Old age love - 4 books and stories free download online pdf in Marathi

वृद्धाश्रमातलं प्रेम - 4

भाग – ४

दुर कुठेतरी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. दाट धुकं पडलं होतं. गुलाबी थंडी सर्वांना सुस्तवून सोडत होती. सूर्य नेहमीप्रमाणे उगवला होता. नव्हे, तो त्याच्या जागेवर अनादि काळापासून अविचल आणि अविरतपणे होता तसाच होता. एखाद्या चक्रवर्ती सम्राटासारखा. खरं तर पृथ्वी त्याच्याभोवती फिरते आणि आपल्याला वाटतं सूर्य उगवला. पृथ्वी फिरते हे माहीत असूनही सगळे सूर्य उगवला असंच म्हणतात. त्रिकालबाधित सत्य असूनही ते नाकरतात. आयुष्याचं सुद्धा असंच नाही का? एक वेळ अशी येणार आहे की जेव्हा आपण या जगात नसू, आठवणी असतील पण काही काळाने काळपुरुष त्यांना आपली शिकार बनवेल. हे सर्व सृष्टीला ज्ञात आहे. पण तरीही मायमोहाची लक्तरं काही गळून पडायला तयार नसतात. काही गोष्टी, वस्तु, ठिकाणं यांचा मोह कालपरत्वे सोडलेलाच बरा. नाहीतर ऐन वेळी खूप त्रास होतो. जो या वृद्धाश्रमातल्या लोकांना होत होता. सूर्य उगवला असं म्हटल्यासारखं ते म्हणत होते, आम्ही बरे आहोत असं. पण ती जखम कधीही भरून न येण्यासारखी होती.

“काय रे अण्णा, एकटाच आलास? तो तुझा रूम पार्टनर महाजन नाही आला का?” बर्वे काकांनी किचनमध्ये येत असलेल्या अण्णांना विचारलं.

“रात्री नीट झोपला नाही तो, दर एक-दीड तासाने उठून बसायचा. त्याला विचारलं तर काही बोलायचाच नाही. काही नाही रे, बरा आहे मी असं सांगायचा. आता पहाटे झोपला. झोपू देत. नको उठवायला त्याला.” अण्णा बर्वे काकांशेजारी बसत म्हणाले.

“मी कालपासून गंमत बघतोय त्याची. त्या सुधा कदम आल्यापासुन काहीतरी विचारात पडलाय तो. असा भूतकाळात हरवल्यासारखा वाटतोय. काल बोलतानासुद्धा मध्येच काहीतरी अगम्य बोलायचा. आम्ही विचारलं त्याला आधी. नंतर जाऊ दिलं. त्याला सांगायचं नसेल बहुतेक आम्हाला. तो काहीतरी लपवतोय हे मात्र नक्की.” जोशीकाका थोडं गंभीर होत म्हणाले.

“खरंय तुझं. त्याला वहिनींची आठवण येत असावी बहुतेक. अण्णा, तुला काय वाटतं? तू कधीचा आहेस त्याच्यासोबत.” बर्वेकाकांनी अण्णांना प्रश्न केला.

“नाही रे. आम्ही गेल्या वर्षभरपासून सोबत आहोत. पण या विषयावर काही बोलणं नाही झालं कधी. भूतकाळच्या काही गोष्टी विचारल्या तर एवढंच सांगतो, मी विसरलो आता सगळं. मला काहीही आठवत नाही. हे माझं नवीन आयुष्य आहे. याला काही कीड लगायला नको.” अण्णा खिडकीतून येणार्‍या सूर्यकिरणांच्या तिरीपीकडे बघत म्हणाले.

“त्याच्या मनाचा ठाव लागणं कठीण आहे रे. तो प्राध्यापक होता. विद्वान माणूस. त्याचं दुःख तो आपल्यासमोर कसं आणेल?” जोशीकाका म्हणाले.

“त्याच्या मनातलं काढावं लागेल. जे असेल ते. नाहीतर तेच घोकत राहील तो बिचारा,” अण्णा दरवाज्याकडे बघत म्हणाले. ते महाजन काकांची वाट बघत होते.

“हो, बरोबर आहे तुझं. यावर विचार करायला हवा.” बर्वेकाका म्हणाले.

असं बोलणं सुरू असतानाच तिथे महाजन आले. जोशींशेजारी बसताना एकदा घड्याळात पहिलं आणि म्हणाले, “भरपूर उशीर झाला रे मला आज.”

“चालतं रे एखाद्या दिवशी. पहाटेच्या थंडीत झोपण्याची एक वेगळीच मजा असते बघ.” जोशींनी महाजन काकांना प्रत्यूत्तर दिलं. कारण बर्वेकाका पोह्यांमधल्या मिरच्या अण्णांच्या डिशमध्ये टाकत होते. हा मिरच्यांचा व्यापार सुरू असताना महाजन आले याच्याकडे त्या दोघांचं लक्षच नव्हतं.

नाश्ता वगैरे झाल्यावर चौघंजण बाहेर पटांगणात आले. कोवळं ऊन पडलं होतं. थंडीच्या दिवसांत असं कोवळ्या उन्हात फिरायला कुणाला नाही आवडणार? एका ठिकाणी बसण्यापेक्षा ऊन खाल्लेलं बरं, असा विचार करून ते फिरायला लागले. आधी कुणीच काहीच बोलत नव्हतं. मग जोशींनी कोंडी फोडत सुरुवात केली, “महाजन, तुला रात्री झोप नाही आली म्हणे? अण्णा संगत होता.”

“हो, एवढी विशेष झोप लागली नाही. आता म्हातारपणात होतं तसं. कुत्र्यासारखी झोप. झाडाचं पान पडलं तरी जाग येते.” महाजन काका मनातलं बोलून गेले.

“महाजन तुला आम्ही गेल्या आठ महिन्यांपासून ओळखतोय. तू आमच्यापसुन काहीतरी लपवतोय. आम्ही तुझ्याएवढे शिकलेले नसू. पण माणूस अस्वस्थ आहे हे ओळखता येतं आम्हाला. कालपासून बघतोय. आता खरं काय ते सांग बघू,” जोशी स्पष्टपणे बोलले.

जोशींकडून झालेल्या प्रश्नाच्या भडिमाराने महाजन एकदम दचकलेच. चलता चलता एकदम थांबले आणि आळीपाळीने तिघांकडे बघू लागले. काल आपण मनातलं बोलून गेल्यावर सावरण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला असं त्यांना वाटलं होतं पण तो पुरता फासला होता हे त्यांच्या आता लक्षात आलं होतं. खरं सांगण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांना उमगले होते. त्यांनी उसासा घेऊन बोलायला सुरूवात केली. “तुम्हाला ऐकायचं आहे ना, मग इथं नाही.” महाजन काकांच्या आज्ञेनुसार तिघंजण त्यांच्या मागोमाग चालू लागले. खोलीत पोहोचेपर्यंत कुणीही काहीही बोललं नाही. खोलीत गेल्यावर महाजन काकांनी परत उसासा सोडला, आपला भूतकाळ सांगण्यासाठी ते त्यांच्या मनाची तयारी करत होते. महाजन काका त्यांच्या पलंगावर बसले. त्यांच्या बाजूला जोशीकाका, अण्णांच्या पलंगावर बर्वेकाका बसले आणि अण्णा खुर्चीवर बसले. अजूनही कुणीच काही बोलत नव्हते. सर्वांच्या नजरा महाजन काकांवर खिळल्या होत्या. आळीपाळीने महाजन तिघांकडे बघत होते. शेवटी त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“तर, कालपासून मी इतका अस्वस्थ आणि हरवलेला का वाटतोय हे जाणून घ्यायचं आहे ना तुम्हाला? ऐका तर मग, काल आलेली सुधा ही कॉलेजला असताना माझ्या वर्गात होती. काल तिला पाहिलं आणि मी क्षणभर थबकलोच. कारण, एम. ए. च्या शेवटच्या पेपरला बघितलं होतं तिला. नंतर खूप वाट पहिली पण ती आलीच नाही. आपलं पहिलं प्रेम जवळपास चाळीस वर्षांनी पाहिल्यावर कसं वाटेल तुम्हाला? मोडलेली स्वप्न आणि त्यांचं एकमेव कारण असलेली व्यक्ती जेव्हा अचानक भेटते तेव्हा मनाची काय स्थिती होते हे तुम्हाला नाही कळणार. कॉलेजचे ते सोनेरी दिवस काल श्रवणाच्या झडीसारखे माझ्यासमोर बरसत होते. त्यांच्यात मी चिंब भिजून गेलो होतो. रात्रीसुद्धा त्या आठवणींनी मला रातकिड्यांसारखं किर्र किर्र करून भंडावून सोडलं होतं. आधी मला वाटलं की दुसरं कुणीतरी असेल किंवा आपल्या दृष्टीचा भ्रम असेल पण सायंकाळी किचनमध्ये पक्की खात्री पटली.”

महाजन काकांच बोलणं ऐकून सर्वजण विजेचा शॉक लागल्यासारखे स्तब्ध झाले. काही वेळ अशाच स्मशान शांततेत गेले. महाजन काका आळीपाळीने तिघांकडे बघत होते. पण सर्वजण महाजन काकांच्या नजरेला नजर देण्याचं टाळत होते. महाजन काकांनी परत बोलणं सुरू केलं. आपल्या जीवनाच्या पुस्तकाचं एकेक पान ते आता वाचून दाखवणार होते.

मी पहिल्यांदाच पुण्याला आलो होतो. कॉलेजचा पहिलाच दिवस होता. हॉस्टेलमध्ये जागा नसल्यामुळे भाड्याने खोली घ्यावी लागली होती. पाहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी अर्धा तास लवकर जाऊन पोहोचलो. तिथं अगदी सिनेमात बघितल्यासारखं वातावरण होतं. स्त्री-पुरुष समानता एकदम. मला ते पाहून धडकीच भरली. कुण्या एका मुलीशी बोलण्याचा काही प्रसंग मला माझ्या उभ्या आयुष्यात झालेला आठवत नव्हता आणि इथेतर मुलं मुली एकदम बिनधास्तपणे गप्पा वगैरे मारत होते. भल्यामोठ्या कॉलेजमध्ये वर्ग शोधत असताना माझी तारांबळ उडत होती. संपूर्ण कॉलेज फिरलो पण मला वर्ग काही सापडला नाही. शेवटी मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर उभा राहिलो. तिथं आजूबाजूला कुणी ओळखीचं दिसतंय का ते पाहू लागलो. अॅडमिशनच्या वेळी तीन चार मुलांचे चेहरे चांगले पाठ करून ठेवले होते. पण तेसुद्धा काही दिसत नव्हते. इतक्यात एक माध्यम सावळ्या वर्णाची मुलगी माझ्यासामोर उभी राहिली. घाबरलेली आणि बावरलेली. केसांत एक लालभडक गुलाबाचे फूल मळले होते. हातात दोन मोठी रजिस्टर होती. तिसुद्धा माझ्यासारखीच गोंधळलेली वाटत होती. आमची दोघांची नजरानजर झाली. तिने एकदम घाईत विचारलं, “बी. ए. एफ. वाय. चा वर्ग कुठं आहे माहितीये का तुम्हाला?”

मी याआधी कुणा मुलीशी बोललो नसल्याने गोंधळून गेलो. माझ्या घशाला कोरड पडू लागली. छातीत धडधड वाढत होती. काय बोलावं ते सुचत नव्हतं. “म, मला नाही माहिती. मीसुद्धा तोच वर्ग शोधतोय.” मी कसाबसा उच्चारलो.

†††