Niropya.---porvardh in Marathi Short Stories by suresh kulkarni books and stories PDF | निरोप्या!---(पूर्वार्ध )

निरोप्या!---(पूर्वार्ध )

"हणम्या, जरा चहा पाण्याचं बघ! दिवस हातभर वर आलाय. ऊन तापायच्या आधी रानात खेटा मारायचाय!"
हानाम्याने लगबगीने मालकाच्या पुढ्यात, लाल भडक तांब्याचा लोटा अन तांब्याचाच वीतभर उंच पेला ठेवला. पुन्हा घरात फेरी मारून, ताज्या दुधाचा, विलायची-अद्रक घातलेला, वाफाळलेला चहाचा कप आणला.
उंच्यापुऱ्या भारदस्त विष्णुपंतांनी शेजारच्या तांब्याच्या पेल्यातले पाणी, तोंड वर करून नरड्यात ओतले. पांढऱ्याशुभ्र धोतराच्या सोग्याने, ओल्या मिश्या साफ केल्या. गरमागरम चहा बशीत ओतून मन लावून पिला. चहा पिताना, अभिमानाने आपल्या वाडलोपार्जीत, भव्य दगडी तटबंदी असलेल्या वाड्यावरून समाधानाने नजर फिरावी. हत्तीवर अंबारीत बसून त्यांचे पूर्वज, या समोरच्या वीतभर रुंद भरीव लोखंडी दाराच्या कमानीतून येत असत! एखाद्या किल्ल्याला लाजवील असा त्यांचा वाडा होता. एके काळी पंचक्रोशीतली सगळी जमीन त्यांची होती! आता फक्त शंभर एकर शिल्लक होती. तरी पंत समाधानी होते! गावात मान राखून होते. त्यांच्या शिवाय गावचे पान हलायचे नाही.
ओसरीवरल्या शिसवी बंगईत बसून, त्यांनी चांदीचा पानपुडा जवळ घेतला. घुंगराच्या आडकित्याने, छालीया सुपारीचा पसाभर कातर तोंडात टाकला, चुना आणि सुगंधी तंबाखूचा बार भरून, त्याचा स्वाद बराचवेळ तोंडात घोळत ठेवला. त्यांचे डोळे आपसुख मिटले.
कोणी तरी आल्याची त्यांना चाहूल लागली. मोठ्या कष्टाने त्यांनी डोळे उघडले.
अंगणात तो उभा होता. खाली मान घालून. आदबीने. काळाकुट्ट, वाळलेल्या बाभळीच्या खोडासारखे टणक हात-पाय, खप्पड गाल. डोक्याला मळकट पागुट, अंगात मुंडीछाट कोपरी, गुढग्याच्या थोडे खाली आलेले डबल काष्ट्याचे धोतर, तेही मळकट. कमरेला करंगळी एव्हडा जाड करदोडा आणि त्याला लटकलेली बंद्या रुपया एवढी चांदीची पेटी! हाती भरीव वेळूची काठी. उजव्या पायात नजरेत भरणारा चांदीचा घनसर तोडा. त्याची काटकता पाहणाऱ्याच्या नजरेत भरल्या शियाय रहात नव्हती.
बंगईवरून उठून, पंतांनी कोपऱ्यात जाऊन तोंड मोकळे केले. लोट्यात राहिलेल्या पाण्याने चूळ भरली.
"कोण रे तू ?" पंतांनी घसा साफ करून, अंगणातल्या अनोळखी माणसाला विचारले.
"जी, मी निरोप्या हाय!" तो जमिनीकडे पहात नम्रपणे म्हणाला. त्याचा आवाज खोल विहिरीतून आल्या सारखा गार आणि घुमल्या सारखा होता. किमान पंताला तरी तसे वाटले.
"निरोप्या? काय निरोप आहे? आन कुणाचा?"
"जी, तुमासनी आमच्या मालकांनी बोलिवलंय!"
निरोप्या बाळगणारा, पंताशिवाय या पंचक्रोशीत कोणच नव्हते. असा कोण तालेवार असेल, जो मुद्दाम माणूस पाठवून बोलावतोय? पंत क्षणभर विचारात पडले.
"कोण आहे तुझा मालक?"
"जी, आम्ही चाकर मानस, मालकाचं नाव ठाव नाई! अन असलं तरी, आमी आमच्या तोंडानं ते घेत नाई. वडिलोपार्जित तसा रिवाज हाय! पर आसपासची मानस त्यासनी 'देव' म्हणत्यात. तुमि येताव नव्ह?"
हे मात्र खरे होते. खानदानी चाकर आपल्या मालकाचे नाव कधीच आपल्या तोंडाने घेत नाहीत. हि परंपरा पंत जाणून होते.
"येतो बाबा, पण अजून काय म्हणाले तुझे मालक?"
"काय नाय! इतकाच निरोप दे मानले. अन हा, येन्याला राजी झाले तर, मातर संगच घेऊन ये, असं मला सांगतील हाय! तवा लै उपकार झाल तुमचं!"
"उपकार? अन ते कसले?"
"जी, तुमि मालकाच्या निरोपाला, 'येताव' मानून राजी झालात मानून!"
"बर, कोणतं गाव म्हणालास?, पत्ता काय?"
"आमचं काय गाव कंच मलाच ठाव नाई! पत्या कसा सांगू? पर वाट मातर ध्यानात हाय!"
"बघ, मला सवड असलं तेव्हा,येईन! तुला तुझ्या मालकच नाव, त्यांचा पत्ता माहित नाही, किंवा सांगता येत नाही. तू असे कर, या वाड्यातली दुपारची भाकरी खा. दिवस कलला कि परत जा! पुढच्या शनिवारी ये. मग बघू!" उपरणे झटकत पंत उठले.
संभाषण संपल्याचा संकेत त्या निरोप्याला मिळाला. तो पाठ न दाखवता चार पावले मागे गेला, आणि मग मात्र मागे वळून, ताडताड पावले टाकत दिंडी दारातून नाहीसा झाला.
पंत पायात जोडा घालून शेताकडे निघाले. पायात जोडा घालताना त्यांच्या डाव्या कुशीतून एक बारीक चमक निघाली. जाणवण्या इतपत. क्षणभर ते जागीच थांबले. फक्त क्षणभरच,मग नेहमी प्रमाणे लांब लांब ढांगा टाकायला सुरवात केली. काही तरी बिनसल्याची त्यांच्या मनाने नोंद घेतली होती.
०००
कामाच्या रगाड्यात पंत गुंतले. शुक्रवारी माळावरल्या विरोबाची जत्रा दणक्यात साजरी केली. जत्रेचे नियोजन त्यांच्याकडेच होते. हाताखाली कार्यकर्त्यांची फौज होती तरी, देखरेखीची त्यांना दमवलेच होते. भक्क लाईटीच्या उजेडात कुस्त्यांची दंगल झाली. विजेत्या मानकऱ्याला, अकराहजार रोख अन चांदीची गदा देऊन, त्यांनीच सत्कार केला. जत्रेची सांगता झाली. गुलहौशी मंडळी तमाशाच्या कानातील घुसली. पंत मात्र वाड्यावर परतले. छपरी पलंगावर पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागला.
मध्यरात्री कधीतरी त्यांना जाग आली. त्यांना बेचैन वाटू लागले. पाठ अगदीच भरून आली होती. काही तरी होतय. पण काय आणि का याचा अंदाज लागत नव्हता.
"आहो, जरा उठता का? आम्हास बेचैन झाल्या सारखे वाटतंय!" त्यांनी हलकेच शेजारी झोपलेल्या रामबाईस आवाज दिला. त्या झटक्यात उठल्या.
"बेचैन?"
"होय, आणि पाठ पण भरून आलीयय!"
एकदा झोपलेले पंत, सकाळी सात शिवाय उठलेले त्यांनी आजवर कधी पहिले नव्हते. पहाडासारखा भक्कम माणूस! कधी, साधी डोकेदुखीची सुद्धा तक्रार नाही आणि आज पाठ भरून आली म्हणतोय!काय झालं?
त्यांनी लगबगीने लिंबाचे सरबत करून आणले. पंतांनी ते पिऊन टाकी पर्यंत, रमाबाईंनी गोबरगॅसच्या बर्नरवर तवा गरम करून आणला. सोबत पाठ शेकायला कापडाचा बोळा पण त्या घेऊन आल्या.
गरम शेक पाठीला दिल्याने पंतांना जरा बरे वाटले.
"मी काय म्हणते?" रमाबाई हलकेच म्हणाल्या.
"काय?"
"आता हि दगदगीचा कामे नका घेऊ अंगावर?"
"कोणती काम?--- ते जत्रेचं काम ना?"
"हो! अहो, मागच्याच महिन्यात तुमच्या पन्नाशी निमित्य मी औक्षवण केलंय! आता थोडा शांतच असावं. नाही म्हणाल तरी वय वाढतच असत!"
"इतक्यात काय होतंय आम्हाला? उगाच घाबरताय तुम्ही!"
"आहो, मग हि पाठ ---"
"पाठ ना? आता तुम्हाला सांगायला हरकत नाही म्हणा. काय झालं कि संध्याकाळी कुस्त्यांची दंगल होती. त्यासाठी हौद तयार करत होते, उस्तादांची पोर. लाल मातीचा वास आमच्या नाकात घुसला. मग काय? शड्डू ठोकून घेतली उडी हौदात! चार दोन डाव पहिले टाकून. आपल्या हणम्याचा पोरगा होता कि. आता सवय राहिली नाही म्हणा, त्यामुळंच पाठ भरून आली असेल." इथपर्यंत सत्य होते. पण त्या 'चार दोन' डावात, हणम्याच्या पोराने दोनदा आस्मान दाखवले होते पंतांना! नाही म्हटले तरी पाठ सडकून निघाली होती!
सरबताने आणि शेकण्याने पंतांचा सकाळी सकाळी डोळा लागला.
त्या वेळेस सकाळची चांदणी उगवली होती. आणि तिला तो, काळा कुट्ट निरोप्या, ताठ मानेने वाड्या समोरच्या पिंपळाच्या पारावर हातात काठी घेऊन बसलेला, स्पष्ट दिसत होता. त्याची नजर वाड्याच्या दिंडी दारावर खिळली होती. जणू तो ते उघण्याची वाट पहात होता!
०००
पंतांना नेहमीच्या वेळेलाच जाग आली, पण आज ते लोळत पडले, उठावेच वाटत नव्हते. पण असं लोळून कसे भागेल? तालुक्याला जायचंय, ट्रॅक्टर बघायचाय. तसे, दोन आहेत, पण अजून एक लागणारच आहे. खूप काम खोळंबलीत. या जत्रेच्या नादात चार दिवस वाया गेलं होते. अश्या विचाराने ते झटक्यात उठले. सकाळची आन्हिक उरकून ओसरीवर आले. बंगईवर बसून आपला आवडता पानांचं डबा पुढ्यात ओढला. चांगली टणक बघून, एक छलिया सुपारी डब्याच्या तळातून काढली. घुंगराचा अडकित्ता हाती घेतला, आणि त्यांचे लक्ष अंगणात गेले.
पुन्हा तोच! निरोप्या अंगणात उभा होता! खाली मान घालून!
कामाच्या रगाड्यात पंत तो निरोप्या अन त्याचा निरोप दोन्ही विसरून गेले होते. त्याला समोर पाहून त्यांच्या डाव्या कुशीतून पुन्हा चमक निघाली. ज्या दिवशी हा पहिल्यांदा भेटला होता, तेव्हा निघाली होती तशीच! पण आत्ताची थोडी ज्यास्त तीव्र होती!
"तू आलास पुन्हा?" पंत गरजले.
"जी! तुमीच 'सनवारी ये' मनला व्हतात!" तो नम्रतेने म्हणाला.
"आता मला वेळ नाही!"
"जी! म्या थांबतो! तुमच्या सवडीनं हुंद्या!"
तो चार पावले पाठ न दाखवता मागे गेला, आणि मग ताडताड पावले टाकत दिंडी दारातून बाहेर गेला.
पंत पुन्हा उगाच बेचैन झाले. तोवर पंढरीने जीप दारात आणली. ते त्यात बसून तालुक्याला निघून गेले.
०००
पंतांना तालुक्यातून परतायला रात्री उशीर झाला. म्हणून ते आणि पंढरी राणूबाईच्या हॉटेलात, अपेय पान आणि सामिष भोजन करूनच आले. हे त्यांचे नेहमीचेच होते. राणूबाईच्या हातच्या कोंबडीच्या रस्स्याला आगळीच खुमारी असते, हे कोणीच अमान्य करणार नाही! त्या रश्श्यात, तिच्या हातची गरमागरम भाकरी कुस्करून खाल्यावर जे समाधान मिळत ते, रमाबाईंच्या हातच्या उकडीच्या मोदकात कुठून असणार?
पंतांनी प्रसन्न आणि तृप्त मनाने अंथरून जवळ केले. आज सगळेच त्यांच्या मनाप्रमाणे झाले होते. चार दिवसात नवा कोरा ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉल्या, आरटीओ पाससिंग करून वाड्यावर दाखल होणार होत्या. दोन दिवसांनी, शेती कॉलेजची एक टीम, माती परीक्षण आणि इतर मार्गदर्शनासाठी येणार होती. त्यांच्या कडून काय, काय माहिती घ्यायची, कोणाकोणाला या टीमचा फायदा घेऊ द्यायचा, या आणि असल्या विचारात त्यांचा डोळा लागला.
"उठा मालक! निघायचंय ना?"त्यांच्या काना जवळ कोणी तरी म्हणत होते. तो निरोप्याचा आवाज होता!थंडगार, घुमल्या सारखा!
खाड्कन त्यांनी डोळे उघडले. त्यांना स्वप्न पडले होते. दरदरून घाम आला होता! त्यांनी कपाळावरला घाम पुसला. कसला तो, फडतूस निरोप्या, आत्तापर्यंत कंटाळून निघून हि गेला असेल! उगाच आपण त्याचा आठव करतोय. म्हणून तर असली स्वप्न पडतात. आणि आपण नाहीच गेलो तर, तो काय उचलून नेणार आहे? उगाच आपण त्याची धास्ती घेतोय! त्यांनी स्वतःच्या मनाची समजूत घातली. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप लागेना.
आजून वाड्याबाहेरच असेल का तो? थांबतो म्हणाला होता!
पंतांनी फडताळातली चार सेलची हातभार लांब बॅटरी बाहेर काढली. आणि ते दुसऱ्या मजल्याच्या माळवदावर आले. रेडिअमच्या मनगटावरल्या घड्याळात नजर टाकली. रात्रीचे दोन वाजून काही मिनिटे झाली होती. माळवदावरून, सगळीकडे पसरलेले टिपूर चांदणे दिसत होते. आकाशात चंद्र मात्र नव्हता. आमावस्या होती. चंद्र कसा दिसेल? चांदण्याच्या उजेडात त्यांनी आसपासचा परिसर न्याहाळला. सर्वत्र निबिड शांतता होती. एक सुंदर अशी चंदेरी चादर सर्वत्र पसरली होती, त्या खाली सर्व झाकून गेले होते. वाड्यासमोरचा पिंपळ हि ध्यानस्थ होता. पंतांची नजर त्या पिंपळाच्या वरच्या टोकापासून तळाच्या पारा पर्यंत आली. तेथे कोणी तरी होते. पंतांनी हातातल्या बॅटरीचे बटन दाबून, प्रकाश झोत त्यावर टाकला.
आणि त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली!
कारण, हातात काठी घेऊन बसलेला 'निरोप्या' त्यांना स्पष्ट दिसत होता! झोपलेला नव्हता, तर ताठ बसलेला होता!
पंतांनी स्वतः सावरले. असे दहशतीखाली ते कधीच जगले नव्हते. सकाळी या 'निरोप्या'चा, काय तो सोक्ष मोक्ष लावायचा! 'निरोप्याचा' प्रकरणाचा उद्या शेवटचा दिवस! हे पक्के ठरले!
०००
आज पंत नेहमी पेक्षा लवकरच उठले. सकाळची आन्हिक उरकून घेतली. आणि बंगईवर येऊन बसले.
"हणम्या!" त्यांनी आवाज दिला.
"जी." हणम्या हजर झाला.
"आरे, तो परवा आलेला निरोप्या बाहेर आहे का पहा."
"कोणता, निरोप्या मालक?" हणम्याने गांगरून विचारले.
"बेकूफ, कुठं लक्ष असत तुझं? शनिवारी मी असाच बंगईवर बसलो होतो, तेव्हा तो अंगणात उभा होता. तू केर काढत होतास. तुझ्याच तर समोरून तो आला कि, काळा, उंचेला, हातात काठी होती!"
"नाई, मालक मला काय कुणी परक माणूस नाई दिसलं!"
"बर, न दिसू दे. समोरच्या पिंपळाच्या पारावर असेल बघ बसलेला! बोलावं त्याला!"
हणम्या मुंडी हलवून निघून गेला. आणि रात्री गस्त घालणारा तुकाराम अंगणात येऊन उभा राहिला.
"काय तुका, आज सकाळी सकाळी?"
"मालक, जरा गरिबाकडं बगा कि! चार म्हयन झाली. पंचायतीतून काय पगार आली नाय! भुक्क मरायची येळ आलिया!"
"बरं, बर, गेला तालुक्याला तर, भाऊसाहेबाला भेटून येतो. तुझा विषय पण काढीन. ये तू आता!"
"जी." मुजरा करून तो निघाला. तेव्हा हणम्या परत आला.
"भेटला का रे, तो निरोप्या?" पंतांनी विचारले.
"जी, पारावर कुणीच न्हाई! आसपास पण कुणी परका माणूस नाय घावला!"
कुठं गेला? रात्री होता आणि आता नाही!
"अरे तुका! जरा थांब!"
दारापर्यंत गेलेला तुकाराम परत फिरला.
"जी, काय मालक?"
"अरे, रात्री गस्त घालताना, तुला कोणी समोरच्या पिंपळाच्या पारावर बसलेला माणूस दिसला का?"
"नाही मालक! काल रातच्या चार फेऱ्या मारल्यात या वाड्यावरन. कोण पन नव्हतं बगा पारावर!"
हरामखोर! सगळे वेंधळे आहेत!
का, हा निरोप्या फक्त आपल्यालाच दिसतोय? आणि बोलतोय! छट! असं कस होईल? हा हणम्या अन तुक्या वेंधळे आहेत. अधून मधून गांजा पितात. त्यांचे लक्ष नसते.
तुकाराम आणि हणम्या दोघेही आपापल्या कामाला निघून गेले.
चला त्या निरोप्याची पीडा गेली, या समाधानात पंत बंगईवरून उठले आणि घरात जाण्यासाठी वळले. तेव्हड्यात मागून आवाज आला.
"मला याद केली जनु!"
तो निरोप्याचा होता! हातात काठी घेऊन तो अंगणाच्या मध्यभागी उभा होता!
पंतांनी क्षणभर त्याला डोळे भरून पहिले. हा असा अचानक कसा उगवला? आपण फक्त पाठमोरे वळलो आणि हा तेव्हड्या वेळात दिंडीदारापासून अंगणाच्या मध्यापर्यंत कसा पोहंचला?
" जा, नाही येत तुझ्या बरोबर!" पंतांनी निक्षून सांगितले.
"तुमासनी पैल इचारलं व्हतं! तुमि येतो मनालात! मला सनीवरी बलिवलंत! अन अता येत नाई? मालक, आमच्या 'देवाचा' इस्वास हाय तुमच्या जबानीवर! म्या काय? निरोप्या मानूस, म्हागारी जाणार अन, तुमि जबान पलटली, येतु मनून नाई आले, असाच आमच्या मालकासनीं सांगनार! बेअदबी तुमचीच हुईन मालक! तवा आनी एकवार हात जोडतो, आता माग सुरू नगा!"
हा निरोप्या बुद्धिमान होता! मूर्ख सांगकाम्या नव्हता. पंतांनी क्षणभर विचार केला. आणि निर्णय घेतला. 'विषुपंतांनी दिलेला शब्द पळाला नाही!' असे आजवर झाले नाही, आणि या पुढेहि होणार नाही!
"ठीक आहे! चाल तर! आज तुझ्या 'देवाला' भेटूनच येतो!"
"जी! म्या वाड्या भाईर हुबा हाय. येवा भिगीन!" तो नेहमी प्रमाणे चारपावले पाठ न दाखवता मागे गेला आणि मग मागे वळून ताडताड पावले टाकत वाड्या बाहेर निघून गेला.
पंतांनी मग फार वेळ गमावला नाही. समोरच्या खुंटीवरचे उपरणे खांद्यावर टाकले. डोक्यावर फेटा घातला. देवळीतले जोडे काढून जमिनीवर ठेवले आणि त्यात पाय सारले. सवयीने वाड्यावरून नजर फिरवली. थोडे रेंगाळल्या सारखे झाले. पण असे रेंगाळून चालणार नव्हते. लवकरात लवकर परत येण्यासाठी लवकर जाणे गरजेचे होते.
"हणम्या, आम्ही जाऊन येतोय. जेवण वेळेपर्यंत येतोच. पण उशीर झाला तर, मुक्कामी वाड्यावर येतोय!, घरात निरोप दे!" दिंडी दाराकडे झपाझप पावले टाकत, पंतांनी अंगणाच्या कोपऱ्यात काम करणाऱ्या हणम्याला, थोडे मोठ्या आवाजात बजावले.
दिंडी दारातून एक पाय बाहेर टाकला, घाईघाईमुळे धोतराचा काठ पायाच्या अंगठ्यात अडकला. त्यांचा तोल गेला.
"मालsss क!" मागून हणम्या ओरडला.

(पूर्वार्ध)

सु र कुलकर्णी.

Rate & Review

शारदा जाधव
Pgp

Pgp 3 years ago

Kirti Barde

Kirti Barde 3 years ago

Manali Sawant

Manali Sawant 3 years ago

Rajan Bhagat

Rajan Bhagat 3 years ago