Pratibimb -The Reflection - 10 books and stories free download online pdf in Marathi

प्रतिबिंब - 10

प्रतिबिंब

भाग १०



जाईला सर्वच गोष्टींचा प्रथमपासून विचार करून पाहणे गरजेचे वाटू लागले. सर्व घटनांमधले कच्चे दुवे शोधून, त्यातील अर्थ समजावून घेणे गरजेचे होते. शेवंताचा पुढचा घाव कसा आणि कुठे असेल हे आता ओळखणे गरजेचे होते. हातात वेळ फार उरला नव्हता. कुठल्याही क्षणी काहीही घडण्याची शक्यता होती. तिचा जीव धोक्यात होता, होता का? वाड्याच्या इतर सुनांमधे आणि आपल्यामधे काय फरक आहे? आता सर्व गत इतिहास आपल्याला कळलाय, खरंच कळलाय का? अचानक तिला आपले सासरे आठवले. त्यांनी एवढ्या अजिजीने आपल्याला वाड्यावर जाण्यास का सांगितले? ते ही स्वत:च्याच पत्नीची झालेली भीषण अवस्था स्वत:च्या डोळ्यांनी पाहून? खरंच त्यांना बायकोच्या मृत्यूमधे काहीच अनैसर्गिक वाटले नसेल? प्रश्न, नुसते प्रश्न! आणि अचानक तिला सासऱ्यांचा घुसमटलेला आवाज आणि पाठोपाठ चलचित्र दिसू लागले.

वाड्यातील त्यांची शेवटची भेट असावी.

रावसाहेब वरील खोलीत झोपले होते. वाड्याच्या विक्रीचे सर्व नक्की होत आले होते. उद्या वकिलांसमोर सह्या झाल्या की संपले. अचानक त्यांना जाग आली. कोणीतरी अंगावरून हात फिरवतंय असा भास झाला. त्यांनी दिवा लावून पाहिला तर कोणीच नव्हते. स्वप्न असावे असे वाटून ते परत झोपी गेले. परत तसाच भास. आता मात्र ते उठून बसले. शेवंता पायाशी बसली होती. "क...क... कोण तू? " त्यांची बोबडीच वळली. ती हळूहळू जवळ आली, परत हात जवळ आला तसा तो रावसाहेबानी झटकण्याचा प्रयत्न केला. तिने तो पकडला, ते पलंगावर मागे मागे सरकू लागले.

ती छद्मी हसली. "तिला कसा कुरवाळत होतास? मला काय महारोग झालाय काय? कशी गत केली तिची पाह्यलीस ना? पण तू घाबरू नको, तुला नाही मारणार, तसंही तुझ्यात काय आहे? तुझा पोरगा तरणा मर्द आहे. पण येत नाही इथं. बायकोला चिकटून शहरात बसलाय. त्याला लावून दे इथं. आणि सुनेलाही. मी असताना वाड्याला नवी मालकीण नकोय. येवढ्यात नाही मारायची तिला. वंश वाढायला कोणी हवं ना? मी कशाच्या जीवावर रहावं नाहीतर? पोर होऊ द्या एक. मग बघू तिचं काय ते."

रावसाहेबांची बोबडी वळलेलीच राहिली.

मग त्यांच्या डोळ्यात भेदक पहात म्हणाली, "चुकवायचं नाही. लावून द्यायची. नाहीतर तुझ्या पोराला जिवंत ठेवणार नाही. आणि त्या आधी तुला संपवेन." एवढं बोलून ती नाहीशी झाली. रावसाहेबांनी ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर आला नाही. उठायला गेले पलंगावरून आणि धाडकन खाली कोसळले.

पुढचं सगळं जाईला माहीतच होतं. डावी बाजू पूर्ण निकामी झाली होती. निदान झालं, ‘पॅरॅलिसीस’. वकील बरोबर होताच. त्याने सरळ अॅम्ब्युलन्स बोलावली आणि शहरात आणून हॉस्पिटलमधे अॅडमिट केले. काही दिवस तिथे काढल्यावर घरी पाठवलं. फिजीओ वगैरे घरीच सुरू झालं. जाई स्वत: जातीने लक्ष घालत होती. पोटची पोर करेल, अशी सेवा करत होती. ते सतत तिला शिवपुरी जाण्यास सांगत होते. रावसाहेब सतत रडत. ती त्यांना धीर देई. उमेदीने पुन्हा उभे राहण्यास सुचवे. हलकं, पौष्टिक अन्न, रुचकर बनवून थोड्याथोड्या वेळाने देई. रावसाहेब चिडत. तिला कधीकधी ‘ऑफिसला निघून जा, मला त्रास देऊ नको’ म्हणत. तिला आत्ता त्या सर्व गोष्टींचा अर्थ उमगत होता. एकीकडे स्वत:च्या जीवाची भीती, वर मुलाच्या जीवाची भीती, आणि मुलीसारखी सेवा करणाऱ्या सुनेला मृत्यूच्या तोंडी आग्रहाने पाठवत असल्याची अपराधी टोचणी. मी जरा वाईट वागले असते तर त्यांची ही टोचणी कमी झाली असती कदाचित. जाईला मनुष्यस्वभावाचे राहूनराहून आश्चर्य वाटत राहिले. या टोचणीनेच जीव घेतला त्यांचा खरं तर. तिला वाटू लागले. अचानक शेवंता समोर दिसली... जणू म्हणत होती... बघ ही तुझी आपली माणसं... माझ्याकडे ढकलून गेला तुझा सासरा. आणि तू, वेडपट मला इथे येण्याचा तोडगा सुचवलास...
आणि अचानक जाईला पुढचा मार्ग दिसला. अत्यंत बिकट पण तो एकच मार्ग होता. आता जास्त विचार करायला वेळ नव्हता.

तिने भराभर फोन फिरवायला सुरूवात केली. प्रथम तिने घरच्या दोन्ही कामाच्या बायकांना येऊ नका म्हणून कळवले. मग यशची सेक्रेटरी, सोफीला फोन करून, तिला ‘जरा बंद केबिनमधे जा मग बोलते’ असे सांगितले.

तिने तसे केल्यावर जाई तिला म्हणाली, “सोफी, माझ्या लग्नाच्या आधीपासून आपण दोघी मैत्रिणी आहोत, आणि आपल्यात तेच नाते आहे, असं तुलाही वाटतं ना?”

सोफी बुचकळ्यात पडली. "व्हाट्स ऑन मॅन ?? तू असं का बोलतेस आज?"

त्यावर जाई म्हणाली "कॅन आय काऊंट ऑन यू सोफी इफ आय आस्क यु टू डू समथींग?" "ऑफ कोर्स जाई. यु नो, यु कॅन. पण आता लवकर सांग. आर यु इन ट्रबल? बॉसला सांगू का?" "नाही नाही. हे फक्त तुझ्यामाझ्यात. त्याला काहीही सांगायचं नाहीय. फक्त आज पूर्ण दिवस आणि रात्र तो घरी येणार नाही ही जबाबदारी तुझी. काय वाट्टेल ते कर. कामं काढ, बाहेरगांवची मीटींग ठरव पण बॅग घ्यायलाही तो घरी येता कामा नये. त्याच्या आणि माझ्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. वेळ पडलीच तर युज युवर चार्म सोफी, पण तो घरी येता कामा नये."

"आर यु आऊट ऑफ युवर माईंड जाई? बॉस आधी थोबाडीत मारेल मला. नक्की काय झालय? मी आत्ता अशीच जाऊन बॉसला सांगतेय."

"नो नो सोफी, आय मीन, त्याला येऊ न देणं इतकं महत्वाचं आहे की त्यासाठी जे करावं लागेल ते कर. शपथ आहे माझी तुला. माझ्यावर विश्वास आहे ना? मग एवढं कर. त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. प्लीज, यु आर द ओन्ली वन हुम आय कॅन ट्रस्ट. प्लिज प्रॉमिस मी की तू हे करशील?"

"येस आय प्रॉमिस जाई!"

जाईने लगेच फोन कट केला. ती सरळ उठून स्टडीमधे आली. तिने दरवाजा लावून घेतला. मग ती आरशासमोर जाऊन उभी राहिली आणि तिने शेवंताला हाक दिली.

ती म्हणाली, "मला माहीत आहे की तू मला पाहते आहेस, ऐकते आहेस, तर आज आपण बोलुया, तुझी संमती असेल तर समोर ये."

काहीही झाले नाही. मग ती म्हणाली "तुझ्या मनी मला मारून टाकायचे आहे. प्रथम तू माझ्या मनावर कब्जा करण्यासाठी आरशात सर्व घटना मला दाखवायचीस जेणेकरून माझं मन प्रचंड दडपणाखाली येईल आणि तू त्यावर कब्जा करशील. पण हळूहळू मन-एकाग्रतेच्या कारणाने मलाही भूतकाळ कळू लागला. त्यातून मला एक कळलं की, तू निदान माझ्याबरोबर खोटेपणा करत नव्हतीस. मला मारून टाकलेस किंवा टाकू शकलीस, तर तुझे नुकसान होईल. मला मात्र तुझी सुटका करायची आहे."

प्रचंड आवाज करत वरचा सिलींग फॅन धाडकन खाली आला. जाईपासून काही अंतरावर पडला. जाई किंचित हसली आणि म्हणाली, "तुझा राग मला कळतो, ही कोण मला सोडवणारी असं वाटतय तुला. आणि ते खरच आहे. जोपर्यंत तू स्वत: तुझी सुटका या नरकयोनीतून करून घेण्याची इच्छाच मनी आणत नाहीस, तोपर्यंत कोणीच काही करू शकत नाही. पण आज तुला माझे म्हणणे ऐकून घ्यावेच लागेल. मला मारून टाकलेस, तर तुझा सुटकेचा मार्ग तर बंदच होईल पण ज्या इर्षेने तू आजतागायत हे सर्व करत आलीस, ते करण्याचे ठिकाणच तुला उरणार नाही. माझ्या मृत्यूबरोबर हे घराणे नष्ट होईल. यशबरोबर तू काही काळ व्यतीत करशीलही पण नेहमीप्रमाणे त्यातही तू एकटीच असशील. तो नसेल."

जोरजोरात पाय आपटण्याचा आणि एखादे श्वापद जसे संतापाने हुंकार भरते तसा आवाज येऊ लागला. ही एक पावतीच होती की जाईचे बोलणे ऐकले जात होते आणि समजतही होते.

"आता मी काय बोलते ते नीट ऐकून घे. तुझ्याबरोबर जे घडले, ते अत्यंत लांछनास्पद होते. आमच्या घराण्याच्या पुरूषांनीच हे केले, याचा मला अतोनात खेद आहे. ऐन तारुण्यात प्रियकराने केलेली प्रतारणा, वर त्याच्याच बापाने केलेला अत्याचार, अनवधानाने झालेला तुझा खून, हे सर्वच फार भयंकर होतं. परंतु त्याहूनही भयंकर होता, तुला पहावा लागलेला तुझ्या प्रियकराचा त्याच्या पत्नीबरोबरचा श्रृंगार, त्यानंतर त्याने तुझ्या आईबरोबर तिच्या अगतिकतेचा फायदा घेत केलेला संग."

आतून एक खोल किंकाळी आणि हुंदका ऐकू आला.

जाई बोलायचे क्षणभर थांबली. "तुझ्या मनात सुडाची ठिणगी पेटणे अगदीच स्वाभाविक होते. पुढे त्याचा सुडाग्नी झाला, पण नंतर मात्र, तुझ्या मनात राहून गेलेली, शरीरसुखाची इच्छा, आणि मालकी हक्काची भावना, हीच प्रामुख्याने तुझ्या मनावर आरूढ झाली, आणि मग ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांना सोडून तू घराण्यातल्या स्त्रियांच्या मागे लागलीस. त्यांचे बळी घेत गेलीस आणि पापाची धनीण बनलीस. त्यांचे मृत्यू अटळच होते. तू कारणमात्र ठरलीस. पण तुझा अहंकार इतका वाढला की तुला वाटलं आपण काहीही करू शकतो. तू कारणमात्र होतीस शेवंता. माझी आजेसासू म्हणाली ते अगदी खरं. प्राक्तनात जे असेल ते घडतंच. तिचाही मृत्यू हा तसाच होता, इतरांचाही. पण फरक एवढाच की बाकीच्यांच्या मनाला तू कह्यात घेवू शकलीस, एकीच्या मनाचा पूर्ण ताबा घेतलास आणि तिच्याकरवी तू स्वत:ला हवे तसे वागून घेतलेस. माझ्या सासूबाईंच्या मनात मात्र फक्त एवढाच शिरकाव केलास की, तू दाखवलेलं भीषण दृष्य त्या खरं समजून जगल्या. भयाने शरीर कोलमडलं त्यांचं."

अचानक शेवंता अक्राळविक्राळ रुपात आरशात दिसू लागली. तिचा हात बाहेर आला आणि जाईच्या गळ्याला पकडायला पुढे झाला.