता सगळे उठतील आणि चहा-चहा करतील. जा. गोविंदमामाकडून दूध घेऊन ये..."
"आई, थोड्या वेळाने जातो ना ग. थोडे झोपू तर दे..."
"जमणार नाही. गोविंदमामा डेयरीला दूध घेऊन गेले ना तर पंचाईत होईल. तुझे काही नाही पण तुझे बाबा मला फोडून काढतील. जा. पळ. लवकर."
शेवटी मी झोपेत असल्याप्रमाणे तणतणत गोविंदमामाकडे गेलो आणि म्हणालो,
"गोविंदमामा, दूध पाहिजे हो..." तसा आतून आवाज आला,
"अरे, तुझे मामा गोठ्यात गायीचे दूध काढत आहेत. तिकडेच जा आणि ताजे ताजे दूध घेऊन जा."
मी लगेचच घराशेजारी असलेल्या त्यांच्या गोठ्यात गेलो. एका वेगळ्याच वासाने माझे स्वागत केले. गोविंदमामा एका गायीचे दूध काढत होते. तर शेजारची दुसरी गाय गोमुत्र देत होती. मी सरळ त्या गायीजवळ गेलो आणि हातातल्या तांब्यात ते गोमुत्र घेऊ लागल्याचे पाहून गोविंदमामा म्हणाले,
"अरे, गोमुत्र नेतोस? आई, पापड करणार आहे का?"
"हो...हो..." म्हणत मी तो तांब्या घेतला आणि घर गाठले. तोवर सारी कंपनी उठली होती.
"आणले. आणले. दूध आणले..." आत्याच्या मुलांनी ओरडायला सुरुवात केली. मी हातातला तांब्या आईच्या हातात दिला आणि एक मस्त झोप काढावी या हेतूने वळलो न वळलो तोच आईचा खळाळून हसण्याचा आवाज आला. माझ्यासह सर्वांनी आईकडे पाहिले. माझ्या पाठीत एक रट्टा देऊन म्हणाली,
"अरे, तुला दूध आणायला सांगितले तर तू चक्क गोमुत्र घेऊन आलास. वेंधळा कुठला. जा पुन्हा दुसऱ्या तांब्यात दूध घेऊन ये. पळ..."
शेवटी दहावी उत्तीर्ण झालो. तसाच बारावी झालो. जशी माझी शैक्षणिक प्रगती होत होती तसे मला 'ते' गुणही अधिकच चिकटत होते. बारावी नंतर पदवीही प्राप्त झाली. नोकरी मिळाली आणि त्यानंतर सुरू झाला खराखुरा प्रवास...
@ नागेश सू. शेवाळकर