Aadhar books and stories free download online pdf in Marathi

आधार

#आधार

मकरंद सकाळी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडला. आज त्याच्या बरोबर येणारा मित्र आलेला नव्हता.... "माझ्या मोठया भावाला कोरोना झालाय. भावाला व त्याच्या कुटुंबाला होम क्वारंटाईन मध्ये ठेवलंय.मी आज फिरायला येऊ शकणार नाही. कदाचित त्यांना काही आवश्यकता लागली तर मला तिकडे जावे लागेल. "
....असा मेसेज मकरंदच्या मित्राने रात्री उशिरा पाठवला होता.
" तुझी काळजी घे, काही मदत लागली तर कळव."..... मकरंदने त्याला मेसेज पाठवला होता.
या कोरोना मुळे आणखी किती जण आजारी पडणार हे समजेनास झालंय. तोंडाला मास्क लावून सर्व प्रकारे काळजी घेऊन माणसं वावरत आहेत. तरी हे कोरोना चक्र अजून थांबलेले नाही.
मकरंद सध्या कोरोना मुळे घरातून काम करत होता. त्याची बायको सुमिता गृहिणी होती. दिवसभर मुलं व नवरा घरी असल्यामुळे आता तिचे काम वाढले होते. तसेच जून पासून शाळा सुरु झाल्यावर ऑनलाईन शिक्षण सुरु झालं होते. मुले लहान होती. सुमिताला त्यांच्या बरोबर ऑनलाईन क्लास सुरु असतांना त्यांना घेऊन बसावे लागायचे. तसेच मुले अभ्यास करत असतांना तिला मुलांबरोबर बसून मार्गदर्शन करावं लागायचं.दिवसभर घरातील व मुलांच्या कामातून तिची सुटका नसायची. काम करणाऱ्या मदतनीस यायची बंद झाल्यामुळे कामाचा ताण तिच्यावर येऊ लागला. मकरंद दिवसभर ऑफिसच्या कामात मग्न असायचा. सुमिता तो ऑफिसचे काम करत असतांना त्याला कसला ही आवाजाचा त्रास व मुलांचा गोंगाट होऊ देत नव्हती.
एरवी मकरंद बायकोच्या कामात लक्ष देत नसे. पण आता तिच्यावर येणारा ताण पाहून मकरंदने सुलेखाला मदत करायचं ठरवलं. तो आठवड्यातून एकदा सर्व किराणा, भाजी, दुध सर्व आवश्यक सामान बाहेर जाऊन आणुन द्यायचा. तो सकाळी फिरून आला कीं, दोघांचा चहा करून ठेवू लागला.घरातील कामात जमेल तशी मदत करू लागला. त्याने ऑफिसच्या कामाला बसण्या आधी व नंतर मुलांकडे लक्ष द्यायला सुरवात केली. घरातील कामात कधीच जास्त लक्ष न घालणाऱ्या व तुसड्या स्वभावाच्या मकरंद मध्ये बदल झालेला बघून संध्याला आश्चर्य वाटले.सारखं घरात राहून त्याला बदल हवा असेल म्हणून घरकामात स्वतः लक्ष घालतोय अस मनातल्या मनात म्हणून ती शांत राहिली.
मकरंदची आई त्याच्या मोठया भावाकडे रहायची.अधून मधून मकरंदकडे येऊन एखादा महिना राहायची. त्यांचा मोठा मुलगा मुकुंद मोठया हॉस्पिटलमध्ये पॅथॉलाजीस्ट होता व सून माधवी स्वतःचं ब्युटी पार्लर चालवत असे.दोघे आपल्या कामात बिझी असत. अलीकडे या कोरोना मुळे ब्युटी पार्लर बंद होते.सून घरीच असायची. मुलगा मात्र काम वाढल्या मुळे हॉस्पिटलमधून उशिरा घरी यायचा. घरी आल्यावर सर्वांपासून एकदम वेगळा रहायचा. त्याचं खाणं, झोपणं हे सर्व कोरोना जास्त पसरल्या पासून अगदी वेगळं झालं होतं. कुणी त्याच्या जवळ जात नव्हते. फक्त झोप घेण्यासाठी रात्री त्याचा मुक्काम घरातील एका वेगळ्या खोलीत असायचा. मुकुंद त्याच्या लहान भावापेक्षा स्वभावाने वेगळा होता. तो प्रेमळ व मनमिळाऊ असल्यामुळे आई, पत्नी व मुले यांच्या बरोबर अंतर ठेवून त्यांना धीर द्यायचा. तुम्ही सर्व जण स्वतःची काळजी घ्या असं सांगायचा. त्याच्या हॉस्पिटल मधील नोकरी मुळे घरातील सर्वांना त्याचे टेन्शन वाटत होते . मुले या वेगळ्या वातावरणाशी जुळवून घेतांना समजदार झाली होती. त्यांना पण आपल्या पप्पांची काळजी वाटायची.
मुकुंदची आई मुलांच्या बरोबर जास्त वेळ असायची. त्यामुळे मुले आपल्या आजीच जास्त ऐकायची. त्या तिघांचे वेगळे जग झाले होते. मुलं आपल्या पेक्षा आपल्या सासूचं जास्त ऐकतात म्हणून माधवीला सासूबाईंचा राग येत होता. तो राग मधून मधून मुलांवर तर कधी सासूवर निघायचा. वास्तविक माधवी तिच्या पार्लर मध्ये इतकी बिझी असायची त्यामुळे मुलांना सासूबाईंचा जास्त लळा लागला ते तिला सोईस्कर झाले होते. सकाळी नाश्ता व किचनचं थोडं पहिले कीं घरात जास्त लक्ष दिले नाही तरी चालत असे. घरी कामवाल्या मदतनीस यायच्या त्यांच्या मदतीने सासूबाई सर्व सांभाळून घ्यायच्या. कोरोनाचा आजार काही थांबत नाही उलट जास्त वाढत चालला आहे हे पाहून माधवीने पार्लर पूर्ण पणे बंद करून टाकले. माधवी मुलांच्यात जास्त गुंतून राहू लागली. मुलांच आपल्या आजीवरील प्रेम पाहून तिची चिडचिड व्हायची. माधवीच्या सासूबाई तिची समजूत घालून म्हणायच्या मुलं हळूहळू तूझ्या जवळ येतील.तु त्यांना थोडा वेळ दे.प्रेमाने व धीराने वाग. तुझ्या बोलण्यात गोडवा राहूदे.
मुकुंदाबरोबर माधवीला सासूबाई विषयी जास्त काही बोलता येत नव्हते. कारण तिचा स्वभाव त्याला माहीत असल्याने त्याने तिच्याकडे सरळ दुर्लक्ष केले असते.आपल्या आईचा स्वभाव व चांगुलपणा मुकुंद चांगले जाणून होता. त्याची आई सकाळी आपला व्यायाम व योगा नियमित करायची. संध्याकाळी मुकुंद घरी आला की नियमित बाहेर फिरायला जायची. कोरोनाचा फैलाव जास्त झाल्यापासून तिचे वेळापत्रक बदलले गेले होते. सकाळी व्यायाम नियमित होईना. फिरायला जाणे जवळजवळ बंद झाले होते.मुलांना बाहेर इतर मुलांच्यात खेळायला पाठवणे शक्य नव्हते. शाळा बंद झाल्या होत्या. मुकुंद हॉस्पिटल मध्ये जायचा खूप उशिरा परत यायचा. त्याचे टेन्शन व दिनचर्येत झालेला बदल अशा प्रकारे मानसिक अस्वस्थ पणा त्यांच्याकडे सर्वांना जाणवत होता.
मकरंदला आपल्या मित्राच्या भावाला कोरोना झाल्याचे समजल्यावर त्याला आपल्या भावाची काळजी वाटू लागली. तो बेचैन होऊ लागला. त्याला भावाच्या बायको मुलांची व आपल्या आईची पण काळजी वाटू लागली. भाऊ दुसऱ्या शहरात रहात असल्यामुळे तिकडे जाणे शक्य नव्हते. अधून मधून त्यांच्याकडे फोन करणे एव्हढेच शक्य होते. सुमिता आपल्या मोठया जावेशी फोन वरून बोलत असे. त्या सर्वांना काळजी घ्यायला सांगायची. एक दिवस ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. मुकुंदाच्या लॅब मधील एकजण कोरोना पॉजिटिव्ह झाला. त्यामुळे त्यांच्या लॅब मधल्या सर्वांना टेस्ट करून घ्यावे लागले. सर्वांना हॉस्पिटलच्या एका रूम मध्ये क्वारंटाईन करून ठेवले.
मुकुंदाच्या घरातील सर्व जण खूप तणावाखाली होते.शेजारच्या माणसांना समजल्यावर त्यांनी पण चौकशी सुरु केली. सर्व जण संशयाने त्यांच्याकडे पाहायला लागले होते. अशा परिस्थितीत मुकुंदाच्या आई सर्वांना धीर देत होत्या.माधवीला व मुलांना बरोबर घेऊन देवाची प्रार्थना करू लागल्या. नामस्मरण, जप, धार्मिक ग्रंथाचे वाचन यात वेळ घालवू लागल्या.माधवी मुलांना बरोबर घेऊन त्यांच्या शाळेतील ऑनलाईन अभ्यासात मदत करू लागली.इकडे मकरंद पण भावाच्या काळजीने अस्वस्थ झाला होता.त्याची पत्नी सुमिता त्याला धीर देत होती. या दोन्ही कुटुंबाना धीर व आधार देणाऱ्या मुकुंद व मकरंदच्या आई मात्र स्वतःची काळजी चिंता कुणाला सांगू शकत नव्हत्या. या वयात मुलांनी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. पण परिस्थिती मुळे त्यांना आपल्या मुलाची चिंता सतावत होती.
आजकाल कोरोना मुळे सर्वच जण भीतीच्या दडपणा खाली वावरत आहेत.सर्वांच्या आयुष्यात सध्या खूप बदल झालेत. प्रत्येकाला आपापल्या मुलाबाळांची काळजी वाटतेय. मुकुंद सारखी आणखी कित्येक कुटुंबातील कर्तीसवरती माणसे दररोज कोरोनाच्या संकटाशी सामना करायला घराबाहेर जात आहेत.त्यांच्या मुळे कोरोना आटोक्यात आणला जात आहे. त्यांच्या मागे त्यांना आधार द्यायला उभे आहेत त्यांच्या कुटुंबातील माणसे. सध्याच्या काळात सर्वांनाच एकमेकांच्या आधाराची अतिशय आवश्यकता आहे.

©Vasanti Pharne

फोटो -व्हाट्सअप 🙏