Dominant - 3 in Marathi Thriller by Nilesh Desai books and stories PDF | डॉमिनंट - 3

Featured Books
Share

डॉमिनंट - 3

डॉमिनंट

भाग तीन

मंदारला कोल्हापूरहून इथे आणण्याचा प्लॅन एकाचा. त्यात त्याने लोकल भाईला समाविष्ट करून घेणे. मंदार आणि मौसमची भेट, मौसमचा खुन होणं, तेव्हा खुनाचं हत्यार डिग्री अथवा नसीर किंवा चंदूच्या हातात असणं.. मग नेमकं तिला मारलं कोणी...? मंदारची त्या लोकल भाईच्या गुंडांशी हातापाई होणं, मंदारचं तिथून पळून जाणं... पण मंदार का बरं पळाला असावा तिथून..?

डॉमिनंट – भाग दोनपासून पुढे....

लॉजच्या मागच्या बाजूला असलेल्या माणूसभर उंच कट्ट्यावरून धडपडत उडी मारत मंदार तिथल्या चिंचोळ्या गल्लीतून मेनरोडवर आला. आजूबाजूला पसरलेली बारीक झाडी तुडवत पुढे येताना त्याला शरीरावरच्या जखमांची जाणीव होत होती.

इतक्या रात्रीही वाहनांची रहदारी तुरळक प्रमाणात सुरू असल्याने अधूनमधून रस्त्यावर प्रकाशामय वातावरण निर्माण होते. आडोशातून मिळणार्या थोड्याफार अंधारातून मंदार लॉजपासून काहीसा दूर सुरक्षित ठिकाणी येऊन थांबला.

आकस्मिक घडलेल्या या प्रसंगानंतर मंदार मनाच्या द्विधा अवस्थेत विचार करू लागला. इथून निघून पुन्हा गावी जावे तर धोका नक्कीच टळणार होता, पण इथे त्याच्या येण्याचा उद्देश कधीच कळू शकला नसता. झाल्या प्रकाराचा काय तो सोक्षमोक्ष लावल्याशिवाय तिथून जाईल तो मंदार कसला..?

आणि म्हणूनच सगळ्या प्रकरणाची उकल लावूनच गावी घराकडे जाण्याचा निर्धार त्याने केला.

बसलेल्या जागेवरून मंदार लॉजच्या दिशेला नजर ठेऊन होता. तिथून लॉजचे मुख्य प्रवेशद्वार आणि आसपासचा परिसर बर्यापैकी दिसत होता. अजूनतरी तिकडे शांतता होती. काही वेळातच एक पोलिस व्हॅन त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेली. बहुतेक पोलिसांना कुणीतरी मौसमच्या खुनाची खबर दिली असावी.

पण हा खुन केला कुणी...? कश्यासाठी...? मौसमला कुणी का मारावं...? तिचं कुणाशी काही वैर वगैर असावं... किंवा.... ओह् गॉड्.... हा मंदारवर आळ आणून त्याला खूनाच्या प्रकरणात गोवण्याचा प्लॅन तर नसावा..

मंदारनं झटकन मागे अडकवलेली बॅग चाचपली. खिश्यात हात घूसवून रूमाल, वॉलेट तपासले. सगळं काही जागेवरच होतं. कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याची खात्री त्याने करून घेतली.

लॉजच्या पुढच्या बाजूला आता बर्यापैकी प्रकाश होता. एव्हाना तिथं दहा-बारा माणसं जमली होती. बहुधा ते इतर रूम्स् मधले गेस्ट असावेत. एक हवालदार व्हॅनजवळ उभा होता. मंदार परीस्थितीचं निरीक्षण करत मनात पुढे करावयाच्या बाबींवर अंदाज घेत होता. डाव्या बाजूला लॉजवरच्या हालचाली टिपन्यात मग्न असलेला मंदार उजव्या दिशेने गाडीचा करकचून ब्रेक मारल्याच्या आवाजाने भानावर आला...

राखाडी रंगाची काहीशी लांबट होंडा सिटी समोर रस्त्याच्या बाजूला येऊन अचानक थांबली. तिच्यापासून अवघ्या दहापंधरा फुटांवर मंदार होता. पण मंदार आडोशाला झाडाझुडपांसोबत असल्यामुळे बाहेरून कुणी बारीक नजरेनं पाहिल्याशिवाय तो दिसला नसता.

कार थोडावेळ तशीच थांबली. कारच्या आतमध्येही इतकावेळ काही हालचाल झाली नाही.

तिकडे लॉजजवळील हालचालींना वेग आला. खाकी गणवेशातील दोनजण खाली आले. त्यांच्यासोबत पाच-सहा माणसेही होती. घाईघाईने सर्वजण लॉजच्या मागच्या दिशेने वळाले. एकूण सगळ्या गोष्टींची कल्पना मंदारला आली होती.

ते पोलीस आपल्याच तपासात तिकडे गेले असल्याची खात्री त्याला झाली.

आता काहीही करून आसपासचा परीसर शोधला जाऊ शकतो त्यामुळे तिथंच बसून राहणे मंदारला परवडण्यासारखे नव्हते.

समोर आलेल्या कार बद्दल जाणून घेण्याची ईच्छा असतानाही नाईलाजाने मंदारला निघणे भागच होते. त्याने कारचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला पण अंधुक वातावरणामुळे तो फोल ठरला. शिवाय समोरून पोलीसांचा मोर्चा त्याच्या दिशेने येताना त्याला दिसला. आणि मंदार क्षणभरही न थांबता आतल्या झाडाझुडपांतून वाट काढू लागला.

सुरक्षित ठिकाणी पोहचेपर्यंत तो वाटेत येणारे काटेकुटे तुडवत तसाच झपाझप पावले टाकत पुढे जात होता. अर्धा तास पायपीट केल्यावर मंदार मुंबई-नाशिक एक्सप्रेस हाईवेवर पोहोचला.

जवळच्या ढाब्यावर विश्रांती करण्याच्या हेतूने त्याने तिकडे कूच केले.

अनोळखी शहर त्यात मध्यरात्र उलटून गेलेली, शरीरावरच्या किरकोळ जखमा, काट्यांतून वाट तुडवताना खरचटलेले पाय, आणि इतका वेळ चालण्यामुळे मंदारला विसाव्याची गरज होतीच.

काही वेळातच ढाब्यावरच्या टॉयलेटमधून बाहेर पडताना मंदार थोडा फ्रेश वाटत होता. त्याच्या अंगातले बदललेले कपडे, डोळ्यांवर डार्क ब्लॅक रंगाची फ्रेम असलेला ट्रान्स्परंट ग्लासेसचा चश्मा त्याच्या एकूण लूक्स् मध्ये कमालीचं अंतर पडल्याची साक्ष देत होता.

नाही म्हणायला फक्त एक-दोन शहराबाहेर जाणार्या ट्रॅव्हलस् तिथं उभ्या होत्या. आणि दहा-बारा माणसं वगळता खाली ढाब्यावर कुणी फारसं उतरलं नव्हतं.

आसपास १८०° च्या कोनात नजर फिरवत मंदार काऊंटरपाशी गेला. तिथं खाण्यासाठी काही ऑर्डर देऊन फिरावं तर त्याची दृष्टी कोपर्यात उभ्या इसमावर गेली.

तिथं आलेल्या काही प्रवाशांपैकी दोनएक बायकांवर हपापलेल्या नजरेनं पाहत तो इसम आपल्या मनाचं समाधान करण्यात मग्न होता. मागून खांद्यावर पडलेल्या थापेनं त्याचं लक्ष विचलित झालं.

मंदारला बाजूला पाहताच आरीफ चकीत झाला पण क्षणभरच.

"कुणाच्या इशार्यावर मला इकडे आणलं..?" मंदारनं त्याला बकोटीला घट्ट पकडून ठेवत विचारलं.

मंदारचा आवाज कठोर होता. त्याचा प्रश्न विचारण्यातलाच दरारा इतका वाटावा की भलाभला गुन्हेगारही त्याचं उत्तर देणं टाळू शकला नसता. आणि आरीफ तर त्याच्यासमोर मच्छर होता अगदीच.

आरीफही काहीकाळ गांगरून गेला पण सावरत त्याने उलट उत्तर दिले.

"मुझे खाली पैसा दिखता है दोस्त.. उसके ही इशारे अपन समझता है..! तेरे को इधर कौन लाया, कायकु लाया अपना इस्ससे कोईच वास्ता नई.. और तू किधरसे आया ये भी पता नहीं.. डिग्री बोला उतना मैं किया और बदले में अपने को अपना खुदा माने पैसा मिला...." आरीफ रोखठोकपणे सांगून मोकळा झाला.

याच्यावर हात उचण्यात काहीच अर्थ नसल्याचे मंदारला उमगले.

खिश्यात हात टाकत मंदारने हजारची करकरीत नोट काढून आरीफला टेकवली.

"चल कमसेकम अपने खुदा के साथ तो वफा रख.." मंदारने आरीफच्या खिश्यातून फोन बाहेर काढत स्वतःला फोन लावला.

"जरूरत पडी तो याद करूंगा.. पैसा और मिलते जायेगा.." मंदारनं त्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. नाहीतरी सध्या त्याला आरीफशिवाय इतर कुठून माहीती मिळेल असे वाटत नव्हते.

"सलाम साहब..." आरीफने त्याचा प्रस्ताव हसतहसत स्वीकारला.

तासाभरात मंदारने आरीफकडून संबंधित माणसांची थोडीफार माहीती काढून तो ढाबा सोडला. आरीफला त्यांचा उद्देश माहीत नसला तरी पैश्याच्या आमिषामुळे त्याने शोध घेण्याचे आश्वासन मंदारला दिले.

-----------------

दुसर्या दिवशी सकाळी....

शहराच्या मध्यवर्ती भागातल्या झोपडपट्टीत सकाळच्या कामांना वेग आला होता. कुणाची कचरा वेचण्यास निघण्याची घाई तर कुठे पाण्यासाठी भागदौड सुरू होती. तिथेच एका पत्र्याच्या झोपडीवजा घरात मात्र अजून शांतता होती. कालचा दिवस समाधानकारक गेल्याने आरीफ नऊ वाजले तरी गाढ झोपेत होता.

घराची ऊंची जेमतेम माणूसभर असावी. दोन माणसं आगपेटीत कोंबल्यासारखी राहू शकतील अशी एकूण त्या झोपड्याची परीस्थिती होती. मोबाईलच्या रिंगच्या कर्कश आवाजाने जसे ती शांतता भंग केली तसा आरीफ वैतागत आळोखेपिळोखे देत उठला.

'मनू' चा कॉल पाहताच त्याने आळस झटकत फोन उचलला.

"हॅलो.. बोल मनू..."

....................

"क्या... कब..."

....................

"किसने किया......."

.........................

पलीकडून मिळालेली माहीती ऐकून आरीफची झोप कुठल्याकुठे पळून गेली. झटकन उठून त्याने सर्वप्रथम कोपर्यातला छोटासा टिव्ही चालू केला. टीव्हीच्या बटनांवर धडाधड बोटे फिरवत तो न्यूज चॅनल शोधत होता. शेवटी समोर हवी ती बातमी दिसताच तो थांबला. बातमी खरंच त्याच्यासाठी धक्कादायक अशीच होती.

'मौसमचा कुणीतरी अज्ञात इसमाने पाठीत सुरा घुपसून खुन केल्याची...'

फोन अजून चालूच होता..

"मनू..... मैं मिलने आता...." आरीफच्या आवाजात रडवेलेपणाचे भाव उतरले होते.

पलीकडून काहीतरी सांगितले गेले तसे काहीसा सावरण्याचा प्रयत्न आरीफने केला..

"ठिक.. मैं देखता है... तू खयाल रख" आरीफने कॉल कट करत फोन बाजूला ठेवला.

अंगात शर्ट चढवत तो न्यूज बारकाईने पाहत होता. इतक्यात त्याचा फोन पुन्हा एकदा खणाणला. फोन हातात घेत त्याने आलेला मॅसेज पाहीला.

मॅसेज उघडताच जणू शॉक लागल्यासारखा आरीफ स्तब्धपणे पाहतच राहीला.

'मंदार.... होय त्या मॅसेजमध्ये मंदारचा तोच फोटो होता जो मौसमने चलाखीने काढला होता. फोटोवरून साफ दिसून येत होते की मौसम काल रात्री मंदारसोबतच होती. पण मंदारने का करावं असं.. तो तर या शहरात पहील्यांदाच आला होता. डिग्री आणि मदनला यामागचं नक्की गौडबंगाल काय आहे हे माहीतचं असणार...' आरीफच्या डोक्यात फोटो पाहिल्यावर विचारचक्र सुरू झाले.

भानावर येत त्याने मनूला फोन लावला. पहील्याच रिंगमध्ये पलीकडून फोन उचलला गेला..

"मनू.... मैं जानता इसको...." आरीफ महत्वाचं सांगत असल्यासारखं घाईतच म्हणाला.

पलीकडून बहुधा मनू नावाच्या व्यक्तीने भेटण्यासंदर्भात विचारले असावे, त्यावर आरीफ म्हणाला..

"नहीं... वो खुद मुझे फोन करेगा.. हमे पहले उसको जानना होगा. इस शहर में वो नया है और मुझे लगता की उसे कुछ पता करना होगा तो वो मुझे जरूर कॉन्टॅक्ट करेगा...."

..........................

"उसका फोन आते ही मैं तुझे खबर करूँगा.." आरीफने मनूला आश्वासन दिले आणि कॉल कट केला.

इकडे मंदारने जवळच पुढे एक स्वस्तातला लॉज पाहून आपला मुक्काम तिकडे हलवला होता. मनात असूनही मंदार आरीफला मारू शकत नव्हता कारण आता तोच एक असा व्यक्ती होता.. ज्याला मंदार या अनोळखी शहरात ओळखत होता.. म्हणून आरीफला स्वतःच्या बाजूने वळवून त्याचा काही प्रमाणात तरी उपयोग करून घेणे मंदारसाठी आवश्यक होते..

सध्या आरीफच अशी व्यक्ती होता, जिच्या आधारे मंदार सुतावरून स्वर्ग गाठू शकत होता..

तिकडे लॉजवर परीस्थिती गंभीर होती. पोलीस एकेकाची कसून तपासणी करत होते. मदन, डिग्री, चंदू आणि नसीर चौघेही तिथेच होते. मौसमचा खुन मंदारनेच केला असून आपण तिला वाचवण्यासाठी सर्वात पुढे असल्याचं पोलिसांना पटवून देण्यात ते जवळपास यशस्वी ठरले होते.

मौसमचा खुन झालेला ती रूम सील करण्यात होती. बाहेर पोलीस सर्वांची उलटतपासणी करत होते.

"दरवाजा बाहेरून कोणी तोडला...?" इन्स्पेक्टरने सर्वांवर नजर फिरवत गंभीरपणे विचारले.

"साहेब.. मी रात्री ड्यूटीवर असतो. (बाजूला दोघांकडे पाहत) आम्ही दरवाजा खूपवेळा वाजवला आणि शेवटी नाईलाजाने तोडला." एक पस्तीशीचा माणूस म्हणाला.

"मग तुम्ही अगोदरच रूमच्या आतमध्ये काय करत होता...?" डिग्री आणि इतर तिघांकडे वळत इन्स्पेक्टरने विचारले.

"तेच तर सांगतोय साहेब आम्ही... आम्हाला कुणाच्यातरी ओरडण्याचा आवाज आला आणि धावत इथं येऊन पोहोचलो... आम्ही दरवाज्यावर आलो तर तो उघडा होता..." मदन शिताफीने इन्स्पेक्टरच्या डोळ्यात पाहत खोट्याचं खरं करू पाहत होता.

"हो.. आणि आम्ही आत आलो आणि पाहतो तर त्या माणसाने मौसमचा खून केला होता..." नसीरने पुढे पुष्टी जोडली.

"आणि आम्ही ते पाहीलं म्हणून त्या माणसाने साक्षीदार संपवण्यासाठी दरवाजा बंद केला आणि आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत होता...." नसीरचे बोलून होताच डिग्रीनेही आपल्यापरीने नाट्य कथन केले.

"नशीब बाहेरून वेळेवर मदत आली नाहीतर आम्हीही जिवंत राहीलो नसतो.." चंदूने आणखी त्यात भर घातली.

"तुम्ही सांगताय त्यात तथ्य असू शकतं.. पण तरीही मला ही गोष्ट पटणं अवघड आहे की तुम्ही चौघे आणि तो एकटा तरीही तो तुमच्यावर भारी पडावा..." इन्स्पेक्टर संदेह व्यक्त करत बोलत होता.

"खरंच साहेब, तो प्रोफेशनल किलरच असावा.. आम्ही चौघे असून त्याला रोखू शकलो नाही.. आमच्या देखत खून करून तो खिडकीतून पळाला.." डिग्री गोष्ट अधिक उलगडून सांगत होता.

"आणि साहेब, ज्या स्पीडने तो दुसर्या मजल्याच्या खिडकीतून खाली पोहचला.. हे काम एखादा सराईत गुन्हेगारच करू शकतो, नाही का..?" मदनने इन्स्पेक्टरला विश्वासपूर्ण वाक्यात स्पष्ट केले.

"ठिक आहे, सध्या तुम्ही चौघे पोलीस स्टेशनला चला. त्या माणसाचे वर्णन, फोटो, माहीती काही असल्यास नोंदवून घरी जा. आणि हो केस संपेपर्यंत तुम्ही शहर सोडून कुठेही जाऊ शकत नाही.." इन्स्पेक्टर काहीसा कठोर आवाजात म्हणाला.

"त्याचा फोटो....." चंदूने तोंड उघडलेच होते की डिग्रीने डोळे वटारत त्याला गप्प केले.

पुढे निघालेला इन्स्पेक्टर चंदूच्या त्या अर्धवट शब्दांवर मागे फिरला तसं डिग्री सावरत म्हणाला, "साहेब, त्याचा फोटो कसा ना आमच्याकडे असेल... (चंदूकडे रागाने पाहत) आम्ही तर त्याला ओळखतही नव्हतो..."

"ओह् आय सी.... पण मी फोटो सोबत वर्णनही म्हणालो... ते तर तुम्ही देऊ शकता ना...? की आत टाकून तुम्हालाच खुनी म्हणून सिद्ध करू...." करड्या स्वरात इन्स्पेक्टर बोलून पुढे गेला.

मागोमाग ते चौघे आणि इतर तीन कॉन्स्टेबलही पोलीस स्टेशनला रवाना झाले.

-----------------------

मंदारला कोल्हापूरहून इथे आणण्याचा प्लॅन एकाचा. त्यात त्याने लोकल भाईला समाविष्ट करून घेणे. मंदार आणि तृतीयपंथीय मौसमची भेट, मौसमचा खुन होणं, तेव्हा खुनाचं हत्यार डिग्री अथवा नसीर किंवा चंदूच्या हातात असणं.. मग नेमकं तिला मारलं कोणी...?

मंदारची त्या लोकल भाईच्या गुंडांशी हातापाई होणं, मंदारचं तिथून पळून जाणं... पण मंदार का बरं पळाला असावा तिथून..?

त्यात मंदार लपून लॉजवरच्या हालचाली पाहताना तिथं आलेली कार.. त्या कारचा आणि तिच्यात असलेल्या व्यक्तीचा या प्रकरणाशी काही संबंध असावा का..?

तिथून निसटल्यावर ढाब्यावर आरीफचं इतक्या सहजासहजी भेटणं हा निव्वळ योगायोग समजावा की हा देखील प्लॅनचा एखादा हिस्सा असावा...?

--------------------

कल्याण-नाशिक हाईवेच्या आतल्या बाजूचा पाईपलाईन रोड तसा भरदिवसाही निर्जन असायचा. चुकून कधी बाहेर ट्रॅफिक लागलीच तरच या रस्त्याचा वापर व्हायचा, नाहीतर नेहमी सामसूमच.

मंदार पाईपलाईन रोडच्या मध्यभागी असलेल्या कठड्यावर शांतपणे बसून होता. सूर्यनारायण त्याच्यावर क्रोधित झाल्याप्रमाणे आपलं शक्तीप्रदर्शन करत होते. आजूबाजूला कुठे झाडाझुडपांचं नावही नव्हतं. ऊन्हाच्या झळांनी मंदार अक्षरशः त्रस्त होऊ लागला होता. पण तो तिथून उठून कुठं जाऊही शकत नव्हता.

कारण तीच तर जागा होती जिथं आरीफने त्याला काहीतरी महत्वाचं सांगण्यासाठी बोलावलं होतं. मंदारने दोन्हीबाजूंच्या दोन टोकांना पाहीले. अजूनतरी कुठुनही आरीफच्या येण्याच्या खुणा दिसत नव्हत्या.

अर्धा तास वाट पाहील्यानंतर मंदार वैतागून आरीफला फोन करणारंच होता की त्याला उजव्या बाजूने एक बाईकस्वार येताना दिसला. लांबून काळ्या रंगाचे जॅकेट खाली चकचकीत काळी ट्राऊझर आणि डोक्यात काळे हेल्मेट या अवतारात कुणाची ओळख पटवणे अवघडचं. मंदार त्याला निरखून पाहत जागेवर उठून उभा राहिला. साधारण पन्नास मिटरवरून ती बाईक झपाझप अंतर कापत त्याच्याजवळ येतंच होती..

इतक्यात हातातला फोन वाजला म्हणून मंदारचं लक्ष विचलित झालं. त्यानं फोन पाहीला.. आरीफ कॉल करत होता..

"किधर है तू...."

"ये क्या भाई सामने से आ रहा है मैं..."

मंदारने डावीकडे पाहीले..

'आरीफ समोरून येत आहे...'

'पण पायीच..'

'आणि मग उजवीकडला तो बाईकस्व.....रऽर..'

मंदार विचारचं करत राहीला... आणि मागे फिरून पाहेपर्यंत...

'सट्ऽटाक्क.....' त्याच्या डोक्यात कसलातरी मजबूत प्रहार पडला..

त्या बाईकस्वाराने आपला डाव साधला होता... आरीफही जवळ पोहचला होता.. मंदार आरीफकडे अविश्वासाने पाहत होता... त्याचे डोळे शरीराने ताबा सोडल्यासारखे बंद होऊ पाहत होते. पण मंदारची हिम्मत त्यांना बंद होऊ देत नव्हती.. पंधरा सेकंद थोडीफार धडपड केल्यानंतर मंदार खाली कोसळला...

खाली पडल्यावरही डोळे अर्धवट बंद-उघड स्थितीत तो त्या व्यक्तीला पाहण्यासाठी आसूसला होता... कोण होता तो इसम.. ती व्यक्ती.. एक नक्की की आरीफ त्याला सामील होता.. अगदी साळसूदपणे त्या दोघांनी मंदारला जाळ्यात ओढले होते.. अवघ्या एक-दोन क्षणांचा अवधीही मंदारला सावरायला मिळाला नव्हता..

मंदारच्या नेत्रवलयासमोर त्या इसमानं अलगद आपला हेल्मेट काढला... मंदारनं पुसटसं त्या व्यक्तीला पाहीलं... तत्क्षणी अकस्मात् आश्चर्यछटा त्याच्या चेहर्यावर येऊ पाहत होती पण त्याआधीच शरीरावरचं त्याचं नियंत्रण सुटलं.. आणि मंदारने डोळे मिटले...

घडलेल्या एकेक घटना निस्तरण्याऐवजी त्यात आणखी नवनव्या प्रसंगांची भर पडत चालली होती. मंदारला अजूनही काहीच माहीती मिळाली नव्हती. उलट मौसमच्या खुनाचा आरोप मात्र त्याच्या माथी पडला होता. पोलीस त्याचं वर्णन केलेलं स्केच घेऊन तपास करत होते..

आरीफ सोबत आल्यापासून मंदारची अंधुक अशी आशा जागृत झाली, पण आजच्या प्रकारानं ती ही फोल ठरली होती. नेमकं कश्याचा शोध घ्यावा मंदारने आणि कोणाच्या मागे जावे..

डिग्री... मदन.. नसीर... चंदू... पण आता त्यांच्याही पुढे जाऊन लेच्यापेच्या दिसणारा आरीफ जास्त मोठा गुन्हेगार वाटत होता.. आणि तो इसम.. जो आरीफसोबत होता.. त्याचा काय उद्देश असावा.. की हाच तो मास्टरमाईंड.. का आणखी कुणी नवा दुश्मन मंदारचं नुकसान करू पाहत होता...? आणि त्याला पाहून बेशुद्ध पडतानाही मंदारनं आश्चर्य का व्यक्त करावं... मंदार त्याला ओळखत होता...? की आणखी काही कारण असावं..?

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूया पुढील भागात..

क्रमशः