Suvarnamati - 12 books and stories free download online pdf in Marathi

सुवर्णमती - 12

12

सकाळी दरवाजावर टकटक झाली आणि सुवर्णमती दचकून उठली. भरभर दरवाजाजवळ जात कोण आहे याचा कानोसा घेतला. बाहेर तिची सेविका आली होती.

‘राणीसरकारांनी चुल्हापूजनासाठी स्नान आटोपून बोलावले आहे, दरवाजा उघडावा’ असे तिने विनवताच ‘कुंवर निजले आहेत, मी तयार होऊन येते’ असे सुवर्णमतीने आतूनच सांगून तिला जायला सांगितले. पार न पडलेल्या सुहागरातीचे गुपित ती तिच्या बाजूने तरी गुपितच ठेवणार होती.

पुढील काही दिवस, छोटे मोठे कार्यक्रम, रितीरिवाज, यात पार पडले. यासर्व कार्यक्रमांदरम्यान सुवर्णमतीचे हसून खेळून सर्वांशी वागणे, कोणी चेष्टा मस्करी केली तर प्रसंगी लाजणे, हे सर्व पाहिल्यावर, ही एक उत्तम अभिनेत्री असल्याची गवाहीच सूर्यनागास मिळाली. तो अधिकच सतर्कतेने तिच्या आसपास वावरू लागला. तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागला.

एक महत्वाचा कार्यक्रम उरला होता तो म्हणजे परकीय पाहुण्यांसाठी जंगी मेजवानी.

शेषनागांनी विचारपूर्वक सूची तयार केली होती. भोजनसमयी ती सूर्यनागास देऊन ते म्हणाले की आणखी कोणी राहून तर गेले नाही ना पाहावे.

“लॉर्ड कार्टन चे नाव आहे ना सूचीत? ते सध्या फार चर्चेत आहेत आणि परकीय फौजेचे सर्वेसर्वा आहेत. सध्या शेषनगरीपासून काही अंतरावर असणाऱ्या फौजेच्या मुक्कामी आहेत.” सूर्यनागाने विचारले.

“हो आहे त्यांचे नाव. परंतु ते फारसे अनोळखी राज्यांत जात नाहीत असे ऐकले आहे. आपली ज्या अफसरशी ओळख होती तो सध्या परदेशी गेला आहे. आता त्यांच्याशी संधान कसे बांधावे हे कळत नाही.”

यावर मिष्टान्न स्वहस्ते परोसण्यास आलेली सुवर्णमती म्हणाली "माफी असावी, गेली अनेक वर्षे ते आपल्या इलाक्यात लहानमोठ्या फौजांचे प्रमुखपद भूषवत आहेत. काही वर्षांपासून माझा त्यांच्या कन्येशी परिचय आहे जो मैत्रीत रुपांतरीत झाला आहे. त्यांच्याबरोबरच तिलाही आमंत्रित करावे असे मला वाटते. विवाहसमयी तिला न बोलावल्याने ती काहीशी नाराज आहे.”

सूर्यनाग शंकेखोर नजरेने तिच्याकडे पाहू लागला. राजाजी मात्र बेहद्द खुश झाले.

“हे तर फारच छान आहे की बहुराणीचा लॉर्डच्या कन्येशी परिचय आहे. मी आजच खलिता.... नाही नको. कुंवर, आपण स्वयं जाऊन हे आमंत्रण करावे. आम्ही चंद्रनागास पाठवले असते, परंतु त्यांचे मन सध्या परदेशी जाण्यात रस घेत आहे. आणि कोणतीच कुचराई होणे हानीकारक ठरेल. शंखनाग आणि बडी बहू यांची इथे मदत लागेल. नाहीतर त्यांना न्योता घेऊन धाडले असते.”

सुवर्णमती म्हणाली, “आपली संमती असेल तर मीही जाऊ का ? तिथले देवी माँ चे मंदिर, फार पुरातन आणि प्रसिद्ध आहे. सर्वांच्या मन्नत तिथे पूर्ण होतात असे ऐकून आहे. मीही माथा टेकवून यावे असे वाटते. विवाह नीट संपन्न व्हावा म्हणून मी मन्नत मागितली होती तीही पूर्ण होईल. मी स्वत:च जाऊन मेजवानीचे निमंत्रण दिले तर लॉर्ड मना नाही करणार, मला खात्री आहे.”

राजमाता ज्या एवढा वेळ बोलणे ऐकत होत्या, त्या म्हणाल्या, “बहूने मन्नत मागितली आहे तर ती पूर्ण करायलाच हवी. कुंवर, आपण घेऊन जावे बहूस आपल्या सवे.”

सूर्यनाग काहीच बोलेनात तेव्हा राजाजी म्हणाले, “कुंवर घेऊन जातील आपणांस.”

त्यावर सूर्यनाग पटकन म्हणाला की “आम्हाला राज्यकारभाराची फारच तुंबलेली कार्ये मार्गी लावायची आहेत. सारथी कुंवारीस घेऊन जाईल.” त्यावर शेषनाग म्हणाले “मग चंद्रनागाने जावे बरोबर. एकट्या बहूने जाणे योग्य होणार नाही.” सूर्यनाग यावर क्षणभर गप्प झाले, मग म्हणाले “परंतु सारथ्यासह जावे. प्रवास दूरचा आहे.”

राजाजींनी यावर हमी भरली.

सुवर्णमतीचा चेहरा मलूल झाला , पण तिने संमतीदर्शक मान हलवली.

विवाहोत्तर काहीतरी सतत खटकत होते शेषनागास आणि राणीसरकारांनाही. नवदंपती वरवर जरी सर्व कार्यक्रमात हसतमुखाने सहभागी होत असले तरी काहीतरी वेगळे घडत असल्याची शंका त्यांना सतत येत होती. पण नक्की काय ते सांगणे कठीण होते. आताही त्यांना हे प्रकर्षाने जाणवले. त्यानी एकदा सूर्यनागाशी यावर बोलून पाहायचे ठरवले.

दुसऱ्या दिवशीच कूच करायचे ठरले. सुवर्णमती तयारी करण्यास आपल्या कक्षात आली. कुंवर येण्यास नाही म्हणाले तेव्हा सुवर्णमतीस चांगलेच वाईट वाटले, परंतु चंद्रनाग आल्यास दुसरी एक तिच्या मनीची योजना पूर्ण होण्यास मदत होईल असे तिला वाटले.

सूर्यनागास जे नको तेच घडत होते. आता विचार बदलून, ‘मीच जातो’ असे म्हणणेही उचित दिसले नसते. सारथ्यास पाठवून निदान प्रवासात ही विषकन्या, चंद्रनागाच्या मनात काही विपरीत भरविण्याची शक्यता तरी कमी झाली होती.

चंद्रनागास मात्र या प्रवासाचा आनंद मानावा, की नंतर होणाऱ्या त्रासाचा विचार करावा हे ठरवता येईना.