ek patra priy shales books and stories free download online pdf in Marathi

एक पत्र प्रिय शाळेस

एक पत्र प्रिय शाळेस!
माझी अतिप्रिय,
माझे सर्वस्व,
माझी शाळा,
तुज नमन! तुला वंदन!
माझ्या आयुष्यातील कमी-जास्त चाळीस वर्षे मी तुझ्या सान्निध्यात होतो. दहा वर्षे शालेय विद्यार्थी म्हणून, दोन वर्षे विद्यालयात विद्यार्थी म्हणून तर तीस वर्षे शाळेत शिक्षक म्हणून 'शाळा' या ज्ञानमंदिरात म्हणजे तुझ्या समवेत वाढलो, हसलो, रडलो, खेळलो, पडलो, उठलो, शिकलो, बोललो, सुसंस्कारित झालो. शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना खेळवले, हसवले, वाढवले, रडवले, मारले, ओरडलो, रागावलो, शिकवले, हात धरून धडे गिरवून घेतले. ह्याची तू आणि केवळ तूच साक्षीदार आहेस.
खरवड, महालिंगी, भाटेगाव आणि डोंगरकडा या गावांमध्ये तुझ्यासोबत काम करताना शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक अनेक चढ उतार पाहिले, सुख-दुःखं अनुभवली पण एक मात्र निश्चित की, तुझ्या सान्निध्यात आनंदाचे अनेक क्षण जगलो किंबहूना तुझ्या कुशीत मायेची, ममतेची गोडी चाखताना सारे काही विसरून जात असे. तुझ्यासंगे घालविलेले दिवस आठवताच तुझा विरह नकळत डोळे भरून यायला कारणीभूत ठरतो आणि मग प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचे गीत गुणगणतो...
'नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा...'
शिक्षक म्हणून काम करताना कळमनुरी ते खरवड हे चौदा किलोमीटरचे खड्डेयुक्त अंतर कापताना, बारड ते भाटेगाव, पार्डी ते भाटेगाव, वारंगा ते भाटेगाव, डोंगरकडा ते भाटेगाव, नांदेड ते भाटेगाव- डोंगरकडा हे अंतर कधी सायकलने, कधी मोटारसायकलने पार करीत असताना दुरून तुझे दर्शन झाले की, शरीरात एक वेगळाच उत्साह संचारत असे. सायकलिंग, मोटार सायकलिंग हा प्रवास करताना झालेला त्रास, आलेला शीण क्षणार्धात विसरून जात असे. तुझे दर्शन एक वेगळीच प्रसन्नता निर्माण करीत असे. उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्ट्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी होणारे तुझे दर्शन म्हणजे माहेरपणासाठी आलेल्या सासुरवाशीणीला माहेरच्या घराच्या होणाऱ्या दर्शनासम! आमची वाट बघत तुझ्या कुशीत... पटांगणात खेळणारी मुले आम्हाला बघताच आमच्याभोवती जमा होऊन... 'सर आले...गुर्जी आले...' असे आनंदाने ओरडत ना त्यावेळी माहेरी आलेल्या मुलीभोवती घरातील आणि परिसरातील मुलांनी आनंदाने गर्दी केल्याप्रमाणे वाटत असे. आताही अनेकदा वाटते, फिरूनी पुन्हा ते दिवस यावेत. पुन्हा तुझ्या कवेत शिरावे. त्या चिमुकल्या फुलपाखरांसमवेत खेळावे, हसावे, गावे, खेळावे पण म्हणतात ना, गेलेले क्षण पुन्हा परतून येत नाहीत. असो.
भाटेगाव येथे मी उपस्थित होण्यासाठी आलो. तुझे दर्शन झाले. मन हरखून गेले. आनंद झाला पण त्याचवेळी वाटले, अरे, राष्ट्रीय हमरस्त्याला लागून असलेल्या या शाळेत फक्त चौथीपर्यंत शाळा? नाही. हे मनाला पटत नव्हते. दिवस जात होते. मनात एक विचार पक्का होत होता. गावकरी मंडळी सोबत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत गेले. चर्चा करीत होतो आणि मग त्यातून चार वर्गाचे सात वर्ग झाले. त्यावेळी मला किती आनंद झाला हे तू जाणलेच असणार कारण तुलाही तितकाच आनंद झाला असणार, होय ना? पाठोपाठ तिथेच बालवाडीही स्थापन झाली. तुझ्या कृपेने वर्ग वाढविण्याचा फायदा कुणाला झाला असेल तर गावातील मुलींना. कारण चौथी वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर इच्छा असूनही मुलींना पुढे शिकता येत नव्हते. ती अडचण दूर झाली. तुला गावाचा अभिमान होता, गावाला तुझा अभिमान होता आणि मला तुम्हा दोहोंचा अभिमान होता. गावकरी मंडळीच्या मदतीने तुझा परिसर नयनरम्य, मनोमोहक केला. तुझ्या साक्षीने, तुझ्याच आशीर्वादाने भाटेगाव येथील तुझ्या पटांगणात गावकऱ्यांनी माझा पहिला सत्कार केला. तुझ्या मांडीवर बसून तो सत्कार स्वीकारताना किती आनंद झाला हे तुझ्यासारखी माऊलीच जाणो.
मध्यंतरी काही महिन्यांसाठी महालिंगी येथे तुझ्या नित्यदर्शनाचा लाभ झाला. तिथले तुझे रुप पाहून माझा जीव कासावीस होत असे, डोळे भरून येत असत. तिथे तुझ्या डोक्यावर छप्परच नव्हते. मी दररोज तुझ्या गावी येऊन गावात घरोघरी जाऊन पाच-सात मुलांना घेऊन दिवसभर शाळेत बसत असे. ठरलेल्या वेळी विषण्ण मनाने घरी परतत असे. तिथे सहा महिने झाले. मला भाटेगाव येथे उपस्थित होण्याचे आदेश आले. त्यावेळी तुझा त्या गावी निरोप घ्यावासा वाटत नव्हता पण इलाज नव्हतो. मी भाटेगाव येथे आलो. इथे तुझी मनसोक्त सेवा करताना बाळगोपाळांमध्ये चांगले रमता येईल, नवीन काहीतरी करता येईल या आशेने, नवीन जोमाने, नव्या उमेदीने तुझी आणि त्या इवल्याशा लेकरांची सेवा करू लागलो. केलेल्या कामाचे बक्षीसही मिळत होते. गावातील मंडळीचे कौतुक आणि केलेला सत्कार वेगळीच स्फूर्ती निर्माण करीत होते. नंतर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले तेव्हा खूप खूप आनंद झाला. खरेतर पुरस्कार गौण असतात. केलेल्या कामाची कुठेतरी नोंद होते, कुणीतरी शाबासकी देते हे फार मोठे समाधान असते. ते मला सातत्याने मिळत गेले.
तुझ्या संगतीत जे समाधान, जी ऊर्मी, जी प्रेरणा मिळत गेली त्यातून मला लेखन करण्यासाठी स्फूर्ती मिळाली. कथा, कादंबरी, चरित्रं असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य मी प्रसवू लागलो. सोबतच तुझी ओढ दिवसेंदिवस वाढतच गेली. भाटेगाव येथे असताना साक्षरता अभियानात केंद्रीय शाळेचा पूर्ण वेळ कार्यकर्ता या नात्याने गावोगावची तुझी विविध रुपे अनुभवता आली. ठिकठिकाणी तुझ्या दर्शनाचा लाभ मिळाला. प्रत्येक गावी देवतेचे मंदिर असते तसेच ज्ञानमंदिरही असते. नवीन गावात गेले की, जसे तिथले मंदिर लक्ष वेधून घेते तसेच तूही सर्वांना स्वतःकडे आकर्षित करते. साक्षरता अभियानाच्या काळात जवळपास शंभर गावातील तुझी विविध रुपाचे दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले.
योग्यवेळी पदोन्नती झाली. शिक्षकाचा मुख्याध्यापक झालो. डोंगरकडा येथील शाळेवर काम करण्याची संधी मिळाली. तिथे काम करणे म्हणजे सर्व दृष्टीने एक आव्हानच होते परंतु तुझ्या साथीने आणि साक्षीने ते आव्हान लीलया पेलले. मनात रुंजी घालत असलेल्या योजनांना धुमारे फुटले. त्यांना मूर्त स्वरूप देता आले. गावकऱ्यांची साथ होती म्हणून मी तुझ्या छत्रछायेखाली सारे करू शकलो. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासकीय निकषांच्या पुढे जाऊन तुला नटवले, शृंगारित केले. विविध उपक्रम राबवले आणि शाळा-शाळांमध्ये लागलेल्या निकोप स्पर्धेत तुझे रुप अधिकारी, पदाधिकारी यांना भावले म्हणून सर्व शिक्षा अभियानात डोंगरकडा शाळेला कळमनुरी तालुक्यात प्रथम आणि हिंगोली जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाला. केवळ अवर्णनीय आनंदाचे ते क्षण तुझ्या संगतीने अक्षरशः नाचून साजरे केले. गावकऱ्यांनाही आत्यंतिक आनंद झाला. गावकरी मंडळीने तुझ्या कुशीत माझा सत्कार केला. खरेतर मी निमित्तमात्र होतो कारण पुरस्कार तुला मिळाला होता पण सत्कार माझे होत होते. केवळ डोंगरकडा येथेच नाही तर परिसरातील गावांमध्ये, तालुक्यात, जिल्ह्यात ठिकठिकाणी माझे सत्कार होत होते. सत्कार स्वीकारताना वाटायचे, ह्या सत्काराची मानकरी माझी शाळा आहे. संत ज्ञानेश्वर यांनी भिंत चालविल्याचे वर्णन ऐकिवात आहे त्याप्रमाणे तुला... माझ्या शाळेला उचलून ठिकठिकाणी नेता आले असते तर? पण जर तरला काही अर्थ नसतो. परंतु एक खात्री होती, तुझ्यावतीने मी सत्कार स्वीकारतोय याचा तुला आनंद होत असणारच, अभिमानाने तुझी छाती भरून येत असणार. जिल्ह्याचे पथक तुझी पाहणा करायला येणार ही बातमी जेव्हा समजली तेव्हा तुझे अगोदरचे गोंडस रुपडे पुन्हा सजवले. तुझे ते शृंगारित रुप पाहून असे वाटले की, जणू नववधू सजलीय. विवाहाच्या क्षणाची आतुरतेने वाट बघतेय..
तुझ्या मांडीवर बसून रोज जेधण करताना वेगळीच मजा येत असे. घरून आणलेले अगोदरचे रुचकर, स्वादिष्ट जेवण अधिकच आवडायचे. तुझ्या साक्षीने घेतलेला घास वेगळीच उर्जा निर्माण करीत असे. तुझ्या परिसरात एक वेगळीच गोडी असायची की ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिजलेली खिचडी अत्यंत रुचकर होत असे. शासकीय नियमानुसार, निकषानुसार खिचडी शिजत असली तरीही तुझ्या मायाळू नजरेचा मसाला त्यात वेगळीच चव भरत असे. तुझ्या मायेच्या पंखाखाली बसून सारी मुले आनंदाने जेवत असत, त्यांचा तृप्तीचा, समाधानाचा ढेकर वेगळाच आनंद देत असे. आपली खिचडी अत्यंत चविष्ट होत असते हे ऐकून काही अधिकाऱ्यांनी मुद्दाम दुपारच्या जेवणाच्या वेळी भेटी दिल्या. तुझ्या छायेखाली त्यांनी आपल्या सात्विक खिचडीचा आस्वाद घेऊन तृप्तीचा अभिप्राय नोंदवला. अशा अनंत आठवणी संग्रही आहेत. प्रसंगानुरूप त्या आठवत असतात. लेखनाचे अंग आणि छंद असल्यामुळे अनेक आठवणींना 'शाळा लावी लळा!' या शीर्षकांतर्गत शब्दबद्ध केले आहे. तुझ्या अनेक आठवणींना ह्रदयात घेऊन पुढील आयुष्याची वाटचाल सुरू आहे. आजही परिसरात, बाहेर पडल्यावर, प्रवास करताना तुझे दर्शन झाले की, पाय तिथे रेंगाळतात, हात छातीवर जातात. नयन तुझे प्रत्येक रुप साठवून ठेवतात. काही क्षणात मार्गस्थ होतो... एक अनामिक हुरहुर घेऊन...
सदैव तुझाच,
एक विद्यार्थी
००००
नागेश सू. शेवाळकर